Pratap Pawar Article : फिनलँड या देशाच्या एकंदर उत्पन्नापैकी सहा टक्के खर्च सरकार शिक्षणावर करतं. आम्ही पाहिलेल्या, भेट दिलेल्या शिक्षणसंस्थांमध्ये सरकारी सक्रिय भाग होताच; परंतु अनेक उद्योगांचाही सहभाग होता. शिक्षणाचा दर्जा हा सर्वोत्तम असेल असा दृष्टिकोन आणि वस्तुस्थितीही. फिनलँडचं आपल्यापेक्षा आणखी एक महत्त्वाचं वेगळेपण आहे. आपल्यापेक्षा त्यांचं दरडोई उत्पन्न वीसपट अधिक आहे!
दरवर्षीप्रमाणे या वर्षी ‘सकाळ एज्युकॉन’च्या निमित्तानं फिनलँड या देशात नुकतंच जाणं झालं. आपल्याकडील शिक्षणक्षेत्रातील प्रमुख मंडळी, विचारवंत यांना घेऊन वेगवेगळ्या देशांमधील शिक्षणपद्धतींबाबत भेट, चर्चासत्रं या माध्यमांतून होतात. सामाजिक, शैक्षणिक उद्देशानं २००४ मध्ये सुरू झालेल्या या योजनेला जवळपास वीस वर्षं होत आली.
मध्यंतरी कोरोनामुळे दोन वर्षं कुठंही जाता आलं नाही. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया, तर यंदा फिनलँड इथं जाणं झालं. शिक्षणप्रमुखांचा दृष्टिकोन व्यापक व्हावा, त्यांना जगातील उत्कृष्ट शिक्षणसंस्थांचा प्रत्यक्ष परिचय व्हावा, ज्यांना शक्य आहे त्यांनी अशी विद्यापीठं, शिक्षणसंस्था यांच्याशी संधान साधावं हाही उद्देश असतो.
अगदी बारामतीच्या ‘ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट’चं उदाहरण घेतलं तर त्यांचे अनेक विद्यार्थी नेदरलँडमध्ये काही काळ शिकतात. तिकडचे विद्यार्थी आपल्याकडे येतात. यामुळे विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय शिक्षणपद्धतीचा अनुभव मिळतो. काही विद्यार्थ्यांना तिकडे नोकऱ्याही मिळतात. आपल्या देशातही हे घडायला सुरुवात झाली आहे.
विद्यार्थ्यांची, प्राध्यापकांची प्रगल्भता आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावी हा ‘सकाळ एज्युकॉन’च्या आयोजनामागचा उद्देश आहे. अशा प्रयत्नांतून आणखी एक फायदा होतो व तो म्हणजे या आपल्या सर्व संस्थांमध्ये एक सुसंवाद निर्माण होतो. त्यांनाही एकमेकांकडून शिकता येतं. विचारांचं आदानप्रदान आपोआपच होतं.
‘पुढच्या वर्षी नवीन देशात जाण्याची इच्छा आहे का,’ असं आम्ही सहभागी लोकांना दरवर्षी विचारतो. याचं उत्तर १०० टक्के ‘होय’ असंच येतं. कारण या योजनेचा उद्देशच त्यांच्या भल्यासाठी, प्रशिक्षणासाठी आहे.
कोणत्या देशात जावंसं वाटतं याचीही चाचपणी केली जाते आणि त्यावर पुढील वर्षीच्या कामाला सुरुवात होते. फिनलँडची निवड याच पद्धतीनं झाली होती. फिनलँडची शैक्षणिक व्यवस्था जगप्रसिद्ध आहे. आपल्या नवीन शिक्षणधोरणात फिनलँडच्या अनेक गोष्टींचा अंतर्भाव केला गेला आहे. आता थोडंसं फिनलँडबद्दल सांगणं आवश्यक आहे.
रशिया, स्वीडन यांना खेटून असलेला हा देश. काही वेळा स्वीडनच्या, तर काही वेळा रशियाच्या आधिपत्याखाली तो होता. रशिया आणि जर्मनी यांच्यामुळे फिनलँड दुसऱ्या महायुद्धात ओढला गेला. दरम्यान, महायुद्ध सुरू असतानाच एक तहाद्वारे फिनलँड स्वतंत्र झाला. महायुद्धाच्या अखेरच्या काळात जर्मनीनं फिनलँडला मदत केली. फिनलँडनं १९५० पासून प्रगतीची मुसंडी मारली ती आजतागायत.
संशोधन, उत्पादन या प्रयत्नांतून या देशानं ‘नोकिया’सारख्या अनेक आंतरराष्ट्रीय संस्था यशस्वीपणे उभ्या केल्या. इस्राईलप्रमाणे आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्पादनं निर्माण करणं ही यांचीही गरज आहे. इस्राईलची लोकसंख्या ८५ लाख, तर फिनलँडची जेमतेम ४५ लाख! उत्पादन केलं तर विकणार कुठं? देशाबाहेरच विकावं लागणार. त्यामुळे उत्पादनाचा दर्जाही जागतिक स्पर्धेला निश्चित तोंड देऊ शकेल असाच राखावा लागतो. परिणामी, संशोधन हा या व्यवसायाचा गाभा आहे. त्याला अनुकूल अशा शैक्षणिक संस्था निर्माण केल्या गेल्या.
अगदी शाळेपासून समाजोपयुक्त शिक्षण, तेही हसत-खेळत प्रात्यक्षिकातून, हे या देशाचं आणखी एक वैशिष्ट्य. देशाच्या एकंदर उत्पन्नापैकी सहा टक्के खर्च सरकार शिक्षणावर करतं. आम्ही पाहिलेल्या, भेट दिलेल्या शिक्षणसंस्थांमध्ये सरकारी सक्रिय भाग होताच; परंतु अनेक उद्योगांचाही सहभाग होता. शिक्षणाचा दर्जा हा सर्वोत्तम असेल असा दृष्टिकोन आणि वस्तुस्थितीही. फिनलँडचं आपल्यापेक्षा आणखी एक महत्त्वाचं वेगळेपण आहे. आपल्यापेक्षा त्यांचं दरडोई उत्पन्न वीसपट अधिक आहे!
जवळपास ५० टक्के प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कर-आकारणी होते. अर्थात, सर्व पैशाचा विनियोग समाजासाठी होतो. महत्त्वाचं म्हणजे तिथं भ्रष्टाचारच नाही! आपले माजी पंतप्रधान राजीव गांधी एकदा म्हणाले होते, ‘सरकारच्या १०० रुपये उत्पन्नातील जेमतेम दहा-बारा रुपये समाजाच्या भल्यासाठी खर्च होतात.’ बाकीचे कुणाच्या खिशात जातात हे सांगायला नको. आजही त्यात काहीही बदल नाही.
उलट, भ्रष्टाचार वाढला आहे, अशा वस्तुनिष्ठ तक्रारी सतत कानावर येत असतात. फिनलँडमध्ये एकमेकांवरील विश्वास हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. जनतेचा सरकारवरील आणि सरकारचा जनतेवरील विश्वास ठाई ठाई जाणवतो. आम्ही कार्यक्रमाच्या निमित्तानं वाहनातून प्रवास करत असताना चालकानं सीट-बेल्ट लावायला सांगितला. तो न लावल्यास दंड होईल, असं त्यानं स्पष्टपणे सांगितलं.
यावरून एक गोष्ट लक्षात येते व ती ही, की नियम पाळण्यात त्या देशातील नागरिक काटेकोर असतात. आपल्याकडे मात्र असं चित्र दिसत नाही.
आपल्याकडे असं झालं तर आपलाही अत्यंत वेगानं कायापालट होईल. तिथंही एकसूत्री राजकीय पक्षाचं नियंत्रण नाही. पाच-सात राजकीय पक्ष एकत्र येऊन कारभार करतात. देशहिताबद्दल सर्वांचं एकमत असतं.
आपल्याकडे विरोधी पक्षांना, त्यांच्या पुढाऱ्यांना शिव्या देणं, दोष देणं हा सर्व राजकीय पक्षांचा प्रमुख कार्यक्रम असतो. मग एकमेकांचं सहकार्य कसं मिळणार? सहकार्याऐवजी तो पक्ष कसा खच्ची करावा यासाठी भरपूर खोकी, सरकारी यंत्रणा आजकाल सर्रास वापरली जाते, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. यामुळे विरोधासाठी विरोध हा होतच राहतो.
फिनलँडमध्ये देशभर एक लाखाहून अधिक गोड्या पाण्याची तळी आहेत. यामुळे हॉटेलमधील नळाचं पाणी तुम्ही निर्धास्तपणे पिऊ शकता. अशी तळी आणि झाडी, म्हणजे जवळपास ६५ टक्के जंगल, यामुळे प्रदेशाचं सौंदर्य अधिकच खुलतं. आमचा सर्व वेळ तांपेरे आणि हेलसिंकी या दोन शहरांतील शिक्षणसंस्थांबरोबर गेला. जागतिक दर्जाची विद्यापीठं इथं आहेत. संपूर्ण शिक्षणच अशा पद्धतीचं आहे, की जसजसे तुम्ही उच्च शिक्षणाच्या दिशेनं प्रगती कराल तसतसं तुम्ही हवं ते शिक्षण घेऊ शकता.
संवादांतून शिक्षण, शाळेमध्ये उद्योजकता-शिक्षण यांवर भर असतो. उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागते. तुमच्यात कोणत्या क्षमता आहेत आणि नाहीत याचा बारकाईनं आढावा घेतला जातो; मगच त्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळतो. आपल्याकडच्या सारखा इथं वशिला उपयोगी येत नाही! प्रत्येक विद्यार्थी हा समाजाच्या उत्पादकतेचा सभासद होईल याची काळजी घेतली जाते. उद्योजकतेला खूप महत्त्व दिलं जातं. यामुळे सरकार, उद्योजक आणि शिक्षणसंस्था यांच्यात उत्तम समन्वय आहे.
विद्यार्थ्यांना सर्वांगीण सक्षमता यावी यावर इथं भर असतो. यासाठी सर्वत्र उत्तम आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. एक प्रयोगशाळा पाहिली. तिचं नावच Lab of curiosity असं आहे. म्हणजे, तुम्हाला कोणतंही कुतूहल वाटल्यास किंवा तुमच्या मनात कोणताही विचार आल्यास त्याची प्रयोगशीलता तुम्ही इथं प्रयोग करून पाहू शकता. विद्यार्थी हा आनंदी आणि प्रयत्नशील असावा या दृष्टीनं वातावरण निर्माण केलं जातं. उद्याचे सक्षम नागरिक घडविण्यासाठीची ही प्रयत्नशील धडपड कौतुकास्पदच वाटते.
आपल्याकडे बुद्धिमत्ता, निसर्गसंपदा याची वानवा नाही. गरज आहे ती एकोप्याची, सामाजिक जाणिवेची आणि सर्वांगीण प्रामाणिक प्रयत्नांची. ...तरच भारताच्या सुजलाम्, सुफलाम् स्वप्नांचं वस्तुस्थितीत रूपांतर होईल. आपल्या सर्वांना हे पटल्यावर ते प्रत्यक्षात शक्य आहे. मग मागं का राहायचं? आपण करूया प्रयत्न... आपल्या भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी.
(प्रतिक्रिया नोंदवा : व्हॉट्सॲप क्रमांक
८४८४९ ७३६०२)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.