Women in Agri Business: प्रक्रिया उद्योगातून वाढल्या व्यावसायिक संधी

Agro Processing Revolution: नांदेड जिल्ह्यातील उपक्रमशील महिलांनी स्वयंसाह्यता महिला समूहाच्या माध्यमातून विविध पूरक उद्योगांतून आर्थिक प्रगतीला चालना दिली.
Agriculture Business
Agriculture BusinessAgrowon
Published on
Updated on

Rural Woment Empowerment: नांदेड जिल्ह्यातील पिंपळगाव (निमजी) येथील महानंदा देविदास डक यांनी गावातील बारा महिलांना एकत्र घेऊन २०२१ मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत (उमेद) शिवनेरी स्वयंसाह्यता महिला समूहाची नोंदणी केली. प्रति महिना शंभर रुपये याप्रमाणे महिला बचत करतात. या समूहाला ‘उमेद’कडून २०२२ मध्ये पंधरा हजार आणि २०२३ मध्ये पंधरा हजार असा फिरता निधी मिळाला.

शिवनेरी स्वयंसाह्यता महिला समूहाच्या अध्यक्ष म्हणून महानंदा देविदास डक, सचिव सविता भागवत डक काम पाहतात. सदस्यांमध्ये वंदना सदाशिव डक, ललिता पुंडलिक कल्याणकर, अंजना सखाराम डक, मुद्रिका बळवंत डक, वर्षा राजेश डक, मंगल पांडुरंग डक, चित्रा नरहरी डक, सावित्री जनार्दन डक, गीताई शिवाजी डक यांचा समावेश आहे. समूहातील महिलांनी बँकेचे अर्थसाहाय्य आणि गटाच्या बचतीतून दुग्ध व्यवसाय, शिलाई, पिठाची गिरणी, फुलशेती अशा विविध व्यवसायांची सुरुवात करून आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल केली आहे.

Agriculture Business
Mahua Processing Business : गोडवा मोहफुलांच्या लाडवांचा

दर्जेदार मसाला निर्मिती

महानंदा डक यांच्या दोन एकर शेतीमध्ये हळद, मिरची लागवड आहे. त्यांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन हळद पावडर, लाल मिरची पावडर, शेंगदाणा चटणी, जवस चटणी, लसूण- जिरा चटणी, तीळ चटणी, धने पावडर, काळा मसाला निर्मिती करून विक्रीस सुरुवात केली. गुणवत्तापूर्ण प्रक्रिया उत्पादनामुळे ग्राहकांची चांगली मागणी असते. गावरान मिरचीपासून बनवलेले लाल तिखट उच्च दर्जाचे असते. तिखट ३२० रुपये आणि हळद पावडर २५० रुपये प्रति किलो दराने विकली जाते. सध्या गाव परिसरातील प्रदर्शनामध्ये उत्पादनाची विक्री होत आहे. या माध्यमातून ग्राहक जोडले जात आहेत.

महानंदा डक दगडी फूल, कर्णफूल, लवंग, वेलदोडा, काळी मिरे, शहाजिरे, खसखस, धने पावडर, खोबरे, दालचिनी आदी गरम मसाल्याचे साहित्य योग्य प्रमाणात वापरून काळा मसाला तयार करतात. हा मसाला नऊशे रुपये प्रति किलो याप्रमाणे विक्री केला जातो. ग्राहकांच्या मागणीनुसार मसाल्याची निर्मिती केली जाते.

गटातर्फे कर्जाची परतफेड

शिवनेरी स्वयंसाह्यता महिला गटाला बँकेकडून २००२ मध्ये एक लाख रुपयांचे कर्ज मिळाले. यातून प्रत्येक महिलेस नऊ हजार रुपये वाटप करून ९०० प्रमाणे प्रति महिना या कर्जाची परतफेड करण्यात आली. यानंतर २०२३ मध्ये तीन लाख रुपये कर्ज मिळाले. प्रति महिला २५,००० प्रमाणे कर्जाचे वाटप करून २४०० प्रमाणे प्रति महिना महिलांनी परतफेड केली. २०२४ मध्ये साडेचार लाख रुपये कर्ज बँकेकडून मिळाले. प्रत्येक महिलांना ३७ हजार ५०० प्रमाणे कर्जाचे वाटप करून ३,४०० प्रमाणे प्रति महिना हप्ता भरून याही कर्जाची परतफेड केली आहे. या कर्जाच्या माध्यमातून मंगल डक, चित्रा डक, ललिता डक, वंदना डक यांनी पशुपालन सुरू केले आहे. महानंदा डक यांनी शिलाई मशिन, मसाला उद्योग तर वर्षा डक यांनी पिठाची गिरणी व्यवसाय सुरू केला आहे. या पूरक उद्योगातून गटाने आर्थिक प्रगती साधली आहे.

- महानंदा डक, ७०८३३८२१०२

Agriculture Business
Masala Business : शून्यातून उभारलेला शिवनेरी मसाले उद्योग

काकांडी (ता.जि. नांदेड) येथील शकुंतला नवनाथ जाधव यांनी घर खर्च भागवण्यासाठी माहेरकडून मिळालेल्या शिलाई यंत्रावर कपडे शिवण्यास सुरुवात केली. परंतु शिवणकामातून पुरेशी आर्थिक मिळकत होत नसल्याने अडचणीत तयार झाल्या. त्यांचे पती नवनाथ जाधव यांचे सलून दुकान आहे. परंतु कोरोना काळात दुकान बंद झाल्याने कर्ज झाले. यातून सावरत शकुंतलाताईंनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) माध्यमातून बचत गटाच्या फिरत्या निधीतून मिनी डाळ मिल सुरू केली.

२०१८ मध्ये काकांडी गावात भारतीय स्टेट बँकेच्या वतीने ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण आयोजित केले होते. यामध्ये त्या सहभागी झाल्या. यातून रोजगाराची नवी दिशा मिळाली.भारतीय स्टेट बँकेच्या वर्धिनी फेरीमुळे काकांडीमध्ये महिलांना स्वयंरोजगाराची प्रेरणा मिळाली. ‘उमेद’चे तालुका अभियान व्यवस्थापक धम्मदीप ढवळे, तालुका व्यवस्थापक (सामाजिक समावेशन) आश्‍लेषा कुलकर्णी यांच्या प्रेरणेतून शकुंतलाताईंनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामधून २०१८ मध्ये बारा महिलांना सोबत घेऊन खुशी महिला स्वयंसाह्यता समूहाची स्थापना केली.

समूहातील सदस्यांनी प्रत्येक महिन्याला शंभर रुपये बचत करण्यास सुरुवात केली. यातून त्यांनी स्वयंरोजगाराला सुरुवात केली. ‘उमेद’च्या माध्यमातून समुहाचे काम सुरू केल्यानंतर शकुंतलाताईंचे संभाषण कौशल्य तसेच कामातील तत्परता पाहून समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून निवड करण्यात आली. याअंतर्गत त्या विविध गावांतील पन्नास स्वयंसाह्यता समूहांना मार्गदर्शन करतात. या गटांना शासनाच्या विविध योजना, बँकांचे कर्ज, शासनाचे पाठबळ याबाबत त्या तांत्रिक माहिती देतात.

स्वयंरोजगाराला सुरवात

शकुंतला जाधव या पूर्वीपासूनच महिला बचत गटांना भोजन पुरवण्याचे काम करत होत्या. त्यांना २०२१ मध्ये भारतीय स्टेट बँकेच्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या (आरएसईटीआय) खाणावळीचे काम मिळाले आहे. प्रशिक्षणार्थ्यांना जेवणामध्ये भात, भाजी, वरण, पापड पोळी दिली जाते. खाणावळीचे काम मिळाल्यानंतर त्यातून घरखर्च, मुलांचे शिक्षण यासोबतच नऊ लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड केली. यासोबतच तीन लाखांची बचत केली. खाणावळीसाठी वर्षभर लागणारा गहू तसेच धान्य गावातील शेतकऱ्यांकडून घेतले जाते.

महिला स्वयंसाह्यता समूहाच्या बचतीतून शकुंतला जाधव यांनी पाच हजार रुपये कर्ज घेतले. यामध्ये स्वतःकडील पाच हजार रक्कम जमा करून त्यांनी चार वर्षांपूर्वी मिनी डाळ मिल विकत घेऊन प्रक्रिया उद्योगाला सुरुवात केली. डाळ मिलमधून तूर, हरभरा, मूग, उडीद डाळी तयार करून देऊ लागल्या. यासोबतच डाळीचे पीठ ही बनवून देण्याचा व्यवसाय सुरू केला. पाच किलो डाळ बनविण्यासाठी दहा रुपये मजुरी दर ठेवला. यासोबतच कडधान्य विकत घेऊन त्यापासून डाळ तयार करून विविध प्रदर्शनातून विक्री करतात. यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले आहे.

‘उमेद’कडून सन्मान

खुशी स्वयंसाह्यता समूहाला २०२१-२२ मध्ये तीन लाख रुपयाचे कर्ज मिळाले. यातून३० हजार रुपयांची मदत झाली. या कर्जाची परतफेड केली. ग्रामसंघामध्ये २२ स्वयंसाह्यता समूह आहेत. या समूहाला २०२२ मध्ये तीन लाख रुपयांचे कर्ज मिळाले. यातून प्रत्येक गटाला साठ हजार रुपयांचे कर्ज मिळाले. या साठ हजारांतील दहा हजार रुपये कर्ज घेऊन ते दरमहा पाचशे रुपये हप्त्याने फेडण्यात आले. समूहाने वेळेत कर्जाची परतफेड केल्यामुळे २०२३ मध्ये भारतीय स्टेट बँकेने सहा लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. यातून प्रत्येक महिलेने पन्नास हजार रुपये घेऊन भांडवल उभे केले. हे कर्ज सध्या फेडण्याचे काम चालू आहे. शकुंतला जाधव यांनी खुशी स्वयंसाह्यता महिला समूहाचे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवल्याबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाकडून तीन हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे.

- शकुंतला जाधव, ७४९८१५९११२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com