Pratap Pawar : माझे काही शिक्षक

Teacher : मला वाहनचालकाबरोबर गप्पा मारायला आवडतं. थोडं बोलतं केल्यावर त्यांच्याकडून अनेकदा खूप शिकायला मिळतं. त्यांच्यामध्ये एक प्रगल्भता निर्माण झालेली असते.
Pratap Pawar
Pratap PawarAgrowon

Pratap Pawar Article : मला वाहनचालकाबरोबर गप्पा मारायला आवडतं. थोडं बोलतं केल्यावर त्यांच्याकडून अनेकदा खूप शिकायला मिळतं. त्यांच्यामध्ये एक प्रगल्भता निर्माण झालेली असते.
मी   गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ प्रवास करत आहे. बराचसा प्रवास हा व्यावसायिक कारणांमुळे किंवा काही वेळा मित्रांबरोबर सुटीकरता नवीन नवीन जागी जाणं या उद्देशानं असतो. मी एकटा असतो तेव्हा देशात अथवा परदेशांत टॅक्सीनं प्रवास करावा लागतो. बहुधा हा प्रवास अर्ध्या-एक तासाचा असतो. मात्र, काही वेळा दोन-तीन तासांचाही असतो. या प्रवासात मला वाहनचालकाबरोबर गप्पा मारायला आवडतं. थोडं बोलतं केल्यावर त्यांच्याकडून अनेकदा खूप शिकायला मिळतं. माझ्यासारख्या शेकडो प्रवाशांशी त्यांचा संपर्क आलेला असतो, प्रश्नोत्तरं झालेली असतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रगल्भता निर्माण झालेली असते. प्रश्न असतो तो त्यांच्या काळजाला भिडणं आणि त्यांच्याकडून शिकायला मिळणं (मिळवणं). हे फक्त परदेशात होतं असं नव्हे तर, भारतातही होतं. सन १९९४ चा काळ. मी मुंबईत विमानतळावरून फोर्टमध्ये जाण्यासाठी टॅक्सी केली.

टॅक्सीचालक हा उत्तर प्रदेशातील असल्याचं त्याच्या बोलण्यावरून ध्यानात आलं. इकडच्या-तिकडच्या गोष्टी झाल्यावर मी म्हटलं : ‘‘आता देशात निवडणुका होत आहेत. तुम्ही ‘यूपी’वाले राजकारणात पटाईत आहात. इतकी वर्षं तुमचाच पंतप्रधान असतो.’’
‘‘खरं आहे.’’ तो उत्तरला.
मी विचारलं : ‘‘या वेळी काँग्रेसतर्फे नवा गडी प्रतिनिधित्व करतो आहे.’’
इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतरची ती निवडणूक होती.
मी त्याला विश्वासात घेत विचारलं : ‘‘काय रागरंग दिसतोय? तुम्ही कुणाला मत देऊ इच्छिता आणि त्याचं कारण काय?’’
गप्पांमध्ये तो बराच मोकळा झाला होता.
‘‘काँग्रेसला, म्हणजे राजीव गांधी यांना,’’ तो उत्तरला.
मी म्हटलं : ‘‘अहो, त्यांना तर काहीच अनुभव नाही. तुमच्यासारखा, टॅक्सीऐवजी विमान चालवणारा इंदिरा गांधींचा तो मुलगा, असं मला वाटतं.’’
तो म्हणाला : ‘‘तुम्ही म्हणता ते खरं आहे; परंतु काय आहे, बाळकडू नावाची गोष्ट असते...’’  
मी माझं अज्ञान दाखवलं, त्यावर तो मला समजावण्याच्या सुरात बोलू लागला : ‘‘कसं आहे, गवयाच्या पोराला गाणं शिकवलं नाही तरी त्याच्या कानावर सूर पडत असतात. नकळत त्याचा कान तयार होत असतो. भले तो संगीत न का शिकेना.

Pratap Pawar
Pratap Pawar : काही वाचन, चिंतन

आता आमचंच उदाहरण पाहा ना, आमचा मुलगा हा लहानपणापासून चाकं बदलणं...गाडीची काळजी घेणं...हात काळे करणं...या गाडीवर आपलं जीवन आहे, त्यामुळे आमचं गाडीवर आपल्या मुला-बाळांइतकंच प्रेम करणं...या साऱ्या बाबी पाहत आलेला असतो. त्याला गाडी चालवणं शिकायला कितीसा वेळ लागेल?’’
मी विचार करत होतो. मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा असल्यानं शेतातला वाफसा म्हणजे काय...भाज्या-फळं ताजी आहेत की शिळी आहेत हे आजही एक नजरेत सांगू शकतो. भले मी शेती केलेली नसेलही; परंतु बाळकडू तर आहेच ना!
तो पुढं म्हणाला : ‘‘हीच गोष्ट राजीव गांधी यांना लागू पडते. त्यांच्या घराण्यात राजकारण आहे. ते भले आज पायलट असेनात का; परंतु जबाबदारी पडल्यावर देश चालवू शकतील.’’
राजीव गांधी प्रचंड बहुमतानं निवडून आले, पंतप्रधान झाले. अर्थात्,  इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे देशभर निर्माण झालेली सहानुभूती त्यामागं होती, हीसुद्धा वस्तुस्थिती होती. ‘वॅन’ म्हणजे जागतिक माध्यमांमध्ये काम करणारी जागतिक संघटना. हिचं प्रमुख केंद्र पॅरिसमध्ये आहे. तिच्या संचालक मंडळावर मी २००५ पासून ते आजतागायत आहे. भारतात हिची जागतिक परिषद ‘आयएनएस’तर्फे घडवून आणण्यात माझा प्रमुख वाटा होता. अर्थात्, हे ‘आयएनएस’ म्हणजे भारतातील वर्तमानपत्रांची देशपातळीवरील संस्था. हिचाही मी १९९५ पासून संचालक आहे. ‘वॅन’ची वार्षिक परिषद वेगवेगळ्या देशांत होते, तर संचालकमंडळाची सभा वेगवेगळ्या देशांत, शहरात तीन-चार वेळा होत असल्यानं त्यानिमित्तानं माझी भटकंती होतेच.
सध्या चर्चेत असलेल्या युक्रेनच्या राजधानीत, म्हणजे किव्ह इथं, दोन-तीन वेळा आमच्या सभा झाल्या. सभेनंतर खास जेवण असतं. त्याला आमच्याबरोबर प्रथितयश लोकांना बोलावलेलं असतं. गप्पा होतात, इतिहास-भूगोल समजतो. युक्रेनवर रशियाच्या स्टॅलिननं प्रचंड अत्याचार केले. युक्रेन हे गहू-उत्पादन करणारं युरोपचं एक प्रमुख केंद्र. स्टॅलिननं त्यांचं उत्पादन हळूहळू १०० टक्के पळवलं आणि ज्यांनी विरोध केला त्यांच्यावर रणगाडे घातले. युक्रेनला याचमुळे रशियापासून दूर राहायचं आहे.

Pratap Pawar
Pratap Pawar : ‘गर्जे मराठी’चा डंका

कीव्हमध्ये मी टॅक्सीनं भटकत होतो. त्या वेळी नुकतीच टाटांची नॅनो गाडी बाजारात आलेली होती. गाड्या तयार करणाऱ्यांबरोबरच गाड्या वापरणाऱ्यांमध्येही - मग तो भले टॅक्सी-ड्रायव्हर का असेना - एक कुतूहल निर्माण होतं. या युक्रेनियन ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर भारताबद्दल एक कौतुकाची झलक मला दिसत होती. तो म्हणाला : ‘‘हे कसं शक्य आहे? माझा तर विश्वासच बसत नाही.’’
तो अनुभवातून म्हणाला : ‘‘खरं सांगू, टाटा कंपनीनं निदान दुप्पट किंमत ठेवायला हवी. आमच्यासारख्यांना वर्षभर फुकट देखभाल करण्याची शाश्वती दिली तर आम्ही उड्या मारत ती गाडी घेऊ.’’
हे व्यावहारिक शहाणपण हे त्याच्या अनुभवाचे बोल होते.मी टाटा ग्रुपबरोबर पुणे/जमशेटपूर इथं जवळपास ३५-४० वर्षं व्यवसाय केला. माझा अनुभव नेहमीच चांगला राहिला. त्याअनुषंगानं टाटा ग्रुपमधील सर्वोच्च पदांवरील लोकांच्या गोष्टी ऐकायला-पाहायला- काही वेळा ‘अनुभवायला’ही मिळत.

या ड्रायव्हरवरून मुळगावकर यांची एक गोष्ट मला आठवली. मुळगावकर दुपारच्या जेवणाच्या वेळी स्वतः गाडी घेऊन, म्हणजे ड्रायव्हरशिवाय, बाहेर जेवायला जात. सर्वत्र समजूत अशी होती की, सर्वांसाठी असलेल्या कँटीनमध्ये ते कशाला जेवतील? चांगल्या सर्वोच्च हॉटेलमध्ये मस्तपैकी जेवत असतील. शेवटी, ते टाटा मोटर्सचे प्रमुख होते ना!
एक दिवस या अधिकाऱ्यांपैकी एकानं धाडस करून मुळगावकरांचा पाठलाग केला. दुरून तो टेहळणी करत पाठोपाठ जात होता.  मुळगावकर एक ढाब्यावर गेले. गाडी दूर कुठं लावून चालत गेले. जिथं ट्रकचे ड्रायव्हर्स जेवत असत तिथल्या खाटेवर अथवा टेबलवर जाऊन बसले. ते जेवता जेवता टाटा ट्रक्सबद्दल विचारणा करत होते. या ड्रायव्हर्सना कोणत्या कंपनीचे कोणते ट्रक आवडतात...किंवा का आवडत नाहीत...काय सुधारणा केल्या तर टाटाच्या गाड्यांना ते प्राधान्य देतील...अशा सहज गप्पा मारत चौकशी करत.
तिथून येऊन ते अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करत. सूचना करत, पूर्वी सांगितलेल्या सुधारणांचा आढावा घेत. यामुळे ‘टाटा ट्रक्स’ हे देशात प्रथम क्रमांकावर पोहोचले होते. आपल्या गिऱ्हाइकांची सेवा केली की तिचं फळ मिळतं. हे सर्वत्रच लागू पडतं. असे पुष्कळ अनुभव माझ्या गाठीशी आहेत. सामान्य माणसाचे अनुभवाचे बोल हे आपल्याला खूप काही शिकवून जातात.

हा लेख मी लंडन-मुंबई या विमानाच्या प्रवासात, विमानात बसून लिहीत आहे! कारण, आज मित्राच्या घरून लंडन विमानतळापर्यंतचा टॅक्सीचा प्रवास जवळपास दोन तासांचा होता. आमच्या गाडीचालकांना बोलतं करणं हे माझ्या स्वभावातच आहे. मग काय, इथंही मी तेच केलं. तो दिसण्यावरून इंग्रज नाही हे माझ्या ध्यानात आलं. साहजिकच, ‘कुठून आला...का आला...कसं काय चाललं आहे...तुला इथं कसं वाटतं’ वगैरेची माहिती घेतली.
तो पॅलेस्टाईनमधून २५ वर्षांपूर्वी युरोपमध्ये आला. एक उत्तम खेळाडू असल्यानं त्याची निवड जर्मनीमध्ये झाली. वेळ छान गेला. पैसे मिळवले. व्यक्तिमत्त्व छान असल्यानं मित्र-मैत्रिणी अनेक. मी विचारलं : ‘‘लग्न कुणाशी केलं आणि कशा पद्धतीनं?’’
तो उत्तरला : ‘‘पॅलेस्टाईनला जाऊन लग्न करण्याची इच्छा मी व्यक्त केली; परंतु माझ्या आत्यानं मला एका कौटुंबिक समारंभात नेलं आणि माहितीतली छान मुलगी दाखवली. ती आवडली. ओळख वगैरे करून दिली
गेल्यावर तिच्याशी लग्न केलं’’

मी विचारलं : ‘‘तुझ्याभोवती मित्र-मैत्रिणींचा गराडा असताना पॅलेस्टाईनमध्ये - भारतीय पद्धतीनं, म्हणजे अरेंज मॅरेज - का केलंस?’’
तो उत्तरला : ‘‘प्रश्‍न माझा नाही...पुढील पिढीचा, तिच्या जडणघडणीचा असतो. आपल्या देशातील, समाजातील, चाली-रीतीतील मुलीशी विवाह करण्यानं हे सर्व पुढच्या पिढीत पोहोचतं. युरोपीय मुलीशी लग्न केलं असतं तर हे होऊ शकलं नसतं.’’
त्याचा हा विचार आपल्या भारतीय संस्कारांत बसतो.
पुढं गप्पा मारताना पॅलेस्टाईन, इस्राईल यांविषयी, तसंच युरोपीय आणि विशेषतः ब्रिटिश यांनी कशी वाट लावली याविषयी तो बोलत राहिला. युरोपीय, विशेषतः ब्रिटिश आणि अमेरिकी, ही अत्यंत स्वार्थी आणि निष्ठूर जमात कशी आहे, हे त्यानं ऐतिहासिक दाखले देत सांगितलं.
तो म्हणाला : ‘‘पाहा ना, सद्दाम हुसेनचं आणि इराकचं छान चाललं होतं; परंतु त्यानं एक घोडचूक केली. आपलं तेल अमेरिकी डॉलर्समध्ये न विकता, ज्या देशाला तेल हवं त्या देशाच्या चलनात द्यायला सुरुवात केली. यामुळे अमेरिकेचं पित्त खवळलं. इतर देशही असंच करायला लागतील ही भीती अमेरिकेला वाटली. म्हणजे, म्हातारी मेल्याचं दुःख नाही; पण काळ सोकावतो. यामुळे, इंग्लंडनं आणि अमेरिकेनं खोटं बोलून सद्दाम हुसेन आणि इराक यांची वाट लावली. तेच त्यांनी लिबिया, सीरिया यांसारख्या देशांचं केलं.’’ तो पुढं सांगत राहिला : ‘‘वास्तविक, पॅलेस्टाईन हा पाच हजार वर्षांपासूनचा देश...त्या काळी तर युरोपीय हे पूर्ण मागासलेले होते. दुसऱ्यांना लुटून त्यांचा वापर करून श्रीमंतीत राहणारे हे लोक.’’ हे सांगताना त्याची पोटतिडीक जाणवत होती.
तो पुढं म्हणाला : ‘‘पाहा ना, इंग्लंडमध्ये काम कोण करतं? तर काम करणारे सर्व बाहेरचे लोक आहेत. त्यांना बाहेर काढा, इंग्लंडचं उद्या दिवाळं वाजेल.’’
त्याचं बोलणं ऐकताना माझं शिक्षण होत होतं. विमानतळ आला. मी उतरलो. माझ्याशी प्रेमानं हस्तांदोलन करून या माझ्या शिक्षकानं निरोप घेतला. विमानात स्थिरावल्यावर माझं विचारचक्र सुरू झालं. जुन्‍या गोष्टी आठवायला लागल्या. त्यांचं या लेखात रूपांतर
झालं.
कसे वाटले हे माझे शिक्षक? आपण आयुष्यभर विद्यार्थी असावं असं (तुम्हालाही) (कुणालाही) वाटतं ना?
(प्रतिक्रिया नोंदवा : व्हॉट्सॲप क्रमांक ८४८४९ ७३६०२)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com