Akola News : जिल्हा नियोजन समितीचा संपूर्ण निधी योग्य आणि गुणवत्तापूर्ण कामांवर खर्च व्हावा. वर्ष २०२५-२६ मध्ये कोणताही निधी अखर्चित राहता कामा नये. सर्व नियोजित कामे फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण व्हावीत, असे स्पष्ट निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी अकोल्यात दिले.
नियोजन भवनात अकोला आणि वाशीम जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. यावेळी मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, अमोल मिटकरी, वसंत खंडेलवाल, किरण सरनाईक, संजय खोडके, साजिद पठाण, सईबाई डहाके तसेच वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री म्हणाले, की नियोजन समितीच्या निधीचा अकार्यक्षम वापर किंवा अनावश्यक खरेदी याबाबत तक्रारी येतात, हे प्रकार थांबवले पाहिजेत. वेळेआधी कामे पूर्ण करून निधीचा योग्य वापर सुनिश्चित करावा. नावीन्यपूर्ण योजनांमधून भरीव कामे अपेक्षित आहेत.
कृषी संशोधनाला प्रोत्साहन
खरीप हंगामात कृषी निविष्ठांच्या विक्रीतील बेकायदेशीर लिंकींगबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. दोषींवर थेट गुन्हे दाखल करावेत, कंपन्यांवरही कारवाई करावी, असे आदेश त्यांनी दिले. शेती आणि संशोधन क्षेत्रात ‘एआय’चा वापर करून प्रात्यक्षिके राबवावी व शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी, असेही ते म्हणाले.
विमानतळ विकासाचे प्रयत्न
अकोला विमानतळासाठी नाईट लँडिंग आणि धावपट्टी विस्तारीकरणाच्या कामांवर भर देण्यात येईल. हे काम मार्गी लागण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे आश्वासन पवार यांनी दिले.
१० कोटी वृक्षारोपण आणि व्यापक जलसंधारण
राज्यात यंदा १० कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुढील वर्षी हे उद्दिष्ट २५ कोटी असेल. कॅम्पा योजनेंतर्गत ३ हजार कोटी रुपयांचा निधी मिळालेला असून त्यातून व्यापक कामे राबवण्यात येतील. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
१५० दिवसांचा कृती कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा
शासनाच्या १५० दिवस कृती कार्यक्रमाअंतर्गत अधिकाधिक योजना पूर्ण करून त्याचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवावा. प्रधानमंत्री आवास योजना, पीएम सूर्यघर योजना आणि सौर कृषी पंप योजनेत उद्दिष्टपूर्ती साधावी, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.