Pune News : राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या साखर उद्योगात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून (व्हीएसआय) दिले जाणारे विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत. २०२३-२४ हंगामाकरिता सांगली जिल्ह्यातील रामदास बाबूराव पोळ यांना पूर्वहंगामासाठी,
सोलापूर जिल्ह्यातील अमोल सर्जेराव लोंढे यांना सुरू हंगामासाठी, तर वाळवा (सांगली) तालुक्यातील कुरळपचे शेतकरी शिवाजी यशवंत देवकर यांनी खोडवा पिकामध्ये राज्यात पहिला क्रमांक पटकावला. त्यामुळे तिघेही शेतकरी राज्यस्तरीय ‘ऊस भूषण’ पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. राज्यातील सर्वोत्कृष्ट कारखान्याचा पुरस्कार यंदा अहिल्यानगरच्या ‘अंबालिका शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या खासगी साखर कारखान्याला मिळाला आहे.
व्हीएसआयचे उपाध्यक्ष व राज्याचे माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी (ता.२१) साखर संकुल येथील व्हीएसआयच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पुरस्कार्थींच्या नावांची घोषणा केली. या वेळी व्हीएसआयचे सल्लागार शिवाजीराव देशमुख, महासंचालक संभाजी कडू पाटील, तांत्रिक सल्लागार आर.व्ही.दाणी (साखर तंत्र), डॉ. काकासाहेब कोंडे (विभागप्रमुख, मद्यार्क व जैवइंधन), राजेंद्र चांदगुडे (विभागप्रमुख, साखर अभियांत्रिकी), तुकाराम पाटील (प्रशासकीय व्यवस्थापक, प्रशासन विभाग),
प्रकाश हापसे (जनसंपर्क अधिकारी) उपस्थित होते. व्हीएसआयची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या गुरुवारी (ता. २३) सकाळी साडेदहा वाजता व्हीएसआयचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत होत आहे. श्री. पवार यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. यावेळी व्हीएसआयचे विश्वस्त उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील व साखर उद्योगातील मान्यवर प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
राज्यस्तरीय ऊस भूषण पुरस्कारांमध्ये पूर्वहंगामी हंगामात को ८६०३२ वाणाचे हेक्टरी ३१९.८१ टन उत्पादन घेणारे रामदास पोळ हे सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील सासपडे गावाचे प्रगतिशील शेतकरी आहेत. ते डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत. श्री. पोळ यांना दहा हजारचा कै. यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाला आहे. सोलापूरच्या माढा भागातील पिंपळनेर गावचे शेतकरी अमोल लोंढे यांनी सुरू हंगामात कोएम ०२६५ वाणाचे हेक्टरी २२७.७७ टन उत्पादन घेतले आहे.
त्यांना दहा हजारांचा कै. वसंतराव नाईक पुरस्कार मिळाला आहे. ते माढा येथील पिंपळनेरच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत. सांगलीतील वाळवा भागात असलेल्या कुरळप गावात को ८६०३२ वाणाचे खोडव्यात हेक्टरी २८९.८६ टन उत्पादन घेणारे शिवाजी देवकर हे श्री. तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत. त्यांना दहा हजारांचा कै.अण्णासाहेब शिंदे पुरस्कार मिळाला आहे.
व्हीएसआयकडून ‘विभागीय ऊस भूषण पुरस्कार’ दिले जातात. या पुरस्कारांचीही घोषणा या वेळी करण्यात आली. स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दक्षिण विभागात हंगामनिहाय प्रथम आलेल्या शेतकऱ्यांची नावे अशी (उत्पादनाचे सर्व आकडे प्रतिहेक्टरी व टनांत आहेत)
पूर्वहंगामासाठी प्रथम क्रमांक विजय शंकरराव पाटील, मु.पो.पारगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर (उत्पादन-३१०.७३, वाण- को ८६०३२, कारखाना-तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना), सुरू हंगामासाठी यंदा एकही शेतकरी या विभागात पात्र ठरलेला नाही. खोडवा गटात प्रथम क्रमांक प्रकाश विलास निकम, मु.पो. वर्णे, ता.जि. सातारा (उत्पादन-२६२.४०, वाण- को ८६०३२, कारखाना-अजिंक्यतारा ससाका).
मध्य विभागात हंगामनिहाय पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांची नावे अशी ः पूर्व व सुरू हंगामासाठी प्रथम क्रमांकाकरिता यंदा एकही शेतकरी या विभागांमध्ये पात्र ठरलेला नाही. खोडवा गटात प्रथम क्रमांक सौ. सविता दादासाहेब देशमुख, मु.पो. भाळवणी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर (उत्पादन- २२२.८६, वाण - व्हीएसआय ०८००५, कारखाना-कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग ससाका, श्रीपूर). उत्तरपूर्व विभागात हंगामनिहाय प्रथम आलेल्या शेतकऱ्यांची नावे अशी ः पूर्व, सुरू व खोडवा हंगामासाठी यंदा एकही शेतकरी या विभागात पात्र ठरलेला नाही.
‘अंबालिका’ ना सर्वोत्कृष्ट
राज्यातील सर्व साखर कारखान्यांमध्ये सर्वोत्कृष्ट कारखान्याचा कै. वसंतदादा पाटील यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार अंबालिका शुगर्स साखर कारखान्याने मिळवला आहे. अडीच लाख रुपये, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. एक लाख रुपये व मानचिन्ह असलेला कै. विलासरावजी देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार जालना जिल्ह्यातील अंबडच्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याला (युनिट १) मिळाला आहे. कै. डॉ. अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांच्या नावाने एक लाख रुपये व मानचिन्ह असलेला ऊस विकास व संवर्धनासाठीचा पुरस्कार कागल (जि. कोल्हापूर) येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे.
कर्मयोगी शंकररावजी पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा एक लाखाचा पुरस्कार बारामती (जि. पुणे) येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे. कै. किसन महादेव ऊर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार एक लाखाचा असून, दौंड (जि. पुणे) येथील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याने पटकावला आहे. कै. रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवनी पुरस्कार यंदा कळंबच्या (जि. धाराशिव) नॅचरल शुगर अॅण्ड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेड साखर कारखान्याने मिळवला आहे. हा पुरस्कारदेखील एक लाख रुपयांचा आहे.
कृष्णा, माळेगाव, नॅचरल शुगर ‘आर्थिक’मध्ये उत्कृष्ट
साखर कारखानदारीमध्ये उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते. या गटासाठी दक्षिण विभागात यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने तर मध्य विभागामध्ये बारामती (जि. पुणे) येथील दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याने पुरस्कार मिळवला आहे. उत्तरपूर्व विभागात कळंबच्या (जि. धाराशिव) नॅचरल शुगर अॅण्ड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेड साखर कारखान्याने पुरस्कार पटकावला. मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
ऊस संवर्धनात श्री दत्त, भीमाशंकर, पूर्णा आघाडीवर
ऊस विकास व संवर्धनात दक्षिण विभागात कोल्हापूरच्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने पुरस्कार मिळावला. मध्य विभागात पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना सरस ठरला. उत्तर पूर्व विभागात हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा सहकारी साखर कारखान्याने पुरस्कार मिळवला.
तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार
तांत्रिकदृष्ट्या उत्तम कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना व्हीएसआयकडून तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार दिला जातो. यंदा दक्षिण विभागातून सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी कारखान्याला व कोल्हापूरच्या दालमिया भारत शुगर अॅण्ड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेड कारखान्याला प्रथम पुरस्कार विभागून मिळाला आहे. द्वितीय पुरस्कार शिरोळच्या (जि. कोल्हापूर) श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेडला मिळाला आहे. तृतीय पुरस्कार सांगली जिल्ह्यातील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने मिळवला आहे.
मध्य विभागात तांत्रिक कार्यक्षमतेचा पहिला पुरस्कार पुणे जिल्ह्यातील व्यंकटेश्वरकृपा शुगर मिल्स लिमिटेड यांना, द्वितीय पुरस्कार अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याला आणि तृतीय पुरस्कार पुण्याच्या श्री सोमेश्वर सहकारी कारखान्याला व द्वारकाधीश साखर कारखाना लिमिटेड, ता. सटाणा, जि. नाशिक यांना विभागून मिळाला आहे.
उत्तर पूर्व विभागात पहिल्या क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार कळंब (जि. धाराशिव) येथील नॅचरल शुगर अॅण्ड अलाइड इंडस्ट्रीज कारखान्याला मिळाला आहे. द्वितीय पुरस्कार बीडच्या छत्रपती सहकारी कारखान्याला मिळाला आहे. तृतीय पुरस्कार लातूरमधील संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे.
अभाळे ठरले उत्कृष्ट आसवनी व्यवस्थापक
राज्याच्या साखर कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांचाही व्हीएसआयकडून विविध पुरस्कारांनी गौरव केला जातो. दहा हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे (अहिल्यानगर) ज्ञानेश्वर वसंतराव अभाळे यांना यंदाचा उत्कृष्ट आसवनी व्यवस्थापक पुरस्कार जाहीर झाला आहे.
व्हीएसआयच्या इतर पुरस्कार्थींची नावे अशी ः उत्कृष्ट पर्यावरण अधिकारी अमर अविनाश भांबुरे (पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील ससाका, कोल्हापूर), उत्कृष्ट फायनान्स मॅनेजर योगिराज सुरशिंगराव नांदखिले (सोमेश्वर ससाका, पुणे), उत्कृष्ट शेतकी अधिकारी प्रशांत लक्ष्मण पाटील (राजारामबापू पाटील ससाका, सांगली), उत्कृष्ट चीफ केमिस्ट सुनील नामदेव जाधव (सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील ससाका,सोलापूर), उत्कृष्ट चीफ इंजिनिअर संताजी हैबतराव चव्हाण (राजारामबापू पाटील ससाका, सांगली),
उत्कृष्ट कार्यकारी संचालक जगन्नाथ भाऊराव घुगरकर (सहकारमहर्षी भाऊराव थोरात ससाका, अहिल्यानगर), व्हीएसआयमधील उत्कृष्ट कर्मचारी म्हणून यंदा प्रमोद देशमुख (सहतांत्रिक सल्लागार, साखर अभियांत्रिकी विभाग), राजेंद्र गोडगे (सहायक प्राध्यापक, सहतांत्रिक सल्लागार, अल्कोहोल टेक्नॉलॉजी अॅण्ड बायोफ्युएल्स विभाग), गुरुदास म्हात्रे (लेखाधिकारी, लेखा विभाग), दत्तात्रय गव्हाणे (हॉस्टेल अटेंडंट अॅण्ड केअर टेकर, रजिस्टार अॅण्ड हॉस्टेल विभाग), ज्योती रावडे (लॅब अॅसिस्टंट, सॉइल सायन्स विभाग) यांना घोषित झाले आहेत. दहा हजार रुपये, मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.