Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील खरीप पिके या आधीच पावसाअभावी करपून गेली. त्यानंतर आता सगळी आशा रब्बीवर आहे. पण जेमतेम पावसामुळे ओलाव्याअभावी जमिनी आताचा कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे रब्बीतील पेरण्यांचे भवितव्यही अधांतरीच आहे. त्यातच जिल्ह्याची पाणी पातळी सुमारे एक मीटरने घटली आहे. केवळ सांगोला आणि मंगळवेढा या दोनच तालुक्यांत पेरण्या होऊ शकलेल्या आहेत. त्यामुळे खरिपानंतर आता ‘रब्बी’ची आशाही जवळजवळ मावळली आहे.
सोलापूर हा रब्बीचा जिल्हा मानला जातो. पण खरिपातही बऱ्यापैकी पिके घेतली जातात. पण यंदा पावसाने दीर्घकाळ पाठ फिरवलीच, पण तो सरसकट सगळीकडे झाला नाही. प्रत्यक्षात त्याची हजेरी जुलै आणि ऑगस्टमध्ये काही ठराविक भागात आणि ठराविक प्रमाणात झाली. त्यामुळे खरीप हातचा गेला. पण सर्वाधिक ज्या हंगामावर जिल्ह्याची भिस्त आहे. त्या रब्बी हंगामाबाबतही आता चिंता वाटत आहे. कारण, पाऊसच त्या प्रमाणात झालेला नाही. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ५४५ मिलिमीटर आहे. पण आतापर्यंत तो ३६८ मिलिमीटर झाला आहे.
भूजल सर्वेक्षण विभागाने नुकतीच पाण्याची पातळी तपासली, त्यासाठी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील सुमारे १५९ विहिरी निवडल्या आणि निरीक्षण केले. त्यातून जवळपास एक मीटरने पाणी पातळीत घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात करमाळा, माळशिरस, उत्तर सोलापूर, सांगोला या तालुक्यांच्या पाणी पातळीत एक ते दीड मीटरची तफावत दिसत आहे. एकीकडे कमी झालेला पाऊस आणि दुसरीकडे पाण्याच्या खोल चाललेल्या पाणीपातळीने चिंता वाढली आहे. त्याचा परिणाम आता रब्बीच्या पेरण्यांवरही झाला आहे. पावसाअभावी पुरेशा प्रमाणात जमिनीत ओल नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत.
पुण्याकडील धरणातील अतिरिक्त पाण्यामुळे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणात पाणी सोडल्यामुळे उणेत गेलेली पाणी पातळी कशीबशी अधिकमध्ये आलीच, पण धरणातील पाण्याने ६० टक्केची पातळीही ओलांडली. त्यामुळे या आधी फक्त पिण्यासाठी राखून ठेवलेले धरणातील पाणी आता शेतीसाठी मिळण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा पंढरपूर, करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढ्याच्या काही भागाला होईल. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या धरणामध्ये एकूण पाणी पातळी ४९४.८९० मीटरवर पोचली आहे. तर धरणातील एकूण साठा ९६.५ टीएमसी तर उपयुक्त साठा ३२.४० टीएमसी आहे.
यंदा रब्बीत ज्वारी आणि गव्हाची पेरणी करणार आहे. दरवर्षी यावेळी पेरणी होते, पण यंदा पुरेसा पाऊस नसल्याने आणि जमिनीत ओल नसल्याने पेरणी अजून केली नाही. पाणीही जेमतेम आहे. या हंगामात कांदाही घेतो, पण पाण्यामुळे त्याचेही जरा अवघडच आहे.- नागेश नन्नवरे, शेतकरी, बीबीदारफळ, ता. उत्तर सोलापूर.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.