Pune News : पाणलोट क्षेत्रात सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कुकडी प्रकल्पातील धरणात समाधानकारक २७ टीएमसी (९१.२२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील सात तालुक्यांतील १ लाख ४२ हजार हेक्टर क्षेत्रातील रब्बी हंगामातील शेती पिकांच्या सिंचनाची चिंता दूर झाली आहे.
रब्बी (डिसेंबर ते फेब्रुवारी) हंगामासाठी सुमारे ९ टीएमसी पाण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती कुकडी प्रकल्प पाटबंधारे विभाग क्र.१ चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी दिली.
कुकडी प्रकल्पाची उपयुक्त पाणीसाठवण क्षमता सुमारे २९ टीएमसी आहे. जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या सात तालुक्यांतील शेती व पिण्याच्या पाण्याचे भवितव्य कुकडी प्रकल्पातील पाणीसाठ्यावर अवलंबून असते.
जुलै, ऑगस्ट महिन्यांत पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत होते. खरीप पिकांना जीवदान देण्यासाठी कुकडी प्रकल्पातून कालव्यात पाणी सोडण्याची मागणी शिरूर, पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या भागातील लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी केली होती.
कुकडी डाव्या कालव्यातून जुलै ते ऑगस्टदरम्यान खरीप पिकांसाठी सुमारे पाच टीएमसी पाणी सोडले. त्यामुळे ऑगस्टअखेर येडगाव धरणात २० टक्के (०.३९६ टीएमसी), तर कुकडी प्रकल्पातील धरणात एकूण २२ टीएमसी (७४.७० टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला होता. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात पाऊस न झाल्यास रब्बी व उन्हाळी आवर्तनाचे काय होणार, अशी चिंता व्यक्त होत होती.
कुकडी प्रकल्पातून कालव्यात पाणी सोडल्यामुळे नगर विरुद्ध जुन्नर, असा संघर्ष निर्माण झाला होता. मात्र, २० सप्टेंबरनंतर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. दहा दिवसांत कुकडी प्रकल्पाच्या उपयुक्त पाणीसाठ्यात ४.८४ टीएमसी (१६.५२ टक्के) वाढ झाली. पूर नियंत्रणासाठी येडगाव, वडज, डिंभे या धरणांतून कुकडी, मीना, घोड या नद्यांमध्ये पाणी सोडण्यात आले.
शेतकऱ्यांना दिलासा
कुकडी प्रकल्पात आजअखेर २७ टीएमसी (९१.२२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी प्रकल्पात आजअखेर २८.३६ टीएमसी (९५.५८ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला होता. सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे कुकडी प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला.
त्यामुळे सात तालुक्यांतील रब्बी पिकांसह पिण्याचे पाणी, औद्योगिक कारणासाठी वापरले जाणाऱ्या पाण्याची चिंता दूर झाली आहे. एकूणच कुकडी प्रकल्पातील पाण्याची सद्यःस्थिती पाहता या वर्षी किमान एप्रिल अखेरपर्यंत पाणीटंचाई जाणवणार नाही. त्यामुळे सात तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.