Pratap Pawar : ‘गर्जे मराठी’चा डंका

Garje Marathi... : आनंद गानू आणि त्यांचे सहकारी यांच्यासारखी ध्येयवेडी माणसं मी आयुष्यात अनेक अनुभवली. मी स्वतः पिलानीमध्ये महाराष्ट्र मंडळाचा सक्रिय कार्यकर्ता होतो. कुठंही महाराष्ट्राबाहेर मराठी माणसं एकमेकांना शोधत असतात. त्याचंच वैश्विक स्वरूप म्हणजे ‘गर्जे मराठी...’ या उपक्रमाची माहिती लोकांना होण्यासाठी काय योगदान देता येईल याचे मी प्रयत्न केले. ‘सकाळ’ आणि ‘साम’ यांच्या माध्यमातून यशस्वी मराठी लोकांचा परिचय करून दिला.
Prataprao Pawar
Prataprao PawarAgrowon
Published on
Updated on

प्रताप पवार - अमेरिकेतून आनंद गानू यांचा सुमारे दोन वर्षांपूर्वी फोन आला होता. माझा व त्यांचा परिचय नव्हता. त्यांनीच स्वतःची ओळख करून देत ‘गर्जे मराठी’ या संकल्पनेची थोडक्यात माहिती दिली. आवाजात एक गांभीर्य आणि कळकळ होती. एक हितचिंतक, सल्लागार या नात्यानं ‘गर्जे मराठी’शी मी नातं जोडावं अशी विनंतीवजा सूचना त्यांनी मला केली. त्यांची संकल्पना मला आवडली आणि काय करता येऊ शकेल याचा विचारही मी करू लागलो. यानंतर आमचा अनेकदा फोनवरून संवाद झाला.

Prataprao Pawar
गावांना लोकसहभागातून प्रगतीकडे घेऊन जायचे - प्रतापराव पवार

या संस्थेशी थेट संलग्न होण्याबरोबरच हा ध्यासपूर्ण उपक्रम समाजापर्यंत कसा पोहोचवता येईल या दृष्टीनं मी विचार करायला लागलो. या उपक्रमाची माहिती लोकांना होण्यासाठी काय योगदान देता येईल याचे मी प्रयत्न केले. ‘सकाळ’ आणि ‘साम’ यांच्या माध्यमातून यशस्वी मराठी लोकांचा परिचय करून दिला.

गानू आणि त्यांचे सहकारी यांच्यासारखी ध्येयवेडी माणसं मी आयुष्यात अनेक अनुभवली. मी स्वतः पिलानीमध्ये महाराष्ट्र मंडळाचा सक्रिय कार्यकर्ता होतो. कुठंही महाराष्ट्राबाहेर मराठी माणसं एकमेकांना शोधत असतात. त्याचंच वैश्विक स्वरूप म्हणजे ‘गर्जे मराठी...’
जगात अनेक देशांत किती तरी यशस्वी पदांवर काम करणारी, तसंच उद्योजक असणारी मराठी मंडळी आहेत. या सर्वांना एका संस्थात्मक रूपानं जोडता येईल का, त्यांचा उपयोग महाराष्ट्राला अथवा आपल्या देशाला करून देता येईल का हा गानूंचा विचार. मग गानू कुटुंबीयांनी आणि सहकाऱ्यांनी आपल्या या ध्येयासाठी सर्वस्व ओतलं.

आता या लोकांचं अमेरिकेत संमेलन भरवावं, त्यातून सर्वांची एकमेकांशी ओळख, परिचय करून द्यावा हा विचार पुढं आला. हे संमेलन कुठं, कसं, केव्हा भरवायचं याचं विचारमंथन सुरू झालं. कुणाला पकडायचं व कामाला लावायचं हे गानूंना चांगलं समजतं. माझ्यासारख्यांना या संस्थेत ओढण्यात ते यशस्वी झाले. अर्थात, माझ्यासारखे शेकडो... अगदी नितीन गडकरी, डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यापर्यंत.

‘गर्जे मराठी’चं सॅनफ्रॅन्सिस्को इथं दोन दिवसांचं, भरगच्च कार्यक्रमांचं संमेलन जुलैमध्ये झालं, त्यात मला सहभागी व्हावं लागलं. कल्पना करा, सर्वच मंडळी वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगवेगळ्या विषयांमध्ये यशस्वी. त्या सर्वांशी संपर्क साधायचा, त्यांची राहण्याची वगैरे सोय करायची. सर्वांना पसंत पडतील अशा भाषणांचं, चर्चांचं, संवादरूप कार्यक्रमांचं आयोजन करायचं...हे काम सोपं नव्हतं. मला आग्रहाचं आमंत्रण होतंच; परंतु ते स्वीकारल्यानंतरही पाच-सहा वेळा चौकशी करून, काही अडचण नाही ना, याची काळजीपूर्वक चौकशी! कोण हे गानू...हे सर्व ते कशासाठी करत असतात? तथापि, अशी ध्येयवेडी माणसंच समाजाचं भलं करत असतात. माझ्या आयुष्यात डॉ. माचवे, डॉ. अच्युतराव आपटे,  डॉ. नरेंद्र दाभोलकर, किशाभाऊ पटवर्धन, बाबासाहेब जाधव, बाबासाहेब सगरोळीकर अशी किती तरी माणसं आली. त्यांच्याबरोबर काम करण्याची मला काही दशकं संधी मिळाली. या लोकांचं वैशिष्ट्य असं असतं की, ते एखाद्या लोहचुंबकाप्रमाणे लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घेतात...त्यांना कायमचे सहकारी बनवतात...संस्था घडवतात...आणि तेही निःस्पृहपणे, समाजाच्या हितासाठी.

Prataprao Pawar
शेतकरी समूहाने संघटित रिटेल साखळी उभारणे गरजेचे ः प्रतापराव पवार

समारंभाच्या उद्‍घाटनाच्या वेळी दोघांची प्रमुख भाषणं झाली. एक होते डॉ. माशेलकर आणि दुसरे होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. डॉ. माशेलकरांचं भाषण अप्रतिम झालं. मला त्यांचं भाषण ऐकायला नेहमीच आवडतं. एक अभ्यासू, विद्वान, जमिनीवर पाय असणारा विचारवंत या नजरेतून मी त्यांच्याकडे पाहतो. आमचे व्यक्तिगत संबंध जवळचे आणि गेल्या काही दशकांचे आहेत.

केंद्रीय मंत्री गडकरी मला फार आवडतात. पहिलं कारण म्हणजे, ही व्यक्ती प्रथम हाडाचा कार्यकर्ता आहे. राजकारण, पद हे त्यांच्या दृष्टीनं दुय्यम असतं. कुणाबद्दलही द्वेष, आकस नाही.
सध्याच्या राजकारणात व्यक्तिगत द्वेष, तसंच कुणी राजकीय विरोधक असले तर ते म्हणजे शत्रू किंवा काही वेळा देशद्रोही अशा विचारांच्या टोकाला जाणारी नेतृत्वं पाहायला-ऐकायला मिळतात. खरं म्हणाल, तर राजकारणात राहून खूप काही चांगली कामं करता येतात; परंतु त्यासाठी वेगळी मानसिकता लागते (सर्वपक्षीय), जी सर्वांची नसते. आजकाल अनेक आरोपांमुळे; मग ते खरे-खोटे का असेनात, यातून राजकीय नेतृत्वाबद्दलच जनतेत फार वाईट प्रतिक्रिया उमटतात हे फारसं कुणी ध्यानात घेत नाही.

‘एबीसीडी’तील सर्व ‘बंदुका’ वापरून राजकीय विरोधकांना नामोहरम करणं अथवा त्यांना शरण यायला लावून माफ करणं असला प्रकार केंद्रीय मंत्री गडकरींकडून त्यांच्या स्वप्नातही होणार नाही. आपलं काम उत्कृष्ट दर्जाचं, व्यावहारिक चातुर्य वापरून करणं हे त्यांचं वैशिष्ट्य. त्यांच्याबरोबर गप्पा मारणं म्हणजे नवीन योजना, कल्पना यांत पोहण्यासारखं असतं! महत्त्वाचं म्हणजे, ते अभ्यासू आहेत. आपण चांगली कल्पना, तंत्रज्ञान घेऊन गेलो की ते ती विनाविलंब उचलून धरतात. सामान्य माणसाला राजकीय नेतृत्वाकडून यापेक्षा काय हवं असतं? डॉ. माशेलकरांप्रमाणेच गडकरींचं भाषणही उत्तम झालं. संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं - इच्छा असूनही - ते व्यक्तिशः येऊ शकले नाहीत. नागपूरमधून त्यांनी आम्हा सर्वांशी संवाद साधला. त्यामुळे प्रत्यक्ष भेटीची संधी हुकली.

या संमेलनाच्या निमित्तानं अनेक संस्थांनी आपापला परिचय करून दिला. यासाठी त्याचं नियोजन केलं गेलं होतं. आमच्या ‘विद्यार्थी सहायक समिती’तर्फे आम्ही तिघं विश्वस्त उपस्थित होतो. सर्वांशी संवाद साधण्याची संधी आम्हाला प्रश्नोत्तर-पद्धतीनं मिळाली. प्रतिसाद उत्तमच होता. समितीच्या भावी वाटचालीत याचा नक्कीच उपयोग होईल.

समितीच्या वतीनं ‘एकलव्य’ या उपक्रमांतर्गत ३० विद्यार्थ्यांना विविध प्रकारचं प्रशिक्षण दिलं गेलं. हा ‘गर्जे मराठी’च्या प्रयत्नाचा एक भाग असून, पहिलाच प्रयोग आहे. या उपक्रमांतर्गत राज्यभरात कार्यविस्तार करण्याची योजना आहे. त्याचा विविध शैक्षणिक संस्थांना आणि पर्यायानं होतकरू विद्यार्थ्यांना, फायदा होणार आहे.

Prataprao Pawar
राज्यातील सहाशे गावांचा पाणी प्रश्न सोडविला : प्रतापराव पवार

समारंभाच्या निरोपाच्या वेळी सर्वांनी श्री. व सौ. गानू, श्री. व सौ. पाध्ये, दिवस-रात्र झटणारे इतर सर्व कार्यकर्ते यांना उभं राहून, टाळ्यांच्या कडकडाटात मानवंदना दिली. हे सर्व कार्यकर्ते आपल्या भावना आवरू शकले नाहीत. मुलीचं लग्न धामधुमीत पार पाडल्यानंतर जेव्हा निरोप घ्यायची वेळ येते तेव्हा तिच्या आई-वडिलांना अश्रू आवरता येत नाहीत. तशीच भावना या सर्व कार्यकर्त्यांमध्ये होती. आम्हीही सर्व जण भारावून गेलो. ‘गर्जे मराठी’चं ऋण, विचार बरोबर घेऊन सर्वांनी निरोप घेतला.

समाजासाठी निःस्पृहपणे काम करण्याच्या इच्छेचं पूर्ततेत होणारं समाधान वेगळंच असतं. समाजासाठी संपूर्ण योगदान देणं सर्वांनाच शक्य नसतं आणि आवश्यकही नसतं.
आपण सर्व जण ‘फूल ना फुलाची पाकळी’ या स्वरूपात काय देऊ शकतो याचा विचार मात्र झाला पाहिजे. आणि हो, तोही आपल्या आवडत्या क्षेत्रात...(करताय ना सुरुवात?) पाहा, जमतंय का...

गानूंनी प्रत्येक देशातील मराठी माणसांचा शोध घ्यायला सुरुवात तर केलीच; त्याचबरोबर त्यांना ‘गर्जे मराठी’चं सभासदही करून घेतलं; अगदी अमेरिकेपासून ते ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडपर्यंत. अर्थात, हे काम सोपं नव्हतं. सातत्यपूर्ण प्रयत्नांतून शेकडो व्यक्तींची नावं, पत्ते, माहिती गोळा करण्यात आली. हा पहिला टप्पा होता.

(प्रतिक्रिया नोंदवा : व्हॉट्सॲप क्रमांक ८४८४९ ७३६०२)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com