Amravati News : अमरावती जिल्ह्यात रब्बी हंगामात आतापर्यंत सरासरी १ लाख ४७ हजार ८९६ हेक्टरच्या तुलनेत १ लाख ४१ हजार ७८० म्हणजे ९६ टक्के क्षेत्रात रब्बीची पेरणी आटोपली आहे. गत काही वर्षांत जिल्ह्यात सिंचनाच्या सोयीसुविधा वाढल्याने रब्बी हंगामातील क्षेत्रात वाढ नोंदविण्यात आली आहे.
रब्बी हंगामात पिकांची लागवड करताना शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती हरभरा पिकाला दिली आहे. त्यामुळे यंदा हरभरा पिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. अमरावती, दर्यापूर या बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची सर्वाधिक उलाढाल होते. रब्बी हंगामात दुबार पीक घेण्याची पद्धत आहे. विहीर, बोअरवेल यांसारख्या सिंचन सुविधांचा पर्याय शेतकऱ्यांनी उपलब्ध करून घेतला आहे. परिणामी, क्षेत्रवाढ नोंदविली गेली असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात हरभरा पिकाचे सरासरी क्षेत्र १ लाख ३ हजार ६७९ हेक्टर असून, आतापर्यंत ९८ हजार ८६ हेक्टर म्हणजे ९५ टक्के क्षेत्रात हरभरा पिकाची, तर सरासरी ४२ हजार २३३ हेक्टरच्या तुलनेत ४० हजार २६३ हेक्टर म्हणजे ९६ टक्के क्षेत्रात गव्हाचा पेरा झाला आहे. सूर्यफूल, करडई, जवस या तेलबियांचे क्षेत्र नाममात्र आहे.
दर्यापूर बाजार समितीमध्ये रब्बी हंगामातील हरभऱ्याची मोठी आवक होते. दर्यापूर तालुका हा खारपणपट्ट्यामध्ये समाविष्ट आहे. या भागातील हरभऱ्याला त्याच कारणामुळे वेगळी चव येत असल्याने उत्तर भारतातून याला सर्वाधिक मागणी राहते. दिल्ली बाजारपेठेत खारपाणपट्ट्यातील हरभरा म्हणून व्यापारी यास अधिकचा दर देतात असे सांगण्यात येते.
बाजार समितीत हरभऱ्याची सर्वाधिक आवक
अमरावती जिल्ह्यात सोयी अधिक असल्याने दुर्गम मेळघाटसह सर्वदूर हरभरा लागवड होते. विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये रब्बी हंगामातील हरभऱ्याची सर्वाधिक आवक अमरावती बाजार समितीमध्ये होते. त्यामुळे हरभरा उलाढालीचे मोठे केंद्र नजीकच्या काळात हीच बाजार समिती झाली आहे. पंजाब, हरियाना, दिल्ली, राजस्थान तसेच उत्तर प्रदेशसह देशभरात मागणी असलेल्या राज्यांमध्ये या ठिकाणावरून हरभरा पाठविला जातो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.