Property Dispute Agrowon
ॲग्रो विशेष

Property Dispute : सत्य कधीतरी उघड होतेच

Team Agrowon

Land Dispute : एका गावात रत्नाकर नावाचा एक शेतकरी राहत होता. रत्नाकरच्या बाजूला विठ्ठल नावाच्या शेतकऱ्याची जमीन होती. विठ्ठलच्या जमिनीत रत्नाकरने अतिक्रमण केले होते. बांध कोरत कोरत जवळपास १५ ते २० गुंठे जमीन रत्नाकरने वाढविण्याचा प्रयत्न केला.

या जमिनीच्या अतिक्रमणाबाबत विठ्ठलचे व रत्नाकरचे अनेक वेळा भांडण झाले. प्रत्येक वेळी भांडणात रत्नाकर विठ्ठलला हेच सांगत होता, की मी अतिक्रमण केलेले नाही. पण रत्नाकर विठ्ठलच्या जमिनीमध्ये अतिक्रमण करीत आहे हे गावातील बऱ्याचशा लोकांना माहिती होते.

शेवटी वैतागून विठ्ठलने जमिनीची सरकारी मोजणी करण्याचे ठरविले. जमिनीची मोजणी करण्यासाठी सरकारी अधिकारी येणार म्हणून रात्रीतून रत्नाकरने वहिवाटीच्या खुणा काढून टाकल्या. जमीन मोजणीच्या वेळी जाणीवपूर्वक रत्नाकर गैरहजर राहिला.

तरी सुद्धा मोजणीमध्ये १५ गुंठे क्षेत्रावर रत्नाकरने अतिक्रमण केल्याचे मोजणी अधिकाऱ्यांच्या मोजणी केल्यानंतर लक्षात आले. मोजणी करणाऱ्या भूकरमापकाने नकाशावर कोणत्या क्षेत्रावर अतिक्रमण व कसे झाले आहे, हे देखील स्पष्टपणे दाखविले. गावातील आजूबाजूच्या शेतकऱ्यांनीही रत्नाकरने कशाप्रकारे अतिक्रमण केल्याचे ते अधिकाऱ्यांसमोर जबाबात सांगितले.

जमीन मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी रत्नाकरला नोटीस पाठवून व म्हणणे ऐकून विठ्ठलच्या जमिनीवर अतिक्रमण केले आहे हे त्यात नमूद केले. भूमिअभिलेख विभागाकडून सही शिक्क्यासह मोजणी नकाशा प्राप्त झाल्यावर विठ्ठलने उपविभागीय अधिकाऱ्याकडे अतिक्रमण क्षेत्र काढून मिळण्यासाठी अर्ज केला.

जाब जबाब व साक्षी पुराव्याच्या आधारे अतिक्रमित क्षेत्र आठ दिवसांत मंडळ अधिकाऱ्यांसमोर काढून टाकण्याचे आदेश झाले. सांगावयाचे तात्पर्य म्हणजे माणसाने कितीही चलाखी केली तरी कधीतरी सत्य हे उघड होते. पण तोपर्यंत माणसाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.

तुकडेबंदी कायद्यास अपवाद नियम
एका गावात नागेश नावाचा एक शेतकरी राहत होता. गावात पिण्याच्या पाण्याच्या टाकीची नितांत गरज असल्यामुळे गावातील प्रत्येक माणसाला ग्रामपंचायतीकडून जमिनीबाबत विचारणा करण्यात आली. पण कोणीही पाण्याच्या टाकीसाठी जमीन द्यायला तयार होत नव्हता. नागेशने मोठे मन करून दोन गुंठे जमीन स्वतःहून गावाला दान देण्याचे ठरविले.

नागेशच्या या निर्णयावरून गावातील लोक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य फार खूष झाले. ही जमीन खरेदी करायला किती स्टॅम्प ड्यूटी लागेल हे विचारण्यासाठी गावातील सर्व जण सब-रजिस्ट्रार यांचे कार्यालयात गेल्यावर त्यांना सब-रजिस्ट्रारने सांगितले, की पाण्याच्या टाकीसाठी कमीत कमी अर्धा एकर जमीन तुम्हाला दान द्यावी लागेल.

पाण्याच्या टाकीसाठी फक्त दोन गुंठे जमीन लागत असताना मी अर्धा एकर जमीन दान कशी काय देऊ, असा प्रश्‍न शेतकरी नागेशला पडला. यावर सब-रजिस्ट्रार कार्यालयात बराच वेळपर्यंत गावकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली पण त्या चर्चेत गावकऱ्यांचे व नागेशचे म्हणणे सब-रजिस्ट्रार ऐकून घ्यायला तयार नव्हते. सब-रजिस्ट्रारचे म्हणणे होते, की दोन गुंठे जमिनीचा व्यवहार तुकडेबंदी कायद्याच्या विरोधात होतो.

शासनाने सार्वजनिक कामासाठी दान देण्याच्या क्षेत्राला तुकडेबंदी कायद्यातून वगळल्याचे सब-रजिस्ट्रारला माहीत नव्हते. सांगावयाचे तात्पर्य म्हणजे एकत्रीकरण कायद्यानुसार सार्वजनिक कामासाठी जमीन दिल्यास जमिनीचा तुकडा होत नाही, असे तुकडेबंदी कायद्यात अपवाद करून नमूद करण्यात आले आहे.

शेखर गायकवाड
ई-मेल- shekharsatbara@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT