Multilayer Cropping: नियोजन बहुस्तरीय पीकरचनेचे...

Crop Productivity: एकाच जागी अनेक वनस्पती वेगवेगळ्या उंचीवर, वेगवेगळ्या वयाच्या वाढत असतात. हे पीकरचनेत आणून एकत्र बहुस्तरीय पीकरचना करणे महत्त्वाचे आहे. जागा, पाणी, मनुष्यबळ, वेळ, मृदा व जलसंधारण, कमीत कमी मशागत, जास्तीत जास्त उत्पादकता या पद्धतीमुळे घेता येणे शक्य आहे.
Agriculture Method
Agriculture MethodAgrowon
Published on
Updated on

राजेंद्र भट

Sustainable Agriculture: जागतिक स्तरावर प्रचंड वेगाने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. यास तोंड द्यायचे असेल तर शेती आणि जीवनशैलीत मोठे बदल करावे लागतील. हवामान, परिसंस्थेची गुणवत्ता आणि सातत्य टिकवणे हे महत्त्वाचे काम आपल्याला करावे लागेल. आपले संपूर्ण जीवन पृथ्वीच्या आरोग्यावर अवलंबून आहे. त्यात शाश्‍वतता आल्यावर सर्व सजीवांचे आयुष्य आनंदी, निरोगी, समाधानी होईल. आपल्याला शेती परिवर्तन करायचे आहे. त्यात शाश्‍वतता आणायची आहे. यासाठी विचार आणि कृतीत बदल करावे लागतील. यातून इकॉनॉमी, इकॉलॉजी आणि इमोशन या तीन उद्दिष्टांची पूर्तता होऊ शकेल. यासाठी शेतीमधील पीकरचनेमध्ये बदलणे आवश्यक आहे.

कमीत कमी मशागत : गांडूळ, दिसणारे सजीव आणि न दिसणारे जिवाणू, बुरशीच्या उत्तम वाढीसाठी कमीत कमी मशागत करावी.

उंच गादीवाफा : एकाच वेळी वाफसा, जलसंधारण होणे गरजेचे आहे. उंच आणि रुंद गादीवाफ्यावर लागवड केल्यास पीक उत्तम वाढते. हळद, आले हरभरा आदी पिके चांगली वाढतात.

बहुस्तरीय बहुपीक पद्धती : मिश्रपीक, आंतरपीक पद्धतींचा अवलंब वाढवला तर मृदा, जलसंधारण आणि वातावरण बदलास तोंड देण्याची क्षमता तयार होते.

Agriculture Method
Agriculture Method : पाणी, मातीची उत्पादकता वाढविणारी ‘पाच स्तरीय शेती’

बहुस्तरीय पीक रचना

वातावरणातील बदलामुळे पिकांवर विपरीत परिणाम होतात. याला तोंड देण्याचे निसर्गात उदाहरण आहे. एकाच जागी अनेक वनस्पती वेगवेगळ्या उंचीवर, वेगवेगळ्या वयाच्या वाढत असतात. हे पीकरचनेत एकत्र आणून आपल्या विभागानुसार बहुस्तरीय पीकरचना तयार करावी. जागा, पाणी, मनुष्यबळ, वेळ, मृदा-जलसंधारण, कमीत कमी मशागत, जास्तीत जास्त उत्पादकता या पद्धतीमुळे घेता येणे शक्य आहे. आज हळद हे नगदी पीक म्हणून प्रसिद्ध आहे. गेल्या दहा वर्षांपासून एक पीक पद्धतीने लागवड न करता बहुस्तरीय रचना माझ्या शेतात राबवत आहे.

शेतात कायमस्वरूपी उंच गादीवाफे तयार करावेत. याचा आकार तीन फूट रुंद आणि गरजेप्रमाणे लांब ठेवावा. जमिनीवर कुजायला जड पिकांचे अवशेष, लाकूड, केळीची खोड असे घटक ३.५ फूट रुंद आणि शेताच्या लांबीच्या गरजेप्रमाणे रचावेत. यावर पालापाचोळा व शेणखत टाकावे.

हे वाफे करताना ३.५ फूट रुंद रचावेत. २.५ फूट रिकामी जागा सोडावी, परत ३.५ फूट रुंद वाफे रचावेत, परत २.५ फूट रुंद रिकामी जागा सोडावी अशी रचना करावी. हे झाल्यावर २.५ फूट मोकळ्या जागेतील माती ६ ते ९ इंच खोदून ती वाफ्यावर पसरावी. वरच्या थरात नंतर कडूनिंब पेंड आणि हाडांचा चुरा मिसळावा. रचलेले पीक अवशेष अधिक त्यावर पसरलेली माती यामुळे उंच वाफा तयार होतो. हा गादीवाफा काडीकचरा ४ ते ५ इंच आणि ६ इंच माती असा ८ ते १० इंच तयार होतो. मधली माती खोदल्यामुळे प्रत्यक्षात त्याची उंची १४ ते १५ इंच होते. पिकांची मुळी ९ इंचापर्यंत असते. यावर ठिबक किंवा सूक्ष्म तुषार सिंचन बसवावे. जास्तीच्या पाण्याचा निचरा होतो, वाफसा स्थिती कायम राहण्याची शक्यता होते.

Agriculture Method
Agriculture Intercropping Method : आंतरपीक पद्धतीवर द्या भर

या बेडवर अक्षय तृतीयेला आधी धने पेरून घ्यावेत. ते चांगले मातीत मिसळल्यावर हळदीचे कंद ठिबक लॅटरलच्या दोन्ही बाजूंस दोन ओळींत लावावेत. तीन फुटांत दोन ओळीत प्रत्येक कंदात १ फूट अंतर सोडावे. सिंचन सुरू करावे.

दुसरीकडे आपण मिरची आणि झेंडू रोपे करण्यास घ्यावी. संपूर्ण वाफ्याच्या लांबीत एका बाजूस मिरची व दुसऱ्या बाजूस झेंडू लागेल एवढी रोपे करावी.

साधारण ३० ते ४० दिवसांत कोथिंबीर काढणीस येते, तोपर्यंत हळद उगवून आलेली असते. कोथिंबीर काढल्यावर हळदीच्या दोन्ही बाजूंपैकी एका बाजूस मिरची आणि दुसऱ्या बाजूस झेंडू रोपांची लागवड करावी. त्याच वेळी ठिबकच्या लॅटरलजवळ म्हणजे वाफ्यामध्ये दर तीन फुटांवर १८० ते १२० दिवसांचे तुरीचे बी लावावे. म्हणजे आता बेडवर हळद, झेंडू, मिरची व तूर ही पिके असतात.

पहिल्या टप्यात कोथिंबीर काढून झालेली असते. कोथिंबीर काढताना तण नियंत्रण होते. ९० दिवसांत झेंडूचे पीक निघाले. झेंडूमुळे मातीतील सूत्रकृमीचे नियंत्रण होते. त्याचा फायदा मिरची पिकाला होतो. मिरची पाऊस काळात हिरवी असताना काढावी. पावसाळा संपल्यावर झाडावरच लाल होऊ द्यावी.लाल मिरची घरासाठी वापरावी. बाजार जवळ असल्यास हिरवी मिरची विक्री फायदेशीर ठरते.

ही पिके गादीवाफ्यावर आहेत. दोन वाफ्यामध्ये फिरण्यास २.५ फूट जागा आहे. यातून फिरून झेंडू व मिरची काढता येते. झेंडूमुळे मित्र कीटक येतात आणि बाकीच्या पिकांचे किडीपासून संरक्षण होते.

हळदीच्या स्रावामुळे मर रोगाच्या बुरशीचे नियंत्रण होते. तसेच तुरीच्या मरीचे पण नियंत्रण होते. तूर हळदीपेक्षा उंच जाऊन हळदीवर थोड्या प्रमाणात सावली करते. मधे उंच तूर, तिच्या दोन्ही बाजूंस हळद आणि हळदीच्या पेक्षा कमी उंच झेंडू व मिरचीचे पीक असते. यामुळे कोणत्याच पिकाला स्पर्धा होत नाही. दिवाळीनंतर झेंडू कापून काढावा. तेथे राजमा/ फरस बी लागवड करावी. हे ७० दिवसांचे पीक आहे. डिसेंबर- जानेवारीच्या सुमारास तूर तयार होते. ती कापून घ्यावी. गादीवाफ्यावर लावलेला राजमा, फरस बी ७० ते ८० दिवसांत संपते.

हळद जानेवारी- फेब्रुवारीत काढणीस येते. तेव्हा आधी मिरची रोपे उपटून घ्यावीत. त्याच्या फांद्या व थोडी मुळे कापून आपण ती लागवडीसाठी परत वापरू शकतो. हळद खोदून काढावी.

फेब्रुवारीपर्यंत फक्त हळदीऐवजी हळद + मिरची + झेंडू + तूर + राजमा + कोथिंबीर अशी एकूण ६ पिके मिळतात. ही लागवड एकमेकांना पूरक आहे. त्याच्या उंची व विस्ताराप्रमाणे एकमेकांशी प्रकाशाची स्पर्धा करत नाही.

तूर आणि राजमामुळे मातीत नत्राच्या गाठी राहतात. गादीवाफासारखा करून मार्चमध्ये त्यावर वैशाखी मूग लावावा. तो पावसाळ्याआधी ६० ते ७० दिवसांत तयार होतो.

या पद्धतीत धोके कमी होतात. मातीत वेगवेगळ्या पिकांच्या मुळांमुळे जिवाणू व बुरशी वेगवेगळ्या वाढतात. जमिनीत सहा प्रकारची पिके वेगवेगळी असतात. या लागवड पद्धतीमध्ये मूळ हळद पिकाचे उत्पादन १० ते २० टक्क्यांनी वाढते.

- राजेंद्र भट ९३२४६०१२७२

(लेखक ठाणे जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com