Sustainable Farming: बदलावर मात करण्याची संधी

Smart Agriculture: कुठलीही यशोगाथा फक्त वाचून, पाहून समजत नाही. त्यामध्ये प्रत्यक्ष उडी घेऊन ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करावयास हवा. शाश्‍वत शेतीकडे या दृष्टिकोनातून पहिले तरच वातावरण बदलावर मात करण्याची संधी प्राप्त होऊ शकते.
Agriculture
Agriculture Agrowon
Published on
Updated on

Climate Change Farming Strategies: एका कृषी विज्ञान कार्यशाळेतील व्याख्यानामध्ये मला एक प्रश्‍न विचारण्यात आला. ‘सर! सध्याच्या वातावरण  बदल आणि वाढत्या उष्णतामानाच्या समस्येमध्ये दिशाहिन झालेल्या शेती आणि शेतकऱ्यांसाठी तुमचा सकारात्मक संदेश, काय असेल?’ तेव्हा माझ्या ओठामधून दोनच शब्द बाहेर पडले, ‘शाश्‍वत शेती’. काय असावे याचे स्पष्टीकरण? शाश्‍वत शेती म्हणजे कसणाऱ्या जमिनीपासून शेतकरी कुटुंबास कायम स्वरूपी मिळणारे धान्य उत्पादन त्याच्या वाढत्या कौटुंबिक गरजांची पूर्ती करू शकेल, शेतीचा कस कायम ठेवेल आणि पर्यावरणही. निसर्गाच्या शेतीला जोडलेल्या विविध घटकांचे संवर्धन आणि संरक्षणही करेल.

माती, वृक्ष आणि भूगर्भामधील जल हे निसर्गामधील तीन मुख्य घटक हे शाश्‍वत शेतीला जोडलेले असतात. माती उपयुक्त जिवाणूंनी समृद्ध असेल तरच पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. अशी सुपीक जमीन पावसाने ताण दिला तरी भरपूर उत्पादन देते, मुसळधार पाऊस पडला तरी पिकासह वाहून जात नाही. शाश्‍वत शेतीमध्ये जमीन हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे, जो नेहमी कायम जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करावयास हवा. येथे सेंद्रिय खताचे महत्त्व अधोरेखित होते. गायरानात चरणाऱ्या गायी, शेळ्या, मेंढ्या यांच्या शेणाचे कुजलेले खत शाश्‍वत शेतीसाठी अतिशय उपयुक्त, त्याचबरोबर शेतामधील पालापाचोळा, पिकांचे अवशेष कुजवून पुन्हा त्याच शेतात खत म्हणून वापरणे योग्य ठरते.

वृक्ष हा शाश्‍वत शेतीचा दुसरा महत्त्वाचा घटक जो बांधावर सैनिकाप्रमाणे उभा राहून शेतीचे रक्षण तर करतोच, त्याचबरोबर पक्ष्यांना घर आणि संरक्षण देऊन पिकावरील कीड नियंत्रणामध्ये महत्त्वाचा ठरतो. बोर, आवळा, चिंच, आंबा, शेवगा, हादगा यांसारखे वृक्ष शाश्‍वत शेती समृद्ध करून दोन पैसे जास्त मिळवून देतातच, त्याचबरोबर कुटुंबाच्या अन्नसुरक्षेमध्ये सहभागी होतात. भूगर्भामधील जल हा शाश्‍वत शेतीचा कणा आहे. शेतकरी जेव्हा सेंद्रिय पद्धतीने बांधावरील स्थानिक वृक्ष जातींना बरोबर घेऊन शेती करतात, तेव्हा भूगर्भामधील पाणी सातत्याने वाढत असते, अशा शेतीतून पावसाचा एक थेंबही वाया जात नाही.

बांधावरील वृक्ष आणि शेतामधील सुपीक, जिवाणूंनी समृद्ध माती ही पाण्याचा प्रत्येक थेंब अमृताप्रमाणे स्वीकारते, जेवढे पाणी हवे तेवढेच आपल्याजवळ ठेवते आणि उरलेले सर्व भूगर्भास देते. विज्ञान सांगते, की कुठल्याही शाश्‍वत शेतीला जेमतेम ४० टक्के पाणी लागले आणि उरलेले ६० टक्के भूगर्भात जाते, जे पुन्हा विहिरीतून आपणास मिळते. आपण जेवढे निसर्गास परत करतो, त्याच्या दुपटीने निसर्ग ते दान आपणास देतो. पशुधन आणि पारंपरिक बियाणे महत्त्वाचा घटक आहे. शाश्‍वत शेतीसाठी पशुधन महत्त्वाचे आहे.

पिकांचे अवशेष, बांधावरची हिरवळ हे त्यांचे खाद्य. त्याचबरोबर खोल नांगरट करून तापलेल्या कडक उन्हामध्ये किडीचा नाश करणे हे सुद्धा त्यांचेच काम आणि या मोबदल्यात त्यांचे शेण, मूत्र खत रूपात शेती जास्त समृद्ध करते ते वेगळेच. सांभाळलेले गोधन शेतकरी कुटुंबास दूध देऊन मुलांचे संगोपन करते, हा सुद्धा फायदा. शाश्‍वत शेतीमध्ये खरीप, रब्बीच्या मुख्य पिकाबरोबरच अनेक पारंपारिक बियाणांचे संवर्धन आणि संरक्षण होत असते. शाश्‍वत शेतीमध्ये शेतकरी केव्हाही एक दोन पिकांवर अवलंबून नसतो, तो इतरही पिकांचे उत्पादन घेतो. सोबत फळबाग, भाजीपाला, दूध यांचेही उत्पादन सुरू असते. विहिरीस कायम पाणी असल्यामुळे उन्हाळ्यात काही नगदी पिके सुद्धा घेता येतात.

Agriculture
Sustainable Agriculture: पर्यावरणपूरक शेतीच शाश्‍वत शेतीचा आश्‍वासक स्रोत

या पद्धतीमध्ये शेतकरी ताणतणाव मुक्त असतो. पारंपरिक बियाण्यांचे संवर्धन करून वातावरण बदलास सहज सामोरे जाऊ शकतो, त्यास पाण्याची टंचाई कधीही भासत नाही, कारण त्याची शेती रासायनिक खतापासून मुक्त असते. कुटुंबास अन्नसुरक्षा याचबरोबर कर्जबाजारीपणाची कधीही वेळ येत नाही. निसर्ग जेवढे त्यास देतो, त्याच्या अनेक पटीत तो निसर्गास परत करत असतो. बांधावरचे वृक्ष, त्यावरील शेकडो पक्षी, विहिरीमधील वाढलेले पाणी, गोठ्यामधील पशुधन आणि बहरलेली शेती हे त्याचे खरे साक्षीदारच आहेत.

उत्तर भारतातील स्थिती

पंजाब, हरियाना, मध्य प्रदेशमधील अनेक शेतकरी हजारो क्विंटल गव्हाचे उत्पादन घेतात, पैशाने श्रीमंत होतात, पण अति रासायनिक खत वापरामुळे जमिनी मरणावस्थेत आहेत. भूजल ८०० फूट खोल गेले आहे, त्यात विषारी धातूंचे प्रमाण वाढत आहे. तसेच कर्करोगाचे प्रमाणही. फक्त शेकडो पोती गहू, तांदूळ, मका पिकला, म्हणजे ती शाश्‍वत शेती होते का? उत्तर नाही; कारण या कृषी उत्पादनात सुख-समाधान नाही, फक्त हव्यास आहे. अनियंत्रित रासायनिक खते आणि भूजल उपशावर आधारलेली सोयाबीन, कपाशी आणि ऊस शेती शाश्‍वत कशी असणार? हे उत्पादन घेणारे शेतकरी मातीमधील जैवविविधता संपवत आहेत, तसेच भूजलास पाताळात ढकलत आहेत. शेतकऱ्यांना या पिकातून चार पैसे जास्त मिळतात, पण उत्पादन हातात पडेपर्यंत मिळालेली विवंचना, ताणतणाव हजार पटीत असतो.

पंजाब, हरियानामधील अनेक शेतकऱ्यांची जमीन रासायनिक खतांमुळे नापीक होत आहे. अनेक शेतकऱ्यांना याचा पश्‍चात्ताप होऊन ते सेंद्रिय पद्धतीचा स्वीकार करून शाश्‍वत शेतीकडे वळत आहेत. शहीद भगतसिंग नगरमधील महिला शेतकऱ्याने रासायनिक शेतीचा त्याग करत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला. सेंद्रिय पद्धतीने भात, गव्हाचे उत्पादन रासायनिक शेतीपेक्षाही जास्त घेतले, सोबत भाजीपाला, फळे आणि दूध उत्पादन वेगळेच. गव्हामध्ये मक्याचे आंतरपीक घेऊन दुहेरी उत्पादन घेतले.

उत्तरपूर्व राज्यात अनेक शेतकरी शाश्‍वत पद्धतीने शेती करून पर्यावरण संरक्षण करत आहेत. मणिपूर, नागालॅण्डमध्ये शेकडो भाताच्या जाती आजही जिवंत आहेत, ते निसर्गास जोडून असलेल्या शेती पद्धतीमुळेच. आमच्या संस्थेने जव्हार भागात आदिवासींना नाचणी पिकाची आधुनिक पद्धतीने शेती शिकवून सेंद्रिय खतावर चार पट उत्पादन अधिक मिळवून दिले. आदिवासी बालके आणि स्त्रियांमधील कुपोषण निर्मूलनामध्ये त्यांच्या पारंपारिक नाचणी शेतीमधील हा बदल महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

Agriculture
Sustainable Agriculture : शाश्‍वत एकात्मिक शेतीकडे जावेच लागेल

पारंपारिक बियाण्यांमध्ये विशेषत: भातांच्या जातीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. या जातींची लागवड करून शेतकरी चांगले उत्पादन मिळवू शकतात. ओडिशा राज्यातील कलहांडी हा भाग आदिवासींच्या भूकबळींची दफनभूमी म्हणून ओळखला जात असे, येथील शेतकरी काळ्या भाताचे तुटपुंजे उत्पादन घेत असे. पद्मश्री प्राप्त कमला पुजारी या आदिवासी महिलेने डॉ. स्वामिनाथन यांच्या मदतीने या भागात आधुनिक तंत्रज्ञान आणून सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आदिवासी शेतकऱ्यांना कर्ज आणि भुकेच्या विळख्यामधून मुक्त केले. त्यांचे स्थलांतरच थांबवले तसेच त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी केले. आज या भागात प्रतिवर्षी काळ्या भाताचे उत्पादन वाढत आहे, तसेच मोठ्या प्रमाणावर निर्यात सुद्धा होत आहे.

देशातील परिस्थिती आणि संधी

आज भारतातील अल्पभूधारक शेतकरी संपूर्णपणे रासायनिक शेतीकडे खेचला गेला आहे. संकरित बियाणे आणि भूगर्भातील पाण्याचा उपसा या दोन बोथट आयुधासह तो वातावरण बदलाशी अयशस्वी लढा देत आहे. डोक्यावर कर्ज, पावसाचे थैमान, दलालांच्या चिमट्यात अडकलेला शेतकरी फक्त शाश्‍वत शेतीच्या माध्यमातून वाचवला जाऊ शकतो, फक्त शासनाचे त्याला पाठबळ हवे. पीक पद्धतीत बदल, पारंपारिक पीक लावणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, दोन रोपांमधील योग्य अंतर, जमिनीमधील जिवाणूंची जैवविविधता सांभाळत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून अल्पभूधारक शेतकरी त्यांच्या शेतीचे उत्पादन वाढवू शकतात. आपल्या देशावर वातावरण बदलाचे वादळ घोंघावत आहे, याचे चक्रीवादळात रू‌पांतर झाले, तर सर्व प्रथम अल्पभूधारक शेतकरी पालापाचोळ्याप्रमाणे गोल घिरट्या घेत त्यामध्ये नष्ट होणार आहेत.

कापूस, सोयाबीन या पिकांच्या फार मागे न लागता हे शेतकरी हळद, ओवा, बडीशेप, तीळ, उडीद, जवस, कारळा, सूर्यफूल, इसबगोल, खपली गहू, पिवळी ज्वारी, गोड मका, भाजीपाला, फळे यांची रसायन अवशेषमुक्त शेती करून उत्कृष्ट उत्पादन शहरी बाजारपेठेत विकू शकतात. या खरिपात आम्ही जव्हार भागामधील १०० शेतकऱ्यांना छत्तीसगडमधील दुर्मीळ भात बियाणे देणार आहोत. त्यांनी तयार केलेला तांदूळ उच्चदराने खरेदी करून मुंबईत विकणार आहोत, मधुमेहावर औषध असणारा हा तांदूळ हातोहात संपणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे ही जात शेतकऱ्यास २० गुंठ्यांमध्ये चार क्विंटल उत्पादन देईल.

एक क्विंटल हातसडीच्या तांदळास दहा हजार या दराने तो शेतकरी एका हंगामात सहजपणे ४०,००० रुपये उत्पादन मिळवू शकेल, अशी आम्हाला आशा वाटते. तेही कुठेही रासायनिक खत, कीडनाशक न वापरता, यालाच शाश्‍वत शेती म्हणतात. प्रतिवर्षी एवढे उत्पादन मिळत असेल तर तो शेतकरी लागवड क्षेत्र वाढवून आर्थिकदृष्ट्या सहज स्वावलंबी होवू शकतो.

अल्पभूधारक शेतकरी महत्त्वाचा

शाश्‍वत शेतीच्या नवीन संकल्पनेमध्ये जिवामृत तसेच इतर जैविक खतांचा समावेश जरूर असावा. ड्रोन तंत्रज्ञान हे अल्पप्रमाणात पानाद्वारे नत्र देण्यासाठी योग्य आहे, कारण यामुळे जमिनीमधील जैवविविधतेस फारसा धक्का बसत नाही. पिकांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता असेल तर ती ओळखून त्याची पूर्तता करण्यास हे तंत्रज्ञान वापरावे. पारंपरिक बियाणे पेरणी किंवा रोवणीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरावे. आंतरपिकास प्राधान्य द्यावे, पाण्याचा वापर कमी करून जमिनीत ४० टक्के आर्द्रता राहील याची काळजी घेतल्यास शेती शाश्‍वत होते. काही पारंपरिक बियाण्यात आवश्यक ते जनुकीय बदल करून आपण पिकाच्या गुणधर्मात फारसा बदला न करता कृषी उत्पादन सहज वाढवू शकतो.

सध्याची वातावरण बदलाची स्थिती, वाढते उष्ण तापमान, मुसळधार पाऊस या सर्वांची निरगाठ रासायनिक शेतीबरोबर जोडलेली आहे. ही निसर्ग संकटे कमी करावयास हवी असल्यास सर्व प्रथम अल्पभूधारक शेतकऱ्यांना शासनाच्या प्रोत्साहनातून शाश्‍वत शेतीकडे वळविणे गरजेचे आहे. हे शेतकरी रासायनिक शेतीला बाजूस करून लहान क्षेत्रातही बहुपीक शेती करू शकतात, काही जण सेंद्रिय भाजीपाला, फळभाज्या, हरितगृह शेती, वृक्ष लागवड, फळबाग, फुलशेती, औषधी वनस्पतींची शेती करू शकतात, मात्र त्यांना या प्रवाहात घेण्याआधी शासनाने अथवा कृषी विक्री संस्थेने त्यांना खरेदीची हमी द्यावयास हवी.

Agriculture
Sustainable Agriculture : शाश्‍वत एकात्मिक शेतीकडे जावेच लागेल

शाश्‍वत शेती संकल्पना समजून ती अमलात आणण्यापूर्वी आजच्या परिस्थितीत याची गरज का आहे, हे समजणे आवश्यक आहे. पूर्वी ग्रामीण भागात पर्यावरण सुदृढ होते कारण तेथे वृक्ष संख्या अमाप होती, विहिरी पाण्याने भरलेल्या होत्या, गावाबाहेर वाहती नदी होती. प्रत्येक शेतकरी खरीप, रब्बीला मिळून १५ ते २० पिकांची शेती करत होता. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्व पीक बैलगाडीतून घरी येत असे.

आरोग्याचा गंभीर प्रश्‍न

हरितक्रांतीमुळे देशात रासायनिक खतांचा प्रवेश झाला. उत्पादन वाढले आणि सोबत शेतकऱ्यांचा हव्यास ही, म्हणूनच आम्ही आमच्या पारंपरिक शेतीला विसरलोय. त्याचाच परिणाम म्हणून नद्या आटल्या, जंगल कमी झाले. बांधावरचे वृक्ष हरवले मात्र ‘बोर’चे प्रमाण प्रचंड वाढले. शेतकऱ्यास पशुधन ओझे वाटू लागले, हीच ती वातावरण बदलाची स्थिती. पर्यावरण ढासळण्याची सुरवात, ज्याचा परिणाम रोगराई वाढण्यात झाला. गावात पूर्वी कुठेतरी एखादा वैद्य असे, आता गल्लीबोळात डॉक्टर आहेत, हे कशाचे दर्शक? पूर्वी आम्हास घरचे जेवण, शेतातील ताजी भाजी, हाताने फोडलेला कांदा, शिळी भाकरी, चटणी प्रिय होती. आज हे कुणाला तरी आवडते का? पूर्वीची पारंपरिक बहूपीक शेतीतून आम्हास खऱ्या अर्थाने संपूर्ण आरोग्य आणि सुदृढ शरीर मिळत होते. आज तसे आहे काय?

आज आपल्या देशाचा आरोग्यावर होणारा खर्च तब्बल दहा लाख कोटी आहे, जो दरडोई ६,५०० रुपयांच्या वर आहे. हे धक्कादायक आहे. आपण कोणते अन्न घेतो यावर आरोग्य अवलंबून असते. आरोग्याचा सर्वांत जास्त भार अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजुरांवर पडत आहे, यांना यातून सुदृढ अवस्थेत बाहेर काढावयाचे असेल तर शाश्‍वत शेती आणि त्यामधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाकडे वळवून फक्त कृषी उत्पादन न वाढवता या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त रोजगाराची संधी उपलब्ध व्हावयास हवी. शाश्‍वत शेतीमध्ये फक्त कृषी उत्पादनास महत्त्व न देता पशुसंवर्धनासही स्वीकारावयास हवे. पशुधन जमिनीला सुपीक करते, म्हणूनच तर शेती फायद्याची ठरते. विकतचे शेणखत घालून शेतकरी कसा श्रीमंत होणार?

हवामान बद‌लाच्या प्रभावामधून शेतीला वाचवावयाचे असेल, जनता जनार्दनास आरोग्यदायी अन्न सुरक्षा द्यावयाची असेल तर टप्याटप्याने आपण अत्याधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध असलेली शाश्‍वत शेती स्वीकारावयास हवी, यामध्ये अल्पभूधारकांना शासनाच्या पाठबळावर प्राधान्य द्यावे.

चीन देशाने बदलेले धोरण

रासायनिक शेतीला कंटाळून गेलेल्या तब्बल २५० दशलक्ष शेतकऱ्यांना चीनमधील कृषी विभागाने शाश्‍वत शेतीची दिशा दाखवली आहे. शेतकऱ्यांना बहूपीक योजनेचे महत्त्व आणि त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान शिकवून रासायनिक खतांच्या तुलनेत अनेक पटीत उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित केले. शेतीला नवी दिशा देऊन ग्रामीण भागास समृद्ध केले. या कृषी प्रयोगास जागतिक अन्न व कृषी संघटना आणि जागतिक बँकेने मोलाचे सहकार्य केले. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत १/५ लोकसंख्या आणि त्याच तुलनेत जेमतेम ७ टक्के कृषिक्षेत्र असलेल्या या देशात पाण्याची तीव्र टंचाई पाहून तेथील शासनाने राबवलेल्या शाश्‍वत शेतीच्या प्रयोगामुळे मागील तीन दशकात तब्बल ७०० दशलक्ष लोक गरिबीमधून बाहेर पडले.

यामुळे रासायनिक खते आणि कीडनाशकावर होणारा मोठा खर्च वाचला. जागतिक बँकेचा अहवाल सांगतो, की चीन देशाने निवडलेल्या २५० दशलक्ष अत्यभूधारक गरीब शेतकऱ्यांमध्ये १५० दशलक्ष शेतकरी कुपोषित होते. त्यांची शेती रासायनिक खतामुळे नापीक झाली होती, शेतात आक्रमक वनस्पती वाढल्या होत्या. या सर्व शेतकऱ्यांना तेथील शासनाने आधुनिक तंत्रज्ञानासह शाश्‍वत शेती उपक्रमास जोडले. अन्नसुरक्षेच्याबरोबरीने आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी केले. २०३५ पर्यंत देशातील सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांना शाश्‍वत शेतीच्या प्रवाहात आणण्याचे ध्येय देशापुढे आहे. असाच प्रयोग आपल्याकडे का होऊ नये?

- डॉ. नागेश टेकाळे, ९८६९६१२५३१

(लेखक शाश्‍वत शेतीचे संशोधक आणि अभ्यासक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com