Chh. Sambhajinagar News : बचत गटाच्या घोंगडी, प्रक्रिया उत्पादने, गावरान बियाण्यांपासून ते आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या अत्याधुनिक ट्रॅक्टर, ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेतीचे भरगच्च ज्ञान वाटत ‘सकाळ-अॅग्रोवन’च्या ‘अॅग्री एक्स्पो-२५’चा समारोप सोमवारी (ता. १३) झाला. या चार दिवसीय भव्य कृषी प्रदर्शनातून उत्पादनांची खरेदी करीत हजारो शेतकरी विविधांगी माहिती घेत तृप्त मनाने गावाकडे परतले.
प्रदर्शन स्थळ असलेले छत्रपती संभाजीनगरमधील केंब्रिज चौकाजवळील श्रीराम मंदिर ट्रस्टचे मैदान म्हणजे शेतकऱ्यांसाठी दुसरी पंढरी बनले होते. राज्याच्या शेतीत प्रयोगशीलता आणि व्यावसायिकता आणण्यासाठी ‘सकाळ-अॅग्रोवन’कडून विविध उपक्रम राबविले जातात. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून गेल्या अकरा वर्षांपासून राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन होते आहे.
यंदाच्या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक ‘अॅग्रीकॉन न्यूट्रिटेक लिमिटेड’ होते. तसेच, सहप्रायोजक म्हणून एन्जोकेम अॅग्रो केमिकल इंडस्ट्रीज (नाशिक), पवन अॅग्रो, पितांबरी प्रॉडक्टस् प्रायव्हेट लिमिटेड, बी. जी. चितळे डेअरी (भिलवडी, जि. सांगली), आत्मा (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा), महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण-मेडा (महाऊर्जा), महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ (एमएआयडीसी) या संस्था सहभागी झाल्या. तर, प्रदर्शनाचे गिफ्ट स्पॉन्सरर्स म्हणून रोहित कृषी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड (पुणे) व इफ्को (इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड) या संस्था होत्या.
उन्हातान्हात औत हाकणारा शेतकरी या प्रदर्शनाच्या निमित्ताने ज्ञानाच्या शीतल छायेत आला होता. अल्पभूधारक कोरडवाहू शेतकरी, बागायती भागातील शेतकरी, युवा शेतकरी तसेच कृषी संलग्न क्षेत्रातील विद्यार्थी, कृषी संस्थांमधील प्रतिनिधी अशा साऱ्या वर्गांमधील मंडळींनी प्रदर्शनाला उत्साहाने भेटी दिल्या.
या प्रदर्शनात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. शेकडो शेतकऱ्यांनी खरेदी केलीच; पण विविध उत्पादनांसाठी नोंदणीही केली. अनेक कंपन्यांच्या प्रतिनिधींना शेतशिवारांमध्ये प्रात्यक्षिकांसाठी (डेमो) निमंत्रित केले. शेतीविषयक अत्याधुनिक अवजारे, यंत्रे, अन्नधान्य, फळे व भाजीपाला प्रक्रियातली उत्पादने, सूक्ष्म सिंचन, पशूधन, दुग्ध व्यवसाय, कृषी व्यापार व निर्यात, सौर, निविष्ठा या क्षेत्रांसह केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची भरभरून माहिती शेतकऱ्यांनी घेतली. कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, राष्ट्रीय पातळीवरील शासकीय व खासगी संस्थांच्या दालनांमधून उपयुक्त माहितीचा खजिनाच शेतकऱ्यांनी गोळा केला.
पुढच्या प्रदर्शनाविषयी उत्सुकता
या प्रदर्शनाला चार दिवसांत कृषी व संलग्न क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी भेटी दिल्या. शेवटचा दिवस असूनही सोमवारी सायंकाळपर्यंत प्रदर्शनातील गर्दी कायम होती. प्रदर्शनाच्या निमित्ताने कृषी क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधी, तज्ज्ञ, अभ्यासक, कृषी विभागाचे अधिकारी, कृषी संशोधन संस्थांमधील शास्त्रज्ञ यांच्या भेटीगाठींची संधी शेतकऱ्यांना मिळाली. त्यामुळे ‘आता ‘अॅग्रोवन’चे पुढील कृषी प्रदर्शन केव्हा आणि कुठे,’ असे उत्सुकतेने विचारात तृप्त मनाने गावाकडे परतत होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.