Rabi Weed Management : रब्बी पिकातील तण व्यवस्थापन

Rabi Crop Protection : पिकाच्या व्यवस्थापनामध्ये व तंत्रज्ञानामध्ये सातत्याने सुधारणा होत गेल्या असल्या तरी तणांचे नियंत्रण अपेक्षेप्रमाणे साध्य झालेले दिसत नाही.
Rabi Crops
Rabi CropsAgrowon
Published on
Updated on

संजय बडे

Weed Control Technique : कोणत्याही पिकाच्या उत्पादन वाढीच्या प्रयत्नामध्ये तणे ही प्रमुख जैविक अडथळा ठरतात. उपलब्ध आकडेवारीनुसार केवळ तणांकडील दुर्लक्षामुळे उत्पादनात एक तृतीयांशपेक्षा अधिक घट येऊ शकते. तणांमुळे पिकाच्या उत्पादनात येणारी घट ही पिके व पिकांच्या सभोवतीची परिस्थितीच्या घटकांवर अवलंबून असते.

तणांमुळे पीक उत्पादनात सरासरी ३३ टक्के घट येते. या तुलनेत कीटकांमुळे २६ टक्के, रोगामुळे २० टक्के व इतर घटकांमुळे २१ टक्के घट येते. याचाच अर्थ अन्य कोणत्याही घटकांमुळे येणाऱ्या घटीपेक्षा पीक उत्पादनामध्ये तणांमुळे येणारी घट ही सर्वाधिक आहे. आपल्या देशाचे भरडधान्य, कडधान्य व तेलबिया पिकामध्ये प्रतिवर्षी रु. ५० हजार कोटीचे नुकसान यामुळे होत असते.

तणाचे अनेक अप्रत्यक्ष परिणाम पिकाच्या वाढीवर होत असतात. उत्पादनामधील घटीसोबतच उत्पादनाची गुणवत्ता घसरणे, एकाच तणांच्या अधिक वाढीमुळे जैव विविधतेमध्ये घट, परिसरात काम करणाऱ्या मनुष्य, पशूंच्या आरोग्यावरील विपरीत परिणाम यांचा त्यात समावेश होतो. पिकाच्या व्यवस्थापनामध्ये व तंत्रज्ञानामध्ये सातत्याने सुधारणा होत गेल्या असल्या तरी तणांचे नियंत्रण अपेक्षेप्रमाणे साध्य झालेले दिसत नाही. त्यामागील कारणे पुढीलप्रमाणे...

न कुजलेल्या किंवा अर्धवट कुजलेल्या शेणखतांचा वापर.

रासायनिक खते व पाणी यांचा अतिरेकी वापर.

अधिक उत्पादन देणाऱ्या जातींचा वापर.

जमिनीची अधिक प्रमाणात मशागत.

Rabi Crops
Rabi Crop Management : रब्बी पिकांत संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापन महत्त्वाचे

एक पीक पद्धतीत द्विदल पिकांच्या अंतर्भावाचा अभाव.

हवामानातील बदल.

विविध कारणांमुळे वाढलेला परदेशी तणांचा प्रादुर्भाव.

तणामध्ये तणनाशकाविरोधात विकसित होत असलेली प्रतिकारक्षमता इ.

या सर्व बाबींचा विचार करून कार्यक्षम तण व्यवस्थापनासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी तणांचे सातत्याने परीक्षण आणि तंत्रज्ञानात वेळोवेळी बदल करावे लागणार आहेत. केवळ एकाच तण नियंत्रणाच्या पद्धतीवर अवलंबून राहण्यापेक्षा एकात्मिक तण व्यवस्थापनाच्या दिशेने प्रयत्न करावे लागतील.

पीक-तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी

पीक तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी म्हणजे पिकांच्या पेरणीपासूनचा शेत तणमुक्त ठेवणे आवश्यक असलेला कालावधी होय. या कालावधीत तण नियंत्रण न केल्यास उत्पादनात लक्षणीय घट येते. साधारणतः पीक वाढीच्या सुरुवातीचा १/३ कालावधी तणमुक्त ठेवणे आवश्यक असते.

तणनियंत्रणाची एकात्मिक पद्धती

प्रतिबंधात्मक उपाय : तणांचा शेतामध्ये प्रादुर्भावच होणार नाही, या दृष्टीने काम करणे. तणांचे बियाणे येण्याच्या विविध मार्गांना अडथळा निर्माण करणे. उदा.

प्रमाणित बियाण्यांचा वापर करणे.

घरगुती बियाणेही तणविरहित असेल, याची खात्री करणे.

पेरणीपूर्वी शेतातील तणे नष्ट करणे.

पूर्ण कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खते वापरणे.

जमिनीची पूर्वमशागत योग्य रीतीने करणे.

शेताचे बांध, पाण्याच्या चारी किंवा पाट, शेतातील रस्ते तण विरहित ठेवणे इ.

Rabi Crops
Rabi Crop Management : नियोजन रब्बी हंगामातील पिकांचे...

निवारणात्मक उपाय

तणांचा प्रादुर्भाव शेतामध्ये झाल्यानंतर तणांची तीव्रता कमी करण्यासाठी वापरावयाच्या सर्व पद्धती या प्रकारात मोडतात. यामध्ये प्रामुख्याने भौतिक, मशागत व यांत्रिक पद्धतीचा समावेश होतो.

उदा. हाताने तण उपटणे, कोळपणी, खुरपणी, खांदणी, मशागत, तणांची कापणी व छाटणी करणे, तण प्रभावी क्षेत्रात पाणी साठवणे, जाळणे अथवा आच्छादनाचा वापर करणे.

मशागतीय पद्धती : तणांच्या व्यवस्थापनासाठी तणांच्या तुलनेमध्ये स्पर्धात्मक जलद वाढणारी पिके घेणे, योग्य पीक पद्धतीचा व योग्य पेरणी पद्धतीचा अवलंब करणे, प्रति हेक्टरी पिकाची अवलंब करणे, पिकास खते व पाणी देण्याच्या सुधारित पद्धतीचा अवलंब करणे अशा पद्धतींचा अवलंब करता येतो. त्याला जैविक घटकांची जोड देता येते. तण व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींच्या वापरांचे अपेक्षित परिणाम हे वेगवेगळ्या कारणांवर अवलंबून असतात. त्यात प्रामुख्याने तणांचा प्रकार व त्याने व्यापलेले क्षेत्र, त्या भागातील हवामान परिस्थिती, त्या विभागाची सामाजिक व आर्थिक परिस्थिती, वापरलेल्या पद्धतीची कार्यक्षमता यांचा समावेश होतो.

रासायनिक पद्धती

पारंपरिकरीत्या मनुष्यबळांच्या साह्याने तणे काढणे या एकाच पद्धतीवर बहुतांश शेतकरी अवलंबून होते. मात्र कुटुंबाचा घटता आकार, मजुरांची अनुपलब्धता आणि वाढलेली मजुरी यामुळे तणांच्या नियंत्रणामध्ये अनेक अडचणी येत आहेत. आर्थिकदृष्ट्या परवडण्यापलीकडे चालले आहे.

अशा स्थितीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये तणनाशकांच्या वापरामध्ये वेगाने वाढ होत आहे. मात्र केवळ एकाच पद्धतीवर अवलंबून राहण्यापेक्षा एकात्मिक तण व्यवस्थापनावर भर देण्याची आवश्यकता आहे. तणनाशकांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाच्या तांत्रिक बाबी पुढील प्रमाणे...

लेबल क्लेमनुसार तणनाशकाची निवड व वापर करणे.

तणनाशकाचा शिफारशीत मात्रेइतकाच वापर करणे. त्यापेक्षा कमी अथवा अधिक वापर टाळणे.

तणनाशकाच्या प्रकारानुसार योग्य वेळी तणनाशकांची फवारणी करणे. उदा. प्रकारानुसार पिकाच्या पेरणीपूर्वी फवारणी करणे किंवा पेरणीनंतर, परंतु पीक व तण उगवण्यापूर्वी जमिनीवर तणनाशक फवारणे किंवा पीक व तणे उगवल्यानंतर तणनाशकाची तणावर फवारणी करणे इ.

तणनाशक फवारणी पद्धतीनुसार नोझलचा वापर करणे.

वरील तांत्रिक बाबीमधील थोडीशीही चूक केवळ तण व्यवस्थापनावरच परिणाम करते, असे नाही तर संपूर्ण पीकच धोक्यात येऊ शकते. जमिनीमध्ये अधिक काळ अंश शिल्लक राहिल्यास, त्याचे पुढील संवेदनशील पिकांवरही परिणाम होऊ शकतात. तणांच्या वापरासंदर्भात थोडीही शंका आल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

तणनाशक फवारताना घ्यावयाची काळजी

फवारणीसाठी शक्यतो स्वतंत्र पंप वापरावा.

तणनाशक फवारणीपूर्वी जमिनीत पुरेसा ओलावा आवश्यक.

फवारणी वारा शांत असताना करावी.

फवारणी पंपासाठी शिफारशीनुसार नोझलचा वापर करावा.

फवारणीसाठी लागणारे पाणी ठरविण्याकरिता फवारणी पंप कॅलिब्रेट (समायोजित) करून घ्यावा.

तणनाशके पाण्यात मिसळताना काठीचा वापर करावा. हाताने ढवळू नये.

तणनाशके फवारणीसाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा. गढूळ किंवा गाळ मिश्रित पाणी वापरू नये.

अपेक्षित ताण नियंत्रणाकरिता शिफारस तणनाशकाची मात्रा फवारणी क्षेत्रावर पडेल याची काळजी घ्यावी.

फवारणी करीत असताना तंबाखू सेवन अथना धूम्रपान करू नये. डोळे चोळणे टाळावे.

तणनाशक खरेदी करण्यापूर्वी संबंधित तणनाशकाचा फवारणी करावयाच्या पिकाकरिता लेबल क्लेम असल्याची खात्री करावी.

तणनाशक फवारणीसाठी वापरावयाचे नोझल्स

तणनाशकाच्या प्रकारानुसार फ्लॅट फॅन अथवा फ्लडजेट प्रकारातील नोझलचा वापर तणनाशक फवारणी करताना करावा. जमिनीवर फवारावयाच्या तणनाशकाकरिता शक्यतो फ्लॅटफेन नोझलचा वापर करावा व पीक उगवणीनंतर फवारावयाच्या तणनाशकाकरिता शक्यतो फ्लडजेट नोझलचा वापर करावा.

तणनाशक फवारणी करताना हॉलो कोन व सॉलिड कोन प्रकारातील नोझलचा वापर टाळावा. या प्रकारातील नोझलने तणनाशकाची एकसारखी फवारणी होत नाही, परिणामी अपेक्षित तण नियंत्रण मिळत नाही.

- संजय बाबासाहेब बडे, ७८८८२९७८५९

(सहायक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग, दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com