डॉ. चंद्रशेखर पवार, डॉ. सतीश पाटील
मागील लेखामध्ये आपण हिमालयापासून दक्षिणेपर्यंतच्या भारतातील सर्व नद्यांमध्ये वातावरणीय बदलांमुळे होत असलेल्या परिणामांची माहिती घेतली. हिमालयीन बर्फाच्छादित प्रदेश हा उत्तरेतील नद्यांसाठी वरदान ठरतो. (उदा. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा इ.) या नदी खोऱ्यांमधील उपलब्ध जलसंपत्तीच्या आधारे भारतात कृषी विकास शक्य झाला आहे.
भारताच्या हिमालयीन क्षेत्रांमध्ये ९,०४० हिमनग असून, त्याखाली १८,५२८ वर्ग कि.मी. भौगोलिक क्षेत्र व्यापले आहे. त्यावर सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा या नद्यांची खोरी अवलंबून आहेत.(संगेवार २००९, शर्मा २०१३).
उन्हाळ्यात वितळलेल्या बर्फांपासून सर्वाधिक फायदा सिंधू व त्या खालोखाल गंगा आणि ब्रह्मपुत्रा या खोऱ्यास होतो. मात्र सिंधू नदीचे पात्र हे भारतात ३९ टक्के, पाकिस्तानात ४७ टक्के, चीनमध्ये ८ टक्के आणि अफगाणिस्तानला ६ टक्के लाभलेले आहे.
याशिवाय झांस्कर, चिनाब, झेलम, रावी, सतलज आणि बियास या डाव्या बाजूच्या किनाऱ्यावरून मिळणाऱ्या नद्या, तर शोक आणि नुबारा उजव्या काठावरून मिळणाऱ्या महत्त्वाच्या नद्या आहेत. त्यांची हिमालयातून पाणी वाहून आणण्याची क्षमता जास्त आहे. हिमालयाच्या एकूण क्षेत्रफळापैकी जवळपास दहा ते वीस टक्के क्षेत्र हे बर्फाच्छादित आहे. सर्वसाधारणपणे ३० ते ४० टक्के क्षेत्र हे हंगामी बर्फाखाली झाकले जाते. या बर्फामुळे हिमालयीन नद्यांना बारमाही पाणी उपलब्ध होते. बहादूर या शास्त्रज्ञाच्या मते हिमालयातून येणाऱ्या नद्यांमधून भारतामध्ये ५०० घन कि.मी. इतके पाणी बर्फ, हिमनगांपासून उपलब्ध होते.
विशेष म्हणजे हे हिमालयातील हिमनगांचे व बर्फाचे क्षेत्र दुष्काळ प्रवण परिस्थितीमध्ये जास्त पाणी देतात, मॉन्सून काळात तुलनेने कमी पाणी देतात. म्हणजेच पावसाळ्यातील पावसामुळे महापूराची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी होते. गेल्या चार दशकांमध्ये झालेल्या वातावरणीय बदलांमुळे ६७ टक्के हिमालयीन हिमनग व बर्फाच्छादित प्रदेशांकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे अजेठा (१९९२) आणि फुशिमि (२०००) शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
सिंधू व तिच्या उपनद्यांमधील जलसंपत्तीच्या वापराबाबत भारताने चांगली धोरणे आखली आहेत. भाक्रा नांगलसारख्या प्रकल्पांची उभारणी करून पाणी वापराचे योग्य नियोजन केले आहे. सिंधू नदी खोऱ्याबरोबर भारतातील सर्वात महत्त्वाच्या गंगा, ब्रह्मपुत्रा आणि मेघना नद्यांचे खोरे भारताचे विकासामध्ये मोलाची भूमिका बजावते. मात्र संशोधनातून वातावरणीय बदलांमुळे होणारे संभाव्य परिणाम पुढील प्रमाणे -
गंगा, ब्रह्मपुत्रा आणि मेघना या तीनही नदी खोऱ्यांमध्ये पाणी प्रवाह अनुक्रमे ३३.१ टक्के १६.२ टक्के आणि ३९.६० टक्के इतका वाढण्याचे शक्यता मसूद (२०१५) या शास्त्रज्ञाने व्यक्त केली आहे. यापैकी ब्रह्मपुत्रा नदी खोरे हे जगामधील चौथ्या क्रमांकाचे वार्षिक सर्वाधिक पाणी वाहून आणणारे नदी खोरे असल्याचे मिर्झा (२००१) हा शास्त्रज्ञ म्हणतो.
जागतिक वातावरणीय बदलांचा अभ्यास करणाऱ्या ‘जनरल सर्क्युलेशन मॉडेल’ (GCM) नुसार, वातावरणातील वायू प्रदूषणामुळे झालेल्या बदलांमुळे ब्रह्मपुत्रा आणि सिंधू नदीच्या ऊर्ध्व खोऱ्यांमध्ये २०४६ ते २०६५ या वर्षादरम्यान नदी प्रवाह कमी होण्याची शक्यता वर्तविली आहे.
ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्यातील चिलमारी या ठिकाणी २१ व्या शतकाच्या अंतापर्यंत ५ ते २० टक्के प्रवाह वाढण्याची शक्यता महानता (२०१४) या शास्त्रज्ञाने ‘जीएसएम’ तंत्राच्या वापरानंतर वर्तविली आहे.
कमाल (२०१३) या शास्त्रज्ञाने मेघना नदीच्या निम्न खोऱ्यामध्ये ४.५ ते ३९.१ टक्के नदी प्रवाह मॉन्सून पर्जन्यादरम्यान वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.
सन १७५० दरम्यानच्या ब्रह्मपुत्रा आणि देहिंग या नद्यांमधील प्रवाहांमुळे तयार झालेल्या महापूरामुळे जगातील सर्वात मोठ्या माजुली या नदी बेटाचे नुकसान झाल्याचे जैन (२००७), व सारमा आणि फुकण (२००४) यांनी संशोधनाद्वारे सिद्ध केले आहे. या बेटाचे एकूण क्षेत्रफळ १९७१ मध्ये ७५१.३१ वर्ग कि.मी. वरून घसरून ते २००१ मध्ये ४२१.६५ वर्ग कि.मी. इतकी असल्याचे नमूद केले आहे. याशिवाय दरवर्षी ३.४३ वर्ग कि.मी. या बेटाच्या जमीन क्षेत्रफळाचा नाश होत असल्याचे देखील या संशोधकांनी सिद्ध केले आहे.
कर्नाटक मधील तुंगभद्रा या नदीच्या प्रवाहामध्ये सन २०७५ ते २१०० या दरम्यान ३८ टक्क्यांची वाढ होण्याचे शक्यता मिनू (२०१३) या शास्त्रज्ञाने हॅडसीएम, जीएसएम च्या आधारे सांगितले आहे.
एकूणच सिंधू व गंगा नदी खोरे हे भारताच्या जलसंपत्तीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आणि इतक्या विघातक समस्या निर्माण होण्याची शक्यता असूनही कोणत्याही उपाययोजना किंवा धोरण आखलेले दिसत नाही. वातावरण बदलामुळे भारतासारख्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांवर होणारे सामाजिक व आर्थिक परिणाम अत्यंत गुंतागुंतीचे असणार आहेत. आपल्यासमोर केवळ दोनच पर्याय आहेत, एक तर वातावरणीय बदलाचा आहे तसा स्वीकार करायचा किंवा गंभीर स्वरूपाचे बदल होऊ नये म्हणून काळजी घ्यायची.
वातावरणीय बदलांमुळे जल, कृषी, नैसर्गिक परिस्थितिकीय व्यवस्था, जैवविविधता आणि मानवी आरोग्य अशा सर्वच घटकांवर गंभीर परिणाम होत आहेत. वातावरण बदलाच्या अनिश्चितता चार पद्धतीने तपासाव्या लागणार आहे. त्या पुढील प्रमाणे.
वातावरणीय बदलाची वेळ, तीव्रता आणि प्रकार
नैसर्गिक परिसंस्थांची वातावरण बदलांना सामोरे जाण्याची नैसर्गिक किंवा मानवनिर्मित क्षमता.
भविष्यातील वाढती लोकसंख्या व आर्थिक उलाढालीमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीवर होणारे परिणाम.
वातावरणीय बदलांना सामोरे जाण्याची समाजाची, उद्योगाची किंवा व्यावसायिकांची मानसिकता आणि धोरण निश्चिती.
आतापर्यंत हवामान बदलाबाबत सातत्याने चर्चा होत असली तरी भारतीय धोरणकर्ते अद्याप जागे झालेले दिसत नाही. निदान त्यांच्या कृती आणि साधनांचा अभावावरून तरी तसेच म्हणावे लागते. आज ज्या हिमालयीन नद्यांवर कृषी विकासासाठी आपण अवलंबून आहोत, त्यावरच वातावरण बदलाचा मोठा आघात होणार आहे. भविष्यात तो शाश्वत न राहता अस्थिर होईल, असेच सारे संशोधक दाखवून देत आहेत.
वातावरण बदलामुळे संपूर्ण भारतामध्ये पर्जन्याची विगतवारी विषम स्वरूपाची असण्याची शक्यता गृहीत धरूनच उपलब्ध होणाऱ्या पर्जन्यांचे व्यवस्थापन करावे लागणार आहे. या दृष्टिकोनातून भारतातील जलसंपत्तीचा आढावा घेऊ. एकूणच भारतामध्ये हिमालयांपासून दक्षिणेपर्यंतच्या सर्वच नद्यांमध्ये नदी प्रवाहांचे प्रवाह अस्थिर असल्याचे संशोधनांत दिसून आले आहे. ही अस्थिरता निश्चितपणाने कमी करण्यासाठी नद्यांच्या उपखोऱ्यांमध्ये व अवर्षण प्रवण क्षेत्रांमध्ये पाणलोट क्षेत्र विकास आणि व्यवस्थापन महत्त्वाचे ठरणार आहे.
- डॉ. चंद्रशेखर पवार, ९९२३१२२७९१, (संचालक, शिवश्री पर्यावरण संस्था, पुणे.)
- डॉ. सतीश पाटील, ९४२२७०७२६१, (प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.