
Valpapadi Crop Management:
शेतकरी नियोजन । वालपापडी
शेतकरी : संतोष वामन आव्हाड
गाव : चापडगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक
वालपापडी लागवड : ४ एकर
नाशिक जिल्ह्यातील चापडगाव (ता.सिन्नर) येथील संतोष वामन आव्हाड हे मागील १५ वर्षांपासून दरवर्षी उन्हाळी हंगामात वालपापडी लागवड करत आहेत. घरगुती बीजोत्पादन घेऊन लागवड, सेंद्रिय खते आणि जैविक निविष्ठांच्या वापरावर भर देत दर्जेदार उत्पादनात त्यांनी सातत्य राखले आहे. रासायनिक खतांवरील खर्च कमी करण्यासाठी शेणखत व कुक्कुटखताचा वापर, जैविक निविष्ठांच्या फवारण्या घेतल्या जातात. लागवडीसाठी सुधारित तंत्राचा अवलंब केल्याने उत्पादन खर्च मर्यादित ठेवण्यासह उत्पादकता व गुणवत्ता वाढीत यश मिळाल्याचे संतोष आव्हाड सांगतात.
लागवड नियोजन
दरवर्षी २० ते २५ मार्चदरम्यान लागवडीला सुरुवात होते. पूर्वतयारी म्हणून सुरुवातीला जमिनीची खोल नांगरणी करून नंतर शेणखत ५ ते ६ ट्रॉली व कुक्कुटखत २ ते ३ ट्रॉली प्रमाणे शेतात पसरले जाते. त्यानंतर रोटाव्हेटर मारून जमीन भुसभुशीत करून खत मातीआड केले जाते. पुढे जमीन सपाट करून भरखते म्हणून निंबोळी पेंड व सिंगल सुपर फॉस्फेट आणि ८:२१:२१ ग्रेडच्या खताची मात्रा फोकून दिली जाते.
लागवडीसाठी ३ फुटांचे बेड तयार केले जातात. दोन बेडमध्ये साधारण ४.५ फूट अंतर राखले जाते. बेडवर २५ मायक्रॉन जाडीचा पांढरा मल्चिंग पेपर अंथरून घेतला जातो. तत्पूर्वी इनलाईन पद्धतीने ठिबक सिंचनचा वापर केला जातो.
सर्व पूर्वतयारी झाल्यानंतर ठिबक संच चालू करून चांगले ओलित केले जातो.
त्यानंतर झिगझॅग पद्धतीने मल्चिंग पेपरवर छिद्र पाडून त्यात एक फूट अंतरावर बियाणांची टोकण केली जाते.
लागवडीनंतरचे नियोजन
लागवड झाल्यानंतर प्रत्येक सरीमध्ये बांबू रोवून तारेच्या साहाय्याने रोवणी केली जाते. बियाणे टोकण केल्यानंतर १५ ते २१ दिवसांची लहान वेली सुतळीच्या साह्याने तारेला बांधून घेतली जातात. जेणेकरून वादळी वाऱ्यामुळे ताटी पडू नये. ताटीचा आधार दिल्यामुळे वेलींची वाढ व उत्पादन चांगले मिळण्यास मदत होते.
वेली ताटीवर पोचेपर्यंत ५० ते ६० दिवसांचा कालावधी जातो. दरम्यानच्या काळात फुलोरा येण्यासाठी बगल फुटवे काढले जातात. वेलीला आलेले फुटवे काढून वेली सुतळीच्या साह्याने वरील दिशेने चढविली जातात. या पद्धतीने नियोजन केल्यामुळे वेलींना भरपूर सूर्यप्रकाश, हवा मिळण्यास मदत होते. त्यामुळे शेंगांना एकसारखा रंग येतो. तसेच लागवडीमध्ये खुरपणी, कीडनाशक फवारणी आणि शेंगांची तोडणी ही कामे करणे सोपे होते.
पीक फुलोऱ्यात आल्यानंतर वेलींची पाण्याची गरज वाढते. त्यानुसार वाफसा स्थिती तपासून उन्हाळ्यात ३ ते ४ सिंचन वेळा सिंचन केले जाते. पावसाळ्यात पावसाचा अंदाज घेऊन सिंचन करण्यावर भर दिला जातो.
कीड-रोग व्यवस्थापन महत्त्वाचे
वालपापडी पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर जाणवतो. यासह सूत्रकृमींचा प्रादुर्भाव झाल्यानंतर मुळाजवळ गाठी तयार होऊन वेली पिवळ्या पडतात. त्यामुळे जमिनीतील हानिकारक बुरशी व सूत्रकृमी नियंत्रणासाठी जैविक निविष्ठांचा वापर करण्यावर भर दिला जातो.
फुलोरा व शेंगामध्ये अळीचा प्रादुर्भाव आढळून येतो. प्रादुर्भाव वेळेत नियंत्रित करण्यासाठी गरजेनुसार जैविक निविष्ठांचा वापर केला जातो. प्रादुर्भाव जास्त वाढल्यास गरजेनुसार रासायनिक फवारण्या घेतल्या जातात.
जमिनीतील बुरशीचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी ट्रायकोडर्माचा वापर केला जातो.
उन्हाळ्यात लागवड केल्यानंतर प्रामुख्याने पावसाळ्याच्या दिवसात शेंगा तोडणीस येतात. त्यामुळे कीड-रोग नियंत्रण हा महत्त्वाचा मुद्दा असतो. पावसाळ्याच्या दिवसांत पिकात तणांचा प्रादुर्भावही वाढतो. त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव देखील वाढतो. त्यासाठी शेत तणविरहित ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार निंदणी आणि तणनाशक फवारणी केली जाते.
काढणी नियोजन
लागवडीनंतर साधारणपणे ७० ते ७५ दिवसांनी शेंगाचे तोडे सुरू होतात. लागवडीनंतर शेंगांची काढणी सुरू झाल्यानंतर चार बहर येतात. एका बहरात तीन ते चार तोडे होतात.
तोडलेल्या शेंगा साधारणपणे १५ किलो आणि ३० किलोच्या पिशव्यांमध्ये भरून बाजारात विक्रीसाठी पाठविल्या जातात. शेंगांना एकसारखा रंग आणि आकार असल्याने चांगले दर मिळण्यास मदत होते. त्यासाठी हाताळणी आणि प्रतवारीवर भर दिला जातो.
पहिल्या बहरातील उत्पादन २ जूनपासून मिळण्यास सुरुवात झाली. साडेसात टन उत्पादन एका बहरातून मिळाले आहे. पुढील काळात अजून दोन बहार होतील. त्यातून दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील. असे संतोष आव्हाड यांनी सांगितले.
अन्नद्रव्य व्यवस्थापन
वेलीच्या मुळ्या कार्यक्षम होण्यासाठी ह्युमिक ॲसिड व ट्रायकोडर्मा यांच्या वापरावर भर दिला जातो. उगवण झाल्यानंतर साधारण ४ ते ५ दिवसांत टप्प्याटप्प्याने खतांचे नियोजन केले जाते.
पहिली तोडणी झाल्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केली जाते. त्यात लोह, जस्त आणि बोरॉन यांचे प्रमाण अधिक ठेवले जाते.
सुरुवातीच्या टप्प्यात १९:१९:० आणि २०:२०:० या ग्रेडची विद्राव्य खते दीड महिन्यात तीन वेळेस दिली जातात.
फुलोरा अवस्थेत दर आठ दिवसांनी रासायनिक खतांचे नियोजन केले जाते. तर ताटी पूर्ण भरल्यानंतर शेंगा फुगवणीसाठी १३:४०:१३, ०:३७:३७, ०:५२:३४ या खतांचा आलटून-पालटून वापर केला जातो.
- संतोष आव्हाड, ९०११५४७८२२
(शब्दांकन : मुकुंद पिंगळे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.