Chilli Crop Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Chilli Crop Disease : मिरची पिकातील ‘भुरी रोग’

Bhuri Disease in Chilli : महाराष्ट्रामध्ये मिरची हे महत्त्वाचे भाजीपाला पीक म्हणून घेतले जाते. मिरची पिकामध्ये प्रामुख्याने मर, ॲन्थ्रकनोज, सरकोस्पोरा, भुरी आणि जीवाणूजन्य रोग या महत्त्वाचे रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.

Team Agrowon

राहुल वडघुले

Chilli Crop Disease Management : महाराष्ट्रामध्ये मिरची हे महत्त्वाचे भाजीपाला पीक म्हणून घेतले जाते. मिरची पिकामध्ये प्रामुख्याने मर, ॲन्थ्रकनोज, सरकोस्पोरा, भुरी आणि जीवाणूजन्य रोग या महत्त्वाचे रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यापैकी ॲन्थ्रकनोज या रोगाविषयी मागील लेखामध्ये माहिती घेतली आहे. आज मिरची पिकातील भुरी या रोगाविषयी आजच्या लेखामध्ये माहिती घेऊ.

भुरी रोग प्रामुख्याने पानांवर दिसून येतो. काहीवेळा फळे आणि खोडावर देखील रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानांचे नुकसान होते. तसेच मिरचीच्या फळांचे प्रत्यक्ष नुकसान होते. परिणामी मोठे आर्थिक नुकसान होते.

या रोगाचा नमुना आम्हाला सुकेणे (ता. निफाड, जि. नाशिक) येथून मिळाला होता. डोळ्यांना दिसणारी लक्षणे व सूक्ष्मदर्शकाखाली नमुना तपासणी केली असता सदर रोग हा ‘भुरी’ असल्याचे स्पष्ट झाले.

रोगाची माहिती

रोगाचे नाव : भुरी (पावडरी मिल्ड्यू)

हा रोग बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो.

रोग निर्माण करणाऱ्या बुरशीचे शास्त्रीय नाव ः लेव्हील्यूला तौरीका (Leveillula taurica)

बुरशीचा स्वभाव : ही बुरशी ऑब्लीगेट (Obligate) म्हणजेच काही नियम पाळून स्वतःला एका बंधनात ठेवणारी अशा प्रकारात येते. ही बुरशी ज्या पिकावर वाढते, त्या पिकास जिवंत ठेवून त्यातील अन्नद्रव्यांचे शोषण करते.

हा रोग सर्व मिरची उत्पादक देशांमध्ये आढळून येतो.

नुकसान : या रोगामुळे मिरची पिकाचे साधारणतः २५ ते ८० टक्क्यांपर्यंत नुकसान होते.

यजमान पिके ः सर्व प्रकारच्या मिरची, टोमॅटो, बटाटा, कांदा, कपाशी, वांगी इत्यादी महत्त्वाच्या पिकांवर प्रादुर्भाव दिसून येतो.

लक्षणे

या रोगाची लक्षणे पाने, खोड व फळांवर दिसून येतात.

मुख्य प्रादुर्भाव सुरवातीला पानांवर दिसून येतो. पानांच्या मागील बाजूस पांढऱ्या रंगाची भुकटी (पावडर) पसरल्याप्रमाणे दिसून येते. तर पानांच्या वरील बाजूला पिवळसर चट्टे दिसतात. पाने निस्तेज दिसतात. पाने वरच्या बाजूने वळतात.

रोगाच्या जास्त तीव्रतेमध्ये पाने सुकतात व गळून पडतात.

रोगग्रस्त फळांची वाढ व्यवस्थित होत नाही. काहीवेळा फळे गळून पडतात.

फांद्यांवर काळसर चट्टे दिसतात.

भुरी रोगाची लक्षणे शक्यतो पानांच्या वरच्या बाजूला दिसून येतात जसे की द्राक्ष, टोमॅटो, काकडी, भेंडी इत्यादी पिकांमध्ये दिसतात. परंतु मिरची पिकामध्ये सुरवातीला ही लक्षणे पानांच्या खालच्या बाजूला दिसतात. त्यामुळे हा रोग भुरी नसून डाऊनी मिल्ड्यू असावा असे वाटते. आणि चुकीचे निदान होऊन नियंत्रणासाठी अयोग्य रासायनिक घटकांची फवारणी केली जाऊ शकते.

अनुकूल हवामान

रोगाचा प्राथमिक प्रसार हा शेतातील जुने पीक अवशेष व यजमान पिकांवर जिवंत असलेल्या बिजाणूंमार्फत होतो. त्यानंतर

दुय्यम प्रसार हा सुरवातीच्या प्रसारानंतर तयार होणाऱ्या बिजाणूंमार्फत होतो. हे बिजाणू वारा, पाणी, शेतमजूर, कीटक इत्यादींमार्फत एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जातात.

थंड व कोरडे हवामान या रोगासाठी अत्यंत अनुकूल असते.

साधारणतः २० ते २८ अंश सेल्सिअस तापमान व ६० टक्के आर्द्रता अशा वातावरणात बुरशीची वाढ व बिजाणू निर्मिती चांगल्या प्रकारे होते.

कमी प्रकाश या रोगास अधिक पोषक असतो.

सूक्ष्मदर्शकाखाली काय दिसते?

सूक्ष्मदर्शकाखाली आपण रोगाचे बिजाणू अतिशय स्पष्टपणे पाहून रोग निश्चिती करू शकतो. सूक्ष्मदर्शकाखाली लेव्हील्यूला तौरीका या प्रजातीचे बिजाणू अतिशय स्पष्टपणे दिसून येतात. या बिजाणूंना ‘कोनिडीया’ असे म्हणतात. हे कोनिडीया प्रायमरी आणि सेकंडरी अशा दोन प्रकारचे असतात. प्रायमरी कोनिडीया हे टोकदार, तर सेकंडरी कोनिडीया हे लंबगोलाकार असतात. कोनिडीया रंगहीन असतात. बिजाणू दंडावर (conidiophore) एकच कोनिडीया असते. इतर भुरी रोगांप्रमाणे कोनिडीयाची साखळी नसते.

नियंत्रणाचे उपाय

दोन ओळींतील अंतर जास्त ठेवावे. त्यामुळे हवा खेळती राहण्यास मदत होते.

पीक फेरपालट करावी. दुसरे किंवा आधीचे पीक हे वर दिलेल्या यजमान पिकांपैकी नसावे.

रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा. पोटॅश खताची मात्रा जास्त ठेवावी.

पोटॅशिअम बाय कार्बोनेटचा वापर फवारणीद्वारे करावा.

रोगाचा प्रादुर्भाव दिसून येणारी पाने, फळे, फांद्या व इतर भाग त्वरित तोडून नष्ट करावेत.

शिफारस केलेल्या बुरशीनाशकांचा वापर करावा.

निमतेलाचा वापर करावा.

जमिनीवर ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी. स्युडोमोनस बॅसिलससारख्या जैविक घटकांचा दर १५ ते २० दिवसांनी वापर करावा.

ॲम्पेलोमायसीस क्विसक्वॉलीस या बुरशीचा वापर करावा.

शिफारस केलेली बुरशीनाशके (लेबलक्लेमयुक्त)

सायफ्ल्युफेनामिड (५ टक्के ईडब्ल्यू)

फ्युसिलॅझोल (४० टक्के ईसी)

हेक्झाकोनॅझोल (७५ टक्के डब्ल्यूजी)

मेट्राफेनोन (५०० जी/एल एससी)

टेब्युकोनॅझोल (२५.९ टक्के ईसी)

ॲझोक्सिस्ट्रोबीन (१८.२ टक्के) अधिक डायफेनोकोनॅझोल (११.४ टक्के डब्ल्यू/डब्ल्यू एससी)

ॲझोक्सिस्ट्रोबीन (११ टक्के) अधिक टेब्युकोनॅझोल (१८.३ टक्के डब्ल्यू/डब्ल्यू एससी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT