
Amravati News : पश्चिम विदर्भातील चार लाख हेक्टर विस्तारित खारपाणपट्टा अनेक वैशिष्ट्य जपून आहे. त्याच भागातील हरभरा देखील खारपट चव आणि टिकवण क्षमतेसाठी सर्वदूर नावारूपास आला आहे. याच हरभऱ्याला आता भौगोलिक मानांकन मिळाले असून, अंजनगावसुर्जी येथील ‘कार्ड’ (कम्युनिटी ॲक्शन फॉर रूरल डेव्हलपमेंट सोसायटी) संस्थेच्या नावावर याची नोंदणी झाली आहे.
पूर्णा नदीच्या खोऱ्यालगतचा असलेला भाग खारपाणपट्टा म्हणून ओळखला जातो. पूर्वी हा भाग समुद्राची खाडीचा होता. त्यानंतरच्या काळात ज्वालामुखीमुळे हा भूभाग निर्माण झाला, असे कृषी विद्यापीठाचे निरीक्षण आहे. अकोला, बुलडाणा, अमरावती या तीन जिल्ह्यांतील १६ तालुक्यांत हा खारपाणपट्टा आहे.
चार लाख १६ हजार हेक्टर जमीन यामुळे प्रभावित असून, या जमिनीचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्याची उपलब्धता अधिक असली, तरी त्यात क्षाराचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे शेतीकामी त्याचा अपेक्षित वापर शक्य होत नाही. उन्हाळ्यात जमिनीला तडे जात असल्याने या भागात फळपीक घेणे शक्य होत नाही.
परिणामी, पारंपरिक पिकांवरच या भागातील शेतकऱ्यांची भिस्त आहे. कपाशी हे खरिपात, तर रब्बी हंगामात हरभरा हे मुख्य पीक घेतले जाते. या भागातील हरभऱ्याची टिकवणक्षमता अधिक आहे, त्यासोबतच खारपट चव असल्याने त्याला देशभरातून मागणी असते.
अशा प्रकारची वैशिष्ट्य जपणाऱ्या या हरभऱ्याला भौगोलिक मानांकन मिळावे याकरिता कार्ड संस्थेचे विजय लाडोळे यांनी पाठपुरावा केला होता. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून याकरिता निधीची ३२ लाख रुपयांची उपलब्धता करून घेण्यातही ते यशस्वी झाले. त्यांचे हे प्रयत्न फळास येत खारपाणपट्ट्यातील हरभऱ्याला भौगोलिक मानांकन मिळाले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.