Mango Orchard : केसर आंबा बागेतील मोहोर संरक्षण

Mango Orchard Protection : आंबा बागेमध्ये मोहोराचे संरक्षण करणे हे चांगल्या उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाचे असते.
Mango Blossom
Mango BlossomAgrowon

डॉ. भगवानराव मा. कापसे, डॉ. पुरुषोत्तम झंवर

Mango Orchard Management : आंबा बागेमध्ये मोहोराचे संरक्षण करणे हे चांगल्या उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. कोकणातील हापूस आंबा बागांमध्ये मोहोरावर सामान्यत तुडतुडे कीड आणि भुरी रोग यांचा प्रादुर्भाव होतो. मात्र, कोकण व्यतिरीक्त उर्वरीत राज्यात केसर सह अन्य आंबा बागांमध्ये मोहोरावर प्रामुख्याने भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे या भागातील मोहोराच्या संरक्षणासाठी वेगळ्या प्रकारे नियोजन करण्याची आवश्यकता वाटते.

महाराष्ट्रामध्ये केसर आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. केसर आंबा महाराष्ट्रामध्ये साधारणतः १५ डिसेंबर ते १५ जानेवारी या दरम्यान मोहरतो. अर्थात थंडीच्या तीव्रता यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावते. मात्र जर वाढ नियंत्रकाचा (पॅक्लोब्युट्राझोल) वापर केलेल्या केसर आंबा बागेमध्ये अगदी १५ नोव्हेंबर पासूनच मोहर येण्यास सुरुवात होते. त्या प्रमाणे यावर्षी अशा बागांमध्ये अगदी नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच मोहर आलेला दिसत आहे.

Mango Blossom
Mango Orchard : केसर आंबा बागेतून जोपासली शेतीची आवड

मला नुकताच विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अगदी सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा बागांची पाहणी करण्याचा योग आला. त्यात बहुतेक बागांमध्ये यावर्षी वाढ नियंत्रकाचा वापर केला गेला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे सध्या बागा अतिशय चांगल्या मोहरलेल्या दिसतात. शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा लागलेली आहे. परिणामी काही बागांत तर हा केसर काढणीला अगदी १५ मार्चपासून सुरुवात होऊ शकते. मात्र अशा बागांमध्ये आता मोहर संरक्षणावर भर देण्याची आवश्यकता आहे.

आपल्याकडे मोहरावर मुख्यतः भुरी, करपा हे रोग आणि तुडतुडे कीड व काही प्रमाणात अन्य रसशोषक किडी यांचा प्रादुर्भाव होतो. त्यापासून मोहराचे संरक्षण करणे आवश्यक असते. कोकणात मुख्यतः करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील भागामध्ये केसर बागेमध्ये मुख्यतः भुरी रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो. तुडतुडे कोकणापेक्षा कमी प्रमाणात असतात. मात्र ढगाळ किंवा पावसाळी वातावरण राहिल्यास तुडतुड्याचा प्रादुर्भावसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.

भुरी

हा रोग उडीयम मॅन्जीफेरा या बुरशीमुळे होतो. प्रामुख्याने आंबा झाडावर आलेल्या मोहोराला या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मोहोर आणि कच्च्या फळांची गळ होते. रोगग्रस्त मोहरांवर पांढरी बुरशी दिसते. मोहोरातील फुलांच्या पाकळ्यापेक्षा फुलांच्या दलावर हा रोग जास्त परिणाम करतो. त्यामुळे मोहरातील फुले न उमलताच गळून पडतात. अशा प्रकारे मोहोर गळाल्यामुळे आंबा उत्पादनावर परिणाम होतो.

अनेक वेळा झाडाला मोहोर येण्याआधीच कोवळ्या फुटीवरही या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आढळतो. या रोगाच्या वाढीसाठी वातावरणातील ८० ते ८४ टक्क्यांच्या आसपासची आर्द्रता, १५ ते ३० अंश सेल्सिअसच्या आसपास तापमानात होणारा बदल आणि सतत तीन चार दिवस अतिशय वेगाने वाहणारे वारे अशा गोष्टी अधिक कारणीभूत ठरतात. रोगाचा प्रसार वेगाने होतो.

प्रतिबंधात्मक उपाय : रोगग्रस्त पाने, मोहोर आणि फुले झाडावरून काढून नष्ट करणे हा प्रतिबंधात्मक उपाय करता येतो. सोबत झाडाला मोहोर येण्याच्या कालावधीत वेळापत्रकात दाखविल्याप्रमाणे फवारण्यांचे नियोजन करावे.

Mango Blossom
Mango Orchard Management : फळे काढणीपश्चात आंबा बागेत कोणत्या उपययोजना कराव्यात?

करपा

हा रोग कोलेटोट्रायकम ग्लियोस्पोरीऑइड्स या बुरशीमुळे होतो. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे ३९ टक्क्यापर्यंत नुकसान होते.

प्रादुर्भावाची लक्षणे : फांद्यावरील मोहर करपणे, फांद्यांचे शेंडे जळणे, डहाळ्या वाळणे, पाने करपणे इ. अधिक आर्द्रता असलेल्या वातावरणात या बुरशीची वाढ खूपच झपाट्याने होते. ही बुरशी रोगग्रस्त पाने, फुले, फांद्यावर जगते. अनुकूल वातावरण तयार होताच या बुरशीचे बीज तयार होते. हे बीज आंबा मोहोरावर प्रादुर्भाव करते. सततचे आर्द्र वातावरण या रोगाच्या प्रादुर्भावासाठी उपयुक्त ठरते.

बारा तासाहून अधिक काळ वातावरणात ९५ टक्के पेक्षा जास्त सापेक्ष आर्द्रता आणि २५अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान, तसेच धुके किंवा दव पडत असणे असे वातावरण या बुरशीसाठी लाभदायक ठरते. सध्या आपल्याकडे वातावरणात धुके आणि दव मोठ्या प्रमाणात पडत आहे.

प्रतिबंधात्मक उपाय : रोगग्रस्त फांद्याची छाटणी करावी, झाडाखाली पडलेल्या फांद्या, फळे गोळा करून आंबा बागेबाहेर जाळून टाकावे. रोगाची मोहोराला लागण झाल्यास कार्बेन्डाझीम १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे पंधरा-वीस दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात. तसेच सोबत दाखविलेल्या वेळापत्रकाप्रमाणे फवारणीचे नियोजन करावे.

तुडतुडे

तुडतुडे हे पाचरीच्या आकाराचे, दोन मिमी लांब, भुरकट तपकिरी रंगाचे असून, त्यांच्या डोक्यावर तांबड्या रंगाचे तीन ठिपके असतात. बुद्धिबळातल्या उंटासारखी तिरपी चाल असलेला हा कीटक अत्यंत चपळ असतो. तुडतुडे साधारणतः वर्षभर आंब्याच्या झाडावरच राहतात. ते आंब्याच्या झाडाची कोवळी फुले व पाने यावर प्रादुर्भाव करतात. त्यांच्या शरीरातून आंब्याची पाने, मोहोर यावर मधासारखे लाल चिकट द्रव्य सोडले जाते.

या द्रवावर काळ्या बुरशीची जोमाने वाढ होते. या बुरशीमुळे झाडाची पाने आणि खोड काळे पडते. हा द्रव फळावर पडल्यास फळावरही काळे डाग पडतात. झाडांना मोहोर यायला लागल्यावर या किडीचा प्रादुर्भाव अधिक नुकसानकारक ठरतो, म्हणूनच मोहोर यायच्या आधी त्यांचा नायनाट करण्यावर भर

द्यावा. या किडीसोबतच अन्य काही रसशोषक किडी व बड बोरर हे मोहोरावर प्रादुर्भाव करतात. त्यांच्यापासून मोहोराचे रक्षण करण्यासाठी वेळापत्रकाप्रमाणे उपाययोजना कराव्यात.

आंबा मोहोर संरक्षणाचे वेळापत्रक

अ. क्र. फवारणीची वेळ कीडनाशक प्रमाण प्रति १० लिटर पाणी शेरा

१ मोहोर दिसण्याच्या १५ दिवस आधी (संपूर्ण झाडावर) लॅम्बडा सायहॅलोथ्रीन १० मि.लि किंवा अॅझाडिरॅक्टिन (१००० पीपीएम) ५ मि.लि. खोडावर, फांद्यावर व पानांवर सर्वत्र कव्हरेज होईल, अशी फवारणी करावी.

२ डोळे फुटताच खोड, फांद्या व झाडावर गंधक (पाण्यात मिसळणारे) २० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम अधिक थायामेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ३ ग्रॅम यामुळे भुरी रोग आणि तुडतुड्याचे नियंत्रण होईल.

३ दुसऱ्या फवारणीनंतर सुमारे दोन आठवड्यांनी गंधक (पाण्यात मिसळणारे) २० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम किंवा हेक्साकोनॅझोल ५ मि.लि. (यापैकी एक बुरशीनाशक) अधिक इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के) ३ मि.लि. मोहोर उमलण्याच्या काळात फक्त बुरशीनाशक फवारावे. मात्र कीडनाशक वापरणे टाळावे, कारण त्याचा मधमाश्यांवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

४ तिसऱ्या फवारणीनंतर सुमारे दोन आठवड्यांनी गंधक (पाण्यात मिसळणारे) २० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम किंवा हेक्साकोनॅझोल ५ मि.लि. (यापैकी एक बुरशीनाशक) अधिक थायामेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) १ ग्रॅम केसर आंबा बागेमध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव अधिक हानिकारक असून, तुडतुडे तुलनेने कमी असतात. त्यामुळे केसर आंबा उत्पादकांचा मुख्य भर हा भुरी रोगाच्या नियंत्रणावर असावा. मराठवाड्याच्या तुलनेने तुडतुडे कोकणामध्ये जास्त असतात.

५ चौथ्या फवारणीनंतर दोन आठवड्यांनी गंधक (पाण्यात मिसळणारे) २० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम किंवा हेक्साकोनॅझोल ५ मि.लि. (यापैकी एक बुरशीनाशक) अधिक बुप्रोफेझीन (२५ टक्के प्रवाही) २० मि.लि. --

६ पाचव्या फवारणीनंतर दोन आठवड्यांनी (गरज भासल्यास) गंधक (पाण्यात मिसळणारे) २० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम किंवा हेक्साकोनॅझोल ५ मि.लि. (यापैकी एक बुरशीनाशक) अधिक डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के इसी) ५ मि.लि. --

टीप : केसर आंबा उत्पादक पट्ट्यामध्ये सध्या फळमाशी फारसा प्रादुर्भाव करत नाही. मात्र फक्त काढणीच्या काळात ढगाळ वातावरण असल्यास तिचा काही प्रमाणात प्रादुर्भाव होतो. त्यामुळे या किडीच्या नियंत्रणाविषयी फळे लागल्यानंतर काढणीच्या काळामध्ये माहिती घेऊ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com