Jalgaon News: देशभरात प्रसिद्ध असलेल्या नंदुरबारच्या मिरचीची लागवड यंदा फारशी वाढणार नाही, अशी स्थिती आहे. लागवड यंदा सुमारे साडेचार ते पाच हजार हेक्टरवर स्थिर राहील. मागील हंगामात अतिपाऊस, रोगराईने मिरची पिकाची हानी झाली होती. तसेच दरही स्थिर किंवा फारसे वाढले नव्हते. यामुळे लागवड स्थिर राहील, अशी स्थिती आहे.
नंदुरबार व शहादा तालुका मिरची लागवडीत आघाडीवर आहेत. सर्वाधिक दोन ते अडीच हजार हेक्टर एवढी लागवड नंदुरबार तालुक्यात केली जाते. नंदुरबारातील सुजालपूर, कोठली, चौपाळे, लहान शहादे, शिंदे, समशेरपूर, खोंडामळी, बामडोद आदी गावे मिरचीसाठी प्रसिद्ध आहेत. मे अखेरीस व जूनमध्ये मिरची लागवड सुरू केली जाते. पूर्वी लागवड अडीच ते तीन हजार हेक्टर एवढीच असायची. परंतु नवतंत्रज्ञानाचा प्रसार, नवे वाण, बाजारातील मागणी, अधिकची विपणन संधी यामुळे मिरची लागवडीत सतत वाढ झाली. अलीकडे मिरचीचे सर्वसाधारण क्षेत्रही वाढले आहे.
अलीकडे शहादा, तळोदा तालुक्यांतही मिरची लागवड वाढली. पण मागील दोन हंगाम रोगराई व निसर्गाच्या लहरीपणाचा फटका मिरचीस बसला. यामुळे मिरची लागवडीत मोठी वाढ होणार नाही, अशी स्थिती आहे. कारण अनेक शेतकरी मिरचीचे पीक कमी करून किंवा स्थिर ठेवून अन्य क्षेत्रात केळी, पपई लागवड करीत आहेत. काहींनी उसालाही पसंती दिली आहे. परंतु मिरची पिकात मोठी घटही होणार नाही, अशी स्थिती आहे. नंदुरबार तालुक्यातील अनेक गावे अनेक वर्षांपासून मिरची लागवड करीत आहेत.
लागवडीस वेग
अनेक शेतकरी चांगला पाऊस झाल्यानंतर किंवा तापमानात मोठी घट झाल्यानंतर मिरची लागवड करतात. जूनच्या मध्यानंतर किंवा १०, ११ जूननंतर तापमान कमी झाले. काही भागात पाऊसही आला. यामुळे लागवडीस जूनच्या दुसऱ्या आठवड्यात गती आली. आजघडीला सुमारे साडेतीन हजार हेक्टरवर लागवड पूर्ण झाली आहे. शहादा, तळोदा भागांतील मिरची लागवडदेखील स्थिर असल्याची माहिती आहे.
लागवड या महिन्यातही सुरूच राहणार आहे. अनेक शेतकरी पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने मिरची लागवड करीत असल्याचे चित्र आहे. मिरची लागवडीसाठी शेतकरी रोपांचा उपयोग करीत आहेत. सव्वा, दीड ते दोन रुपये प्रतिरोप, असे मिरची रोपांचे दर आहेत. लहान आकाराच्या, तिखट मिरची वाणांची लागवड अधिक सुरू आहे. लागवडीसाठी पॉलिमल्चिंग, गादीवाफा व ठिबक तंत्राचा उपयोग केला जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.