
Sustainable Farming Techniques: साधारणपणे पाच वर्षांपासून मी वीस एकर क्षेत्रातील कापूस, तूर आणि रब्बी ज्वारी या कोरडवाहू पिकात विना नांगरणी शेती आणि शून्य मशागत तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली. अशा पद्धतीने शेती तरी होईल का, हा प्रश्न विचारून लोकांनी मला वेड्यात काढले. पण जमीन सुपीकता आणि व्यवस्थापन खर्च कमी करण्यासाठी विना नांगरणी, शून्य मशागत तंत्रानेच बळ दिले आहे.
माझ्या जीवनात प्रयोगशीलता ही कुटुंबाकडूनच आली. सत्तरच्या दशकातील हरितक्रांतीच्या काळात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील एक प्रयोगशील शेतकरी कुटुंब असा ठसा राज्यभर उमटविला होता. हे बाळकडू घेऊन मी १९८४मध्ये बीए पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मौजे देवगाव (ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे माझे वडील पुरषोत्तम जोशी यांच्यासोबत वीस एकर शेतीमध्ये रमलो. साधारणपणे २००० मध्ये माझ्याकडे शेतीची संपूर्ण जबाबदारी आली. आमच्या कुटुंबीयांचा गावशिवारामध्ये पहिल्यापासूनच सामाजिक उपक्रमात सहभाग आहे. यातून युवकांना एकत्र करून व्हॉलिबॉल, कब्बडी असे मैदानी खेळ गावात आयोजित करू लागलो. या एकत्रीकरणाचा फायदा शेती तंत्रज्ञान विस्ताराला झाला.
शून्य मशागतीच्या दिशेने...
साधारणपणे २००० पर्यंत पारंपरिक पीक उत्पादनामध्ये फारशा समस्या नव्हत्या, परंतु पुढील काळात हवामान बदल, जमिनीची खालावलेल्या सुपीकतेचा परिणाम पीक उत्पादनावर दिसू लागला. विविध समस्यांमुळे उत्पादन खर्च जास्त वाढला. २०१० नंतर कापूस पिकात बोंड अळी, लाल्या विकृती या समस्या जास्त वाढू लागल्या. दुसऱ्या बाजूला रब्बी ज्वारी काढणीचा प्रश्न अवघड झाल्याने हे पीक धोक्यात आले. ज्वारी, बाजरी ही वैरणीची पिके शेतातून हद्दपार झाली, त्यामुळे जनावरांची संख्या कमी झाली.
शेतात सेंद्रिय घटकांचा पुरवठा कमी झाल्याने पीक उत्पादनावर परिणाम दिसू लागला आणि मी खडबडून जागा झालो. शेती किफायतशीर करण्यासाठी मी विविध उपाय शोधत असताना २०१८ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे दैनिक ‘ॲग्रोवन’तर्फे आयोजित कृषी प्रदर्शनाला भेट देण्याचा योग आला. या प्रदर्शनात विना नांगरणी, शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर करणारे कोल्हापूर येथील प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी मी सकाळीच प्रदर्शनात दाखल झालो.
मार्गदर्शन झाल्यानंतर चिपळूणकर यांच्याशी दोन तास विना नांगरणी, शून्य मशागत तंत्रज्ञानाबद्दल चर्चा झाली. यानंतर आपल्या शेती नियोजनात काहीतरी बदल केलाच पाहिजे, असे विचार डोक्यात घुमू लागले. सुरुवातीला विना नांगरणी, शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर करण्याची माझी हिंमतच होत नव्हती. पण मनाने उचल खाल्ली आणि २०१९ मध्ये वीस एकरापैकी अर्धा एकर क्षेत्रामधील कापूस पिकात विना नांगरणी तंत्रज्ञानाचा वापर करायचा हे निश्चित झाले. चिपळूणकरांच्या मार्गदर्शनामुळे मला पहिल्या प्रयत्नामध्ये १०० टक्के यश आले.
वर्षानुवर्ष तण निर्मूलन करून शेत स्वच्छ ठेवायचे, हाच संस्कार असल्यामुळे यश मिळून सुद्धा या तंत्रज्ञानाचा मोठ्या क्षेत्रात वापर करण्याची हिंमत होत नव्हती. या अभ्यासादरम्यान चिपळूणकर यांची शून्य मशागत तंत्राबाबत पुस्तके वाचल्यानंतर लोक काय म्हणतील, याचा विचार न करता मी २०२० पासून संपूर्ण वीस एकर क्षेत्रावर कापूस, तूर आणि रब्बी ज्वारी या कोरडवाहू पिकात शून्य मशागत तंत्रज्ञान वापरण्याचा निर्धार केला. अशा पद्धतीने एक एकर तरी शेती होईल का, असे प्रश्न परिसरातील शेतकरी विचारू लागल्याने मी गावातील पहिला वेडा ठरलो.
तण व्यवस्थापन कळीचा मुद्दा
निश्चय पक्का असल्यामुळे सुरवातीची तीन वर्ष बीटी कापसात शून्य मशागत तंत्रज्ञान वापरले. लागवड पारंपरिक पद्धतीने न करता ५ फूट बाय १ फूट या अंतराने केली. लागवड केल्यानंतर लगेच आणि उगवणीपूर्वीचे शिफारशीत तणनाशकाचा वापर कापूस लागवड केलेल्या ओळीमध्ये केला. याचा परिणाम असा झाला, की पिकाच्या ओळीत जवळपास दोन महिन्यांपर्यंत तण उगवले नाही. मधल्या तीन फुटांच्या पट्ट्यात गुढघ्यापर्यंत तण वाढू दिले. त्यानंतर मजुरांच्याकरवी तण कापून जागेवर टाकले.
तण व्यवस्थापनामुळे कापसावरील मावा तणावर जास्त प्रमाणात गेला. किडीचा फारसा प्रादुर्भाव कापसावर झाला नाही. याच काळात गावातील शेतकऱ्यांनी मावा नियंत्रणासाठी रासायनिक कीडनाशकांची जोरदार फवारणी केली होती. मी मात्र गरजेपुरत्या रासायनिक कीडनाशकाच्या फवारण्या केल्या. परत कापसामध्ये तण वाढू दिले, ते चांगले परिपक्व होईपर्यंत तसेच ठेवले. फक्त पिकाची ओळ तण मुक्त ठेवली. या काळात कापसावर येणारे फुलकिडे तणावर जास्त प्रमाणात गेले.
कापसावर फारच कमी प्रादुर्भाव झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रासायनिक कीडनाशकाच्या फवारणीचा खर्च वाचला. या काळात आमच्या गावशिवारात कपाशीवर फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. शून्य मशागत तंत्रज्ञानाने केलेल्या कोरडवाहू कपाशीचे एकरी उत्पादन आठ क्विंटल मिळाले. थोडक्यात, उत्पादन स्थिर होते. नांगरणी, वखरणी, रोटाव्हेटरने मशागत, तणनियंत्रणासाठी भांगलणी पूर्णपणे थांबली. फवारणीमध्ये ५० टक्के बचत झाली.
आर्थिक बचत हाच नफा
कापसासारख्या मुख्य पिकाबरोबर तण वाढत होते. या काळात जमिनीतून मिळणारे नत्र तसेच हवेतून मिळणारे नत्र यांच्यात तणामुळे विभागणी झाली. कापसाची अवास्तव कायीक वाढ झाली नाही, पीक कीडमुक्त राहिले. पहिल्याच वर्षी मला गावातील शेतकऱ्यांच्याप्रमाणे कोरडवाहू क्षेत्रात एकरी आठ क्विंटलचा उतारा मिळाला, मात्र गावातील शेतकऱ्यांपेक्षा कापूस व्यवस्थापनातील माझा खर्च एकरी पंधरा हजारांपेक्षा कमी झाला, हाच माझा निव्वळ नफा ठरला. यातून आत्मविश्वास वाढला. हंगाम संपल्यानंतर कॉटन श्रेडरच्या सहाय्याने पीक अवशेष जमिनीत ठेवून झाडाची कुट्टी करून ती पूर्ण शेतभर पसरवून दिली, त्याचा सेंद्रिय कर्ब वाढीसाठी फायदा झाला.
रब्बी ज्वारीमध्ये प्रयोग
अडीच एकर क्षेत्रावर २०२१ मध्ये रब्बी ज्वारीसाठी विना नांगरणी, शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर केला. ज्वारीचे लागवड क्षेत्र खरिपात पूर्ण पडीक ठेवले. त्यात तण वाढू दिले. पेरणीच्या आधी म्हणजे पूर्वा नक्षत्रात या क्षेत्रात तणनाशकाचा वापर करून ते जागेवर जिरविले, उत्तरा नक्षत्राच्या शेवटी ज्वारी पेरणी करण्यासाठी ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्र चालकाला बोलविले. सुरुवातीला शेतात गबाळ पाहून त्याने नकारच दिला. त्याला अधिकचे भाडे देऊन पेरणी करण्यास भाग पाडले.
पारंपरिक पद्धतीने १८ इंचांवर पेरणी न करता दोन ओळींतील अंतर दोन फूट केले. या पद्धतीने पेरणी करण्यास ट्रॅक्टर चालकाने थेट नकारच दिला. मात्र त्याला कसाबसा मनवून एका ओळीची पेरणी करण्यास भाग पाडले. पेरणीची जमीन एकदम भुसभुशीत पाहून त्यानेही आश्चर्य व्यक्त केले आणि ज्वारीची पेरणी आनंदाने पूर्ण केली. पेरणीनंतर मी शिफारशीनुसार उगवणीपुर्वीचे तणनाशक मारले. त्याने तण नियंत्रण चांगले झाले.
विना नांगरणी तंत्रज्ञानाचा वापर करताना अनेक समस्या येत गेल्या, त्यावर मी मात करत गेलो. मी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या रब्बी ज्वारीच्या परभणी सुपर मोती या वाणाची लागवड केली होती. शून्य मशागत तंत्राने मला कोरडवाहू क्षेत्रात सुमारे एकरी १७ क्विंटल ज्वारी झाली. मी शेती करायला लागल्यापासून हे सर्वांत उच्चांकी पीक उत्पादन होते. या पिकाची पाहणी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. एस. बी. पवार आणि कृषी खात्याचे अधिकारी प्रत्यक्ष शेतावर येऊन गेले. या पीक व्यवस्थापनात केवळ तणनाशक आणि पेरणीचा खर्च झाला. परंतु नांगरट, वखरणी, भांगलणी लागणाऱ्या खर्चाची एकरी १५ हजारांची बचत झाली.
तूर लागवडीला चालना
दिवसेंदिवस वन्यप्राण्यांचा वाढता त्रास आणि ज्वारी काढणीची समस्या बिकट होत असल्यामुळे हे चांगले पीक आम्हाला सोडून द्यावे लागले, ही शोकांतिका आहे. तीन वर्षांच्या अनुभवानंतर कापूस वेचणी आणि ज्वारी काढणीसाठी मजूरटंचाई लक्षात घेता मी तूर पीक घेण्यास सुरुवात केली. मागील तीन वर्षांपासून विना नांगरणी तंत्राने तीन एकर क्षेत्रावर तूर लागवड करीत आहे. बी.डी.एन. ७११ या वाणाची मी पाच फुटांवर लागवड करतो.
पेरणी केल्यानंतर एक महिन्याच्या आत शिफारशीत तणनाशकाची फवारणी केली. मधल्या तीन फुटांच्या पट्ट्यात तण वाढवून त्याचे व्यवस्थापन केले. तण कापणीसाठी मजूरटंचाई लक्षात घेऊन ग्रास कटरचा वापर सुरू केला. यामुळे वेळेवर तण व्यवस्थापन करणे सोपे झाले. मागील तीन वर्षांपासून एकरी सरासरी सहा ते सात क्विंटल तूर उत्पादनाचे सातत्य आहे. २०२४ च्या खरीप हंगामात मी ज्या क्षेत्रात तुरीचे पीक घेतले ते चीबड आहे. या वर्षी आमच्याकडे सरासरीच्या तिप्पट पाऊस (१२५० मिमी) झाला. एवढा पाऊस होऊन सुद्धा तुरीचे पीक कुठेही बाधित झाले नाही, शेतात कुठेही पाणी साचले नाही.
पाच वर्षांच्या तण व्यवस्थापनाचा परिणाम असा झाला, की तूर पिकाची रासायनिक खतांची मागणी ५० टक्क्यांनी कमी झाली. पिकावर फक्त एकाचवेळी कीडनाशकांची फवारणी घ्यावी लागली. या वर्षी मला एकरी सहा क्विंटल तूर झाली. पारंपरिक पद्धतीपेक्षा एकरी १५ हजारांची बचत झाली.
या वर्षी मला कोरडवाहू क्षेत्रातील सहा क्विंटल तूर सात हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकली गेली. उत्पादित तुरीची डाळ केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये थेट ग्राहकांना प्रति किलो १६५ रुपये या दराने रसायन अवशेषमुक्त डाळ विकली. मूल्यवर्धन केल्याने सर्व खर्च वजा जाऊन प्रति क्विंटल दहा हजार रूपये दर मिळाला. असे हे बहुगुणी तंत्रज्ञान मी वापरतोच, त्याचबरोबरीने गावशिवारात प्रसार करतो. माझ्या गावातील शेतकऱ्यांना देखील या तंत्रज्ञानाचे फायदे दिसू लागले आहेत.
जमीन सुपीकतेच्या दिशेने
हवामान बदलामुळे अतिवृष्टीचे प्रमाण वाढत आहे. कमी वेळात जास्त पाऊस पडतो. मातीची धूप वाढत आहे. या वर्षी माझ्या गावात पाच वेळा अतिवृष्टी झाली. परंतु विना नांगरणी आणि तण व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे माझ्या शेतातील पाण्याचा थेंब आणि मातीचा एकही कण वाहून गेला नाही. जमिनीची धूप थांबली. जमिनीची मशागत केल्याने जास्त हालचाल होते. जमिनीतील कर्ब वायू हवेत उडून जातो. ही एक जागतिक समस्या आहे. तण व्यवस्थापन केल्यामुळे जमीन सुपीक होत आहे.
पीक सक्षक्त बनत असल्याने रासायनिक कीडनाशकाच्या फवारण्या कमी होत आहेत. जमिनीखालील पीक अवशेष तसेच तण हे जागेवर कुजविल्यामुळे जमिनीतील उपयुक्त जिवाणू जोरदारपणे काम करतात. जीवसृष्टी वाचवायची असेल तर आपल्याला सेंद्रिय पदार्थ हा जागेवर जिरविणे गरजेचे आहे. आपल्या नजरेस न दिसणारे जिवाणू सक्रिय झाल्यामुळे रासायनिक खताचा वापर माफक होतो. हे पर्यावरणपूरक शेतीकडे जाण्याचे लक्षण आहे.
आता येथून पुढे प्रत्येक शेतकऱ्यास निसर्गाने जे आपणास दिले आहे, त्यातील काही भाग ठेवून बाकी निसर्गाला परत देण्याची शपथ घेतली पाहिजे. शेतीची उत्पादकता हा कळीचा विषय आहे. प्रत्यक्ष कृतीचा वापर करून त्यावर मात करणे गरजेचे आहे. बहुगुणी विना नांगरणी, शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर धोक्यात आलेल्या कोरडवाहू क्षेत्रात वाढवावा लागेल. या तंत्रज्ञानाचा वापर द्राक्ष, डाळिंब, मोसंबी या पिकात फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नुसते विक्रमी उत्पादनाचे आकडे दाखवून चालणार नाही, त्याबरोबर उत्पादनावर होणारा खर्च कमी झाला पाहिजे, हेच कोरडवाहू शेतीचे गमक आहे.
दैनंदिन शेती नियोजनात माझी पत्नी सौ. दीपाली हिचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी मुलांचे शिक्षण, घरी येणारे पाव्हणे, बियाणे, धान्याची स्वच्छता आणि गडी माणसांच्या सुख दुःखामध्ये सहभाग असतोच. देवगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक कमी असल्यामुळे पत्नीने पाच वर्षे विना मोबदला ज्ञानदानाचे काम केले. सध्या गावातील तीस मुलांना माफक फी घेऊन शिकवणी सुरू आहे. ‘उमेद’अंतर्गत महिला बचत गट स्थापन केला आहे. पत्नी घरची आघाडी सांभाळत असल्यामुळे मी शेती तंत्रज्ञान प्रसाराचे काम निश्चिंतपणे करत असतो.
शेतकरी मंडळातून तंत्र प्रसार
गावशिवारातील उपक्रमशील युवकांना सोबत घेऊन २००५ मध्ये तत्कालीन कृषी सहाय्यक मुकेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जय जवान जय किसान शेतकरी मंडळाची स्थापना.
छत्रपती संभाजीनगर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन आणि तंत्रज्ञानाचा प्रसार.
मोसंबी बागेमध्ये पाणी बचतीसाठी मल्चिंग पेपरचा वापर. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत गावातील २५ सामूहिक शेततळ्यांना १०० टक्के अनुदान.
कापूस पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर.
नांदेड येथील कापूस संशोधन केंद्र आणि शेतकरी मंडळाच्या समन्वयाने पाच वर्ष बीटी कापूस आणि देशी कापूस लागवडीचा तुलनात्मक अभ्यास. याचा चांगला परिणाम.
रेशीम विभाग तसेच ‘मनरेगा’चे अधिकाऱ्यांच्या सकारात्मक सहकार्यामुळे गावशिवारातील शंभर युवा शेतकरी रेशीम शेती करतात. यांच्या माध्यमातून ‘ॲग्रोवन रेशीम कट्टा’स्थापन. रेशीम शेतीमधील शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करण्याची मुहूर्तमेढ.
‘ॲग्रोवन’मुळे पोहोचलो राज्यभर
माझी विना नांगरणी, शून्य मशागत तंत्रज्ञानाची यशोगाथा दैनिक ‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झाल्यावर मागील तीन वर्षांत चांद्यापासून बांद्यापर्यंत अनेक शेतकरी जोडले गेले. काही यू-ट्यूब चालकांनी केलेली यशोगाथा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर पोहोचल्याने कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातील शेतकरी माझ्या शेतावर शिवारफेरीसाठी येतात. माझ्या गळ्यातील लाल रुमालामुळे राज्य, परराज्यांत वेगळी ओळख तयार झाली. असे अनेक सुखद अनुभव मला येतात. रक्तातील प्रयोगशीलतेमुळे अजून काही प्रयोग या तंत्रज्ञानात करता येईल का, याचा अभ्यास आम्ही चिपळूणकर काकांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विविध विषयांतील तज्ज्ञ तसेच कृषी विभागातील अनेक अधिकारी भेटी देऊन शून्य मशागत तंत्रज्ञानाबाबत विविध अंगानी चर्चा करत आहेत.
- दीपक जोशी ९८५०५०९६९२
(लेखक देवगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशील शेतकरी आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.