Dragon Fruit : ड्रॅगन फ्रूट मुल्यवर्धनाचे तंत्र

Dragon Fruit Cultivation : ड्रॅगन फ्रूट फळाची वाढती लागवड लक्षात घेता प्रक्रिया आणि मूल्यवर्धनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अयोग्य हाताळणीमुळे फळ काढणीनंतर नुकसान देखील होऊ शकते. हे लक्षात घेता काढणीनंतरच्या व्यवस्थापनावर लक्ष देणे गरजेचे आहे.
Dragon Fruit
Dragon FruitAgrowon
Published on
Updated on

जया दीपक चौधरी, डॉ. गोरक्ष वाकचौरे

Dragon Fruit Update : ड्रॅगन फ्रूट हे उष्णकटिबंधीय निवडुंग प्रजातीमधील फळपीक आहे. याची लागवड प्रामुख्याने दक्षिण मेक्सिको आणि मध्य अमेरिकेमध्ये आहे. या फळांमध्ये पांढऱ्या गरासह लाल साल, लाल गरासह लाल साल, लाल गरासह जांभळी साल आणि पांढऱ्या गरासह पिवळी साल असे प्रकार दिसतात.

फळामध्ये तंतूमय घटक, जीवनसत्त्वे, प्रतिजैविके आणि खनिजांची समृध्दता असते. सौंदर्य प्रसादने, औषधी निर्मिती उद्योग, प्रक्रिया उद्योगामध्ये या फळास चांगली मागणी आहे.

या पिकास इतर पिकापेक्षा पाणी, अन्नद्रव्य व्यवस्थापन कमी लागते. कमी सुपीक जमीन, मध्यम ते कमी पर्जन्यमान, अवर्षण प्रवण क्षेत्र आणि तापमानातील फरक असलेले शुष्क ते अर्ध-शुष्क प्रदेश ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी योग्य आहे.

गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगणा, तमिळनाडू, ओडिशा आणि अंदमान, निकोबार बेटे तसेच अनेक ईशान्येकडील राज्यांमध्ये ड्रॅगन फ्रूट लागवडीमध्ये वाढ झालेली आहे.

या फळपिकाची वाढती लागवड लक्षात घेता प्रक्रिया आणि मूल्यवर्धनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अयोग्य हाताळणीमुळे फळ काढणीनंतर नुकसान देखील होऊ शकते. हे लक्षात घेता काढणीनंतरच्या व्यवस्थापनावर लक्ष देणे गरजेचे आहे.

Dragon Fruit
Dragon Fruit Farming : ‘ड्रॅगन फ्रूट’मध्ये मिळवला बारा वर्षांचा तगडा अनुभव

ताज्या फळांचा वापर, प्रक्रियेसाठी काढणीनंतरचे व्यवस्थापन:

फळांची कापणी:

१) झाडांना पहिल्या वर्षी फळे येण्यास सुरवात होते. तिसऱ्या वर्षी लागवडीनंतर त्यांचे आर्थिकदृष्टया उत्पादन मिळण्यास सुरवात होते. मे ते जून या कालावधीत फळांना बहर येतो. ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान फळे येतात. यावेळी ६ ते ८ वेळा कापणी होऊ शकते.

२) फळांसाठी मुख्य काढणी परिपक्वता निर्देशांक नंतरच्या दिवसांवर आणि लाल सालाच्या रंगाच्या तीव्रतेवर आधारित असतात. येथे फुलोऱ्यापासून २५ ते ३० दिवसांचा कालावधी लागतो.

३) परिपक्वतेचा एक सामान्य निर्देशांक म्हणजे फळाच्या सालाचा रंग जवळजवळ चमकदार हिरव्या रंगापासून पूर्ण लाल रंगात बदलतो. कापणीच्या वेळी चाकू, कात्री किंवा छाटणीची कात्री वापरून फळे हाताने देठापासून नुकसान न होता योग्यरितीने वेगळी करावीत.

प्री-कुलिंग:

१) फळ काढल्यानंतर त्यातील उष्णता काढून टाकण्यासाठी प्री-कुलिंग (क्विक कुलिंग) ही एक आवश्यक प्रक्रिया आहे. यासाठी प्रामुख्याने रूम कुलिंग आणि फोर्सड एअर कुलिंग या पद्धतींचा वापर केला जातो.

२) रूम कूलिंगमध्ये खोलीचे तापमान २९ अंश सेल्सिअसवरून २० अंश सेल्सिअस पर्यंत कमी करण्यासाठी ६ तास लागतात.

३) फोर्सड एअर कूलिंगसाठी तापमान २६.५ अंश सेल्सिअसवरून १८ अंश सेल्सिअसपर्यंत कमी करण्यासाठी १.५ तास लागतात. यामध्ये ह्युमिडिफायर्सचा वापर उच्च वेग असलेल्या हवेमुळे होणारे (डेसिकेशन) सुवासिक द्रव्य कमी करण्यासाठी केला जातो.

बाजाराची तयारी:

१) कापणी केलेली फळे प्लॅस्टिकच्या क्रेटमध्ये पॅकेजिंगसाठी न्यावीत.गुणवत्तेच्या मापदंडांच्या आधारे त्यांची तपासणी आणि प्रतवारी करून वर्गीकरण करावे.

२) रोगग्रस्त, कीटकग्रस्त, तडे गेलेली आणि खराब झालेली फळे वेगळी करावीत

३) फळांचे वर्गीकरण हे वजन, आकार, रंग आणि बाह्य गुणवत्ता या पद्धतीने केले जाते.

पॅकेजिंग:

१) इतर देशांच्या तुलनेत भारतात ड्रॅगन फ्रूट पॅकिंग उद्योग फारसा

विकसित झालेला नाही. फळांची वर्गवारी आणि स्वच्छ केल्यानंतर ते फायबर बोर्ड बॉक्स किंवा कार्टन्समध्ये पॅकिंग केली जातात.

२) विविध पॅकेजिंग मटेरियलमध्ये फळे गुंडाळावीत. यामुळे आर्द्रता कमी होणे आणि साठवणुकी दरम्यान आकुंचन टाळण्यास मदत होते.

३) फळे एका कार्टन बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवावीत. शक्यतो ४-५ थर (सुमारे १०-१५ किलो) करावेत. यामुळे फळे स्थिर राहतील आणि खराब होणार नाहीत.

४) निर्यातीसाठी कंटेनर भरण्यापूर्वी, ताजेपणा आणि कापणी नंतरची टिकवणक्षमता राहण्यासाठी फळे प्री-कूल करावी लागतात.

साठवणूक

१) फळे ८५ ते ९५ टक्के आर्द्रता आणि ४ ते ८ अंश सेल्सिअस तापमानात साठवावीत. ही प्रक्रिया फळांच्या गुणवत्तेला कोणत्याही प्रकारची हानी करत नाहीत.

२) फळे सच्छिद्र प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ४.५ अंश सेल्सिअस तापमानात साठवल्यावर त्यांची गुणवत्ता २५ ते ३० दिवस टिकते.परंतु जेव्हा सामान्य तापमानात फळे साठवली जातात, तेव्हा टिकवणक्षमता १० दिवसांपेक्षा कमी होते.

Dragon Fruit
Fruit Export Registration : पेरू-सीताफळ-ड्रॅगन फ्रूट निर्यातीसाठी नोंदणीची सुविधा

मूल्यवर्धन व्यवस्थापन:

१) ड्रॅगन फ्रूटचे पौष्टिक मूल्य हे लगदा, साल, बिया, फुलांच्या कळ्या आणि वाळलेली फुले या भागांमध्ये असते. ड्रॅगन फळाची साल पेक्टिनचा स्रोत म्हणून वापरली जाते. नैसर्गिक लाल-जांभळा रंग अन्न आणि सौंदर्यप्रसाधनांसाठी वापरला जाऊ शकतो.

२) फुलांचा वापर सूप, सॅलड आणि भाज्यांमध्ये करतात. फळांमध्ये आवश्यक फॅटी ॲसिडस् (EFA) असतात, ज्यांचे रेचक प्रभावी आहे.

३) सोललेल्या फळांचे तुकडे ताजे काप म्हणून खाल्ले जातात. बिया सिरप, सरबत, आइस्क्रीम, फालूदा, दही, कुकीज आणि पेस्ट्रीमध्ये देखील वापरल्या जातात.

४) फळाच्या पावडरचा वापर आहारातील पूरक म्हणून टॅब्लेटच्या स्वरूपात आणि स्मूदी, शीतपेये आणि मिठाई तयार करण्यासाठी करतात.

५) ड्रॅगन फ्रूटपासून ज्यूस, जॅम, मुरंबा, आरटीएस, पेय, स्क्वॅश, रेड वाइन तयार करतात. तसेच केचप, स्प्रेड, आइस्क्रीम, सरबत, चहा, सिरप, मिठाई आणि पेस्ट्रीसह व्यावसायिक उत्पादनांसाठी वापर होतो.

संपर्क - डॉ. गोरक्ष वाकचौरे, ७३५०९१६९८५, (राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, माळेगाव (खुर्द), बारामती,जि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com