
Pune News: महाराष्ट्रातील कृषी सुविधा बळकट करून निर्यात वाढवण्यासाठी राज्य सरकारने २,१०० कोटी रुपये खर्चाच्या ‘मॅग्नेट २.०’ या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यास मान्यता दिली आहे. २०२५-२६ राज्य अर्थसंकल्पात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पाची घोषणा केली. त्यानंतर अलिकडेच राज्यविधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे पणनमंत्री आणि मॅग्नेट प्रकल्पाचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी या प्रकल्पाचा पुनविचार करत घोषणा केली. राज्य सरकारने मंगळवारी (ता.२२) ‘मॅग्नेट २.०’ प्रकल्पाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस चालना मिळेल असा सरकारचा दावा आहे.
२०२५ ते २०३१ या कालावधीत ‘मॅग्नेट २.०’ प्रकल्प राबवला जाणार आहे. या प्रकल्पाचा उद्देश फळांची निर्यात वाढवणे, कृषी व्यवसायात सुधारणा करणे, पायाभूत सुविधा उभारणे आणि आर्थिक मदत वाढवणे असा आहे. या प्रकल्पामुळे फळबाग पिकांचे मूल्यवर्धन होईल, साठवण क्षमताही वाढेल आणि खासगी गुंतवणुकीला चालना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.
‘मॅग्नेट’ प्रकल्पाचा पहिला टप्पा सप्टेंबर २०२० मध्ये सुरू झाला. सहा वर्षांचा २०२०–२०२६ असलेल्या या टप्प्यासाठी एकूण १,००० कोटी रुपये खर्च निश्चित करण्यात आला होता. यामध्ये आशियायी विकास बँकेकडून ७० टक्के (७०० कोटी रुपये) कर्ज मिळाले, तर उर्वरित ३०० कोटी रुपये राज्य शासनाने उपलब्ध करून दिले.
आता दुसऱ्या टप्प्यासाठी सुमारे २,१०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प २०२५ ते २०३१ या कालावधीत राबवण्यात येणार असून, राज्य शासन आणि आशियायी विकास बँक यांच्या संयुक्त सहकार्याने त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
कोणत्या पिकांचा समावेश?
पहिल्या टप्प्यात डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, सीताफळ, पेरू, चिकू, स्ट्रॉबेरी, भेंडी, मिरची अशा १५ फळ व फुलपिकांचा समावेश करण्यात आला होता. ‘मॅग्नेट २.०’ मध्ये आता द्राक्षे, पपई, हळद, अंजीर, शेवगा, टोमॅटो, आले आणि फणस ही आठ नवीन पिके समाविष्ट करण्यात आली आहेत.
‘मॅग्नेट २.०’ प्रकल्पाची मुख्य उद्दिष्टे
फळे आणि फळभाज्यांच्या काढणीनंतर होणारे नुकसान कमी करणे.
साठवण क्षमतेत वाढ करणे.
मूल्यवर्धनास प्रोत्साहन देणे.
खासगी गुंतवणुकीस चालना देणे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.