Mango Orchard Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Farming : आंबा बागेतील फळगळीची कारणे अन् नियंत्रण उपाय

Mango Orchard Management : केसर आंब्याचा फुलोरा व फळवाढीचा हंगाम सध्या सुरू आहे. या काळात विविध कारणांमुळे फळांची गळती होत असते. त्याची कारणे समजून घेऊन त्यानुसार त्वरित उपाय केल्यास आंबा बागेतील नुकसान थांबवणे शक्य होते.

डॉ. भगवानराव कापसे

डॉ. भगवानराव कापसे

Mango Fruit Drop Control Measures : या वर्षी बहुतेक केसर आंबा बागांमध्ये अगदी नोव्हेंबर मध्येच मोहर येऊन फळधारणाही सुरू झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये अगदी फळ लहान म्हणजे अगदी बाजरीच्या आकाराचे ते गावठी बोराच्या आकाराचे होईपर्यंत फळगळ मोठ्या प्रमाणात होत असते.

आंब्याला होणारी फळधारणा येणाऱ्या मोहोरावर अवलंबून असते. अन्य सर्व प्रकारच्या फळझाडांप्रमाणे आंब्यालाही मोहोराचे तीन बहर येतात. हे बहर साधारणपणे १० ते १५ दिवसांच्या अंतराने एकापाठोपाठ येतात.

मोहरात येणारी फुले

मोहरात येणारी फुले साधारणपणे दोन प्रकारची असतात. एक संयुक्त तर दुसरे नर फूल असते. संयुक्त फुलात नर आणि मादी दोन्ही असतात. आंब्याला फळधारणा होण्याच्या दृष्टीने संयुक्त फुलेच महत्त्वाची आणि उपयुक्त असतात. येणाऱ्या तीन बहरांपैकी पहिल्या बहरात नर फुलांचे प्रमाण आंब्याच्या विविध जातींनुसार ५ ते ३० टक्के अधिक असते. दुसऱ्या आणि तिसऱ्या बहरात मात्र तुलनेने नर फुलांचे प्रमाण कमी असते.

आंब्याला येणाऱ्या एकूण फुलांपैकी फक्त २ ते ३ टक्के फुलांचे परागीकरण होऊन फळधारणा होते. बाकीची सर्व फुले म्हणजेच मोहर गळून जातो. फळधारणेसाठी त्याचा काहीही उपयोग होत नाही. होणाऱ्या एकूण फळधारणेपैकी काढणीसाठी फक्त ०.४ ते ०.५ टक्का फळे मिळाली तरी आंब्याचे उत्पादन विक्रमी झाले असे समजावे.

याचाच दुसरा अर्थ असा, की होणाऱ्या फळधारणेपैकी १९.६ ते ९९.५ टक्के फुले, फळे विविध कारणांनी झाडावरून गळून पडत असतात. यातील बहुतेक फळे विविध कारणांमुळे आणि अतिशय लहान आकारात असतानाच गळून पडतात. साधारणपणे बाजरीच्या आकारापासून ते वाटण्याच्या आकाराचे असताना अधिक प्रमाणात गळ होते. अर्थात, फळ पिकेपर्यंत कोणत्याही अवस्थेत गळ होऊ शकते. फक्त नंतर होणाऱ्या फळगळतीचे प्रमाण तुलनेने कमी असते.

मुळात फळाचा आकार किंवा फळातील एकूण पेशींची वाढ फक्त फळ तीन आठवड्यांचे असेपर्यंतच होत असते. नंतरच्या काळात या पेशींचा आणि पर्यायाने फळाचा आकार वाढत जातो. ज्या काळात फळातील पेशींची संख्या वाढत जाते त्या काळात म्हणजे म्हणजे सुरुवातीचे चार आठवडे फळांची काळजी घेणे जास्त गरजेचे असते.

आंबा फळगळतीची कारणे

जातींमधील विविधता, हवामान, कीटक आणि रोगांचा प्रादुर्भाव, आर्द्रतेची कमतरता, अंतःस्रावांची कमतरता अशा अनेक कारणांमुळे आंब्याची फळगळती होते. यातील काही मुद्दे सविस्तर पाहूया.

‘ऑक्झिन इफेक्ट’- ऑक्झिन हा संजीवकाचा प्रकार आहे जे की वनस्पतीमध्ये इंडॉल ॲसेटिक ॲसिड (आय ए ए) प्रकारात तयार होते. याची कमतरता भरून काढण्यासाठी आपण ते बाहेरून देतो.

बाजारात ते पावडर स्वरूपात मिळते. या संजीवकाची कमतरता हे आंबा फळगळतीचे मुख्य कारण आहे. फळाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या ऑक्झिन या घटकाची निर्मिती झाडातच होत असते. फळाच्या देठात ऑक्झिन असणारे ठिकाण तराजूच्या दांडीसारखे असते. फांदी आणि फळ यांच्या मध्यावर साधारणपणे ऑक्झिनचा परिणाम दिसून येतो.

या ठिकाणावर पडणारा प्रत्यक्ष सूर्यप्रकाश आणि मुळांकडून फांद्यांना मिळणारी अन्नद्रव्ये यामुळे ऑक्झिनचे प्रमाण कमी-जास्त होत राहते. सर्वसाधारणपणे फळाच्या बाजूला असलेले ऑक्झिन काही कारणांमुळे कमी झाले की फळाच्या देठापासून काही अंतरावर एक भेग पडते. त्याला ‘ॲब्सिसन लेयर’ संबोधतात.

त्या भेगेच्या ठिकाणाहून नंतर फळ गळून पडते. गळ झालेल्या फळांच्या देठाची व्यवस्थितपणे पाहणी केली तर ही बाब अतिशय चांगल्या रीतीने निदर्शनास येते. साधारणपणे देठात फळाच्या बाजूला असलेले ऑक्झिनचे प्रमाण कमी झाले की फळगळ होते. विशेषतः फेब्रुवारी मार्चमध्ये सुरू झालेला उन्हाळा, वाढलेले तापमान फळांमध्ये या संजीवकाचा नाश करण्यास मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरते.

जातीनुसार फळगळती

ज्या जातींमध्ये फळांचा देठ मजबूत असतो त्या जातींमध्ये फळगळतीचे प्रमाण इतरांच्या तुलनेत खूप कमी असते. दशहरी जातीत फळाचा देठ मजबूत असतो. त्यामुळे फळगळतीचे प्रमाण कमी असते. तर लंगडा जातीत फळाचा देठ कमकुवत असल्याने फळगळतीचे प्रमाण अधिक असते.

प्रतिकूल हवामान

दिवस आणि रात्रीच्या तापमानात आणि वातावरणातील आर्द्रतेच्या प्रमाणात चढ-उतार झाले तर फळाची गळती जास्त प्रमाणात होते. वादळी वातावरण, हंगामी पाऊस आणि धुके यामुळे कीटक व रोगांचे प्रमाण वाढते. त्यामुळेही फळगळतीचे प्रमाण वाढते. मार्च, एप्रिल महिन्यांत पारा ४२ सेल्सिअस अंशाच्या पुढे गेला तर फळगळती वाढते.

फळगळतीवरील उपाय

नैसर्गिक हवामान आणि वातावरण यासंबंधी आपण काहीच उपाय करू शकत नाही. यामुळे होणारे फळगळतीचे नुकसान टाळता येत नाही. परंतु वातावरणातील या बदलांमुळे किडी-रोगांच्या प्रमाणात वाढ होते. त्यांचे नियंत्रण करून अशा वातावरणात त्यांच्यामुळे होणारी फळगळती आपण थांबवू शकतो.

जोरदार किंवा वादळी वाऱ्यामुळे होणारी फळाची गळती थांबविण्यासाठी बागेच्या भोवताली वाराबंधक झाडांची लागवड करावी. त्याद्वारे वाऱ्याचा रोध कमी करता येतो. भोवतालच्या या झाडांमुळे बागेतील उष्णतेचे प्रमाणही कमी करता येते. तापमानवाढीमुळे होणारी फळगळती यामुळे नियंत्रणात येऊ शकते.

गळतीस कारणीभूत कीटक

फूल व फळधारणेच्या अवस्थेमध्ये तुडतुडे, फुलकिडे (थ्रिप्स) आणि पाने व मोहोर खाणारी अळी यामुळे खूप मोठे नुकसान होत असते. तुडतुडे मोहोर आणि फुलांतून रस शोषण करून घेतात. त्यामुळे फुले आणि लहान फळे गळून पडतात.

तुडतुड्याच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या मधासारख्या चिकट द्रवामुळे फळ-पानांवर काळे डाग पडतात. या किडीचे वेळीच नियंत्रण केले नाही तर उत्पादनावर गंभीर परिणाम होतो. पानांवरील काळ्या डागांमुळे प्रकाशसंश्‍लेषण क्रिया मंदावते. शिवाय तुडतुड्याची मादी फुलात आणि फळात आपली अंडी घालते.

फुलकिड्यांमुळे होणारे नुकसान

हा रसशोषण करणारा कीटक आहे. तो फुलाच्या आतील भागांतील तसेच कोवळ्या पानांतील रस शोषून घेतो. त्यामुळे फळांची गळती तर होतेच. शिवाय झाडाचेही नुकसान होते.

गळतीस कारणीभूत रोग

भुरी- वादळ, ढगाळ वातावरण, धुके आणि २७ ते ३१ अंश सेल्सिअस तापमान या बाबी या रोगासाठी अनुकूल आहेत. मोहर आणि आंब्याच्या छोट्या फळांवर भुरीचे पांढऱ्या रंगाचे आवरण तयार होते. अविकसित मोहर आणि फळे खाली गळून पडतात. रोगामुळे ३० ते ९० टक्क्यापर्यंत बागेचे नुकसान होते.

करपा रोगामुळे होणारी गळ

हा रोग मोहोर आणि फळांवर येतो. या रोगामुळे आंब्याच्या फळाचा देठ तसेच मोहोर काळा होऊन सुकतो. त्यानंतर फळगळ होते. या रोगामुळे लहान आकारातील फळाची खूप मोठ्या प्रमाणात गळ होते.

गंधक, कार्बेन्डाझिम आदी बुरशीनाशके तर इमिडाक्लोप्रिड, क्लोरपायरिफॉस, थायामेथोक्झाम आदी कीटकनाशकांचा वापर करून रोग- किडी आटोक्यात आणता येतात. अर्थात, रसायने वापरण्यापूर्वी त्यांचे लेबल क्लेम तपासणे अत्यंत गरजेचे आहे.

पोषण कमतरतेमुळे होणारी फळगळ

आंब्याच्या झाडाला खत योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी दिले गेले नाही, तर त्याचा परिणाम पोषणावर होतो. परिणामी, फळगळती होते. खतांचा अभाव असेल तर आंब्याचा देठ कमकुवत होतो. त्यामुळे देठाचे फळ कधीही गळून पडते. उपाय म्हणजे वाढीनुसार दरवर्षी प्रत्येक झाडास खतांचा समतोल वापर करावा.

कमी आर्द्रतेमुळे होणारी फळगळ

हवेतील आर्द्रतेचे प्रमाण सारखे कमी- अधिक होत राहिले तर त्याचा परिणाम होऊन आंब्याच्या फळाचा देठ कमकुवत होतो आणि फळगळती होते. उपाय- पावसाळ्यानंतर बागेची चांगली साफसफाई आणि मशागत करावी.

त्यामुळे बागेतील आर्द्रता कायम टिकून राहते. फळे वाटाण्याच्या आकाराची होताच बागेला पाणी द्यावे. त्यानंतर २० ते २५ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या दोन पाळ्या द्याव्यात. त्यामुळे बागेतील आर्द्रता टिकून राहण्यास मदत मिळते. तसेच फळगळतीही थांबवता येते.

अंतर्स्रावामुळे होणारी फळगळ : झाडामध्ये अंतर्स्राव होत असेल तर फुले आणि फळांच्या विकासात ऑक्सिजन कमी पडतो. त्यामुळे फळ आणि देठ यांना जोडणारा भाग कमकुवत होतो आणि त्याचा परिणाम म्हणून फळगळती मोठ्या प्रमाणात होते.

उपाय

फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर नॅप्थिल ॲसिटिक ॲसिड, युरिया व कार्बेन्डाझिम यांचा वापर शिफारशीनुसार करावा. गरजेप्रमाणे तापमानात ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढ झाल्यास ही फवारणी पुन्हा करावी. फेब्रुवारीच्या अखेरीस तसेच मार्चच्या मध्यापर्यंत तापमान वाढल्यास एक ते दोन सिंचन हे पाटाने करावे.

त्यामुळे बागेत आर्द्रता राहून तापमान वाढीवर काही प्रमाणात नियंत्रण येऊ शकते. यामध्ये जीए, युरिया व कार्बेन्डाझिम यांचा शिफारशीनुसार वापर करावा. त्यांच्या दोन फवारण्या दिल्यास पुन्हा पुन्हा येणारा मोहर थांबतो. तसेच फळांचा आकारही मोठा होतो.

- डॉ. भगवानराव कापसे,

९४२२२९३४१९, (लेखक वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील निवृत्त शास्त्रज्ञ व फळबागतज्ज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT