Silk Farming : रेशीम उद्योगाने वाचविली तोट्यातील शेती

Reshim Sheti : अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनविहीर (ता. शेवगाव) येथील अर्जुन रंगनाथ मडके यांची शेती काही वर्षांपूर्वी तोट्यात चालली होती. परंतु रेशीम उद्योगाचा त्यास आधार मिळाला.
Silk Farming
Silk Farming Agrowon
Published on
Updated on

Sericulture Success Story : अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनविहीर (ता. शेवगाव) येथील रंगनाथ विश्वनाथ मडके हे कृषी सहाय्यक पदावरून   सेवानिवृत्त झालेले शेतकरी आहेत. त्यांची वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. मुलगा अर्जुन आज शेतीची संपूर्ण जबाबदारी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सांभाळत आहेत. त्यांचे अभियांत्रिकी पदविकेपर्यंतचे शिक्षण झाले आहे. नोकरीच्या मागे न जाता त्यांनी २२ वर्षांपूर्वीच शेतीकडे लक्ष केंद्रित केले.

रेशीम शेतीला सुरुवात

शेवगाव तालुक्यातील काही भागांचा अपवाद वगळला तर पूर्वभागातील बोधेगाव, सोनविहीर यासह अनेक गावांतील बहुतांश भागांना पाणीटंचाईला सातत्याने सामोरे जावे लागते. पावसावरच उपलब्ध अल्प पाण्यावर अवलंबून असलेले शेतकरी कापूस, बाजरी, सोयाबीन, तूर, कांदा अशी पिके घेतात.

सोनविहीर परिसरात सुमारे १४ वर्षांपासून अनेक शेतकरी शेतीला पूरक म्हणून रेशीम उत्पादन घेतात. अर्जुन यांनीही त्यांच्याकडून प्रेरणा घेत पारंपरिक पिकांना रेशीम शेतीची जोड देण्याचे ठरवले. त्यासाठी २०१८ मध्ये एक एकरांवर तुतीची लागवड केली. सव्वा गुंठा क्षेत्रावर दोन लाखांपर्यंत खर्च करून रेशीम अळी संगोपन शेड उभारले. त्यासाठी कृषी विभागाकडून सव्वा लाख रुपयांचे अनुदान मिळाले.

Silk Farming
Reshim Sheti : रेशीमशेतीतून स्थैर्याकडे वाटचाल

रेशीम शेती विस्तार, व्यवस्थापन

पहिल्या वर्षीच रेशीम शेतीत चांगले यश मिळाले. मग उत्साह वाढून २०१९ मध्ये दीड एकरावर नव्याने तुतीची लागवड केली. आजमितीला एकूण अडीच एकरात तुती लागवड आहे. कृषी विभागाने प्रति एकर ३८ हजारांचे अनुदान दिले आहे. चार फुटी रुंद गादीवाफ्यावर दोन झाडांत एक फुटाचे अंतर ठेवून लागवड केली आहे.

तीस टक्के रासायनिक तर ७० टक्के सेंद्रिय पद्धतीने खत व्यवस्थापन तुतीसाठी होते. साधारण ६० दिवसाला तुती पाला तोडणीस येतो. जिल्हा रेशीम कार्यालयाकडून अंडीपुंजांचा पुरवठा होतो. प्रति बॅच दोनशे अंडीपुंजांची असते. सुरवातीच्या दोन अवस्थांपर्यंत स्वतंत्र खोलीत चॉकी अवस्थेतील कीटकांचे ट्रेमध्ये संगोपन होते.

त्यानंतरच्या तीन अवस्था शेडमध्ये पूर्ण केल्या जातात. साधारण १८व्या दिवशी अळी कोष तयार करण्यास सुरवात करते. चंद्रिका अंथरल्यानंतर चार दिवसांत किंवा बॅच्या २४ ते २५ व्या दिवशी कोष तयार होण्याच्या अवस्थेत येतात. तर २८ व्या दिवशी ते विक्रीसाठी सज्ज असतात.

उत्पादन, बाजारपेठ, अर्थकारण

साधारण २८ दिवसांची प्रति बॅच असते. त्यामध्ये दोनशे अंडीपुंजांपासून १६० ते १७० किलो उत्पादन मिळते. बॅच संपल्यानंतर पंधरा दिवस स्वच्छतेसाठी व निर्जंतुकीकरणासाठी शेड मोकळे ठेवले जाते. वर्षभरात सात ते आठ बॅंचेसमध्ये रेशीम उत्पादन घेण्यात येते.

कोषांची प्रामुख्याने बीड, जालना येथे विक्री होते. आतापर्यंत किलोला किमान ४५० रुपये तर त्यापुढे कमाल ९५० रुपयांपर्यंत दर २०२१ मध्ये मिळाला आहे. पूर्वी अनेक शेतकरी असल्याने एकावेळी सर्वांचा माल घेऊन बाजारपेठेत जाणे शक्य व्हायचे.

मात्र आता गावात दोनच रेशीम उत्पादक शेतकरी राहिल्याने बाजारपेठेत स्वतंत्र जाऊनच विक्री करावी लागत असल्याचे अर्जुन म्हणाले. प्रति बॅच २० हजार रुपये खर्च होतो. त्यातून ३० ते ४० टक्के खर्च तर उर्वरित नफा मिळतो.

जगण्याला शाश्‍वती दिली

अर्जुन सांगतात की रेशीम शेती सुरू करण्यापूर्वी पारंपरिक शेती करायचो. ती तोट्यात सुरू होती. परंतु सात वर्षांपासून सुरू असलेल्या रेशीम उद्योगाने आर्थिक शाश्‍वती मिळवून दिली आहे. सन २०२९ पासून शेतीचे अर्थकारण एकदाही नुकसानीत गेलेले नाही. रेशीम उद्योग सुरू केला त्यावेळी त्यातूनच फोर व्हीलर घेण्याचे स्वप्न पाहिले होते.

चिकाटी व जिद्दीतून हे स्वप्न पूर्ण केले. त्याचा आनंद आहे. शिवाय आयुष्य देखील समाधानी झाले आहे असे अर्जुन सांगतात. त्यांना शेतीत वडील रंगनाथ, आई सुशीला, भाऊ कृष्णा व पत्नी जयश्री यांची मोठी मदत मिळते. रेशीम उद्योगात गावातीलच अफसर बेग यांनाही भागीदार करून घेतले आहे.

Silk Farming
Reshim Sheti: गुणवत्तापूर्ण चॉकी निर्मितीसाठी निर्जंतुकीकरणावर भर

मोसंबी ठरली फायदेशीर

मडके कुटुंबाने रेशीम उद्योगासोबत शेतीचाही चांगला विकास केला आहे. एक एकरात पाच वर्षापूर्वी तर तीन वर्षांपूर्वी अर्ध्या एकरांत मोसंबीची लागवड केली. ऑगस्टच्या दरम्यान त्यांच्याकडील फळे विक्रीस येतात. या काळात फळांना मागणीही अधिक असते.

मोसंबीला प्रति किलो १८ रुपयांपासून ४० रुपयांपर्यंत दर मिळतो.विक्री जागेवर तसेच जालना, पाचोड बाजारात होते. पारंपरिक हंगामी पिकांच्या तुलनेत मोसंबी फळबाग लागवड फायदेशीर ठरल्याचा अर्जुन यांचा अनुभव आहे.

शेततळ्याचा मोठा आधार

तुतीची लागवड केल्यावर त्यापासून साधारण १५ वर्षांपर्यंत पाला मिळत राहतो. अर्जुन यांनी २०१८ मध्ये एक एकरांत तुती लागवड केली होती. त्याच वर्षी पुढे दुष्काळ पडला. उपलब्ध असलेल्या विहिरीला पुरेसे पाणी नव्हते. झाडे कशी जगवावी कशी असा प्रश्न कुटुंबाला पडला.

अशा संकटात जवळपासचे शेतकरी मदतीला धावले. त्यांच्याकडून थोडे थोडे पाणी घेत अर्जुन यांनी तुतीची झाडे वाचविली. सन २०१८ मध्ये अर्ध्या एकरांत तीन लाख रुपये खर्च करून कृषी विभागाच्या मदतीने एक कोटी लिटर क्षमतेचा शेततलाव उभारला आहे. त्यास एक लाख ३० हजारांचे अनुदान मिळाले आहे.

अडचणीच्या काळात शेततळ्यातील पाण्याआधारे फळबाग, तुतीची झाडे जगवणे व उन्हाळ्यात रेशीम उद्योग साधणे शक्य झाले आहे. विजेत व वेळेत आर्थिक बचत करण्यासाठी सौरपंप युनिटही उभारले आहे.

अर्जुन मडके ९९६०५४७५६७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com