Norway : उद्योग, मासेमारी, पर्यटनात आघाडी

Article by Dr. Rajesh Sarkale : देशाने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली असून, औद्योगिकीकरणानंतर या देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने विकसित होत गेली. अत्यंत विकसित व समृद्ध असलेला हा देश दरडोई उत्पन्नामध्ये जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Norway
Norway Agrowon

Information about Norway Country : नॉर्वे हा संविधानात्मक राजेशाही असलेला देश आहे. राजेशाही वंशपरंपरागत असून, संविधानानुसार राजाच्या ज्येष्ठ पुत्राला गादी मिळते. १८१४ मध्ये मंजूर झालेले संविधान व त्यात वेळोवेळी झालेल्या दुरुस्त्यांनुसार राज्यकारभार चालतो. राजा हा देशाचा घटनात्मक प्रमुख असून, सर्व शासन त्याच्या नावाने चालते. त्याला संसद बरखास्त करण्याचा मात्र अधिकार नाही. राजा हा सेनाप्रमुख त्याचप्रमाणे प्रमुख धर्मगुरूही असतो.

देशाच्या संविधानात ब्रिटिशांच्या राजकीय परंपरेचा, अमेरिकेच्या संविधान पद्धतीचा आणि फ्रेंचांच्या क्रांतिकारी विचारांचा समन्वय साधण्यात आला आहे. संसदेला स्टॉर्टिंग म्हणतात. २१ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीला निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार आहे. स्त्रियांना हा अधिकार १९१३ पासून मिळाला आहे.

नॉर्वेच्या न्यायदान व्यवस्थेत तडजोड व लवादाच्या तत्त्वाला विशेष महत्त्व दिले आहे. किरकोळ दिवाणी तंटे प्रथम लवाद मंडळाकडे सोपविले जातात. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी या देशातील ‘ओंबुड्समन’ म्हणजे लोकपालाची अभिनव पद्धती आहे. या अधिकाऱ्यामार्फत शासकीय अधिकाऱ्यांच्या गैरवर्तणुकीची अथवा अधिकाराच्या गैरवापराची चौकशी केली जाते.

आर्थिक स्थिती

देशाने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली असून, औद्योगिकीकरणानंतर या देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने विकसित होत गेली. अत्यंत विकसित व समृद्ध असलेला हा देश दरडोई उत्पन्नामध्ये जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. युरोपियन देशांशी तुलना करता या देशातील राहणीमान उच्च दर्जाचे आहे.

२०२२ च्या आकडेवारी प्रमाणे नॉर्वेचे दरडोई उत्पन्न सुमारे ७८,१२८ अमेरिकन डॉलर म्हणजे भारतीय चलनात ६४,०६,४९६ रुपये एवढे आहे. नॉर्वे सध्या प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये २४ व्या क्रमांकावर आहे. तेल व वायूच्या उत्पादनाचा अर्थव्यवस्थेतील हिस्सा २० टक्के आहे. इतर महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये जलविद्युत, मासे, जंगले आणि खनिजे यांचा समावेश आहे. नॉर्वेचा मानवी विकास निर्देशांक जगात सर्वाधिक आहे.

Norway
Agriculture Inflation Formula : महागाई ठरवण्याचे सूत्र, शेतकऱ्यांना लुटीचे अस्त्र

व्यवसाय

नॉर्वेमध्ये शेती, बांधकाम, वन आधारित व्यवसाय, वाहतूक, मासेमारी, खाणकाम, कागदाचा लगदा, इत्यादी प्रमुख व्यवसाय आहे. सर्वाधिक लोक बांधकाम व्यवसायात गुंतलेले आहेत. ऑस्लो, बर्गेन, स्टाव्हांगर, त्रॉनहेम या नॉर्वेच्या प्रमुख बाजारपेठा असून, तेथून स्वीडन, जर्मनी, ब्रिटन, डेन्मार्क, अमेरिका, फ्रान्स या देशांशी व्यापार चालतो.

आयातीत प्रामुख्याने यंत्रे व वाहतुकीची साधने, खनिजे, खनिज तेल, कापड, रसायने व अन्नधान्य या वस्तू अंतर्भूत असून, निर्यातीत यंत्रे व वाहतुकीची साधने, डबाबंद मासे, माशाचे तेल, रसायने, धातू व धातूनिर्मित वस्तू, कागदाचा लगदा इत्यादींचा समावेश होतो.

नॉर्वेतील फलोत्पादन व कृषी पर्यटन हा देखील महत्त्वाचा व्यवसाय आहे.

देशात लोह खनिज आणि लोह गंधकाचे मुख्य साठे आहेत. त्या व्यतिरिक्त चांदी, तांबे, शिसे, जस्त हे धातूही काही प्रमाणात आढळतात. याव्यतिरिक्त दगडी कोळसा, खनिज तेल उपलब्ध आहे.

नॉर्वे हा जगातील पाचव्या क्रमांकाचा खनिज तेल उत्पादक देश आहे.

संदेशवहन आणि वाहतूक

या देशात रस्ते, रेल्वे व जल वाहतूक ही मुख्य व्यवस्था आहे. देशात १८५४ मध्ये रेल्वेची सुरुवात झाली. रेल्वेचे राष्ट्रीयीकरण झाले आहे. देशात विमान वाहतूक वाढत असून, ती हिवाळ्यात जास्त असते. देशाला प्रदीर्घ व खुला सागरी किनारा लाभला असल्यामुळे किनाऱ्यावरील व खोल समुद्रातील सागरी वाहतुकीत हा देश अग्रेसर आहे.

मासेमारी

मासेमारी हा नॉर्वेचा प्रमुख व्यवसाय आहे. यांत्रिकीकरणामुळे मासेमारीचे उत्पादन दुप्पट झाले असून, इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे माशांच्या घोळक्यांचा शोध घेतला जाऊन ती माहिती मच्छीमारांना पुरविली जाते. कॉड व व्हेल (देवमासा) हे प्रमुख मासे येथे सापडतात. माशांवर विविध प्रकारच्या प्रक्रिया करून अधिक उत्पन्न मिळविले जाते. शीतगृहांची संख्या वाढल्याने आता माशांचे उत्पादन दुपटीने वाढले आहे.

Norway
Norway : नॉर्वे : व्यापार, उद्योगाचा केंद्रबिंदू

बँकिंग व्यवस्था

या देशाने बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रगती केली असून, आधुनिक बँकिंग प्रणालीचा वापर केला आहे. डिजिटल बँकिंगचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. नॉर्जस बँक ही या देशातील केंद्रीय बँक आहे. या देशात काही खासगी बँका, काही व्यापारी बँका, रिजनल सेव्हिंग्ज बँका, विविध लहान सेव्हिंग्ज बँका आहेत. काही युरोपमधील परकीय बँका या देशात आहेत. डीएनबी ही नॉर्वे देशातील सर्वांत मोठी बँक आहे. ही बँक ग्राहकांना सर्व आर्थिक सेवा देते, उदाहरणार्थ, कर्ज, ठेवी, विमा, पेन्शन अशा व यांसारख्या सेवा या बँका वैयक्तिक व कॉर्पोरेट ग्राहकांनाही देतात.

शेती आणि पशुपालन

जलविद्युत शक्तीचा विकास होण्यापूर्वी नॉर्वे हा मुख्यतः कृषिप्रधान देश होता. असमान भूपृष्ठरचना व हलक्या प्रतीच्या जमिनीमुळे लागवड क्षेत्र मर्यादीत आहे. देशातील ७४ टक्के जमीन नापीक असून २१ टक्के अरण्यव्याप्त आहे. फक्त ५ टक्के जमीन शेतीसाठी उपलब्ध आहे. यातील निम्म्याहून अधिक यॅरन व ट्रन्नलाग या प्रदेशांत आहे.

शेतीखालील जमीन दऱ्याखोऱ्यांत विखुरलेली आहे. काही क्षेत्र सरोवरांच्या जवळपास आहे. शेती खासगी मालकीची असून, शेतमजुरांत स्त्रियांचे प्रमाण मोठे आहे. बटाटे, सातू, ओट, गहू या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. गवताचे उत्पादन पशुखाद्य म्हणून घेतले जाते.

गाई, म्हशी, शेळ्यामेंढ्यांचे प्रमाण या देशात जास्त असून, शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होतो.

शेतकरी पशुपालन व दुग्ध व्यवसाय हे दोन महत्त्वाचे जोडधंदे करतात. पशुपालनामध्ये वराहपालन व कुक्कुटपालन हे व्यवसाय केले जातात.

शेतीसाठी अतिशय कमी भूमी उपलब्ध असल्याने नॉर्वेला प्रतिवर्षी प्रमुख अन्नधान्ये आयात करावी लागतात. दुग्ध व्यवसायातील उत्पादने, अंडी व मांस या बाबतीत देश स्वयंपूर्ण आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com