Indrjeet Bhalerao : गावात जत्रांना महत्त्व का असतं?

जत्रेला जाताना गावकरी नेहमीच आपली गाडी पुढे काढण्यासाठी रस्त्यातच शंकरपट सुरू करायचे. आणि तुफान गाड्या पळवायचे. आम्ही गाडीच्या खुटलीला धरून उभे राहायचो आणि सगळ्या गाड्यांची गंमत पाहायचो.
Bhimthadi Jatra
Bhimthadi JatraAgrowon

- इंद्रजीत भालेराव

दिवाळी संपली की जत्रांजे वेध लागायचे. गावोगावच्या जत्रा सुरू व्हायच्या. त्या पुढे उन्हाळाभर चालायच्या. म्हणजे पावसाळा सोडला तर हिवाळा आणि उन्हाळा या दोन्ही ऋतूत गावोगाव जत्रा भरायच्या. या जत्रांसाठी खर्चायला आपल्याजवळ पैसे असावेत म्हणून गावाकडची माणसं आठवणीने जत्रांसाठी पैसे साठवून ठेवायची.

सगळ्या जत्रा ह्या प्रामुख्यानं तिथीनुसार भरत असतात. त्यामुळे दरवर्षी त्यांच्या तारखा बदलतात. ज्या देवाची जत्रा आहे त्या देवाची प्रमुख तिथी पाहून जत्रा भरवली जाते. आमच्याकडे पूर्वी सगळ्यात मोठी जत्रा होती ती औंढा नागनाथाची. ही जत्रा मी कधी पाहिली नाही, पण आमच्या गावचे पुष्कळ लोक या जत्रेला जायचे, ते या जत्रेच्या आठवणी सांगायचे. औंढयाचा डोंगरमाळ आमच्या शेतातून दिसायचा. शेतात तो डोंगरमाळ दिसू लागला की काम करणारे गडी आपल्या जत्रेच्या आठवणी सांगायचे.

ही जत्रा महाशिवरात्रीला भरायची. कारण औंढा नागनाथ महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक. त्यामुळे या जत्रेचा मुहूर्त हा महाशिवरात्रीचा असायचा. परिसरात सर्व गावातून लोक या जत्रेला येत असावेत. महादेवाचा रथही मिरवला जात असावा. आणि खूप मोठी उलाढाल या जत्रेत होत असावी. त्यामुळे पुष्कळ दिवस या जत्रेची चर्चा चालायची.

औंढा नागनाथाच्या जत्रे आधी दाठाळी पुनवेला बाराशिवच्या हनुमंताची यात्रा असायची. ही यात्राही खूप लोकप्रिय होती. बारा गावच्या शिवा एकत्रित येऊन तयार झालेलं गुरं राखणाऱ्या गुराख्यांचं ते एक आखर होतं. त्या आखरावर गुराख्यांनी मिळून एका मारुतीची स्थापना केली आणि त्याचं महात्म्य वाढत गेलं.

त्याची जत्रा भरायला सुरुवात झाली. त्याला आता दोन तरी शतकाची परंपरा असावी. ही जत्रा गुराख्यांनी बसवलेल्या हनुमानाची असल्यामुळे परिसरातले सगळे गुराखी या जत्रेला जातातच. कारण हा देवच गुराख्यांचा म्हणून प्रसिद्ध होता. या जत्रेला गेलेले गावातले गुराखी प्रामुख्यानं हनुमंताला नारळ फोडून, प्रसाद खाऊन आणि वेळूच्या काठ्या, बासऱ्या, पिपाण्या आणि पुंग्या घेऊन यायचे.

ही जत्रा मला कधीही पाहता आली नाही. कारण आमचे गुराखी दरवर्षी जत्रेला जायचे. म्हणून गुरं राखण्याची जबाबदारी माझ्यावर यायची. त्यामुळे या जत्रेला जायची कधी संधी मिळाली नाही. पण परत आलेले गुराखी या जत्रेच्या आठवणी सांगायचे आणि मला हुरहुर वाटायची. पुढं किशनराव शिंदे आणि मुरलीधर मुळे या मंडळींनी त्याच ठिकाणी एक निवासी शाळा सुरू केली.

बाराशिव हनुमान विद्यालय असं तिला नाव दिलं. माझा मित्र, कादंबरीकार भारत काळे तिथं कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाला. पुढं त्याच्या भेटीगाठीसाठी म्हणून मी नेहमी बाराशिवला जायचो. भारतनं सुरू केलेला 'बाराशिव साहित्य पुरस्कार' महाराष्ट्रात खूप मोठी मान्यता मिळवून गेला. त्यामुळे वाङ्मयविश्वात पुढे बाराशिव हे नाव भारतमूळे अजरामर झालं.

बाराशिवच्या यात्रेच्या आधी आणखी एक मोठी यात्रा परभणीत भरायची. त्या यात्रेला उरुस असं म्हटलं जायचं. तिला तुरुत पिराची जत्रा असे लोक म्हणायचे. तुरुत पीर म्हणजे तूराबुल हक या अवलिया संताची समाधी, तिथं ही जत्रा भरायची.

जिल्ह्याचं ठिकाण असल्यामुळे आणि सगळीकडून येण्यासाठी वाहनांची व्यवस्था असल्यामुळे फार जुन्या काळापासून हा उरूस फार मोठ्या प्रमाणात भरत असावा. आम्ही महानुभाव असल्यामुळे आम्हाला उरुसाला कधी जाण्याची उत्सुकता वाटली नाही. त्यामुळे परभणीला प्राध्यापक म्हणून येईपर्यंत मी कधी उरुस पाहिला नाही.

इथं आल्यानंतर मात्र काही दिवस मी हमखास उरुसाला जायचो आणि आकाश पाळण्यात बसणं ही माझी सगळ्यात मोठी हौस जत्रेत पूर्ण करून घ्यायचो. त्यामुळे प्राध्यापक झाल्यावरही खूप वेळा मी या आकाश पाळण्यात बसलेलो आहे. इथं महाराष्ट्रातले सगळे प्रसिद्ध तमाशे येतात. पण मी कधी तमाशा पाहायला गेलो नाही. एकदा मित्रांनी मला बळजबरी हाताला धरून नेलं तर तिथं समोरच बसलेला धाकटा भाऊ पाहून मीच पळून आलो.

ही यात्रा जवळजवळ १५ दिवस चालते. पण ही यात्रा एक अशी यात्रा आहे की जी तारखेप्रमाणे दरवर्षी २ फेब्रुवारीला सुरुवात होते. स्वतः जिल्हाधिकारी मजारीवर चादर चढवतात. संदल काढतात. मोठमोठे मानाचे संदल दररोज पंधरा दिवस तुरूत पिराकडे जाताना दिसतात. पार पाकिस्तानातूनही हिंदू, मुस्लिम प्रजा या उरूसासाठी जमा होते. संपूर्ण परभणी जिल्ह्याला या उरुसानिमित्त दोन फेब्रुवारीला सार्वजनिक सुट्टी दिली जाते.

हा उरुसही खूप जुन्या काळापासून भरत असावा. बी. रघुनाथ यांच्या 'हिरवे गुलाब' या कादंबरीमध्ये या उरुसाचं बरंच वर्णन आलेलं वाचायला मिळतं. परभणी जिल्ह्यातले वालूर गावचे सुप्रसिद्ध मराठी कथाकार राम निकम यांनी याच उरसावर 'उरुस' नावाची एक फार सुंदर कथा लिहिलेली आहे.

माझ्या लहानपणी आणखी एक महत्त्वाची जत्रा भरायची. ती म्हणजे भवानीची जत्रा. औंढा नागनाथ हे आमच्या गावच्या उत्तरेला होतं. बाराशिव आणि परभणी हे आमच्या गावच्या पश्चिमेला तर ही भवानीची जत्रा आमच्या गावच्या दक्षिणेला भरायची.

तिला भवानीची जत्रा म्हणायचे किंवा सुकीची जत्रा म्हणायचे. कारण हे ठिकाण तसं आडरानात होतं. आता तिथं एक गावच वसलेलं आहे. त्याला 'लक्ष्मी नगर' असं नावंही भवानीच्या नावावरूनच देण्यात आलेलं आहे.

पूर्वी ही जत्रा फक्त एका दिवसाची असायची. सकाळी सगळे लोक जमा व्हायचे आणि रात्री अंधार पडायच्या आधी सगळी जत्रा पांगलेली असायची. कारण रात्री तिथं भूतांची जत्रा भरते, असं लोक म्हणायचे. भवानीच्या मंदिराभोवती चिंचेचं मोठं बन होतं. त्या बनात रात्री भूतं खेळतात अशी अफवा होती.

आता अर्थातच तिथं वसाहत झाल्यामुळे नेहमीच लोक राहायला लागलेले आहेत. या जत्रेला बऱ्याचदा दादा आम्हाला गाडी जुंपुन घेऊन जायचे. एकदा आमचे चुलते विश्वनाथ दादा गाडी जुंपत असताना गाडीचं डोमाळं बंधनातून सुटलं आणि त्यांच्या कपाळावर आदळलं. त्यामुळे त्यावर्षीची आमची जत्रा रद्द झाली. ही गोष्ट मला अजूनही आठवते.

Bhimthadi Jatra
Pandharpur Yatra : आषाढी वारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नियोजन करा

जत्रेला जाताना गावकरी नेहमीच आपली गाडी पुढे काढण्यासाठी रस्त्यातच शंकरपट सुरू करायचे. आणि तुफान गाड्या पळवायचे. आम्ही गाडीच्या खुटलीला धरून उभे राहायचो आणि सगळ्या गाड्यांची गंमत पाहायचो.

कधीकधी भीतीही वाटायची आणि उभं नाही राहिलं, गाडीतच बसून राहिलं तर बसणाऱ्या आदळल्यामुळे बरगड्या दुखू लागायच्या. पण माणसं सगळी तरुण असल्यामुळे हा गाड्या पळवण्याचा शौक त्यांना प्रवासामध्ये निर्माण व्हायचाच. पुढे महेबूब खानच्या मदर इंडिया चित्रपटात गाड्या एकमेकांच्या पुढे काढणारे शेतकरी पाहिले की प्रत्येक वेळी मला या सुकीच्या जत्रेची आठवण यायची.

सुकी हे गाव माझ्या आईचं आजोळ. त्यामुळे आईला लहानपणापासून या जत्रेचं खूप आकर्षण होतं. कदाचित तिला या जत्रेसाठी म्हणून नेहमी आजोळीही नेत असावेत. आपलीही मुलं आणि मुली या जत्रेला जावेत असं आईला वाटायचं. आम्ही महानुभाव पंथीय असल्यामुळे भवानीचे भक्त नव्हतो. पण तरीही एक आठवण म्हणून आई आमच्या दादाला गाडी जुंपून आम्हा बहिण भावंडांना या जत्रेला न्यायला लावायची.

मी थोडा वेंधळा असल्यामुळे जत्रेत कुठेतरी हरवण्याची सगळ्यांना कायम भीती वाटायची. त्यामुळे एखादी बहीण किंवा एखादा भाऊ कायम माझा हात धरूनच असायचे. या जत्रेतून पुष्कळ वेळा बहिणी बांगड्या भरून घेत, काही वस्तूही घेत. पण प्रामुख्यानं देवीचे दर्शन आणि थोडेफार जत्रेतले पदार्थ खाणं एवढंच आमच्यासाठी या जत्रेचं स्वरूप असायचं. बहिणीनं एकदा हातावर गोंदन गोंदवून घेतल्याचंही आठवतं. आमच्या वहिनी आहेरवाडीच्या असल्यामुळे त्यांनीही लहानपणापासून ही जत्रा पाहिलेली होती. त्याही आमच्यासोबत जत्रेला येत असत.

त्यानंतरची आमच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची जत्रा म्हणजे लिंबगावची जत्रा. ही गोपाळच्यावडीची जत्रा म्हणून प्रसिद्ध होती. नांदेड जवळच्या लिंबगावच्या शिवारात ही जत्रा भरायची. ही महानुभाव पंथीय जत्रा असल्यामुळे आमच्या गावातल्या दहा-बारा गाड्या एखाद्या लग्नाचं वऱ्हाड निघावं तशा निघायच्या. या जत्रेला गावातली पुष्कळ माणसं यायची. या जत्रेला मात्र सगळेजण मुक्कामी यायचे. एक तर आमच्या गावापासून हे अंतर १२ कोस होतं.

गोपाळचावडी ही आमच्या गावाच्या पूर्वेला होती. गोपाळचावडीची यात्राही खूप जुनी असावी. कारण आमची आजीही या जत्रेच्या आठवणी सांगते. तिने सांगितलेल्या आठवणीवरूनच पुढे मी शोध घेतला आणि माझ्या लक्षात आलं की १०० वर्षांपूर्वी इथं सत्यशोधक समाजाची नाटकं देखील व्हायची. समाजामध्ये नवा संदेश पोहोचवला जायचा.

तसा महानुभाव पंथ हा मुळात सुधारणावादी पंथच आहे. या जत्रेत वसमत तालुक्यातल्या दांडेगावचे पाटील स्वतः सत्यशोधक समाजाचा प्रचार करण्यासाठी यायचे. लिंबगावचीही काही मंडळी सत्यशोधक समाजाची अनुयायी झालेली होती. त्यामुळे त्या काळात त्यांनी शिक्षणाचं महत्त्व सांगितलेलं ऐकूनच माझ्या आजीने माझ्या वडिलांना थोडेफार का होईना शिकवलेलं होतं. माझ्या गावचे शिकलेले पहिले गृहस्थ म्हणजे माझे वडीलच होते.

या जत्रेतही बाकीच्या जत्रेसारखं सगळं असायचंच. रात्री छबीनाही मिरवला जायचा. पालखी मिरवण्याला छबीना काढणे असं म्हणण्याची पद्धतही मुस्लिम राजवटीतूनच आलेली होती. ही जत्रा खूप मोठी असायची. या जत्रेला नांदेड, निजामाबाद, आंध्र प्रदेशातले आणि इकडे परभणी जिल्ह्यातले लोक यायचे. संपूर्ण महाराष्ट्रातून महानुभाव साधू आणि संत यायचे. त्यांना पंगती दिल्या जायच्या. आमची आई देखील घरून पुरणाचं करून आणायची आणि इथे जत्रेत पुरणाच्या पोळ्या करून एखादी पंगत द्यायची.

याच जत्रेत पहिल्यांदा आमच्या गावच्या लोकांनी सिंधुताई सपकाळ यांना मंदिराच्या पायरीवर भजन म्हणून भिक मागताना पाहिलं आणि आमच्या गावातल्या जत्रेसाठी सोबतच घेऊन आले. ही ४० वर्षांपूर्वीची गोष्ट. सिंधुताई तेव्हा नुकत्याच घरातून बाहेर पडलेल्या होत्या. माझ्या 'गाई घरा आल्या' या पुस्तकातल्या 'पितांबऱ्या' या ललितलेखात या जत्रेचे संदर्भ आलेले आहेत.

आमच्या गावातही दोन लहान जत्रा भरायच्या. एक आबासाहेबांची जत्रा म्हणजे महानुभाव पंथीयांची जत्रा आणि दुसरी पिराची जत्रा. दोन्ही जत्रांच स्वरूप खूप लहान असायचं. नंतर गावातल्या लोकांनी परचे छापून, इतर जत्रांमध्ये वाटून गर्दी वाढवली आणि जत्रेला थोडं मोठं स्वरूप आणलं. एक दोन तमाशे यायचे, कुस्त्या व्हायच्या, शंकरपट व्हायचा आणि रात्री गावातून छबिना मिरवला जायचा. देवाच्या पालखीची मिरवणूक काढली जायची. एरंडेश्वरवरून आप्पा हलवायचं एकमेव मिठाईच दुकान यायचं. त्या दुकानात बर्फी, चिवडा, जिलबी, बत्ताशा आणि रेवड्या एवढेच पदार्थ मिळायचे. एक दोन फुलाची दुकान यायची.

एक-दोन वर्षी नाटकही आलं होतं. त्या नाटकानं आम्हाला वेड लावलं आणि उन्हाळ्यात शेतात मांडवात आम्ही सगळी बहिण भाऊ त्या नाटकाची प्रतिकृती साकार करायचो. खूप आठवणी मागे ठेवून ही जत्रा जायची. कारण त्या छोट्याशा गावातल्या माणसांचं भावविश्वच तेवढं होतं. त्यामुळे या जत्रेत घडणाऱ्या सगळ्याच गोष्टी नवलाईच्या वाटायच्या. या जत्राखेत्रांच्या निमित्तानेच गावाला काही नव्या गोष्टी कळायच्या. नाही तर आमचं गाव म्हणजे पाच पन्नास उंबऱ्यांचं आदिम जीवन जगणार, दोन अडीचशे लोकवस्तीचं एक आदिम गावच होतं.

कधी कधी जत्रेसाठी आलेला तमाशा गावात काही दिवस मुक्काम ठोकायचा आणि गावातली मुलं चांगलीच तमाशाच्या नादी लागायची. आमचे एक मोठे भाऊ बरेच त्या नादाला लागले होते. घरच्यांना त्यांची काळजी वाटायची. तमाशाचे पंधरा दिवस गावात अफवांचा पूर आलेला असायचा. तरुण मुलं वेगळ्याच गप्पा मारायची, महिलांची वेगळीच कुजबूज सुरू असायची, तर प्रौढांची चर्चा चिंतायुक्त असायची.

गावातली दुसरी जत्रा म्हणजे पिराची जत्रा. आमच्या गावात एकही मुसलमान कुटुंब नाही, तरीही गावात पिराचं देवस्थान होतं. ते देवस्थान मला मोठं गुढ वाटायचं. एक ओटा होता. त्यावर हिरवा गलफ चढवलेला असायचा. दोन तीन खनाचं माळद होतं ते. समोर मोठं पटांगण आणि लिंबाची उंच उंच आणि मोठी झाडं होती. बऱ्याचदा या झाडाखालच्या सावलीत आम्ही मुलं खेळायचो. जत्रेच्या काळात मोठी माणसं इथं दुला खेळायची. तो खेळताना एक गाणं म्हणायची,

दुला रे दुला, रहिमल दुलासांच्याला पीठ नाही, मलिदा केला

पिराचा निवद हा मलीद्याचाच असायचा. मलिदा हा शब्द आज आपण सर्वत्र वेगळ्या अर्थाने वापरतो. पण मलिदा हा एक मुस्लिम पदार्थ आहे. गरम गरम पोळी कुस्करून त्यात तूप आणि गूळ टाकून त्याचे उंडे तयार केले जात आणि त्याला मलिदा असं म्हटलं जायचं. हा खायला खूप गोड आणि चवदार असायचा. कधी कधी आठवण आली की आम्ही हट्टाने आईला मलिदा करायला लावायचो आणि खायचो. तशी ही जत्रा खूपच लहान असायची. इतर कुठलीच काही घटना या जत्रेत घडत नसे ना कुठलं दुकान येई, ना शंकरपट होई, ना कुस्त्या होत, ना तमाशा येई. बस मलिद्याचा निवद आणि रात्रीचं गावकऱ्यांचं दुला खेळणं, एवढंच या जत्रेत घडायचं.

महाराष्ट्रातल्या जत्रा या प्रामुख्याने मुस्लिम राज्यकर्त्यांनी सुरू केल्या असाव्यात. आमच्या गावच्या दोनही जत्रा निजामाच्या जहागीरदाराने सुरू केल्या अशी आठवण वडील सांगत. या जत्रांच्यामधून प्रामुख्याने मुस्लिम व्यापारी आपला माल विकायचे. जत्रा म्हणजे एका अर्थाने गावकऱ्यांसाठी वार्षिक बाजारच असायचा.

कारण छोट्या छोट्या गावातून बाजार भरत नसत. म्हणूनच जत्रांमध्ये खूप लोक भांडीकुंडी खरेदी करीत असत. महिला प्रामुख्याने त्यांचे सामान जत्रेतून खरेदी करीत असत. मुलं बासरी, पुंगी, वेळूच्या काठ्या, असल्या वस्तू आणि चिवडा, बर्फी, रेवड्या, फुटाणे, बत्ताशा असले पदार्थ घेऊन खायचे. अलीकडच्या काळात त्यात भजे, आलू बोंडे, गारीगार, बुढी के बाल असले पदार्थ समाविष्ट झालेले दिसतात.

Bhimthadi Jatra
Bhimthadi Jatra : भीमथडी जत्रेला पवारांनी लावली हजेरी

आज ह्या जत्रांचं स्वरूप नेमकं काय आहे ते मला माहित नाही. पूर्वी जत्रेत मिळणारे पदार्थ पुन्हा जत्रा भरल्यानंतरच पाहायला आणि खायला मिळत. पण आजकाल चिवडा, बर्फी, पेढे हे सहज मिळू लागलेले आहेत. पूर्वी हे पदार्थ विकत घेणेही अवघड असायचं. त्यामुळे दोन चार दिवस दूध साठवून आई घरीच बर्फी करायची. चिवडा करायची. कारण घरच्या सगळ्यांना जत्रेतून बर्फी, चिवडा घ्यायला लागणारे पैसे जवळ नसत.

प्रामुख्यानं जत्रा म्हटलं की महिलांची भांडी खरेदी, गोंदण, नकली दागिन्यांची खरेदी अशा गोष्टी व्हायच्या. जत्रेमध्ये फसवा फसवी व्हायची. त्यामुळे काही सावध लोक जत्रेतल्या वस्तू फारशा विकत घेत नसत. जत्रेत काही चालाक लोक जुन्या नोटा किंवा नकली नोटाही चालवत असत. त्यामुळे लहानपणी नेहमी ऐकलेलं गाणं मला आठवतं की,

ही दुनिया हाय एक जत्रा हावसं नवसं गवसं सतरा

गाडगेबाबांच्या कीर्तनातून कानावर पडलेला

जत्रा मे फत्रा बिठाया तिरथ बनाया पाणी दुनिया भई दिवानी पैसों की धुलधानी

हा कबीराचा दोहा ही आठवतो. जत्रा हा पूर्वी ग्रामीण जीवनाचा एक अपरिहार्य भाग होता. वर्षभर लोक जत्रेची वाट पाहायची. तूच लोकप्रिय शब्द घेऊन अलीकडं आपण नव्या जत्रा भरवत असतो. ग्रंथ जत्रा, महात्मा गांधींची पदयात्रा, दांडी यात्रा, भीमथडी जत्रा, या नव्या जत्रांच्या मधून जत्रा या शब्दांची लोकप्रियता अजूनही ओसरलेली नाही हेच आपल्या लक्षात येतं.

('अक्षरदान' दिवाळी अंकासाठी लिहिलेला हा लेख)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com