Kodo Millet : कोडो मिलेटचे आरोग्यवर्धक पदार्थ

Benefits Kodo Millet : भारताच्या वेगवेगळ्या भागात कोडो मिलेटची लागवड केली जाते. कोडो मिलेटला मराठीमध्ये कोद्रा असे म्हटले जाते.
Kodo Millet Crop
Kodo Millet CropAgrowon
Published on
Updated on

अजिंक्य देशमुख, सचिन शेळके

Millet Benefits : संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. भरडधान्यामध्ये मोठ्या आकाराचे (उदा. ज्वारी, बाजरी इ.) आणि लहान आकाराचे (उदा. नाचणी, वरी, राळा, कोदो, बर्टी, प्रोसो व ब्राऊनटॉप इ.) असे दोन प्रकार पडतात. त्यातील लहान आकाराची भरडधान्ये ही लवकर पक्व होणारी आणि सर्वाधिक दुष्काळ प्रतिरोधक पीक ठरतात.तर राजगिरा आणि बकव्हीट (कुट्टू) यांना ''स्यूडो मिलेट्स'' असे म्हणतात.

शास्त्रीय नाव : पॅस्पॅलम स्क्रोबिक्युलेटम

कुल – ग्रॅमिनी

मराठी – कोदरा, हरिक, कोद्रू

इंग्रजी नाव – कोडो मिलेट.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उष्ण कटिबंधीय भारतातील महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात छत्तीसगड, पश्चिम बंगाल व बिहार राज्यांच्या अनेक भागात कोडो मिलेटची लागवड केली जाते. कोडो मिलेटला मराठीमध्ये कोद्रा असे म्हटले जाते.

हे ‘गरिबांचे पीक’ मानले जात असले तरी खत आणि पाण्याशिवाय नापिक जमिनीत वर्षातून एकदा पिकवले जाते. कमी पावसाच्या काळात ते चांगले तग धरून राहते. पीक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तयार होते तेव्हा कापतात. कोडो मिलेट पक्व झाल्यानंतर दाणे लाल आणि तपकिरी दिसतात. वापर करण्यापूर्वी त्याचा वरचा थर काढून टाकल्यानंतर लाल रंगाच्या तांदळासारखे दाणे दिसतात.

हे धान्य ग्लूटेनमुक्त व फायबर, प्रथिने यांनी समृद्ध आहे. त्यामुळे सेलिआक रोग किंवा ग्लूटेन ॲलर्जी असलेल्या लोकांसाठी अधिक चांगले ठरते. गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोडो मिलेटची मागणी वाढली असून, त्याकडे ‘शुगर फ्री राइस’ म्हणून प्रसिद्ध होत आहे. कोडो मिलेटपासून लापशी, उपमा, भात आणि मिष्टान्न हे पारंपरिक पदार्थ बनवले जातात.

Kodo Millet Crop
Nashik Skill Development : नाशिक जिल्ह्यातील २९ गावांत कौशल्य विकास केंद्रे

प्रक्रियेनंतर केक, ब्रेड, बिस्किटे, मफिन्स, लाडू, शेवया, नूडल्स, खाकरा, पोहे, पापड, चिवडा, रवा, पीठ असे मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात. त्यामुळे बचत गट, शेतकरी उत्पादक गट, लहान प्रक्रियादार, उत्पादक सहकारी संस्था, वैयक्तिक व्यावसायिक, शासकीय संस्था, खासगी संस्था यांच्यासाठी या पिकामध्ये चांगल्या संधी दिसत आहेत.

कोडो मिलेटमध्ये आढळणारी पौष्टिक मूल्ये

प्रथिने - ८.३ ग्रॅम, तंतुमय पदार्थ - ९.० ग्रॅम, कर्बोदके - ६५.६ ग्रॅम, सिग्न पदार्थ - १.४ ग्रॅम, खनिजे -२.६ ग्रॅम, चरबी - ४.२ ग्रॅम, फॉस्फरस - १८८.० मि.ग्रॅम, लोह - १२.० मि.ग्रॅम, कॅल्शिअम - २७.० मि.ग्रॅम, व्हिटॅमिन B१ - ०.१८ मि.ग्रॅम, व्हिटॅमिन B३ - २.० मि.ग्रॅम.

कोडो मिलेटचे आरोग्यासाठी फायदे

मधुमेहामध्ये उपयुक्त.

ग्लूटेन मुक्त तृणधान्य.

रक्त साफ करण्यास उपयुक्त.

अँटी मायक्रोबियल.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर.

वजन कमी करण्यात फायदेशीर.

कर्करोगात फायदेशीर.

किडनी निरोगी राहण्यास मदत होते.

कोडो मिलेटपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ

कोडो मिलेट कुकीज

साहित्य : कोडो पीठ १ किलो, वनस्पती तूप ३०० ग्रॅम, साखर ४०० ग्रॅम, दूध पावडर ५० ग्रॅम, खाण्याचा सोडा ५ ग्रॅम, अमोनिअम बायकार्बोनेट ५ ग्रॅम, व्हॅनिला अर्क ०.५ मि.लि., पाणी ३०० मि.लि.

कृती - साखर आणि वनस्पती तूप ५ ते १० मिनिटे चांगले फेटून घ्यावे. त्यात बेकींग पावडर, दूध पावडर, खायचा सोडा, अमोनिअम बायकार्बोनेट व व्हॅनिला किंवा अन्य सुगंधी द्रव्य मिसळावे. योग्य प्रमाणात पाणी घेऊन त्यांच्या गोळा करावा. हा गोळा ३० मिनिटे तसाच झाकून ठेवावा. त्यानंतर जाडसर लाटून साचाच्या साह्याने काप करावेत. ते काप ट्रेमध्ये टाकून ओव्हनमध्ये १८० अंश से. तापमानाला १५ ते २० मिनिटे ठेवून द्यावे. तयार झालेले कोडो कुकीज सामान्य तापमानाला आल्यानंतर आकर्षक पॅकिंगमध्ये पॅक करावेत.

Kodo Millet Crop
Sugarcane Season 2023 : माळशिरसचा लाखो टन ऊस तालुक्याबाहेर

कोडो मिलेट लाडू

साहित्य : कोडो पीठ १ किलो, तूप ३५० ग्रॅम, गूळ ४५० ग्रॅम, दूध ३०० मि.लि., विलायची ५ ग्रॅम, ड्रायफ्रूट्स ५० ग्रॅम.

कृती - सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये कोडो पीठ आणि तूप टाकून ५ मिनिटे भाजून घेणे. त्यानंतर पिठामध्ये गूळ व दूध टाकून विरघळून घेणे. या मिश्रणात राहिलेले साहित्य टाकून मिश्रण ५ ते १० मिनिटे एकत्र करून घेणे. तयार झालेल्या मिश्रणाचे लाडू बनवून घ्यावेत.

कोडो मिलेट शेवया

साहित्य : कोडो पीठ ५०० ग्रॅम, किनोवा पीठ २०० ग्रॅम, गव्हाचे पीठ १०० ग्रॅम, ज्वारीचे पीठ १०० ग्रॅम, सोयाबीन पीठ १०० ग्रॅम, मीठ ३० ग्रॅम, पाणी ४५० मि.लि.

कृती - कोडो मिलेटच्या पिठामध्ये पोषणमूल्य व आरोग्यकारक घटक असल्यामुळे मधुमेह आणि हृदयाच्या आरोग्यासाठी त्यांच्या पदार्थांची मागणी वाढत आहे. कोडो पीठ, गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ, किनोवा पीठ, सोयाबीन पीठ अशी सर्व पिठे एकत्र करून २ मिनिटे चांगली मिसळावीत. त्यानंतर पिठामध्ये मीठ व पाणी घालून पीठ ५ मिनिटे मळून घ्यावे. त्यानंतर तयार झालेल्या उंड्याला शेवयाच्या साचामधून काढून शेवया तयार करून घ्याव्यात. तयार शेवया उन्हामध्ये २ दिवसांसाठी चांगल्या वाळवाव्यात. या शेवयांपासून खीर, फालुदा, व तत्सम मिठाया बनविता येतात.

Kodo Millet Crop
Paddy Harvesting : मॉन्सूनोत्तर पावसाच्या भीतीने भातकापणीस जोर

कोडो मिलेट चिप्स / पापड

साहित्य : कोडो पीठ १ किलो, पापडखार ५० ग्रॅम, तीळ १०० ग्रॅम, जिरे ५ ग्रॅम, मिरची ५० ग्रॅम, खायचा सोडा ५ ग्रॅम, मीठ ३० ग्रॅम, पाणी ४०० मि.लि.

कृती - प्रथम कढईमध्ये पाणी घेऊन गॅसवर मध्यम आचेवर ४ ते ५ मिनिटे उकळी आणावी. या पाण्यामध्ये मीठ, पापडखार, मिरची, जिरे, तीळ व सोडा घालावा. पाण्याला उकळी चांगली आल्यावर त्यामध्ये कोडो पीठ हळूहळू टाकावे. पिठाची उकड करून घ्यावी. तयार झालेला उंडा घेऊन हाताला तेल लावून ५ मिनिटे मळून घ्यावा. उंड्यापासून छोटे गोळे करून खाली व वर दोन्ही प्लॅस्टिक कागद ठेवून चांगल्या प्रकारे दाबून छोटे पापड किंवा चिप्स करावेत. सावलीत दोन दिवसांसाठी वाळवून घ्यावे. तयार झालेले चिप्स/ पापड तळून खाण्यासाठी उत्तम लागतात.

कोडो मिलेट केक

साहित्य : कोडो पीठ ६०० ग्रॅम, मैदा ४०० ग्रॅम, वनस्पती तूप ३०० ग्रॅम, साखर ५०० ग्रॅम, दूध २०० ग्रॅम, बेकिंग पावडर ५ ग्रॅम, बेकिंग सोडा ५ ग्रॅम, व्हॅनिला अर्क ०.५ मि.लि.

कृती -सामान्यतः केक तयार करण्यासाठी मैद्याचा वापर केला जातो. मात्र मैदा पचनसंस्थेच्या आरोग्याला फारसा चांगला मानला जात नाही. त्यामुळे त्याचे प्रमाण करून, त्यात कोडो पिठाचा वापर केल्यास केकचे पोषणमूल्य वाढतात. त्यासाठी सर्वप्रथम कोडो पीठ आणि मैदा एकत्र करून ३ ते ४ वेळा चाळून घ्यावे. दुसऱ्या भांड्यात वनस्पती तूप आणि साखर ५ मिनिटे फेटून एकत्र करावी. यामध्ये कोडो पीठ, मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, दूध आणि व्हॅनिला अर्क एकत्र करून त्याचे मिश्रण केकपात्रात भरावे. केक पात्र बेकिंग ओव्हनमध्ये १८० अंश सेल्सिअस तापमानाला २० ते २५ मिनिटे बेक करावे. तयार कोडो केक थंड करून सीलबंद करावा.

कोडो मिलेट चकली

साहित्य : कोडो पीठ ५०० ग्रॅम, तांदूळ पीठ ३०० ग्रॅम, बेसन पीठ १०० ग्रॅम, गव्हाचे पीठ १०० ग्रॅम, तीळ ८० ग्रॅम, खायचा सोडा ५ ग्रॅम, मीठ ३० ग्रॅम, ओवा ५ ग्रॅम, कोमट तेल ५० मि.लि., कोमट पाणी ३५० मि.लि.

कृती - सर्वप्रथम सर्व पीठे २ मिनिटे मंद आचेवरती भाजून घ्यावीत. त्यानंतर पिठामध्ये कोमट तेल, तीळ, मीठ, खाण्याचा सोडा व ओवा मिसळून घ्यावे. तयार मिश्रणामध्ये कोमट पाणी टाकून त्याचा ५ ते १० मिनिटे मळून चांगला उंडा तयार करावा. साचामध्ये उंडा टाकून चकल्या पाडून घ्याव्यात. या चकल्या तेलामध्ये नेहमीच्या चकल्याप्रमाणे तळून घ्याव्यात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com