Norway Agriculture : नॉर्वेमधील शेतकऱ्यांची फलोत्पादनाला कृषी पर्यटनाची साथ

Article by Dr. Rajendra Sarkale : वाढत्या शहरीकरणामुळे कृषी पर्यटनाला मागणी वाढत आहे. शेतीशी संबंध नसणे किंवा तुटणे यामुळे शहरी लोक सुट्टीच्या दिवशी शेतामध्ये जाऊ लागले आहेत. शेतीला कृषी पर्यटनाची जोड मिळाल्यास वर्षभर उत्पन्नाची खात्री मिळते. नॉर्वेमधील फळबाग आणि कृषी पर्यटनाचा मागोवा घेतला असता, याची अनुभूती आपणास प्रत्यक्ष येते.
Norway Agriculture
Norway Agriculture Agrowon

डॉ. राजेंद्र सरकाळे

Norway Agrotourism : नॉर्वे हा पर्यटन व्यवसायाला चालना देणारा देश आहे. या देशाला पर्यटन व्यवसायातून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते. घनदाट जंगल, प्राणी, धबधबे यापासून ते दुर्गम जंगलातून काढलेला रेल्वेमार्ग हे येथील पर्यटनाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. देशी-विदेशी पर्यटक जंगलातील हॉटेल किंवा फार्म हाउसमध्ये राहणे पसंत करतात. काही लोक कॅरीव्हॅन घेऊन निसर्ग, धबधब्याचा आनंद घेण्यासाठी येतात.

कॅरीव्हॅनमध्ये अंघोळीपासून ते मुक्कामापर्यंतच्या सुविधा असतात. कॅरीव्हॅन इच्छित स्थळी नेता येत असल्यामुळे नॉर्वेतील बहुतांश नागरिकांकडे ही व्हॅन असते. जंगल, डोंगर, समुद्रालगत कोठेही वाहनाला जोडलेला टेन्ट उघडून किंवा त्या वाहनांत मुक्काम करून लोक निसर्गाचा आनंद घेतात.

Norway Agriculture
Norway : नॉर्वे : व्यापार, उद्योगाचा केंद्रबिंदू

पीच, सफरचंद बागेला भेट :

नॉर्वे अभ्यास दौऱ्यात बर्गेन या ठिकाणी आम्ही सफरचंद, पिच फळबागेस भेट दिली. येथील हवामान आल्हाददायक व थंड असल्यामुळे सफरचंद व पीच ही पिके उत्तम येतात. दौऱ्यात आम्ही पीच फळबागेस भेट दिली. झाडे ३ ते ४ फूट उंचीची होती. पीच फळ हिरवट लालसर रंगाचे, तुरट-गोड चवीचे असून सफरचंदासारखे दिसते.

फळबागेची व्यावसायिक पद्धतीने जोपासना करून दर्जेदार उत्पादन घेतले जाते. शेतकरी फळांची शेतामध्ये तसेच रस्त्यालगत स्टॉल उभारून विक्री करून चांगले उत्पन्न मिळवितात. निसर्गरम्य ठिकाणी जाणारे पर्यटक पीच फळांचा स्वाद घेण्यासाठी रस्त्यालगत असणाऱ्या बागांजवळ थांबतात. या बागेमध्ये रोपांच्या दोन ओळी आणि दोन रोपांतील अंतर १२ फूट ठेवले होते. बागेला शिफारशीनुसार सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर करण्यात येत होता.

एका झाडापासून वर्षाला ५ ते ६ किलो फळे मिळतात. एका किलोस ३९ नॉर्वेजियन क्रोन (३०० रुपये) दर होता. एक एकर पीच लागवडीपासून शेतकऱ्यास ४.५० ते ५.५० लाख रुपये उत्पन्न मिळते. येथे उत्पन्नानुसार सरकारला कर द्यावा लागतो. स्वतः फळांची विक्री करीत असल्याने फळबाग किफायतशीर असल्याचे शेतकरी सांगतात. या ठिकाणी हमखास पाऊस पडत असल्याने पाण्यासाठी शासकीय यंत्रणांवर विसंबून राहावे लागत नाही. पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकरी बागेलगत विहीर किंवा कूपनलिकेची सोय करतात. चांगल्या प्रकारे पीच झाडांची जोपासना केल्यास २० वर्षांपर्यंत उत्पन्न मिळते.

पीच फळ झाडाशिवाय या परिसरात सफरचंदाची लागवड पाहावयास मिळते. आम्ही भेट दिलेल्या शेतकऱ्याची पाच एकरांवर सफरचंदाची लागवड होती. भेट दिली तेव्हा सफरचंदाचा हंगाम सुरू झाला नसल्याने पक्व फळे पाहता आली नाहीत. मात्र बाग हिरव्या सफरचंदांनी लगडलेली होती. सफरचंद फळास ग्रीक व युरोपमध्ये धार्मिक महत्त्व आहे. या ठिकाणी रेड अॅरोमा जातीच्या रोपांची लागवड १२ बाय ३ फूट अंतरावर हाय डेन्सिटी पद्धतीने केली होती.

झाड लहान असतानाच एक इंच जाडीची दोन फूट उंच प्लॅस्टिक पाइप जमिनीत रोवून त्यातून रोप जमिनीच्यावर वाढविले होते. यामुळे रोपे सरळ राहतात, वेडीवाकडी वाढत नाहीत. तसेच रोपे लहान असताना त्यास मुंग्या लागत नाहीत. झाडाची पुरेशा प्रमाणात वाढ होऊन खोड वाढण्यास सुरुवात झाल्यावर ही पाइप कापून काढली जाते.

सफरचंदास एप्रिल-मे मध्ये फलधारणा होते. तोडणी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये केली जाते. २० ते २५ अंश सेल्सिअस तापमान वाढीसाठी उत्तम असते. लागवडीनंतर उत्पादन मिळण्यास पाच वर्षांचा कालावधी लागतो. पाच वर्षांनंतर प्रत्येक झाडापासून ६ ते ७ किलो फळे याप्रमाणे एक एकर क्षेत्रातून ८ टन सफरचंदांचे उत्पादन मिळते. सफरचंद विक्रीचा दर प्रति किलो ९ नॉर्वेजियन क्रोन (७० रुपये) होता. एक एकर सफरचंद लागवडीपासून सुमारे ५.६० लाख उत्पन्न मिळत असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.

येथील शेतकरी स्वतः फळांची विक्री करीत असल्यामुळे त्यांना चांगला फायदा होतो. फळांची ‘ए’ आणि ‘बी’ अशी प्रतवारी केली जाते. ‘ए’ ग्रेड फळांची स्थानिक बाजारपेठेत विक्री होते. ‘बी’ ग्रेड फळांवर प्रक्रिया करून ज्यूस व इतर पदार्थ तयार केले जातात. विक्रीसाठी फळे शहरात पाठविताना त्यांना देखील दलालांचा त्रास होतो. पॅकिंग, वाहतुकीसाठी वेगळा खर्च होत असल्यामुळे बाहेरच्या विक्रीवर पूर्णपणे अवलंबून राहता येत नाही.

Norway Agriculture
Epistemology of Agriculture : शेतीचे ज्ञानशास्त्र : अन्नाचे ज्ञान म्हणजे काय?


संपूर्ण शेती अद्ययावत यंत्रांद्वारे केली जाते. फळे फक्त हाताने तोडली जातात. सर्व फळपिकांचा हंगाम जवळपास एकाच वेळी येत असल्यामुळे फळे तोडण्यासाठी गरजूंना अर्धवेळ काम दिले जाते. तासाला १३० क्रोनर (१००० रुपये) मजुरी मिळते. मजूर स्वतःच्या कारमधून कामासाठी येतात. ३ ते ६ महिने फळतोडणीचे काम करणाऱ्या मजुराला तासाला १५० क्रोनर (१,१६४ रुपये) मजुरी मिळते.

मजूर आठवड्याला ३० तास काम करतात. आठवड्याला ३० ते ३५ हजार रुपये मजुरी मिळते. मजुरास कायमस्वरूपी शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सवलती मिळतात. पुरुष व स्त्री भेदभाव न करता दोघांना समान मजुरी मिळते. या देशात एकूण उत्पन्नाच्या २२ टक्के कर भरावा लागतो. तरीसुद्धा शेती व्यवसाय परवडतो, असे शेतकरी सांगतात.

शेतात रासायनिक खतांचा वापर कमी प्रमाणात होतो. सेंद्रिय खते वापरण्याकडे कल आहे. पाणी ठिबक सिंचनाने दिले जाते. काही ठिकाणी शेती पावसावर अवलंबून आहे. महाराष्ट्रामध्ये थंड हवेच्या ठिकाणी म्हणजेच माथेरान, लोणावळा, महाबळेश्‍वर, पाचगणी, पाटण या ठिकाणी ब्ल्यूबेरी, रासबेरी, गुसबेरी तसेच सफरचंदाची प्रायोगिक तत्त्वावर लागवड करून नॉर्वेप्रमाणे उत्तम प्रकारे उत्पादन घेणे शक्य आहे. काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी असे प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली आहे.

कृषी पर्यटनास चालना :

युरोपीय देशांत शनिवार, रविवार सुट्टीचे दिवस असतात. पाच दिवस काम केल्यानंतर दोन दिवस विश्रांती आणि आनंदासाठी घालविले जातात. नॉर्वे या देशाने कृषी पर्यटनाला गती दिली आहे. कृषी पर्यटनामध्ये स्थानिक शेती, पाळीव प्राण्यांचे संगोपन कसे केले जाते हे पाहता येते. परिसरात सफारी, खाणे, पोहणे आदींचा आनंद घेता येतो.

नॉर्वे देशातील जंगलात रेन्डियर प्राण्याचे कळप आहेत. घोडेस्वारी देखील मोठ्या प्रमाणावर चालते. या ठिकाणी रेन्डियरचे मटण सहज उपलब्ध होत असल्याने त्याचा आस्वाद घेणारे लोक अधिक दिसतात.

वर्षभर पाऊस पडत असल्याने निसर्गरम्य धबधबे, जंगल सफारी, उंच डोंगर आणि खोल दऱ्यांमधून गंडोलाद्वारे प्रवास करता येतो. गंडोला म्हणजे रोप-वे. दोन टेकड्यांमध्ये उंच मनोरे उभारून जाड तारांना ४ ते ६ माणसे वाहून नेणारी हलकी लिफ्ट. यामधून प्रवास करताना खोल दऱ्या, नद्या पाहून अंगावर शहारे येतात. सोबतच परिसरातील निसर्गरम्य दृश्य उंचावरून पाहताना वेगळीच अनुभूती येते.

आमच्या दौऱ्यामध्ये कृषी पर्यटनाच्या दृष्टीने थ्री-स्टार फार्म हाऊस पाहावयास मिळाले. १०० खोल्या असलेल्या या फार्म हाउसचे काम स्वयंचलित पद्धतीने चालते. या फार्म हाउसवर केवळ ३ ते ४ कामगार होते. कृषी पदवीधर व्यक्ती हे फार्म हाउस सांभाळत होती. या ठिकाणी घोडेस्वारीपासून निसर्ग व धबधब्यांचा आनंद घेता येत होता.

युरोपमध्ये नेहमी ऊन पावसाचा खेळ पाहावयास मिळत असल्यामुळे निसर्ग कायम हिरवागार दिसतो. या ठिकाणी फिरताना आम्ही तीन गट तयार केले होते. एक गट जंगलातील झाडांचा अभ्यास करण्यासाठी, दुसरा गट प्राणी पाहण्यासाठी आणि तिसरा गट निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी गेला होता.

- डॉ. राजेंद्र सरकाळे, ९८५०५८६२२०,
(लेखक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com