Reshim Sheti: गुणवत्तापूर्ण चॉकी निर्मितीसाठी निर्जंतुकीकरणावर भर

Sericulture Business: परभणी जिल्ह्यातील श्रीधर सोलव यांनी तांत्रिक प्रशिक्षण, निर्जंतुकीकरण आणि काटेकोर व्यवस्थापन याच्या बळावर बाल्य रेशीम कीटक म्हणजेच चॉकी निर्मितीचा एक यशस्वी मॉडेल उभा केला आहे.
Sericulture Farming
Sericulture FarmingAgrowon
Published on
Updated on

Farmer Success Story:

शेतकरी नियोजन । रेशीम शेती

शेतकरी : श्रीधर हरिचंद्र सोलव

गाव : बरबडी, ता. पूर्णा, जि. परभणी

एकूण क्षेत्र : २२ एकर

तुती लागवड : ६ एकर

परभणी जिल्ह्यातील बरबडी (ता. पूर्णा) येथील श्रीधर सोलव मागील ११ वर्षांपासून मॉडेल चॉकी (बाल्य रेशीम कीटक) निर्मिती केंद्र चालवीत आहेत. गुणवत्तापूर्ण चॉकी निर्मितीत सातत्य राखल्यामुळे मराठवाडा, विदर्भातील रेशीम उत्पादकांकडून चॉकीला चांगली मागणी आहे.

सोलव यांनी २००९ मध्ये १ एकर क्षेत्रावर तुती लागवड करून रेशीम शेतीची सुरुवात केली. महिन्याला खात्रीशीर उत्पन्न मिळू लागल्यानंतर रेशीम शेतीचा विस्तार करण्याचे ठरविले. पुढे तुती लागवडीखाली क्षेत्रात वाढ करत १२ एकर पर्यंत विस्तार केला. मात्र अवर्षणाच्या स्थितीत तुती बागेस सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्यामुळे १२ एकरांपैकी ६ एकर तुती मोडून टाकली. सुरुवातीची ४ वर्षे रेशीम कोष उत्पादन घेतले. त्यावेळी १०० अंडीपुंजांच्या एका बॅचपासून ७० ते ७५ किलो रेशीम कोष उत्पादन मिळायचे. उत्पादित कोषाची विक्री बेंगलोर जवळील रामनगरम येथील बाजारपेठेत केली जात असे. मात्र सध्या पूर्णवेळ चॉकी निर्मिती केंद्र चालवीत आहेत.

Sericulture Farming
Sericulture Business: शेड निर्जंतुकीकरण, तुती बाग व्यवस्थापनावर भर

‘चॉकी रेअरिंग’साठी प्रशिक्षण

अलीकडील काही वर्षांत परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांतील शेतकरी रेशीम शेतीकडे वळले आहेत. त्यांच्याकडून चॉकीची मागणी वाढत आहे. परंतु या भागात चॉकी निर्मिती केंद्र नव्हते. हीच बाब ध्यानात घेऊन श्रीधर सोलव यांनी चॉकी रेअरिंग सेंटर उभारण्याचे ठरविले. त्यासाठी जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालय तसेच केंद्रीय रेशीम मंडळाच्या परभणी येथील कार्यालयातून बाल्य रेशीम कीटक (चॉकी रेअरिंग सेंटर) संगोपन व्यवसायाबाबत माहिती घेतली. त्यानंतर २०१३ मध्ये रेशीम कोष उत्पादन कमी करत मिनी चॉकी रेअरिंग सेंटर सुरु केले. हळूहळू चॉकीची मागणी वाढत गेली. त्यामुळे सेंटरची उत्पादनक्षमता वाढविणे गरजेचे होते. त्यादृष्टीने २०१७-१८ मध्ये श्रीधर यांनी कर्नाटकातील म्हैसूर येथील संस्थेत चॉकी निर्मिती बाबत प्रशिक्षण पूर्ण केले.

मॉडेल चॉकी सेंटरची सुरुवात

२०१८ मध्ये शेतामधील मोकळ्या जागेत सिमेंट विटांचे, आरसीसी छताच्या पक्क्या संगोपनगृहाची उभारणी करून त्या ठिकाणी मॉडेल चॉकी सेंटर सुरू केले. या सेंटरची एकावेळी ८ हजार ५०० अंडीपुंज उबविण्याची क्षमता आहे. येथून परभणी, नांदेड, लातूर, बीड, हिंगोली जिल्ह्यातील रेशीम कोष उत्पादकांना चॉकीचा पुरवठा केला जातो. तसेच विदर्भातील यवतमाळ, वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडूनही चॉकीला चांगली मागणी असते. या शेतकऱ्यांकडून १५ दिवस आधी चॉकीची आगाऊ मागणी नोंदविली जाते.

अंडीपुंजांचे हॅचिंग झाल्यानंतर दोन मोल्ट पास केलेल्या अवस्थेतील बाल्य कीटकांची सुरुवातीचे काही दिवस विशेष काळजी घ्यावी लागते. या अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण बॅच बाद होण्याचा शक्यता असते. त्यासाठी विशेष काळजी घेतली जाते. दर्जेदार रेशीम कोष उत्पादनासाठी चॉकी तसेच रोगमुक्त असणे आवश्यक असते. त्यादृष्टीने गुणवत्तापूर्ण चॉकी उत्पादनासाठी आवश्यक सर्व दक्षता घेतली जाते. दुसऱ्या अवस्थेतील मोल्ट नंतर १२ तासांच्या आत संबंधित शेतकऱ्यांपर्यंत चॉकी पोचविली जाते. एकाच दिवसात आगाऊ मागणीनुसार सर्व चॉकीची पोच दिली जाते. त्यानंतर पुढील बॅचचे नियोजन केले जाते.

Sericulture Farming
Sericulture Farming: काटेकोर व्यवस्थापनातून दर्जेदार चॉकी निर्मितीवर भर

तुती बागेचे व्यवस्थापन

तुती बागेत वर्षातून दोन वेळा एकरी दोन ट्रॉली प्रमाणे चांगले कुजलेले शेणखत दिले जाते. मे महिन्याच्या शेवटी पहिली मात्रा, तर दुसरी मात्रा सप्टेंबर महिन्यात दिली जाते. चॉकीची पोच झाल्यानंतर तुती बागेत खुरपणी करून बाग स्वच्छ केली जाते. त्यानंतर गरजेनुसार सिंचनाचे नियोजन केले जाते.

संगोपनगृह निर्जुंतकीकरणावर भर

रेशीम शेती व्यवसायात संगोपनगृहाची स्वच्छता, निर्जंतुकीकरण या बाबी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. चॉकीची पोच दिल्यानंतर संगोपनगृहाचे निर्जंतुकीकरण केले जाते. त्यासाठी फॉर्मेलिन, ब्लिचिंग पावडर तसेच अन्य शिफारशीत घटकांचा वापर करून संगोपनगृह तसेच ट्रे चे निर्जंतुकीकरण केले जाते. त्यानंतर साध्या पाण्याने पुन्हा धुऊन घेतले जाते. या कामांमध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची मदत मिळते, असे श्रीधर सोलव सांगतात.

नवीन बॅच नियोजन

नवीन बॅच नियोजनानुसार बेंगलोर येथून १६ जुलै रोजी ५ हजार अंडीपुंज आणले आहेत. त्याचे शुक्रवारी (ता.१७) हॅचिंग झाले आहे. रविवारी (ता.२०) १६ तासांचा पहिला मोल्ट बसला आहे.

मागील दोन दिवसांपासून त्यास फिडींग चालू आहे. गुरुवारी (ता.२४) दुसरा मोल्ट बसल्यानंतर मागणीनुसार शनिवारपासून (ता.२६) वाटप मागणी केलेल्या शेतकऱ्यांपर्यंत पोच देणे सुरू केले जाईल.

या बॅचसाठी नांदेड, लातूर, बीड जिल्ह्यांतून ५ हजार चॉकीची आगाऊ मागणी नोंदविण्यात आलेली आहे.

ऑगस्ट महिन्यात नवीन ४ हजार अंडीपुंजांचे बॅच घेण्याचे नियोजन आहे. तत्पूर्वी या बॅचमधील चॉकी गेल्यानंतर संगोपनगृहाचे निर्जंतुकीकरण केले जाईल.त्यानंतर नवीन बॅचसाठी आगाऊ मागणी घेण्यास सुरुवात केली जाईल.

पुढील १५ दिवसांत तुती बागेत आंतरमशागत, खतमात्रा देण्याची कामे केली जातील.

श्रीधर सोलव, ८००७४३७६१२

(शब्दांकन : माणिक रासवे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com