Masala Business : शून्यातून उभारलेला शिवनेरी मसाले उद्योग

Shivneri masale : पोल्ट्री व्यवसायाची साथ
Masala Business
Masala BusinessAgrowon
Published on
Updated on

गणेश कोरे

Spice Business of kabadi family : स्वाती कबाडी (रा. कबाडवाडी, जि. पुणे) यांनी शून्यातून सुरू केलेल्या संघर्षाला जिद्द व धाडसाने उद्यमशीलतेची जोड दिली. पोल्ट्री व्यवसाय सांभाळत मसाले, पुढे पौष्टिक लाडू, वाळवणीच्या पदार्थांची जोड, बळकट विक्री व्यवस्थेतून शिवनेरी मसाले उद्योग विस्तारला. उलाढाल वाढली. पदार्थ सातासमुद्रापार पोचले. अतीव कष्टातून सुंदर बंगलाही साकारला.

पुणे जिल्ह्यातील स्वाती आणि सोपान या कबाडी दांपत्याने शून्यातून उभे राहात पोल्ट्री, मसाले उद्योगातून आपली उल्लेखनीय प्रगती साधली आहे. दोघेही व्यवसायांमध्ये इतके व्यस्त आहेत की निवांत वेळ काढणेही त्यांना अनेकवेळा मुश्‍कील होते. स्वाती मूळच्या नारायणगावच्या. घरची परिस्थिती बेताची असल्याने शिक्षण पूर्ण करू शकल्या नाहीत. सन २००६ मध्ये लग्नानंतर जुन्नरजवळील कबाडवाडीच्या त्या सूनबाई झाल्या. कष्ट आणि उद्यमशीलतेची आवड जपण्यासह
संसाराला हातभार लावण्यासाठी आठवडे बाजार व किरकोळ बाजारात भाजीपाला विक्री व्यवसाय सुरू केला. पती सोपान ‘हार्डवेअर’च्या दुकानात कष्ट करायचे.

पोल्ट्रीतील संधी

एकदा भाजीपाला बाजारात कोंबडीची पिल्ले आली असता ती खरेदी करून स्वाती यांनी घरगुती कुक्कुटपालन सुरू केले. काही कारणाने मरतुक होऊन ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. पण हा व्यवसाय चांगल्या प्रकारे केला तर फायदा मिळवण्याची संधी असल्याचे जाणवले. मग पोल्ट्रीचे प्रशिक्षण घेत कावेरी जातीच्या पाचशे कोंबड्या आणून संगोपन सुरू केले. कधी नफा, कधी तोटा सहन करत व्यवसाय चिकाटीने सुरू ठेवला. आर्थिक घडी बसत असतानाच पतीचा अपघात झाला आणि भाजी व्यवसाय थांबवणे भाग पडले. मग पूर्णवेळ पोल्ट्रीवरच लक्ष केंद्रित करून व्यवसाय वाढविण्यास सुरवात केली. आज एकही कर्मचारी न ठेवता कबाडी दांपत्याने स्वतः राबत व्यवसाय सातहजार
ते आठहजार पक्षांच्या बॅचपर्यंत विस्तारला आहे. दररोज ५० ते १०० या प्रमाणात पक्षांची विक्री होते. व्यापारी जागेवर येऊन खरेदी करतात. व्यवसाय जिद्दीने सुरू ठेवल्याचा फायदा दांपत्याला कोरोना काळात मिळाला. त्या काळात कमाल २८० रुपये प्रति किलो दरांपर्यंत विक्री होऊन काही लाखांचे उत्पन्न मिळवले.

Masala Business
Cashew Processing: शून्यातून उभारलेला काजू प्रक्रिया उद्योग पोहोचला एक कोटीपर्यंत...

मसाला उद्योग

कोरोना काळात भाजीविक्रीला मात्र फटका बसला. तरीही पडेल त्या कष्टांची तयारी व जिद्द असलेल्या स्वाती यांनी कोरोना काळात यू ट्यूबद्वारे पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला. मसाला उद्योगात त्यांना संधी दिसली. पन्नास, १०० ग्रॅमपासून अधिक वजनाच्या पॅकिंगमधून मसाले बाजारासह घरोघरी विक्री करण्यास सुरवात केली. चवीनुसार मूल्यवृद्धी केली. कोल्हापूर येथे संस्थेकडून त्याचे प्रशिक्षण घेतले.
उद्योजकता अंगी भिनलेल्या स्वातींनी एकेक पाऊल टाकण्यास सुरवात केली. आठ लाखांची गुंतवणूक करून यंत्रे खरेदी तेली. शिवनेरी मसाले हा ब्रॅण्ड तयार केला. यंत्रांद्वारे व्यावसायिक पॅकिंग सुरू केले. विविध प्रदर्शनांमधून उत्पादनांचा प्रसार सुरू केला. त्यातून ग्राहक तयार केले.

Masala Business
Spice Manufacturing Industry : तीन उच्चशिक्षीत मित्रांनी सुरू केला मसाले निर्मिती उद्योग

परदेशापर्यंत मसाले

आज खडे ३० तर कुटलेले ३० ते ३५ प्रकारचे मसाले तयार होतात. बेसिक’ मसाले सहा- सात प्रकारचे आहेतच. घरगुती विक्रीतून ग्राहकांची ओळख, व्हॉटसॲप ग्रुपद्वारे केलेला प्रचार यातून मागणी वाढत व्यवसाय वृद्धी होत गेली. स्थानिकसह मुंबई, पुणे, नाशिक, नगर आदी शहरांत थेट ग्राहक तयार झाले असून कुरिअरद्वारेही मसाले पाठवले जातात. नारायणगाव, जुन्नर, पुणे. मुंबईत ‘रिटेलर्स’ आहेत. काहींचे नातेवाईक परदेशात असल्याने दुबई, ऑस्‍ट्रेलिया, अमेरिका, लंडनपर्यंत स्वाती यांचे मसाले पोचले आहेत.

पौष्टिक लाडू


ग्राहकांकडून मसाल्यांबरोबर डिंक, मेथी लाडू आदींचीही विचारणा सुरू झाली. एकातून दुसऱ्या व्यवसायाच्या संकल्पनेने जन्म घेतला. करून तर बघू या विचाराने यू ट्यूबवर पाककृती पाहून तीही निर्मिती सुरू झाली. आज मूग, नाचणी, दामटीचे, खजूर, जवस, खोबरे, ‘शुगर फ्री’ असे सुमारे १२ प्रकारचे लाडू स्वाती तयार करतात. शालेय पोषण आहार योजनेच्या माध्यमातून शाळांना व रुग्णालयांमध्येही ते पुरविले जातात.

रोजगार निर्मिती

व्यवसायातून स्थानिक १० महिलांना रोजगार दिल्याचे समाधान स्वाती यांना आहे. विविध उन्हाळी वाळवणाचे (कुरड्या, पापड, सांडगे आदी) पदार्थही तयार केले जातात. महिलांना साहित्य पुरवून तसे पदार्थ करवूनही घेतले जातात. आज एकूण पदार्थांची श्रेणी ८० ते ९० च्या संख्येपर्यंत पोचली
आहे. मसाले प्रति किलो सुमारे ६५० रुपये तर लाडूंची विक्री ६५० ते ७५० रुपये प्रति किलो दराने होते. घर परिसरात आऊटलेट किंवा शिवनेरी मसाला शोरूमचे उद्दिष्ट ठेऊन इमारत बांधणी सुरू झाली आहे. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत सात लाखांचा पुरवठा मिळाला आहे.

उद्योगातून प्रगती

आज पदार्थ विक्रीची उलाढाल महिन्याला तीन ते साडेतीन लाखांची असून पोल्ट्रीची स्वतंत्र उलाढाल आहे. स्वाती यांनी ३० ते ३५ ग्रामपंचायतीद्वारे उद्योजक प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले आहे. त्यांना सासू तसेच मुली भक्ती (१० वी) आणि दुर्वी (६ वी) यांचीही मोठी मदत होते. मोठ्या कष्टातून दोनच वर्षांपूर्वी कन्यारत्न नावाने बंगला उभारू शकलो याचे वेगळे समाधान असल्याचे हे दांपत्य अभिमानाने सांगते.

स्वाती कबाडी-९५०३६५११६५
(केवळ संदेश पाठवण्यासाठी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com