
डॉ. चंद्रशेखर पवार, डॉ. सतीश पाटील
Global Warming farming impactsजागतिक तापमान वाढीच्या एकूणच पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा विचार प्राधान्याने केला जात असला तरी त्याचा सर्वाधिक फटका कृषी क्षेत्रास बसणार आहे. गेल्या तीन, चार दशकांमध्ये नैसर्गिक ऋतुचक्रामध्ये होत असलेले तीव्र बदल प्रकर्षाने जाणवत आहेत. सर्वसाधारणपणे प्रत्येक जण ढोबळपणे ‘हवामान बदल’ हा शब्द हवामान बदल (Weather change) आणि वातावरणीय बदल (Climate change) या दोन्ही संकल्पनांसाठी वापरत असले, तरी त्यातील नेमका फरक समजावून घेणे गरजेचे आहे.
हवामान बदल ही संकल्पना अल्प काळातील अभ्यासावरून काढलेल्या निष्कर्षांसाठी वापरता येईल. उदा. हवेचे तापमान (बॅरोमेट्रिक), दाब, हवेतील, आर्द्रता, पर्जन्यमान, सूर्यकिरण आणि वारा इ. घटकांचा २४ तासांचा किंवा काही कालावधीसाठी अभ्यास केला जातो. त्यामुळे दिसून आलेल्या बदलाला हवामानातील बदल म्हणता येईल. मात्र वातावरणीय बदलांचा (क्लायमेट चेंज) अभ्यास करण्यासाठी कमीत कमी ३० वर्षे किंवा त्याहून अधिक कालखंडासाठी माहितीचे संकलन करून त्यावरून निष्कर्ष काढावा लागतात.
वातावरणीय बदलांच्या अभ्यासासाठी आर्द्रता, पृष्ठभागाजवळील हवेचे तापमान, महासागरांवरील तापमान, समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान, महासागराचे प्रमाण, समुद्र पातळी आणि जमिनीवरील तापमान इ. घटकांचा अभ्यास करावा लागतो. कारण वातावरणीय बदल ही संथ गुंतागुंतीची प्रक्रिया असून, त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. पृथ्वीच्या बदलत चाललेल्या वातावरणाशी काही प्रमाणात आपण जुळवून घेत असलो तरी मानवी तंत्रज्ञानास मर्यादा आहेत. गेल्या चारशे वर्षांमध्ये पृथ्वी सर्वाधिक तप्त आहे. हे बदल मानवांसोबत अन्य जीवसृष्टीला कठीण जात आहेत. औद्योगिक विकास आणि अन्य विकास प्रक्रियांमुळे वातावरण बदलाच्या प्रक्रियांचा वेग वाढतच चालला आहे.
विकासाची प्रक्रिया अखंडित ठेवण्यासाठी ऊर्जेचा वापर वाढत आहे. यासाठी कोळसा आणि खनिज तेल यांसारख्या नैसर्गिक इंधनांचे बेसुमार उत्खनन होत आहे. त्यांच्या ज्वलनातून हरितगृह वायूंचे उत्सर्जन होत आहे. हरितगृह वायूंमध्ये बाष्प, कार्बन डायऑक्साइड (CO२), मिथेन (CH४), नायट्रेट्स ऑक्साइड (N२O), सल्फर हेक्झाफ्लोराइड (SF६), हेलोकार्बन (हायड्रोफ्लुरो कार्बन) (HFCs), आणि पर-फ्लुरोकार्बन्स (PFCs) हे वायू घातक ठरत आहेत. वातावरणातील त्यांचे प्रमाण वाढल्यामुळे हरितगृह परिणाम बळावून अधिक उष्णता कोंडली जाते.
वातावरणात वाढलेली उष्णता हवामानाच्या बदलाच्या स्वरूपात दृश्य व दीर्घकालीन बदल घडवून आणते. हवामान बदलावर कार्यरत आंतरशासकीय यंत्रणा (IPCC), जागतिक हवामान अभ्यास संघटना (World Metrological Organisation), निसर्ग संवर्धनासाठी जागतिक निधी संस्था (Worldwide fund for Nature) अशा अनेक संस्था हवामान बदलांबाबत संशोधन करत आहेत. त्यांच्या सातत्याने प्रकाशित होणाऱ्या अहवालातून पुढे येत असलेले परिणाम भविष्यातील धोके सांगण्याचे काम करत आहेत. उदा. पृष्ठभागावरील सरासरी तापमान ०.४ ते ०.६ अंश सेल्सिअसने वाढले आहे. भारतात हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण व तीव्रता वाढणार आहेत. उदा. वादळे, महापूर, दुष्काळ, शेतीचे वाळवंटीकरण, जमिनीतील आर्द्रतेचा ऱ्हास, सेंद्रिय कर्बाचे कमी झालेले प्रमाण इ.
- महाराष्ट्रामध्ये २०१९ ते २०२३ या वर्षांमध्ये निसर्ग, यास, तोक्ते या चक्रीवादळांनी अरबी समुद्र किनारपट्टीला तडाखे दिले. वातावरणीय बदलांच्या बाबतीमध्ये विसावे शतक व त्यामधील औद्योगिकीकरणामुळे विसाव्या शतकात आणि वाढत्या तंत्रज्ञानामुळे २१ व्या शतकातही वातावरणीय बदलांची तीव्रता वाढत आहे. यामुळे वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन २८० ppmv (पार्टस पर मिलियन बाय व्हॉल्युम) वरून ते ३६९ ppmv इथपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे पृथ्वीचे सरासरी तापमान ०.६ अंश सेल्सिअसने वाढले आहे. वाढलेल्या तापमानामुळे जागतिक समुद्र पातळी सरासरी दहा ते वीस सें.मी.ने वाढली आहे.
गेल्या ५० वर्षांमध्ये अटलांटिक महासागरातील बर्फाची जाडी उन्हाळ्यामध्ये ४० टक्क्यांनी कमी होत आहे. १९३६ ते १९९९ या वर्षांमध्ये अटलांटिक महासागरामध्ये वाहून येणाऱ्या सहा मोठ्या इरोशिअन नदीपात्रांमधील महापूरांची तीव्रता सात टक्क्यांनी वाढल्याचेही पुढे आले आहे. जगभरातील बहुतांश मोठ्या नदीपात्र महापुरासाठी संवेदनसील बनल्याचे ‘नदी संनियंत्रण माहिती प्रणाली’तून पुढे येत आहे. याबाबत कुमार, २०१० आणि मोडल, २०१५ या दोघा शास्त्रज्ञांनी भारतामध्ये ३०६ ठिकाणच्या मोसम विज्ञान केंद्राच्या माहितीचे संकलन करून (सन १८७१ ते २००५) १३५ वर्षांच्या हवामानाविषयीच्या माहितीच्या आधारे काढलेले निष्कर्ष असे -
देशांमध्ये सरासरी मॉन्सून पर्जन्यामध्ये बदल होणार नाही.
वातावरणीय बदलांमुळे भारतीय पर्जन्यमानावर मोठा परिणाम होणार नसला तरी कमी कालखंडामध्ये जास्त पाऊस पडणे किंवा मोठ्या कालखंडाकरता पर्जन्यमान खंडित होणे असे परिणाम दिसू शकतील.
प्रदूषणाची तीव्रता कमी राखणे शक्य झाल्यास एकविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत जागतिक सरासरी तापमान १.४ ते ३ अंश सेल्सिअस इतके वाढेल. मात्र प्रदूषणाची तीव्रता वाढत राहिल्यास तापमानामध्ये २.५ अंशांपासून ५.८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होऊ शकते.
वरील सर्व हवामान घटकांचा पर्जन्य चक्रावरही तीव्र परिणाम होणार असल्याचे संशोधनांतून पुढे येत आहे. त्यामुळे भारतासारख्या देशांमध्ये तीव्र महापूर व उर्वरित कालखंडामध्ये तीव्र दुष्काळ अशा समस्या उद्भवतील.
भारतातील नद्या व अन्य जलसंसाधनाची स्थिती
भारतामध्ये हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या व त्यांचे जलस्रोत कृषी क्षेत्रामध्ये पर्यायाने अन्नधान्य निर्मितीमध्ये मोलाची निभावतात.
भारतामध्ये मोठी १२ नदीपात्रे व नदी प्रणाली असून, त्यात २५२.८ दशलक्ष हेक्टर पाणलोट क्षेत्र समाविष्ट होते. वार्षिक सरासरी १५७०.९८ अब्ज घनमीटर म्हणजेच नैसर्गिक अपधावाच्या ८५ टक्के पाणी उपलब्ध होते.
मध्यम स्वरूपाची ४८ नदी पात्रे वर्गीकृत असून, त्यांच्या पाणलोट क्षेत्रांत २४.९ दशलक्ष हेक्टर क्षेत्र समाविष्ट होते. मध्यम स्वरूपाचा अपघाव उपलब्ध होणाऱ्या नद्यांमध्ये काही नद्या हंगामी स्वरूपाच्या आहेत. सरासरी सर्व नद्यांमध्ये जून ते ऑक्टोबर अखेर मॉन्सून पर्जन्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जल उपलब्धता होते.
हिमालयातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये उपलब्ध होणारा अपधाव हा मध्य व दक्षिणेकडील नद्यांपेक्षा जवळपास दुप्पट आहे. यासाठी हिमालयातील बर्फाच्छादित भाग कारणीभूत ठरतो. बर्फापासून मिळणाऱ्या पाण्याचा सिंधू नदीला सर्वाधिक फायदा होतो (ग्लॅसिएशन इन्टेन्सिटी २.५ ते १०.८ टक्के), त्या खालोखाल गंगा नदीस फायदा होतो. तिची ग्लॅसिएशन इन्टेन्सिटी ०.४ ते १० टक्के आहे. तर ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामध्ये बर्फापासून पाणी उपलब्धतेची तीव्रता ०.४ ते ४ टक्के इतकी कमी आहे. एकूणच बर्फापासून मिळणाऱ्या पाण्याचा हिमालयीन नद्यांना फायदा होत असला तरी देखील मॉन्सूनच्या पर्जन्यापासून मिळणाऱ्या पाण्याचे महत्त्व देशासाठी अनन्यसाधारण आहे. मध्य व दक्षिण भारतामध्ये ही परिस्थिती नाही.
भारतीय मौसम विभागाने २००० ते २०१६ या कालखंडामध्ये २०१६ हे सर्वाधिक तप्त वर्ष घोषित केले आहे. १९७१ ते २००३ यादरम्यान कोठावळे व कुमार, (२००५) या शास्त्रज्ञांनी दर दहा वर्षांनी ०.२२ अंश सेल्सिअसने तापमान वाढल्याचे नमूद केले आहे, तर पंत आणि कुमार, (१९९७) यांनी पाठीमागील शंभर वर्षांमध्ये त्यामध्ये ०.५७ अंश सेल्सिअस तापमान वाढल्याचे नमूद केले आहे. या वातावरण बदलामुळे विशिष्ट नदीपात्रांमधील उपलब्ध होणाऱ्या प्रवाहांवर अनेक संशोधने झाली आहेत.
यूएनएफएओ (UNFAO) या संस्थेच्या अहवालानुसार प्रति माणशी पाणी उपलब्धतेमध्ये भारताचा जगामध्ये १३२ वा क्रमांक असल्याचे सांगितले आहे.
अमरसिंगे (२००५) या शास्त्रज्ञाच्या मते भारतामध्ये जलसंपत्तीचे विगतवारी विषम स्वरूपाची आहे. ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्यामध्ये सर्वाधिक प्रति माणशी १७ हजार घनमीटर पाणी उपलब्ध होते, तर साबरमती नदी खोऱ्यामध्ये हीच उपलब्धता २४० घनमीटर इतकी घसरते. सतलज सारख्या महत्त्वाच्या नदीखोऱ्यांमध्ये पाण्याचे प्रवाह कासोल, सुनी, आणि रामपूर या ठिकाणी मोजून घेतलेल्या नोंदीच्या विश्लेषणातून गेल्या ४१ वर्षांमध्ये नदी प्रवाहामध्ये प्रचंड घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. (सिंग २०१४).
बियास आणि रावी नद्यांच्या खोऱ्यामध्ये प्रवाह घटल्याचे नमूद केले आहे, तर चिनाब नदी खोऱ्यामध्ये हिवाळ्यामध्ये नदी प्रवाह वाढत असल्याचे भुतियानी (२००८) या शास्त्रज्ञाने म्हटले आहे.
गोमती या गंगा नदीच्या उपनदीवर निमसर
सुलतानपूर, जानपूर मेघाट येथे नियमित प्रवाह मोजण्यातून आता हे प्रवाह केवळ मॉन्सूनच्या पर्जन्यावरच अवलंबून असल्याचे पुढे आले आहे. (अभयसिंग, २०१६).
दक्षिणेला ऊर्ध्व कावेरी नदी पात्रामध्ये नदीप्रवाहाच्या १९८१ ते २०१० या तीस वर्षांच्या कालखंडामध्ये फारसा बदल जाणवला नसला, तरी वार्षिक ०.७७८ घनमीटर इतका प्रवाह २००१ ते २०१० या शेवटच्या दहा वर्षांत कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारताच्या द्वीपकल्पीय भागामध्ये महानदीच्या प्रवाहामध्ये टिकेपारा या प्रवाह मोजमापाच्या ठिकाणी १९७२ ते २००७ यादरम्यान सरासरी ३३८८ दशलक्ष घनमीटर इतका प्रवाह कमी झाल्याचे पांडा (२०१३) यांनी नमूद केले आहे. ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्यामध्ये सन १९५६ ते २००७ या कालखंडामध्ये बहादूराबाद या ठिकाणी महापूर आढळत असल्याचे नमूद केलेआहे.
एकूणच भारतामध्ये हिमालयांपासून दक्षिणेपर्यंतच्या सर्वच नद्यांमध्ये नदी प्रवाहांचे प्रवाह अस्थिर असल्याचे संशोधनांत दिसून येते. ही अस्थिरता निश्चितपणाने कमी करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे. नद्यांच्या उपखोऱ्यांमध्ये व अवर्षणप्रवण क्षेत्रांमध्ये पाणलोट क्षेत्र विकास आणि व्यवस्थापनातून नद्यांचे प्रवाह बऱ्यापैकी स्थिर राखणे शक्य होईल, असे वाटते.
- डॉ. चंद्रशेखर पवार, ९९२३१२२७९१, (संचालक, शिवश्री पर्यावरण संस्था, पुणे)
- डॉ. सतीश पाटील, ९४२२७०७२६१, (प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.