Reshim Sheti Success Story : हंगामी पिकांपेक्षा रेशीम शेतीने दिले आर्थिक स्थैर्य

Silk Farming : वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे शेतीचे बिघडलेले अर्थकारण व एकूणच त्यातील जोखीम कमी करण्याच्या उद्देशाने शिंदे यांनी निवडलेला रेशीम शेतीचा पर्याय त्यांचे शेतीचे व घरचे अर्थकारण उंचावण्यास यशस्वी ठरला आहे.
Silk Farming
Silk Farming Agrowon
Published on
Updated on

Sericulture Story : नांदेड शहरापासून सुमारे ६५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मांजरम गावात (ता. नायगाव) भुजंग बापूराव शिंदे यांची १२ एकर शेती आहे. खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, तूर तर रब्बीत गहू, हरभरा अशी त्यांची हंगामी पीक पद्धती आहे. जवळच वन्यक्षेत्र आहे. त्यामुळे हरिण, वानर, रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांचा उच्छाद या भागातील शेतकऱ्यांना सहन करावा लागतो.

त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन उत्पन्नालाही जबर फटका बसतो. शिवाय शेतीतील जोखीमही अलीकडील काळात वाढली आहे. अशावेळी शेतीचे व घरचे अर्थकारण भक्कम करण्याच्या दृष्टीने शिंदे शेतीला पूरक आधार शोधण्याचा प्रयत्न करीत होते. अनेक पर्यायांच्या अभ्यासानंतर तुती लागवड फायद्याची राहील या निर्णयापर्यंत ते आले.

रेशीम शेतीचा श्रीगणेशा

बारा एकर जमिनीपैकी जंगलालगत असलेल्या दीड ते पावणेदोन एकरांमध्ये २०१८ मध्ये तुतीच्या व्ही-वन वाणाची लागवड केली. रोपांचा वापर केल्याने तुटीचे प्रमाण कमी राहिले. पहिली दोन वर्षे अनुभवी शेतकऱ्यांकडून माहिती घेत शिकण्यात गेली. सन २०१९ मध्ये वर्षभरात सहा बॅच घेण्यात शिंदे यशस्वी झाले. मात्र अद्याप हातखंडा तयार न झाल्याने एकूण साडेपाच क्विंटलपर्यंतच रेशीम कोषांचे उत्पादन हाती लागले. त्यातून साडेतीन लाखांपर्यंत उत्पन्न मिळाले. हळूहळू रेशीम शेतीतील बारकावे समजू लागले. तसतसे व्यवस्थापन सुधारू लागले. कौशल्य वाढू लागले.

Silk Farming
Reshim Sheti : रेशीमशेतीतून स्थैर्याकडे वाटचाल

व्यवस्थापनातील बाबी

आज शिंदे यांचा रेशीम शेतीतील सुमारे सात वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. या व्यवसायात त्यांनी चांगला जम देखील बसवला आहे. प्रारंभी ५० फूट लांब आणि वीस फूट रुंद आकाराचे कीटक संगोपन गृह उभारले होते. परंतु यात अधिक उत्पादन घेणे शक्य होईना. त्यामुळे त्याला लागून शेतातच उपलब्ध असलेल्या सागवानी लाकडाच्या साहाय्याने पन्नास बाय दहा फूट आकाराचा वाढावा दिला.

त्यामुळे कीटकसं गोपनगृहात अधिकचे रॅक उभारण्याची सुविधा झाली. संगोपनगृहाच्या स्वच्छतेला विशेष प्राधान्य दिले आहे. प्रत्येक बॅच आटोपल्यानंतर शेड निर्जंतुक केले जाते. नांदेड जिल्ह्यातील जैतापूर भागात चॉकी निर्मिती करणारे काही रेशीम व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडून चॉकी खरेदी केली जाते.

त्यामुळे बॅचचा कालावधी देखील कमी होतो. कोष तयार झाल्यानंतर पाच दिवसांनी वेचणी केली जाते. स्वच्छ करून कोण विक्रीसाठी तयार केले जातात. घरची जनावरे असल्यामुळे पुरेसे शेणखत उपलब्ध होते. यासोबत संतुलित रासायनिक खतांच्या मात्रेमुळे तुती पाल्याची गुणवत्ता चांगली ठेवणे शक्य होते. रेशीम कीटकांना सकाळी आठ वाजता व सायंकाळी पाच वाजता अशा दोन वेळेस तुतीचा पाला दिला जातो.

Silk Farming
Reshim Sheti : उसाला आधारभूत ठरतेय रेशीम शेती

उत्पादन, विक्री व अर्थकारण

वर्षभरात सहा ते सात बॅचेस घेण्यात येतात. प्रति १०० अंडीपुंजांमागे ७५ ते ८० किलो रेशीम कोष अशी उत्पादकता साध्य केली आहे. दीडशे अंडीपुंजांची बॅच असल्यास एक क्विंटल २० किलोपर्यंत तर दोनशे अंडीपुंजांची बॅच असल्यास दीड क्विंटलपर्यंत उत्पादन आजवर घेतले आहे. परिसरातील चार ते पाच गावांमधील सुमारे सात ते आठ रेशीम उत्पादकांचा गट तयार झाला आहे.

त्यामुळे सर्वांना आपले कोष बाजारपेठेत एकत्रितरीत्या घेऊन जाणे शक्य होते. त्यातून वाहतुकीवरील खर्चाचा भार कमी होतो.बीड, जालना व नांदेड जिल्ह्यातील पूर्णा येथे विक्री होत असल्याचे भुजंग सांगतात. अलीकडील वर्षांतील दरांबाबत सांगायचे तर प्रति किलो पाचशे रुपये, सहाशे ते साडेसहाशे रुपये यांच्या दरम्यानच दर राहिले आहेत. काही प्रसंगी ते ९०० रुपयांपर्यंतही मिळाले आहेत.

प्रति बॅच सुमारे साठहजार रुपयांच्या दरम्यान एकूण उत्पन्न मिळते. वर्षभरातील एकूण बॅचेसचा विचार केल्यास ५० टक्क्यांपर्यंत नफा मिळतो असे भुजंग सांगतात. वास्तविक दहा एकरांतील शेतीत उत्पन्न घेतले जाते.

मात्र दीड ते पावणेदोन एकर रेशीम शेतीतून मिळणारे उत्पन्न जवळपास त्याच्या बरोबरीने असते. पिकांना होणारा वन्यप्राण्यांचा त्रास,हवामान बदलामुळे उत्पादकतेत होत असलेली घट, असमाधानकारक दर आदी समस्या लक्षात घेतल्यास रेशीम शेतीतून मिळणारे उत्पन्न शाश्‍वत असल्याचे भुजंग सांगतात.

कुटुंबाची एकीच ठरली महत्त्वाची

रेशीम शेतीतील सर्व कामे कुटुंबातील सर्व सदस्य करतात. एकही मजूर या कामांसाठी ठेवलेला नाही. त्यामुळे त्यावरील खर्चातही मोठी बचत केली आहे. आई सुशीलाबाई, वडील बापूराव शिंदे व पत्नी दैवशाला शेतीसह रेशीम उत्पादनातही कष्ट उचलतात. त्यामुळेच वर्षभरात सात बॅचेस घेणे शक्य होत असल्याचे भुजंग सांगतात.

साधलेली प्रगती

रेशीम शेतीतून शिंदे कुटुंबाने आपला आर्थिक स्तर उंचावला आहे. त्यांना तीन मुले आहेत. पैकी मोठी मुलगी पूजा डी. फार्मसीला, दुसऱ्या क्रमांकाची आरती अकरावीला तर मुलगा गणपत आठवीमध्ये शिकतो आहे. या तिघांनाही उत्तम शिक्षण देणे शेतीमुळेच शक्य झाल्याचे समाधान कुटुंबाला आहे.

शिवाय शेतामध्ये पक्के घर उभारले आहे. साठवणुकीसाठी ४० बाय वीस फूट आकाराचे शेड बांधले आहे. शिवाय संपूर्ण शेतात पाईपलाईनची व्यवस्था तयार केली आहे. सिंचनासाठी एक विहीर आहे. त्याला चांगले पाणी असून त्यावर रेशीम शेती करणे शक्य होत आहे.

कुटुंबाची शेती मांजरम या गावापासून चार किलोमीटर अंतरावर तर मांजरवाडी वस्तीपासून एक किलोमीटर वर आहे. येथून शेताला पक्का रस्ता नसल्यामुळे पावसाळा व हिवाळ्यामध्ये शेतात जाण्या-येण्यासाठी तसेच मालवाहतुकीसाठी मोठी अडचण निर्माण होते. मात्र सर्व आव्हानांवर मात करून शेती व पूरक व्यवसायांमधून आर्थिक सक्षमता प्राप्त करण्यात शिंदे यांना यश मिळाले आहे.

भुजंग शिंदे ८३९०८१५४५७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com