
Green Chilli Farming Management:
शेतकरी नियोजन । हिरवी मिरची
शेतकरी : संदीप शेवाळे
गाव : खामखेडा, ता. देवळा, जि. नाशिक
हिरवी मिरची लागवड : १ एकर
नाशिक जिल्ह्यातील खामखेडा (ता. देवळा) येथील संदीप काशिनाथ शेवाळे यांची ६ एकर शेती आहे. पाण्याची उपलब्धता, भांडवल व मजुरांची उपलब्धता यांची बाबींचा विचार करून वर्षभर भाजीपाला लागवडीचे नियोजन श्री. शेवाळे करतात. मागील ४ वर्षांपासून उन्हाळी हंगामात हिरवी मिरची लागवडीत सातत्य राखले आहे. यासाठी सूक्ष्मसिंचन, मल्चिंग पेपरचा वापर, एकात्मिक पद्धतीने कीड नियंत्रणावर भर दिला जातो.
कीड- रोग नियंत्रणासाठी रासायनिक निविष्ठांचा मर्यादित वापर करून जैविक निविष्ठा वापराला प्राधान्य दिले जाते. या हंगामात २२ जानेवारीला मिरची लागवड केली आहे. आतापर्यंत एक तोडा झाला असून आगामी काळात मजुरांच्या उपलब्धतेनुसार तोड्याचे नियोजन केले जाईल. सध्या तापमानात वाढ होत असल्याने ठिबकचा कालावधी वाढविण्यास प्राधान्य दिले जात आहे.
लागवड नियोजन
लागवडीपूर्वी नांगरणी करून जमीन उन्हामध्ये तापू दिली. त्यानंतर ८ दिवसांनी एकरी ४ ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरले जाते.
लागवडीसाठी रोटाव्हेटर मारून ५.५ फुटांचे बेड करून ठिबकच्या नळ्या अंथरल्या जातात.
बेडवर डीएपी, पोटॅश, सिंगल सुपर फॉस्फेट तसेच सूत्रकृमी नियंत्रणासाठी निंबोळी पेंड वापर केला. त्यानंतर मल्चिंग पेपर बेडवर अंथरला जातो.
साधारण २२ जानेवारीला दीड फूट अंतरावर सरळ रेषेत रोपांची लागवड करण्यात आली. लागवडीसाठी एकरी ५२०० रोपे वापरली आहेत.
रोपांना आधार
लागवडीनंतर ४० दिवसांनी रोपांची बांधणी करून आधार देण्यात आला. त्यासाठी ७ फूट उंचीचे बांबू १२ फूट अंतरावर रोवून त्यास तार बांधून सुतळीने फांद्या बांधून घेतल्या. जेणेकरून फळधारणा अवस्थेत पाऊस, वारा यापासून झाडे मोडत नाहीत. आधार दिल्याने रोपांची जोमदार वाढ होण्यास मदत मिळते.
कीड- रोग नियंत्रणाकडे लक्ष
जमिनीद्वारे पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच पांढऱ्या मुळी कार्यक्षम होण्यासाठी लागवडीनंतर ६ दिवसांनी शिफारशीत घटकांची पहिली आळवणी केली.
पांढरी माशी व रसशोषक किडींसाठी चिकट सापळे लावण्यात आले. यासह ६ फूट उंचीचे इन्सेक्ट नेटचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रभावी कीड नियंत्रण होण्यासह पिकाचे उष्ण लहरींपासून देखील संरक्षण होते.
कीड-रोगांसाठी सुरुवातीच्या टप्प्यात जैविक व्यवस्थापनावर भर दिला जातो. पांढरी माशी, तुडतुडे, मावा व कोळी किडीच्या प्रादुर्भावासाठी पिकाचे नियमित निरीक्षण करून ८ ते १० दिवसांनी फवारण्या घेतल्या.
पानांवर भुरी रोगाच्या प्रादुर्भावासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्यावर भर दिला.
पिकामध्ये एकात्मिक पद्धतीने कीड-रोग नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे रासायनिक फवारणीवरील खर्चात बचत होऊन उत्पादन खर्च नियंत्रित राहण्यास मदत होते, असे संदीप शेवाळे सांगतात.
अन्नद्रव्य व्यवस्थापन
लागवडीवेळी भरखते दिल्याने पिकांना सुरुवातीपासून खतांची उपलब्धता होते. सुरुवातीच्या काळात १९:१९:०, १३:४०:१३, १३:०:४५, ०:४०:३७ यांचा वापर नियमितपणे करण्यात आला.
१९:१९:० झाडांचा वाढ चांगली होण्यासाठी, १३:४०:१३ चा वापर फुलधारणा चांगली होण्यासाठी, १३:०:४५ चा वापर अनावश्यक वाढ नियंत्रित करण्यासाठी, आणि ०:४०:३७ चा वापर फळांमध्ये परिपक्वता येण्यासह फळाचा दर्जा राखण्यासाठी वापर करण्यावर भर दिला जातो.
वाढीच्या अवस्थेत नत्र, स्फुरद व पालाशयुक्त विद्राव्य खतांचा वापर करण्यावर भर देण्यात येतो. त्यामुळे फुलकळी लागण्यासाठी, फळधारणा जोमदार होण्यासाठी मदत होते. तसेच शाखीय वाढ योग्य होऊन एकरी उत्पादन वाढीसाठी फायदा होतो.
प्रत्येक तोडा झाल्यानंतर १३:४०:१३, परिपक्वता होण्यासाठी पोटॅशसह ०:५२:३४, ०:४०:३८ व ०:६०:२० या विद्राव्य खतांच्या मात्रा दिल्या जातात.
उत्पादन, प्रतवारी, विक्री
लागवडीनंतर साधारण ७० दिवसांनी मिरचीचे तोडे सुरू होतात. सुरुवातीच्या काळात उत्पादन कमी असते. मात्र हळूहळू उत्पादन वाढत जाते. साधारणपणे ५ एप्रिलच्या दरम्यान पहिला तोडा करण्यात आला. या तोड्यातून सरासरी ५ क्विंटल मिरची उत्पादन मिळाले. त्यानंतर १५ दिवसांच्या अंतराने तोड्याचे नियोजन होते. मात्र तोडणी कामासाठी मजूर उपलब्ध न झाल्यामुळे मिरची तोडणीस अडचणी येत आहेत. आगामी काळात मजुरांची उपलब्धता झाल्यानंतर पुढील तोड्याचे नियोजन केले जाईल, असे संदीप शेवाळे यांनी सांगितले.
आगामी नियोजन
पुढील तोड्यासाठी मजुरांची जुळवाजुळव सुरू आहे. मजुरांमार्फत मिरची तोडणी करून शेडमध्ये आणून प्रतवारी करून एकसारखी मिरची निवडली जाईल. देठ तुटलेली, उन्हाने मिरची बाजूला वेगळी काढली जाते. प्रतवारी केलेली एकसारख्या रंग व आकाराची मिरची निर्यातदारास जागेवर विक्री करण्यावर भर दिला जाईल. बाकी दुय्यम प्रतवारीची मिरची स्थानिक किरकोळ विक्रेत्यांना दिली जाईल.
वेळापत्रकानुसार रासायनिक खतांच्या नियमितपणे मात्रा देण्यात येणार आहेत. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर देखील करण्यावर भर दिला जाईल.
सध्या तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे जमिनीतील वाफसा स्थिती तपासून सिंचन करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे सध्या प्रतिदिन दीड तास ठिबकद्वारे सिंचन करत आहे.
नियमितपणे निरीक्षण केले जाईल. कीड-रोग प्रादुर्भावाची निरीक्षणे नोंदवून आवश्यकतेनुसार फवारणीचे नियोजन केले जाईल. त्यातही जैविक नियंत्रणावर अधिक भर दिला जाईल.
- संदीप शेवाळे, ९०९६७०४१४२
(शब्दांकन : मुकुंद पिंगळे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.