Hanneborg Farm Agrowon
ॲग्रो विशेष

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

डॉ. राजेंद्र सरकाळे

Hanneborg Farm in Norway : नॉर्वेच्या आग्नेय भागात ओस्लो हे राजधानीचे शहर आहे. ओस्लो हे व्यापार, बँकिंग, उद्योग आणि समुद्र वाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र आहे. येथील अग्रगण्य उद्योगांत ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स आणि ग्राफिक उद्योगाचा समावेश होतो. ओस्लो शहरापासून सुमारे ३२ किलोमीटर अंतरावर असलेल्या हॅनेबॉर्ग फार्मला आम्ही भेट दिली. ओले मार्टिन टॉमटर हे या फार्मचे मालक आहेत. हॅनेबोर्ग फार्म सांभाळणारी त्यांची तिसरी पिढी आहे.

१९९२ मध्ये मार्टिन यांचे वडील जोहान पेटर यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर अवघ्या २६ व्या वर्षी त्यांनी शेतीची सूत्रे स्वीकारली. ओले मार्टिन यांचे आजोबा ओले पेटर टॉमटर हे शेजारी असणाऱ्या त्यांच्या काकांच्या टॉमटर फार्ममध्ये शेतमजूर म्हणून काम करीत होते. शेतात काम करताना शेजारी असणाऱ्या हॅनेबॉर्ग यांच्या पडीक जमिनीकडे ते सतत पाहात असत आणि एक ना एक दिवस मी ही जमीन लागवडीखाली आणणार, असा निर्धार करीत असत.

स्वतःचा व्यवसाय चालवण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या या तरुणाने १९२३ च्या वसंत ऋतूमध्ये एकेदिवशी हिंमत दाखवली आणि त्याने हॅनेबॉर्ग कुटुंबीयांकडे आपली इच्छा मांडली. मला हे शेत विकत घेणे शक्य होईल का, असा प्रश्‍न त्यांनी विचारला. फार्मचे मालक ओल्ड हॅनेबॉर्ग यांना हा मुलगा आणि त्याची महत्त्वाकांक्षा दोन्ही आवडले आणि त्यांनी हे शेत ओले पेटर टॉमटर यांना दिले.

ओले पेटर यांनी या फार्ममध्ये दुग्धशाळा, घोडे व वराहपालन, धान्य, गवत आणि बटाटा यासह पारंपरिक पिके घेतली. १९६२ मध्ये त्यांचा मुलगा जोहान पेटर आणि त्याची पत्नी सिग्रुन यांनी सदरची शेती ताब्यात घेतली. त्यांनी सुरुवातीला वराहपालनावर लक्ष केंद्रित केले. जोहान पेटर यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी अचानक निधन झाल्याने नुकताच कृषी पदवीधर झालेला त्याच मुलगा ओले मार्टिन याच्यावर फार्मची जबाबदारी आली.

ओले मार्टिन यांनी देखील वराहपालनाबरोबर बटाटा आणि धान्य पिके घेण्याची परंपरा सुरू ठेवली. सध्या मार्टिन यांच्याकडे १५ हेक्टर (१५० डेकॉर) क्षेत्र आहे. आपल्याकडे शेतजमीन मोजण्यासाठी जसा गुंठे हे एकक आहे तसे नॉर्वेमध्ये डेकॉर हे जमीन मोजण्याचे एकक आहे. तुलना करावयाची झाल्यास आपल्याकडील १० गुंठे म्हणजे नॉर्वेचे एक डेकॉर क्षेत्र.

नोकरीच्या संधी असतानाही घरची शेती सांभाळण्याची जबाबदारी आल्याने मार्टिन यांनी कृषी शिक्षणाचा उपयोग आपल्या शेतीमध्येच करण्याचा निर्धार केला. पारंपरिक शेती परवडत नव्हती, म्हणून त्यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग सुरू केले. नॉर्वेमध्ये शेतकऱ्यांकडे जमीन धारणा मोठ्या प्रमाणात आहे.

मात्र मनुष्यबळाची कमतरता असल्याने लागवड, आंतरमशागत, कीटकनाशक फवारणी, कापणी आदी अनेक कामे यंत्राद्वारे केली जातात. शेती व्यवसायात प्रत्यक्ष काम करणारी लोकसंख्या फक्त ३ टक्के आहे. सुमारे ८२ टक्के लोकसंख्या शहरी भागात वास्तव्यास असल्याने त्यांना शेती कशी केली जाते,

याचे नेहमीच कुतूहल वाटते. मार्टिन यांनी याच बाबीकडे आपले लक्ष केंद्रित करून, शहरी जनतेला आपल्या शेतात कसे आणता येईल याचा विचार केला. आवश्यक असणारा भाजीपाला शेतामध्ये ग्राहकांना स्वतः तोडून घेण्यात जास्त आनंद वाटेल अशी भन्नाट कल्पना त्यांना सुचली.

विविध पिकांची लागवड :

साधारणपणे १९९५ मध्ये मार्टिन यांनी नॉर्वेमधील भारतीय ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन चार एकर क्षेत्रावर मका लागवडीचा यशस्वी प्रयोग केला. भारतीय ग्राहकांनीदेखील त्याला उत्तम प्रतिसाद दिला. भारतीय नागरिक कुटुंबीयांसोबत शहरातून मार्टिन यांच्या शेतीमध्ये येऊन स्वतः मका तोडून खरेदी करू लागले. त्यांच्यासोबत येणाऱ्या अन्य देशातील नागरिक त्यांच्या देशातील भाज्यांची मागणी करू लागले.

मार्टिन यांनी ही संधी न दवडता पारंपरिक शेती बंद करून मका, झुकेनी, ब्रोकोली, रेड कॅबेज, आईसबर्ग, लेट्यूस, पोकचॉय, कोथिंबीर, टोमॅटो, वाटाणा, काकडी, भेंडी यांसारख्या विविध पिकांची लागवड सुरू केली. टप्याटप्याने घरची १५ हेक्टर जमीन पूर्ण लागवडीखाली आणून शेजारील शेतकऱ्यांची ५० हेक्टर जमीन भाडेपट्ट्याने घेतली. शेताजवळ असणाऱ्या गॅरेजमध्ये त्यांनी भाजीपाला विक्री सुरू केली.

प्रतिकूल वातावरणामुळे वर्षभर भाजीपाला पुरवठा सुरू ठेवण्यास मर्यादा होत्या. परंतु अनुकूल हवामान परिस्थितीमध्ये मार्टिन यांनी विविध पिकांचे उत्पादन सुरू ठेवले. पाणी पुरवठ्यासाठी पॉपअप तुषार सिंचनाचा वापर केला. प्लॅस्टिकचा वापर करून काही प्लॉट आच्छादित केले. काही प्लॉटवर आच्छादन केल्याने तणनाशक खर्चात बचत झाली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून दर्जेदार उत्पादन मिळू लागले.

हिवाळ्यात बर्फवृष्टी होत असल्याने उघड्यावर शेती करणे शक्य नव्हते. म्हणून मार्टिन यांनी पाच गुंठ्यात पाच ग्रीनहाउसची उभारणी केली. त्यामध्ये मका, टोमॅटो, काकडी, मिरची आणि ढोबळी मिरची पिकांची पिट मॉस (मातीविना शेती पद्धती) वापरून कुंड्यांमध्ये लागवड केली. मातीविरहित असल्याने पिकासाठी आवश्यक तेवढीच खते ठिबकद्वारे दिली जातात.

ग्रीनहाउसमध्ये अत्यंत आवश्यकता असल्यास आणि पीकवाढीच्या सुरुवातीच्या काळात कीटकनाशकांचा वापर करण्यास सुरुवात केली. कीड नियंत्रणासाठी परोपजीवी मित्र कीटकांचा वापर करून मार्टिन यांनी रसायन अवशेषमुक्त शेतीमाल विक्री करणारा फार्म म्हणून स्वतःची ओळख तयार केली.

नैसर्गिक पद्धतीने कीड व रोगनियंत्रण करूनदेखील मार्टिन विक्रमी उत्पादन घेत आहेत. ५ गुंठे ग्रीनहाउसध्ये मार्टिन यांना विविध भाजीपाला पिकातून वर्षभरात सरासरी पाच टन उत्पादन मिळते. प्रति किलो विक्री दर ३०० ते ५०० रुपये असल्याने एका ग्रीनहाउसपासून वर्षाला १५ ते ३० लाख रुपये उत्पन्न मिळते. यामध्ये मार्जिन ५० ते ५५ टक्के असल्याने निव्वळ नफा ८ ते १२ लाखांपर्यंत होतो.

फार्म शॉपला सुरुवात :

२०१५ मध्ये मार्टिन यांनी गॅरेजचे रूपांतर फार्म शॉप मॉलमध्ये केले. स्वतःची वेबसाइट विकसित केली आणि अन्य शेतकऱ्यांशी कंत्राटी शेतीचा करार करून सुमारे ६० प्रकारच्या सेंद्रिय भाज्यांचे उत्पादन सुरू केले. मॉलमध्ये भाजीपाला, अंडी, पीठ, मध, बीफ, जॅम, जेली, आइस्क्रीम विक्रीस सुरुवात केली आहे. मॉलमुळे ग्राहकांना गरजेच्या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळू लागल्या.

मॉलच्या वेबसाइटवर दररोज कोणत्या भाज्या विक्रीसाठी तसेच स्वतः तोडण्यासाठी उपलब्ध आहेत याची माहिती प्रदर्शित केली जात असल्याने ग्राहकांची निराशा होत नाही. ऑनलाइन ऑर्डर स्वीकारून त्याची घरपोच सुविधाही उपलब्ध आहे. वेबसाइटवर ग्राहकांच्या प्रतिक्रिया घेतल्या जातात. त्यांच्या रास्त सूचना विचारात घेऊन व्यवस्थापनात तसेच पीक उत्पादनाच्या दृष्टीने आवश्यक बदल केले जातात. या फार्मपासून मार्टिन यांना वार्षिक सुमारे १ ते १.५ कोटी उत्पन्न मिळते.

हॅनेबॉर्ग फार्म हा त्रॉधीम नावाच्या खेडेगावाजवळ आहे. मात्र हे खेडे वाटत नाही. इथल्या इमारती २ ते ३ मजली असून, याच गावात मार्टिन यांनी शेती उत्पन्नातून भव्य बंगला बांधला आहे. त्यांच्याकडे वाहतुकीसाठी गाड्या आहेत. ग्राहकांच्या मागणीस अनुसरून मार्टिन यांनी प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरी तसेच इतर फळ पिकांची लागवड केली आहे. फार्मच्या नावाने ब्रॅण्ड विकसित करून लवकरच अन्य ठिकाणी रिटेल आउटलेटच्या माध्यमातून विक्री सुविधा उपलब्ध करून देण्याचे त्यांचे नियोजन आहे. महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुण शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीपेक्षा अशा प्रकारची शेती करताना वातावरण, बाजारपेठ इत्यादींचा अभ्यास करून कल्पकतेने प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती केल्यास ती निश्‍चितच फायदेशीर ठरेल.

ग्राहकांसाठी भाजीपाला प्लॉट :

ग्राहकांना स्वतः भाजीपाला तोडण्यासाठी सुमारे ८ ते १० प्रकारच्या भाज्यांचे प्लॉट मार्टिन यांनी ठेवले आहेत. ओस्लो शहरातील लोक स्वतःच्या गाडीने मार्टिन यांच्या शेतीवर येतात. स्वतः भाजी तोडतात, त्याचे वजन करून रोख, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा यूपीआयद्वारे पेमेंट करतात. ऑगस्ट-सप्टेंबर या पिकाच्या हंगामात सुमारे ५,००० ग्राहक दररोज मार्टिन यांच्या शेतीला तसेच मॉलमध्ये भेट देतात.

- डॉ. राजेंद्र सरकाळे, ९८५०५८६२२०

(लेखक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT