Climate Change: हवामान बदलातही जग सुरक्षित, समृद्ध करण्याचे ध्येय

Global Warming: २०२४ हे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले असून, हवामान बदलाचे परिणाम शेती, पर्यावरण आणि मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात होत आहेत. या बदलांना सामोरे जाण्यासाठी हवामान अंदाज, कृत्रिम बुद्धिमत्ता, संशोधन आणि गुंतवणुकीवर भर देण्याची गरज आहे.
Climate Change
Climate ChangeAgrowon
Published on
Updated on

डॉ. प्रल्हाद जायभाये

Technology in Weather Forecasting: तावरणातील बदलाचे विविध परिणाम म्हणून उष्णतेची लाट, वादळ, पूर, मुसळधार पावसाच्या घटनांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. २०२४ हे औद्योगिकीकरणानंतरचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले. गेल्या वर्षात सरासरी तापमानापेक्षा १.५५ अंश सेल्सिअसने तापमान अधिक नोंदले गेले, तर २०१५ ते २०२४ हे दशक औद्योगिकीकरणानंतरचे सर्वाधिक उष्ण दशक ठरले आहे. या परिस्थितीमुळे हवामान बदल आपल्या दारापर्यंत, शेतापर्यंत येऊन पोचला आहे, हे मान्यच करावे लागते. अशा विपरीत वातावरणाला सामोरे जाता आपत्तीजनक घटनांचा इशारा, पूर्वसूचना आणि अंदाज वेळीच मिळणे अत्यावश्यक ठरते. हवामानाबाबत अभ्यास, संशोधन आणि प्रसाराचे काम करणारी महत्त्वाची संस्था म्हणून जागतिक हवामान संघटनेकडे पाहिले जाते.

संघटनेची स्थापना व रचना

सन १८०३ मध्ये व्हिएन्ना येथे आंतरराष्ट्रीय हवामान संस्था (आयएमओ) ही सरकारी परंतु स्वायत्त म्हणून स्थापन झालेली संस्था संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेपासूनच म्हणजे २३ मार्च १९५० पासूनच तिची शाखा म्हणून काम पाहू लागली. १९५१ मध्ये ‘जागतिक हवामान संघटना’’ असे नाव ठेवण्यात आले. म्हणूनच २३ मार्च हा ‘जागतिक हवामान दिन’ म्हणून साजरा केला जातो.

जागतिक हवामान संघटनेचे १८० राष्ट्र आणि ६ संयुक्त वसाहती राष्ट्र असे मिळून १९३ देश सदस्य आहेत. संयुक्त अरब अमिरातीचे अब्दुल्ला अलमंडोस हे अध्यक्ष म्हणून सन २०२३ पासून काम पाहत आहेत, आणि ते २०२७ पर्यंत कायम असणार आहेत. सदस्य देशाचे हवामान विभागप्रमुख संघटनेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य असतात. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक हे जागतिक हवामान संघटनेचे सदस्य आहेत.

कार्य : पृथ्वीप्रणाली विज्ञानातील पृथ्वीचे वातावरण, जमीन, सागर, जैवविविधता, पर्यावरण आणि जलस्रोत इ. बाबतीतील विश्लेषण व मार्गदर्शन करणारी पदसिद्ध संस्था आणि संयुक्त राष्ट्रसंघाची अधिकृत प्रवक्ता म्हणून जागतिक हवामान संघटना ओळखली जाते. आजवर जागतिक हवामान निरीक्षक उपग्रह, जागतिक वातावरण प्रकल्प, वैश्विक वातावरण प्रकल्प, जागतिक हवामान संशोधन प्रकल्प, अवकाश प्रकल्प यासारखे स्वतंत्र तर आंतरराष्ट्रीय वातावरण बदल समिती (आयपीसीसी), जागतिक वातावरण संशोधन प्रकल्प, वैश्विक वातावरण निरीक्षण यंत्रणा, वैश्विक सागरीय निरीक्षण यंत्रणा आणि वैश्विक भूमी निरीक्षण यंत्रणा असे प्रकल्प भागीदारीत चालू आहेत. एकूण आपत्तींपैकी नैसर्गिक आपत्तीची संख्या सुमारे ९० टक्के असून, त्याची झळ मानवी जीवनास बसू नये, यासाठी गेल्या ७५ वर्षापासून संस्था प्रयत्नशील असते. हवामानाच्या अंदाजाची उपयुक्त आणि पूर्व सूचना प्रसारणाची गती वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग यांच्या वापराबाबतही कार्यक्रम राबवला जात आहे.

Climate Change
Climate Change: तापमानवाढीचा धोक्याचा इशारा!

अमृत महोत्सवी वर्षात तिहेरी उद्दिष्ट

अमृत महोत्सवी जागतिक हवामान दिन साजरा करताना संस्थेने तीन कलमी कार्यक्रम ठरवल्याचे संघटनेच्या मुख्य सचिव प्रा. सेलिस्ट साउलो यांनी सांगितले. या तीन कामांसाठी जगभरातील शास्त्रज्ञांचे तीन गट काम करतील. त्यामध्ये हवामानशास्त्र, जलशास्त्र, संगणकशास्त्र, पर्यावरणशास्त्र आदी विषयांतील शास्त्रज्ञांचा समावेश असेल. प्रत्येक गटाला विविध प्रकारच्या कामासंबंधी तांत्रिक व शास्त्रीय माहितीचे प्रसारण आणि मार्गदर्शन करण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

हवामान आपत्तीपूर्व सूचनेतील उणिवा सामूहिकरीत्या संपवणे ः शास्त्रज्ञामध्ये जागतिक हवामान संघटनेच्या मुख्य सचिव आणि ब्राझील देशाचे प्रा. सेलिस्ट साउलो, दक्षिण आफ्रिकेचे मॅक्सोलिसी नोक्सी, घाना देशाचे मौरीन अहिअतकू यांचा समावेश आहे. यामध्ये खात्रीशीर वेळेआधी आपत्तीपूर्व सूचना मिळविण्यासाठी खाजगी क्षेत्रांची मदत घेणे, नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे, विस्तार कार्यक्रमाचे बळकटीकरण यावर भर दिला जाईल.

हवामान विषयक आपत्तीपूर्व सूचना सर्वांसाठी- सर्वत्र पोचवणे. ः यात हवामान विषयक निरीक्षणासह विदा विश्लेषण, अंदाज यामधील त्रुटी शोधून एकात्मिक उपाययोजना करणे. यासाठी निरीक्षणे, उपग्रह, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग यांचा वापर केला जाईल. या गटात भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सोमासेन रॉय, युरोपीय हवामान अंदाज केंद्राचे महासंचालक फ्लोरियन पपेनबर्गर यांचा समावेश आहे.प्रसारासाठी संशोधन किंवा शिक्षण प्रतिनिधी सदस्यांची मदत घेतली जाईल. २०१५ मध्ये केवळ ५२ देशांमध्ये हवामान विषयक निरीक्षण घेणे, विदा साठविणे विश्लेषण करणे अंदाज काढणे आणि हवामान घटनांची पूर्व सूचना देण्याची व्यवस्था आणि त्यासाठी लागणारी एकात्मिक यंत्रणा आता १०८ देशांमध्ये कार्यरत आहे. सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या मागासलेल्या देशातील सामान्यांपर्यंत त्याचे उपयोग नेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

आज गुंतवणूक करून भविष्य सुरक्षित करणे ः सामूहिक संशोधनाला चालना देणे, हवामान अंदाज व पूर्वानुमान यातील त्रुटी दूर करण्यासाठी येणारा खर्च आणि त्याच्यापासून मिळणारे उत्पन्न यांचा अर्थशास्त्रीय अभ्यास केला जाईल. यात चीनमधील जागतिक हवामान केंद्राचे संचालक डॉ. यी वॅगन, कॅरोलिना कॅस्टीलोनस आणि निल्स होम नेल्सन या शास्त्रज्ञांचा समावेश आहे. कोणत्याही देशाने हवामानविषयक घटकांमध्ये १ अमेरिकन डॉलरची गुंतवणूक केल्यास, भविष्यात त्यातून ९ अमेरिकन डॉलर इतका फायदा होऊ शकतो. हा फायदा हवामान आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीतील घट, मानवी जीवितहानीतील घट, राष्ट्रीय स्थावर मालमत्तेतील, संपत्तीचे होणारे नुकसान टळणे अशा बहुविध स्वरूपामध्ये असू शकते.

जागतिक तापमान वाढ, जलवायू परिवर्तन यामुळे प्रामुख्याने बर्फ वितळणे, वादळांच्या संख्येतील वाढ, मुसळधार पावसाच्या घटनांतील वाढ आणि मौसमी पावसाच्या वेळापत्रकात होत असलेले बदल, गारपिटीच्या घटनांमधील वाढ, विस्तारत असलेली दुष्काळी क्षेत्रामध्ये होत असलेली वाढ असे परिणाम दिसत आहे. कधी गारपीट, तर कधी उष्णतेच्या किंवा थंडीच्या लाटा अनुभवास येत आहेत. अशा सर्व घटनांना सामोरे जाण्यासाठी या अमृत वर्ष महोत्सवामध्ये सध्या संशोधन, विकास आणि कार्यपद्धतीसह विविध बाबीमध्ये जाणवणाऱ्या त्रुटी मान्य करून त्यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातून कृती कार्यक्रम आखण्यात येणार असल्याचे घोषणा मुख्य सचिव प्रा. सेलेस्टी साऊलो यांनी आढावा भाषणामध्ये केली आहे. त्याचा सहा मिनिटांचा व्हिडिओ यू ट्यूबवर उपलब्ध आहे.

Climate Change
Climate Change: जागतिक हवामान बदलाने तिसऱ्या हरित क्रांतीचे बीजारोपण

भारत आणि हवामान तंत्रज्ञान

हवामान आणि हवामान धोक्याची पूर्व सूचना देण्याची उत्तम व्यवस्था असलेल्या विकसित ३० देशांमध्ये भारताचा समावेश आहे. भारतामध्ये हवामान आणि कृषी हवामान संबंधित माहिती देणारी एकमेव अधिकृत आणि शासकीय संस्था म्हणजे भारतीय हवामान विभाग (आयएमडी) होय. १८७५ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. या संस्थेच्या माध्यमातून हवामान अंदाज, चक्रीवादळ, पूर, गारपीट आणि उष्णतेच्या लाटा यांसारख्या नैसर्गिक आपत्तींसाठी पूर्वसूचना दिल्या जातात. मॉन्सून अंदाजासाठी विशेष मॉडेल विकसित करण्यासह, कृषी हवामान सल्ला सेवा अंतर्गत शेतकऱ्यांना हवामान आधारित सूचना पुरवण्याचे महत्त्वाचे कार्य ही संस्था करते.

पुणे स्थित भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम) ही १७ नोव्हेंबर १९६२ रोजी स्थापन केलेली संस्था उष्ण कटिबंधीय प्रदेशातील देशांसाठी हवामान व त्यातील बदलांसंदर्भात संशोधन, विकास व कार्यक्रमाची आखणी करण्याचे कार्य करते.

राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्र (National Remote Sensing Centre): १९७४ मध्ये स्थापन झालेली ही संस्था भारतीय सुदूर संवेदन संस्था (इस्रो) अंतर्गत कार्यरत आहे. उपग्रहाद्वारे हवामान निरीक्षण, दुष्काळ, पूर आणि चक्रीवादळ यांसाठी पूर्वसूचना देणे. कृषी हवामान मॉडेलिंगसाठी उपग्रह विदा उपलब्ध करून देणे, यासारखी कार्ये संस्था करते.

कृषी - हवामान सल्ले

हवामान विषयक माहितीच्या आधारे पीक व त्यासंदर्भात सल्ले देण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेकडूनही मोलाचे काम केले जाते. महाराष्ट्रात चार भौगोलिक विभागासाठी चार कृषी विद्यापीठे आणि एक पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ असून, त्यामार्फत ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र योजनेअंतर्गत आठवड्यातून दोन वेळा हवामान अंदाज आणि त्यावर आधारित हंगामनिहाय पीक नियोजन सल्ले दिले जातात.

हवामान - आधारित निर्णयांमुळे उत्पादनात वाढ

योग्य पेरणी वेळ निवडल्यास पावसावर आधारित शेती उत्पादनात १० ते ५० टक्के वाढ होते.

पाण्याच्या अचूक व्यवस्थापनामुळे ७० टक्क्यांपर्यंत सिंचन बचत होते.

हवामान आधारित खत आणि कीटकनाशक व्यवस्थापनामुळे १५ ते २५ टक्के उत्पादन खर्चात बचत होते.

उष्णतेपासून पिकांचे संरक्षण केल्यास १० ते २० टक्के हानी टाळता येते.

गारपिटीच्या पूर्वसूचनेमुळे काही प्रमाणात पिकांचे संरक्षण करता येते. वेळीच केलेल्या हेलनेटसारख्या उपाययोजनांमुळे व्यावसायिक पिकांमध्ये ३० ते १०० टक्क्यांपर्यंत नुकसान टळते. उदा. द्राक्ष, भाजीपाला इ.

अतिवृष्टी आणि पूर स्थितीचा अंदाज आधीच मिळाल्यामुळे व योग्य उपाययोजना केल्यास ३० ते ५०% आर्थिक नुकसान टाळता येते.

अजैविक ताणास सहनशील पीक वाण आणि हवामान - आधारित लागवड पद्धती स्वीकारल्यास शेती उत्पादनात स्थिरता येते.

हवामानविषयक आपत्तीच्या नोंदी अचूक झाल्यामुळे विमा क्लेम करणे शक्य होते.

पावसाचे प्रमाण, बाष्पीभवनाचे प्रमाण आणि एकूण हवामानविषयक माहितीआधारित जल व्यवस्थापन केल्यास पिकांचे शाश्वत उत्पादन मिळविण्याच्या अधिक संधी उपलब्ध होतात.

- डॉ. प्रल्हाद जायभाये, ७९८०६८४१८९

(कृषी हवामानशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com