
Pune News : कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा नगर येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याने पहिली उचल प्रतिटन ३२२० रुपये देण्याची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी शनिवारी (ता.१४) दिली. चालू गळीत हंगाम २०२४-२०२५ मध्ये गळितास येणाऱ्या उसाला प्रतिटन ३२२० रुपये प्रमाणे पहिला हप्ता दिली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन महिना झाला आहे. ११ डिसेंबर अखेर १८१ कारखान्यांनी गाळप सुरू केला असून अद्याप ९३ सहकारी आणि ८८ खासगी कारखान्यांनी धुरांडी पेटवलेली नाहीत. याचा थेट परिणाम पहिल्या महिन्यातील साखर उत्पादनाच्या उताऱ्यावर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या ३० व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कारखान्याच्या संचालक मंडळाने पहिल्या उचलीबाबत निर्णय घेतला. त्याप्रमाणे पहिली उचल प्रतिटन ३२२० रुपये देण्यात येणार असल्याचेही कोरे यांनी सांगितले.
मार्च महिन्यात येणाऱ्या उसाला प्रतिटन १८० रूपये वाढीव म्हणजेच ३४०० दर दिला जाणार आहे. तर कारखान्याच्या वार्षिक सभेत ठरल्याप्रमाणे बुलेट आणि स्प्लेंडर मोटारसायकलचा लकी ड्रॉ देखील काढला जाणार आहे. जो प्रोत्साहनपर बक्षीस योजनेचा भाग असल्याचेही कोरे यांनी म्हटले आहे.
यावेळी कोरे यांनी यंदाच्या गाळपाचा तपशील सांगताना, आजअखेर २ लाख ४६ हजार ९१५ टन गाळप झाल्याचे सांगितले. तर कारखान्यांचे यंदा १६ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट असून ते पूर्ण करण्यासाठी सभासद व गेटकेन ऊस पुरवठादार यांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार डॉ. विनय कोरे यांनी केले.
शेतकरी आणि कारखान्यांची पसंती यंत्राला
दरम्यान जिल्ह्यात शेतकरी, कारखान्यांकडून ऊस तोडणीसाठी यंत्राला प्राध्यान्य देण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या उसतोड मजूर टोळ्या दाखल झालेल्या नाहीत. यामुळे यंत्राच्या साह्याने मोठ्या प्रमाणावर ऊस तोड केली जात आहे. तर ऊस टोळ्यांकडून वाहन धारकांची होणारी फसवणूक, शेतकऱ्यांची आर्थिक लूट या कारणांमुळे देखील शेतकरी आणि कारखान्यांकडून यंत्राच्या साह्याने ऊस तोडीला प्राधान्य दिले जात आहे.
हिरवा चाऱ्याला फटका
एकीकडे इतर अडचणी असल्याने शेतकरी आणि कारखान्यांकडून यंत्राच्या साह्याने ऊस तोडणी केली जात आहे. मात्र यामुळे जनावरांच्या हिरवा चाऱ्याचा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. यंत्राने केल्या जाणाऱ्या ऊस तोडणीत उसाचे वाढे देखील तोडले जातात. यामुळे जनावरांसाठी वाढे मिळत नाहीत. तर वाढे विकत घ्यावे लागत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.