
Future of Farming: राज्यातील शेती आणि शेतकरी आजच्या घडीला मोठ्या स्थित्यंतरातून जात आहेत. एका बाजूला हवामान बदलाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सरकारच्या धोरणांमुळे शेती आतबट्ट्याची झालेली आहे. दुसऱ्या बाजूला कृत्रिम बुद्धिमत्ता, आयओटी, काटेकोर शेतीचे युग सुरू झाले आहे. या दोन टोकांची सांगड घालायची तर शाश्वत शेती पद्धतीचा अंगीकार करणे हीच दिशा असायला हवी. शाश्वत शेती हा शब्द प्रचलित असला तरी धोरणकर्त्यांपासून ते सामान्य शेतकऱ्यांपर्यंत या संकल्पनेविषयी बरीच संदिग्धता आढळते.
शाश्वत शेती म्हणजे सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेती एवढ्या मर्यादित चौकटीत विचार केला जातो. त्यामुळे मोठी गल्लत होते. वास्तविक नैसर्गिक साधनसामग्रीचा शाश्वत वापर, पर्यावरणपूरक शेती पद्धती आणि शेतकऱ्यांना सातत्यपूर्ण दीर्घकाळ परतावा मिळण्याची शाश्वती हे निकष केंद्रस्थानी ठेवून या शेती पद्धतीचा विचार करायला हवा. मुळात शेती अरिष्टाचा सुटा सुटा विचार न करता हवामान बदलाच्या व्यापक पर्यावरणीय समस्येचा भाग म्हणून त्याकडे बघितले पाहिजे. विकेंद्रित आणि निसर्गपूरक विकास ही शेती शाश्वत करण्याची पूर्वअट आहे, हे विसरून चालणार नाही.
हवामान बदल, कोरडवाहू शेती आणि जमिनीची सुपीकता हे शाश्वत शेती या विषयाचे तीन प्रमुख कोन आहेत. हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी आपली रणनीती काय आहे, हा खरा कळीचा मुद्दा आहे. केवळ पिकांचे नवीन वाण विकसित करून भागणार नाही. पीकपद्धतीतच नव्हे तर एकंदर शेतीपद्धतीतही बदल करावे लागणार आहेत. त्यादृष्टीने पशुधन शेती, ऊर्जा शेती यासारख्या पर्यायांवर लक्ष केंद्रित करावे लागेल.
राज्यातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आणि कोरडवाहू असल्यामुळे कोरडवाहू शेतीतल्या समस्या सोडवल्याखेरीज शेती शाश्वत करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार नाही. जमिनीची ढासाळलेली सुपीकता आणि घटलेला सेंद्रिय कर्ब या विषयावर युद्धपातळीवर काम करण्याची आवश्यकता आहे. मातीच सुरक्षित नसेल तर शेती शाश्वत होईल कशी? या पार्श्वभूमीवर राज्यातील भौगोलिक वैविध्य लक्षात घेता पर्यावरपूरक एकात्मिक शेतीचे विविध प्रारूपे (मॉडेल्स) विकसित करणे हाच शाश्वत प्रगतीचा मार्ग असू शकतो.
हवामान बदलाच्या संकटाची चर्चा करताना एक सार्वत्रिक निराशेचा सूर जाणवतो. शेतीचे भवितव्य अंधकारमय आहे, अशीच जणू मांडणी केली जाते. प्रत्यक्षात या संकटाला तोंड देण्यासाठी शेती हे ओझे नसून ती एक खूप मोठी संधी आहे, असे मत अनेक अर्थतज्ज्ञ आणि पर्यावरण अभ्यासक मांडत आहेत. जंगल आणि शेती हे नैसर्गिक कार्बन संकुल असून ते वातावरणातील कार्बनचे प्रमाण संतुलित करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे हवामान बदलाची तीव्रता कमी होते.
पर्यावरण आणि जैवविविधतेचे संवर्धन झाले तर अनेक इकोसिस्टिम सेवा पुरवता येतात. नैसर्गिक परिसंस्था, जैवविविधता वाढली की कार्बन ऑफसेट, जैव विविधता क्रेडिट्स वगैरे मधून चांगले उत्पन्न मिळवता येईल म्हणून खासगी कंपन्या या क्षेत्रात गुंतवणूक करायला तयार आहेत. जागतिक बॅंक व इतर वित्तसंस्था अशा पर्यावरणपूरक गुंतवणूक प्रकल्पांची आवश्यकता अधोरेखित करत आहेत.
ऑस्ट्रेलियामध्ये शेतकऱ्यांनी जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढवला, की त्यांना आर्थिक मोबदला देण्याची योजना सरकारकडून राबवली जात आहे. त्याचे निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत. आपल्याकडेही अशा प्रकारची योजना राबविता येणे शक्य आहे. पण त्यासाठी शाश्वत शेतीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलावा लागेल. नेहमीच्या चाकोरी मोडून विचार केला तर शाश्वत शेतीची वाट निश्चितच प्रशस्त होऊ शकते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.