Kodo Millet Agrowon
ॲग्रो विशेष

Kodo Millet : कोदो मिलेटमुळे हत्ती मरू शकतात का?

Millet Production : कोदो मिलेट खाल्ल्याने हत्ती मरू शकतात का? या १० हत्तींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पोटात कोदो मिलेटचे अंश सापडले.

नीलिमा जोरवर

नीलिमा जोरवर

Millet :
कोदो मिलेट खाल्ल्याने हत्ती मरू शकतात का? या १० हत्तींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पोटात कोदो मिलेटचे अंश सापडले. यावरून तेथल्या मुख्य वन्यजीव रक्षक यांनी ‘विषारी कोदो खाल्ल्याने हत्तींचा मृत्यू झाला’ असे सांगितले. भारताच्या पुढाकाराने २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे केले गेले.

यात मिलेटस अर्थात भरडधान्यांचा प्रचार-प्रसार करण्यात आला. त्यात मोठ्या प्रमाणात कोदो मिलेटचा देखील समावेश आहे. बांधवगड येथील हत्तींच्या मृत्यूस कोदो मिलेट जबाबदार असेल तर ते माणसांना खाण्यास सुरक्षित आहे का, असा उलटा प्रचार होऊन एका गुणी धान्याच्या आहारातील वापरावर प्रश्‍नचिन्ह निर्माण होते.

मध्य प्रदेशात कोदो मिलेट खाल्ल्यामुळे १० हत्तींचा मृत्यू झाल्याची बातमी गेले काही दिवस चर्चेत आहे. यामध्ये असणारे दोन ठळक मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्यावर चर्चा होणे साहजिकच आहे.

पहिला मुद्दा म्हणजे वन्यजीवांच्या सुरक्षेचा. आधीच सुरक्षित नसलेल्या वन्यजीवांचे संरक्षित अभयारण्यात समूहाने मृत्यू होणे, हे विचार करायला लावणारे आहे. वने, जंगले मोठ्या प्रमाणात नष्ट होत असल्याने प्राण्यांचा अधिवास संपुष्टात येत आहे किंवा खराब होत आहे. त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न उभा असताना असे समूहाने मृत्यू होणे दुर्दैवी आहे.

यातला दुसरा मुद्दा म्हणजे कोदो मिलेट खाल्याने हत्ती मरू शकतात का? या १० हत्तींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पोटात कोदो मिलेटचे अंश सापडले. यावरून तिथल्या मुख्य वन्यजीव रक्षक यांनी ‘विषारी कोदो खाल्ल्याने हत्तींचा मृत्यू झाला’ असे सांगितले. भारताच्या पुढाकाराने २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे केले गेले. यात मिलेट्‍स, अर्थात भरडधान्यांचा प्रचार-प्रसार करण्यात आला. त्यात मोठ्या प्रमाणात कोदो मिलेटचा देखील समावेश आहे. बांधवगड येथील हत्तींच्या मृत्यूस कोदो मिलेट जबाबदार असेल तर ते माणसांना खाण्यास सुरक्षित आहे का, असा उलटा प्रचार होऊन एका गुणी धान्याच्या आहारातील वापरावर प्रश्‍नचिन्ह निर्माण होते.

मुळात भरडधन्य गटात येणारे ज्वारी, बाजरी, नाचणी हे आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहेत. ही धान्ये आपण पीठ करून खाऊ शकतो, तर उरलेले सहा प्रकारचे भरडधान्य आकाराने बारीक असलेले व भातासारखी साळ अर्थात आवरणे असणारे असतात. यामध्ये कोदो बरोबरच राळा, वरई, बर्टी, सावा, हिरवी भगर, पिवळी भगर हे प्रकार येतात. या सर्व धान्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते या आवरणामुळे कोणतीही कीड न लागता वर्षानुवर्षे टिकतात. यातील काही धान्यांवर कमीत कमी तीन ते जास्तीत जास्त सात थर असतात. कदाचित यामुळेच हे धान्य ४०-८० वर्षे लोकांनी साठवलेले आजही पाहण्यास मिळते. महाराष्ट्रातील बर्टी, सावा तर मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात होणारे कोदो आजही कणग्या भरून साठवलेले असते. म्हणूनच हिंदीमध्ये ‘कोदो दाणा न होय पुराना’ ही म्हण प्रसिद्ध आहे. तर आपल्याकडे काही कडधान्यांचे बियाणे जसे मठ, उडीद वगैरे या धान्यांच्या आत टाकून संरक्षित केले जातात. हे साठवलेले धान्य म्हणजे दुष्काळासाठी साठवलेली सुरक्षित ठेवच असते.

साडेतीन महिने कालावधी असणारे कोदो धान्यपीक अतिशय काटक व चिवट आहे. एकदा शेतात पेरणी केली, की गवत किंवा कीड-रोग काहीही पाहायचे नाही. त्याची वेळ झाली, की दुधारी इंग्रजीतील v अक्षराच्या आकारासारखी याची कणसे टपोऱ्या दाण्यांनी भरून जातात. यात हिरवट काळसर व तांबूस असे दोन रंग असतात. पॉलिश केल्यानंतर आतला दाणा मात्र पांढरा शुभ्र असतो. पण कोणतेही मिलेट्स हे कमी आवरण काढलेले, अर्थात अनपॉलिशड खाल्ले जाते. तेच कोदो मिलेटच्या बाबतीत होते. कोदो चवीला उत्तम असल्याने प्रथम खाणाऱ्यांच्याही लगेचच आवडीचे बनते. विशेषतः कांदा-बटाटा घालून केलेला मसाले भात खासच लागतो. त्यामुळे बहुतेक लोक पुन्हा पुन्हा कोदो आवडीने खातात.

महाराष्ट्रात धुळे, गडचिरोली, नंदुरबार येथे तसेच कोकणात देखील याची उत्तम शेती केली जात असे. कोकणात याला हरिक असे म्हणतात. ‘हरकाचे तांदूळ’ खाण्यासाठी आजही कोकणातील मंडळी हरखून जातात, इतके ते जनमनात रुजलेले होते. बहुतेकदा आदिवासी याला कोद्रा असे म्हणतात. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो. तसेच ते पौष्टिक असल्याने मधुमेहासारख्या आजारासाठी योग्य आहार म्हणून देखील ते उपयोगी ठरते. कॅन्सररोधी व वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी हे विशेष महत्त्वाचे आहे.

कोदो मिलेट विषारी असते का? असेल तर त्याने जीव जाऊ शकतो का? या प्रश्‍नांच्या खोलात जाऊ. आजपर्यंत कोदो मिलेट खाऊन कुणाचा जीव गेला असे कोणाही व्यक्तीने अथवा जाणकाराने सांगितलेले मी ऐकलेले नाही. त्यामुळे हत्तींच्या मृत्यूस कोदो कारणीभूत होणे, पटणारे नाही. मध्य प्रदेशातील बैगा आदिवासींसोबत काम करणारे नरेंद्र बिस्वास व त्यांच्या काही सहकारी शेतकरी महिला म्हणाल्या, “असे होऊ शकत नाही. कोदो से नशा चढता ही, लेकीन कोई मरेगा नही.”

आता नेमके नशा चढते म्हणजे काय होते? कधी कधी कोदो मिलेट खाल्ल्याने नशा केल्यासारखी प्रचंड झोप येते, माणूस दोन दिवस झोपून राहू शकतो, असे जुने कोकणातील लोक सांगतात. याला कोकणात ‘मांजरे लागणे’ असे म्हणतात. त्यालाच मध्य प्रदेशात ‘मतवाला कोदो खाया’ असे म्हणतात. झोप येण्याबरोबरच काहींना यामुळे उलटी, मळमळणे किंवा जुलाब होऊ शकतात. ते प्रत्येकाच्या पचनशक्तीवर अवलंबून असते.

म्हणजे एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींनी जर असा ‘मतवाला कोदो’ खाल्ला, तर दोन-तीन जणांना हा त्रास होऊ शकतो, बाकीच्यांना काहीच होणार नाही. मांजरे लागले तर त्यामुळे चढणारी नशा उतरण्यासाठी भरपूर ताक प्यावे किंवा आदिवासी लोकांप्रमाणे लाल अंबाडीचे शरबत घ्यावे. झोप येते तर झोपून घ्यावे. आणि उलटी-जुलाब जास्त झाले असेल तर त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक ती औषधे घ्यावीत. असे मांजरे लागलेले लोक सकाळी झोप काढून उठले, की पुन्हा एकदम नॉर्मल असतात, असे काही अनुभवी लोक सांगतात.

सर्वच कोदो हे ‘मतवाले कोदो’ नसतात. इतर पिकांसारखेच ते नॉर्मल व सुरक्षित पीक असते. म्हणजे आमच्या मागच्या १० वर्षांच्या अनुभवातून हजारो लोकांनी हे खाल्ले आहे; पण असे कधी घडले नव्हते. मागच्याच वर्षीचा एक अपवाद वगळता इतर हजारो लोकांनी याचे सेवन केलेले आहे आणि ते सुरक्षित देखील आहे. मग हे असे ‘मांजरे लागणारे’ दाणे कसे तयार होतात? याचे सोप्पे उत्तर आहे, की कधी कधी कणीस तयार होताना व दाणे भरताना जर पाऊस असेल तर एक प्रकारची बुरशी काही दाण्यांवर जमा होऊ शकते. ती तशीच पुढे शिल्लक राहिली, तर असे दाणे खाण्यात आल्यास व्यक्तीनुसार त्याचा परिणाम म्हणजे नशा चढणे, झोप येणे, उलटी-जुलाब अशी लक्षणे दिसू शकतात. असे खाल्यास काय करायचे ते वरती नमूद केलेच आहे.

काही बिग स्त्रियांना मी विचारले की हे असे कोदो आहेत हे तुमच्या लक्षात आले, तर तुम्ही ते फेकून देता का? त्या म्हणाल्या, “आम्ही नाही फेकत.”
“ते पुन्हा कसे खायचे व असे झाल्यास काय करायचे ते आम्हाला माहीत आहे.”

हे सर्व पारंपरिक ज्ञान या लोकांकडे आहे म्हणूनच आजही कोदोची शेती इथे केली जाते व आवडीने ते खाल्लेही जातात. या ज्ञानाचा वापर करून आधुनिक विज्ञानाच्या द्वारे याची शहानिशा करणे आवश्यक आहे. यावर दीर्घकालीन संशोधन देखील होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात देखील कोकणात मांजरे लागते हे माहीत असूनही लोक आवडीने हरिक आजही मागतात व खातात. माझे देखील आवडते असलेले हे मिलेट त्याच्या बहुगुणी फायद्यांसाठी आहारात असणे आवश्यकच आहे.

मध्य प्रदेशातील हत्तींचा कोदो मिलेट खाऊन मृत्यू होऊ शकतो, हे म्हणूनच पटत नाही. हीच शंका तिथल्या सरकारला देखील आली असावी. म्हणूनच मध्य प्रदेश सरकारने तिथल्या वन अधिकाऱ्यांचे निलंबन करून चौकशी समिती देखील नेमली आहे. या चौकशी समितीचे अहवाल नक्कीच सकारात्मक येईल, अशी मला आशा वाटते.

एकंदरच मिलेट खाण्याचे फायदे समजल्यामुळे अनेक लोक मिलेटचा आहारात समावेश करत आहेत. तर ते कसे खावेत इथपासून ते त्याच्या वेगवेगळ्या पाककृती समजून घेणे आवश्यक आहे. मिलेट खाण्याचे दुष्परिणाम (साईड इफेक्ट्स) आहेत का, असे विचारले तर मी त्याचे उत्तर `नाही` असे देईल. कोणताही आहार घेताना तो संतुलित असणे महत्वाचे आहेत. अति आरोग्य जपण्याच्या नादात तेल-मीठ आहारात बंद करून चालणार नाही तसेच मिलेटचा आहारात समावेश करताना उगाचच डोक्यात शंका ठेवणेही योग्य नाही. मिलेट कसे खावेत व कसे खाऊ नये, याविषयी सविस्तर पुढच्या भागात.
(टीप- वरील सर्व माहिती मागच्या १२-१५ वर्षांच्या अनुभवातून व वेगवेगळ्या आदिवासी समूहांशी झालेली चर्चा आणि उपलब्ध संशोधन यांचा आधार घेऊन मांडली आहे.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT