Shekhar Gaikwad : फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. विदर्भातील एका जिल्ह्यातील एका लहानशा गावात किसनाबाई नावाची एक विधवा म्हातारी एकटी राहत होती. तिला कोणीही वारस नव्हते. त्याच गावात तिची मोठी शेतजमीन होती. किसनाबाईची जमीन कसायला कोणीही नसल्यामुळे सगळी जमीन गावातलेच काही लोक वाट्याने कसत असत आणि त्यातून मिळणारा उत्पन्नाचा हिस्सा म्हातारीला तिच्या घरी आणून देत. गावातील सगळ्या लोकांचा किसनाबाई म्हातारीच्या जमिनीवर डोळा होता.
म्हातारीला कोणीही वारस नाही हे पाहून म्हातारीची जमीन आपल्याला मिळावी म्हणून गावातील अनेक लोक वेगवेगळ्या शकला लढवीत होते. गावातील एका माणसाने म्हातारीला तीर्थयात्रा घडवून आणण्याचा घाट घातला. परंतु म्हातारीने तीर्थयात्रेला जाण्यास नकार दिला. ती त्याला म्हणाली, ‘‘नको रे बाबा, इथेच कष्ट करायचे, कष्टातच खरा परमेश्वर असतो.’’ गावातील दुसऱ्या एका माणसाने दिवाळीत किसनाबाईला महाग जरीचं लुगडं घेतलं आणि तिच्याशी गप्पा मारता-मारता म्हातारी आपल्याला दत्तक घेते का? याची चाचपणी करायला सुरुवात केली. परंतु म्हातारीने त्याला पण प्रतिसाद दिला नाही.
दररोज अशा नव्या नव्या गोष्टी किसनाबाईच्या कानावर पडत होत्या. तसतशी किसनाबाई पण हुशारीने व सावधपणे पावले टाकत होती. हे सगळे लोकांचे उद्योग प्रॉपर्टीसाठी चाललेत हे तिला स्पष्टपणे कळत होते. तरीपण कुणालाही न दुखावता काय करता येईल याचा ती विचार करीत होती. एक दिवस अचानक सकाळी म्हातारी मरण पावल्याची वार्ता संपूर्ण गावात व पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली.
किसनाबाईचा अंत्यसंस्कार पार पाडल्यानंतर तिच्या संपत्तीबद्दल गावात सगळीकडे चर्चा सुरू झाली. सगळी चौकशी व शोधाशोध झाल्यानंतर म्हातारीने तिचे मृत्युपत्र करून ठेवले होते असे लक्षात आले. एवढेच नाही तर रजिस्टर मृत्युपत्रावर प्रतिष्ठित लोकांच्या सह्या होत्या. मृत्युपत्रात हुशारीने त्याच गावातल्या शिक्षण संस्थेला सगळी जमीन दान देऊन टाकली होती. त्यानंतर मात्र सगळ्यांची तोंड बंद झाली!
थोडक्यात, आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या मिळकतीची विल्हेवाट लावण्याच्या हक्काचे प्रत्येकाने जाणीवपूर्वक संरक्षण केले पाहिजे. ‘माणूस आणि प्रॉपर्टी’ या विषयाचा अभ्यास करताना शिक्षणापेक्षा चलाखीने वापरलेली बुद्धी अधिक उपयोगी ठरते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.