Indian Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Indian Agriculture News: मराठवाड्यातले तरूण शेतकरी प्रयोगशील आहेत का ?

Team Agrowon

इंद्रजीत भालेराव

Rural Story : परवा गावाकडच्या गणपत नावाच्या मुलाचा फोन आला. फोनवरून मला त्याची ओळख पटली नाही. तो म्हणाला, काका मी तुमच्यासाठी फणस घेऊन आलोय. मला वाटलं हा कोकणात गेला असावा. कोणीतरी उद्योगी मुलगा असावा. पण तो घरी आला तेव्हा लक्षात आलं की अधून मधून कविता लिहिणारा माझ्या गावचा गणपत तो हाच.

गणपतचे वडील शत्रुघ्न आणि चुलते भारत हे माझा धाकटा भाऊ प्रभाकर याचे शालेय जीवनातले मित्र. त्यामुळं आमचं नेहमीच घरी येणं जाणं होतं. आता ते रिधोरा हे आमचं गाव सोडून वडगावच्या शिवारात राहायला गेलेले आहेत. वडगाव आमच्या गावाला अगदी लागून आहे. पण आम्ही त्यांना रिधोऱ्याचेच समजतो.

त्याला विचारलं, अरे हे फणस कुठून आणलं ? तर म्हणाला, काका मी शेतात एक फणसाचं झाड लावलय. महटलं कधी ? तर म्हणाला, सतरा वर्षापुर्वी मी हे झाड लावलय, पाचसहा वर्षापासून त्याला फळं यायलीत.

म्हटलं, कुठून आणलं हे रोप ? तुला कशी कल्पना सुचली ? हे कोकणातलं, आपल्याकडं चुकूनही न दिसणारं, संतांच्या अभंगात, 'फणसाअंगी काटे, आत अमृताचे साठे' एवढंच आपण लहानपणी ऐकलं होतं.

पुढं कधी कोकणात गेल्यावर ते पाहायला मिळालं होतं. नाही तर चित्रातच दिसणार हे फळ तू पिकवलंस कसं ? किती झाडं लावलीस ? कशी वाढवलीस ? कशी टिकवलीस ?

त्यानं मग त्याचा सगळा इतिहास सांगितला. कुणीतरी बंगाली डॉक्टर नावाचे डॉक्टर वीस वर्षांपूर्वी आमच्या भागात आले. आहेरवाडीला राहतात. त्यांनी काही लोकांना या फणसाच्या बिया दिल्या. आणि झाड लावायला सांगितलं. सगळ्यांनी काही ते लावलं नाही. लावलं तर टिकवलं नाही. टिकवलं तर वाढवलं नाही. आणि वाढवलं तर त्याला फळं आली नाहीत.

पण गणपतनं सुकाळात, दुष्काळात, प्यायला पाणी नव्हतं तेव्हाही भरपूर पाणी मागणारं हे झाड जगवलं, टिकवलं, वाढवलं. आज हे झाड त्याला प्रचंड फळं देत आहे. आकारानंही प्रचंड आणि संख्येनंही प्रचंड. पण तो त्याची विक्री करत नाही. सगळी फळं नातेवाईकांना आणि मित्रांना वाटून टाकतो. नव्हाळीचा वानोळा म्हणून वाटत राहतो.

इतक्या कष्टानं पिकवलेला, इतका महागामोलाचा मेवा, आपल्या भागात मिळत नाही म्हणून तो सगळ्यांना वाटत राहतो. कारण त्याच्या रक्तात उदार अंतःकरणाचा खरा कुणबी आहे. तो अजून व्यवहारी झालेला नाही.

गणपतला बसवून घेतलं. त्याच्याशी गप्पा मारल्या. या गणपतचे आजोबा माणिकराव हे आमच्या गावचे भाविक सांप्रदायिक वारकरी. त्यांनी माझ्या मागं लागून औरंगाबादहून मला संत एकनाथांचं भावार्थ रामायण आणायला लावलं होतं.

त्या माझ्या कष्टाचं फळ आज त्यांच्या नातवांनी मला घरी आणून दिलेलं होतं. मीही असंच भावार्थ रामायणाचं ओझं औरंगाबादहून डोक्यावर आणून त्याच्या आजोबांना दिलेलं होतं.

गावाकडं मी विचारांची भाऊबीज घ्यायचो तेव्हा एकदा गणपत माझ्याजवळ आला आणि म्हणाला काका मी एखादी कविता म्हणू काय ? असं मध्येच कुणीही बोलायला लागलं तर कार्यक्रमाचा तोल बिघडतो म्हणून मी तेव्हा त्याला नकार दिला होता.

मला वाटलं तो नाराज झाला असेल. पण तो नाराज झालेला नव्हता. नंतर परभणीला येऊन त्यानं मला एकदा त्याच्या कवीताही दाखवल्या होत्या. लोकप्रिय कवितांच्या आणि गाण्यांच्या चालीवर आणि तो शब्दांची रचना करतो. त्यातून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतो. आजची बिकट परिस्थिती मांडतो.

बोलतानाही तो अत्यंत तडफेनं गावातल्या बिघडलेल्या वातावरणाविषयी बोलत होता. गाव कसं बिघडत चाललंय. गावातली तरुण पिढी कशी बिघडत चाललीय. आपल्या गावातलेही तरुण गौतमी पाटलाच्या नादी कसे लागलेत. ही भयंकर परिस्थिती, हीचं टोक असणार होणार आहे ? तो मोठ्या तडफेनं बोलत होता.

खरंतर त्याचं बोलणं चित्रीकरण करून ठेवायला पाहिजे होतं. त्याची भाषा, त्याची तडफ, त्याच्याकडं असलेले ग्रामवास्तवाचे वर्तमान तपशील, यावर आधारित कुणीही उत्तम कथा, कविता, कादंबऱ्या लिहू शकेल इतकं सगळं दस्तऐवज त्याच्याजवळ आहे.

ते सांगण्याची तडफही आहे. पण तो फारसा शिकलेला नाही. वाङ्मयाचं त्याचं फारसं वाचनही नाही. त्यामुळं त्याला शब्दातून ते नीट आणि परिणामकारकपणे मांडता येत नाही. पण त्याचं बोलणं मात्र फार परिणामकारक वाटत होतं.

त्याचं वय आता तीस वर्षे आहे. तो बारावी शिकून शेतात काम करायला लागला. डीएड, बीएड करून कुठं मास्तरकीला चिकटावं अशी इच्छा निर्माण झाली होती. पण ती गोष्ट आपल्या आवाक्यातली नाही हे लक्षात घेऊन सरळ खाली मान घालून तो शेतात राबायला लागला. कष्ट करायला लागला. बापाचा एकुलता एक मुलगा. त्याला तीन बहिणी. दोन बहिणींची सुस्थितीत लग्न झालेली. एक बहीण एम. एस्सी. झालेली. तिचं आता लग्न करायचं आहे.

गणपतचं लग्न होऊन साताठ वर्षे झाली. पण अजून मुलबाळ नाही. त्यासाठी दवाखाना करणं सुरू आहे. तो म्हणत होता, काका मुलबाळ नाही झालं तरीही मला काही वाटत नाही. पण वाडवडिलांना वाटतं असं कसं ? इथंच कसा वंश खुटू द्यायचा ? म्हणून प्रयत्न करतो आहे. पण आपल्यासारख्याला दवाखाना परवडत नाही.

प्रत्येक महिन्याला दवाखान्यात लागणारे पाच-सहा हजार रुपये आणायचे कुठून ? हा प्रश्न आहे. पण सगळ्यांची मनं सांभाळावी लागतात. आपलाच हेका धरून चालत नाही. म्हणून मी हे सगळं करतो आहे. परभणीतल्या आमच्या ओळखीच्या एका चांगल्या डॉक्टरकडं त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे. गयानं गणपतला त्या डॉक्टरविषयीचे स्वतःचे चांगले अनुभव सांगून त्याला मानसिक आधार दिला. पुन्हा येताना पत्नीलाही घेऊन ये. तिलाही मी बोलते असं सांगितलं.

गणपत म्हणत होता, दादा गावाकडं काही राहिलं नाही हो. आनंदानं जगावं, आनंदानं राहावं असं काही गावाकडं नाही. मागच्या पाच वर्षात पाऊस पाणी चांगलं झालं, येलदरी धरणात पाणी आलं, म्हणून सध्या ठीक वाटतय. पण इथून पुढं आणि याच वर्षी जर दुष्काळ पडला तर शेतकरी मोडून पडणार आहे.

त्यामुळं आहे त्या आठ एकरातलं चार एकर विकून इथं परभणीला येऊन राहावं, एखादं दुकान टाकावं असं मला वाटायलय, असं तो म्हणाला. तो हुशार आहे, व्यवसाय नीट करू शकेल. तो जिद्दी आहे, नक्की व्यवसायात यशस्वी होईल, याची मला खात्री आहे. पण शेतात राहू इच्छिणारा आणि शेतात आनंदानं राहता येत नाही म्हणून तळमळणारा, आनंदानं राहता यावं म्हणून शहराचा रस्ता धरू इच्छिणारा हा मुलगा मला आजच्या ग्रामवास्तवातल्या कोट्यावधी मुलांचा प्रतिनिधी वाटला.

त्यानं मला दाखवलेल्या कवितांपैकी एक प्रातिनिधीक कविता इथं मुद्दाम देत आहे. आपल्या हे सहज लक्षात येईल की, स. ग. पाचपोळ यांच्या आई या कवितेच्या धरतीवर त्यानं ही बापावरची कविता लिहिलेली आहे.

॥ बाप ॥

पाण्याविना पीक जव्हा थराथरा कापं

तवा मला पिकामधी दिसतो माझा बाप

दादाला या गरिबीनं शिकू दिलं नाही

दुष्काळानं रान आमचं पिकू दिलं नाही

बहिणीच्या हुंड्यासाठी लई झाला ताप

तवा मला हुंड्यामधी दिसतो माझा बाप

जव्हा कव्हा पिकाला या बरकत आली

तव्हा तव्हा शिवारात गारपीट झाली

गारा पाहून बाप म्हणे कुणाचा हा शाप

तव्हा मला गारामधी दिसतो माझा बाप

शेतातलं पीक पाहून माय ठुमकती

खांद्यावर ओझं बाच्या कर्जाचं हे किती

सावकारानं घेतली जव्हा खळ्यावर झेप

तवा मला खळ्यामधी दिसतो माझा बाप

काळीज माझं भरून येतं पाहून त्याचं तप

सगळ्यांच्या मुखी घास घाली माझा बाप

तरी देवा असं का रे ? कोणतं हे पाप ?

तवा मला देवा मधी दिसतो माझा बाप

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cotton Anudan : २६ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन, कापूस अनुदान जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंनी दिली माहिती

Agriculture Power Bill : कृषी वीज बिले दुरूस्त करा अन्यथा आंदोलन, इरिगेशन फेडरेशनकडून इशारा

Agriculture Management : पुरातही पिके वाचविणारी ‘एसआरटी’ पद्धत

Agriculture Import Export : आयात-निर्यातीत हवी समयसूचकता

PM Kisan Scheme : पी.एम.किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना

SCROLL FOR NEXT