Dragon Fruit Agrowon
ॲग्रो विशेष

Dragon Fruit Crop : अति पावसापासून परागीभवन क्रिया वाचविणारे तंत्र

Dragon Fruit News: राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे प्रयोग शेतकऱ्यांकडे घेतली प्रात्यक्षिके

Team Agrowon

Dragon Fruit Pollination : अति किंवा मध्यम पावसात ड्रॅगन फ्रूट पिकाच्या फुलातील परागांचे नुकसान होऊन परागीभवन क्रियेत बाधा येते. फूलगळ होते. फळांची गुणवत्ता व आकारावर परिणाम होतो. हे नुकसान टाळण्यासाठी बारामती (जि. पुणे) येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेने तीन पर्यायी पद्धत सांगणारे साधे सोपे तंत्र प्रयोगांद्वारे विकसित केले आहे. १५ ते २० शेतकऱ्यांकडे त्याची प्रात्यक्षिके घेऊन त्याचेही निष्कर्ष सकारात्मक आले आहेत.

ड्रॅगन फ्रूटची लागवड महाराष्ट्रात वाढताना दिसत आहे. देशातील सुमारे ५०० हेक्टर क्षेत्रापैकी महाराष्ट्राचा वाटा १० टक्के असावा. या पिकातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रियांपैकी एक म्हणजे परागीभवन. एप्रिल-मे कालावधीत मॉन्सूनपूर्व सरी येतात. उन्हाळ्यातील उष्ण, कोरडे तापमान कमी करून फुलोरा येण्यास प्रवृत्त करणारा हा घटक आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत पडणारा मॉन्सूनचा पाऊस एक महिन्याच्या अंतराने ५ ते ६ वेळा भरपूर प्रमाणात आणि नियमित बहर येण्यास मदत करतो. ड्रॅगन फ्रूटची फुले संध्याकाळी उमलतात.

ती दुसऱ्या दिवशी सकाळी बारा वाजेपर्यंत त्या अवस्थेत राहतात. या काळात फुलांमध्ये नैसर्गिकरीत्या परागीभवन होत असते. ही क्रिया यशस्वी झाल्यामुळे पुढे फळांचे ‘सेटिंग’ चांगले होते. फळांचा आकार, गुणवत्ता यात वृद्धी होते. उत्पादन चांगले मिळते. फुले उमललेल्या (एन्थेसिस) काळात रात्री उशिरा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास परागकण (पोलन ग्रेन्स) वाहून जातात. किंवा ते ओले होतात. त्यामुळे परागीभवन क्रिया योग्य प्रकारे होत नाही व फुलांची मोठ्या प्रमाणात गळ होते. फळे लागणे (सेटिंग), त्यांचा आकार व गुणवत्तेवर परिणाम होतो.

संस्थेतील संशोधन, प्रयोग

पुणे जिल्ह्यातील बारामती येथे भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) अंतर्गत राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था कार्यरत आहे. राज्यातील काही ड्रॅगन फ्रूट उत्पादकांनी या अनुषंगाने आपल्या समस्या संस्थेकडे मांडल्या. संस्थेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के. एम. बोरय्या यांनी सन २०२० च्या दरम्यान यावर संशोधन सुरू केले. संस्थेतील प्रक्षेत्रात प्रायोगिक चाचण्या घेतल्या. सुमारे तीन वर्षांच्या संशोधनातून पावसामुळे परागीभवन प्रक्रियेचे होणारे नुकसान टाळणारे तीन पर्यायी पद्धतींचे साधे सोपे तंत्र विकसित केले. बारामती, टेंभुर्णी (सोलापूर), निमगाव- इंदापूर भागातील १५ ते २० शेतकऱ्यांकडे त्याची प्रात्यक्षिके घेतली. त्याचबरोबर संस्था क्षेत्र, पुणे व गुजरात या तीन ठिकाणी कार्यशाळेद्वारे पाचशेहून अधिक शेतकऱ्यांपर्यंत या तंत्रज्ञानाचा प्रसारही केला. शेतकऱ्यांकडील प्रात्यक्षिकांचे निष्कर्ष सकारात्मक आल्याचे डॉ. बोरय्या यांनी म्हटले आहे.

...असे आहे तंत्रज्ञान

या तंत्रज्ञानात पुढील तीन बाबी किंवा पर्यायांचा समावेश केला आहे.

१) बॅगिंग किंवा फुलांना झाकणे- पावसामुळे परागकण वाहून जाण्यापासून म्हणजेच फुलांचे संरक्षण करण्यासाठी फुले उमलण्यापूर्वी वा न उमललेल्या फुलांच्या कळ्या जलरोधक (वॉटरप्रूफ) पॉलिथिनच्या पिशव्या किंवा बटर पेपरच्या आवरणाने झाकून घ्याव्यात. अर्थात, प्रत्येक फुलाला असा प्रकारे बॅगिंग करणे मजूरटंचाई वा वेळेअभावी शक्य होतेच असे नाही. कारण बागेतील प्रत्येक पोलला २५ ते ३० फुले असू शकतात. असे एकरी चारशे पोल्स असतात.
२) आच्छादन ः बॅगिंगला दुसरी पर्यायी पद्धत म्हणजे झाडाच्या ओळी दोन मीटर रुंद पॉलिथिन शीटने किंवा पातळ ताडपत्रीने झाकून घ्याव्यात. जेणे करून पावसाचे पाणी थेट फुलांवर पडणार नाही व परागकण पावसात धुऊन जाण्यापासून वाचू शकतील. अर्थात, प्रत्येक फुलांच्या चक्र कालावधीत (२ ते ३ दिवस फक्त) फुले उमलण्याच्या वेळी असे आच्छादन करावे. फुलांवर उष्णतेचा परिणाम टाळण्यासाठी झाडापासून एक मीटर उंचीवर हे आच्छादन असावे. ही पद्धत खर्चिक असू शकते. मात्र मोठ्या आकाराच्या बागांसाठी व जेथे मजुरांची समस्या आहे तेथे प्रभावी आहे.
३) कृत्रिम परागीभवन ः वास्तविक परागीभवनासाठी प्रति फूल ७८ हजार परागकणांची आवश्‍यकता असते. मात्र त्यांची संख्या कमी पडल्यास पावसामुळे अर्ध परागीभवन होते. दुसरी बाब म्हणजे बॅगिंग व आच्छादन हे दोन्ही पर्याय शक्य नसतील तेथे कृत्रीम परागीभवन क्रिया देखील घडवून आणता येते.

पावसापासून बचाव झालेली काही फुले बागेत असू शकतात. त्यांचा वापर परागकणांचा स्रोत म्हणून करता येतो. किंवा त्या संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी उमलणाऱ्या फुलांचाही त्यासाठी वापर करता येतो. वीस फुलांचे परागीकरण करण्यासाठी एका फुलाची किंवा २० झाडांच्या फुलांचे परागीकरण करण्यासाठी एका झाडाच्या फुलांची आवश्यकता असते). यात फुलाच्या स्त्रीकेसराग्र अर्थात स्टीग्मा या अवयवावर परागीकरण करायचे असते. यामध्ये पेट्री डिशमध्ये ताज्या फुलांचे परागकण गोळा करता येतात. न हलवता जोडलेल्या पुंकेसरांसह संपूर्ण फूल तोडून घेता येते. संध्याकाळच्या वेळी परागीकरणासाठी न उमललेल्या (प्री-एंथेसिस) फुलांचा वापरही परागकण स्रोत म्हणून केला जाऊ शकतो. पेट्री डिशमधील परागकण शिंपडण्यासाठी छोटा ब्रश वापरता येतो. किंवा तोडलेल्या फुलांपासूनच स्त्रीकेसराग्रवर संलग्न पुंकेसर हलक्या हाताने घासून किंवा ‘टॅप’ करून परागकण थेट शिंपडता येतात.

तंत्रज्ञानाचे फायदे

या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे साहजिकच नैसर्गिक परागीभवनामुळे मिळणारे फायदे, अर्थात
फळांचे ‘सेटिंग’, दर्जा, आकार सुधारतो. त्यातून उत्पादन वाढ व फळाचे बाजारमूल्य टिकण्यास मदत होते. शास्त्रज्ञ डॉ. बोरय्या म्हणाले, की पावसाळी काळात बागेतील ठरावीक झाडे पराग स्रोत म्हणून राखीव ठेवता येतील. आम्ही विकसित केलेले तंत्रज्ञान व त्याचा वापर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष संस्थेत येऊन अभ्यासता येईल.

तंत्रज्ञान वापरताना घ्यावयाची दक्षता

-फुले उमलण्यापूर्वी ती झाकून ठेवावीत.
-बॅगिंगसाठी ‘पॉलिथिन’ बॅगेचा वापर केल्यास उष्णता आणि जास्त आर्द्रता निर्माण होऊ नये म्हणून हवा खेळती राहण्यासाठी त्याला लहान छिद्रे करावीत.
-चांगल्या परागीकरणासाठी वाऱ्याची पुरेशी हालचाल होणे फायद्याचे असते.

संपर्क ः डॉ. के. एम. बोरय्या, ७०९०९१११०४, ८००५२५८१९०
(या विषयातील लेखनासाठी राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ गोरक्ष वाकचौरे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठातील (राहुरी) पीएचडी. विद्यार्थी सूरज कुलकर्णी यांचे सहकार्य झाले आहे.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT