
Women Entrepreneur Success Story : रसिका आणि मंगेश हे दोघेही इलेक्ट्रॉनिक्स पदविकाधारक अभियंते. रसिका यांचे माहेर (परिंचे, ता. पुरंदर). महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर त्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत काम करत होत्या. रसिका यांच्या व्यवस्थापन कौशल्यामुळे कंपनीमध्ये त्यांच्या अंतर्गत तीस महिला कार्यरत होत्या.
नोकरीदरम्यान त्यांचे लग्न कुडजे (ता. हवेली) येथील मंगेश पायगुडे यांच्याशी लग्न झाले. या दरम्यान कोरोना आजाराचा प्रसार वाढल्याने कंपनीमधील नोकरी त्यांना सोडावी लागली. नोकरी सोडल्यानंतर टाळेबंदीच्या काळात करायचे काय, असा प्रश्न भेडसावत असताना २०२१ मध्ये त्यांनी मसाले निर्मितीचे विविध प्रयोग सुरू केले.
यासाठी यू-ट्यूबवर मसाले निर्मितीच्या पद्धती पाहून, घरातील मिक्सरवर चार प्रकारचे मसाले तयार केले. चव पाहण्यासाठी हे मसाले वापरून भाजी केली. घरातील सर्वांना या मसाल्याची चव आवडली. मग पाहुणेमंडळी, शेजाऱ्यांना मसाला दिला. गावातच विक्री सुरू केली. पहिल्यांदा मसाला विक्रीतून केवळ १०० रुपये मिळाले. सगळ्यांचा चांगला प्रतिसाद आला. यातून आत्मविश्वास मिळाल्यावर चार वर्षांपूर्वी त्यांनी परिसरातील दहा महिलांना सोबत घेऊन उन्नती महिला स्वयंसहाय्यता बचत गटाचे काम सुरू केले.
प्रक्रिया उद्योगाला चालना
उमेद अभियानाच्या अंतर्गत महिला बचत गटाचे काम सुरू केल्यावर मसाला निर्मिती व्यवसायाला गती देण्याचे रसिकाताईंनी ठरवले. परंतु यासाठी प्रशिक्षणाची गरज होती, कारण समाज माध्यमातून म्हणावे तेवढे तंत्रज्ञान मिळत नव्हते. या दरम्यान खादी ग्रामोद्योगाची माहिती मिळाली.
या ठिकाणी प्रशिक्षण घेतल्यामुळे ३५ प्रकारच्या मसाला निर्मितीस त्यांनी सुरुवात केली. यासाठी गटातील महिलांची चांगली साथ मिळाली. पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या सहकार्याने चाळीस हजारांचे भांडवल घेऊन विविध प्रकारचे मसाले निर्मिती सुरू झाली.
मसाला निर्मितीसाठी घरगुती मिक्सर, डंकापासून ते आता अत्याधुनिक मसाला निर्मिती यंत्रणा खरेदी केली आहे. यासाठी ३७ लाखांचे कर्ज घेतले असून, त्याची परतफेड सुरू आहे. विविध यंत्रांमध्ये ग्रॅडिंग, पॅकिंग यंत्रणांचा समावेश आहे. यासाठी कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे चांगले मार्गदर्शन मिळाले आहे.
मसाला चवदार आणि दर्जेदार होण्यासाठी रसिकाताई थेट व्हिएतनाम येथून दर्जेदार दालचिनीची आयात करतात. गरजेनुसार ५ किलो ते ५०० किलोचे पॅकिंगमधून दालचिनी आयात केली जाते. तसेच इंदूर, नगर पाथर्डी येथून धने खरेदी, कोल्हापूर, केरळ येथून काळी मिरी खरेदी आणि हुबळी येथून मिरची खरेदी केली जाते. या उद्योगामध्ये रसिकाताईंना पती मंगेश, सासू शोभा आणि सासरे मोहन यांची चांगली साथ मिळाली आहे.
निर्यातीसाठी प्रयत्न
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद) अंतर्गत मसाले विक्रीसाठी त्यांनी ‘अदित’ हा ब्रॅण्ड तयार केला. मसाल्याचे आकर्षक पॅकिंग करून विक्री सुरू केली. विविध प्रदर्शनांमधून विक्री होत असल्याने पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, इंदूर या शहरांतील महिला ग्राहक कायमच्या जोडल्या गेल्या आहेत.
काही कुटुंब परदेशात वास्तव्यास असली तरी पुण्यात आल्यावर मसाले खरेदी करतात. तसेच कुरिअरद्वारे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, कॅनडा, न्यूझीलंड या देशात विविध मसाले मागवून घेतात. सध्या मसाला विक्रीसाठी फ्रान्स येथील एका कंपनीसोबत कराराची बोलणी सुरू आहेत. रसिकताईंनी मसाला निर्यातीसाठी प्रमाणपत्र मिळविले आहे.
विक्री केंद्राची सुरुवात
सध्या दहा महिलांचा उन्नती महिला स्वयंसहाय्यता बचत गट आहे. घरगुती मसाले उद्योगातून आत्मविश्वास आला आहे. आता यापुढे १०० गटांद्वारे एक हजार महिलांना एकत्र करून, त्यांना उद्योजक बनविण्याचे ध्येय आहे. मसाले वगळता, इतर पारंपरिक खाद्य संस्कृती असलेले कुरडई, पापड, पानवड्या सारखे उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनविणाऱ्या महिलांना देखील रोजगार देण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या रसिकाताईंच्या विक्री केंद्रात विविध महिला बचत गटाची उत्पादने विक्रीस ठेवली आहेत.
केवळ उत्पादन आणि पॅकिंग करून विविध प्रदर्शनांतील विक्री बरोबरच आता रसिकाताईंनी घराजवळ स्वतःचे विक्री केंद्र सुरू केले आहे. कुडजे गावात पर्यटनासाठी येणाऱ्या पुणे आणि हिंजवडी आयटी पार्कमधील अनेक महिला आता थेट मसाला खरेदी करू लागल्या आहेत. तसेच परिसरात विविध हॉटेल, रिसॉर्टमध्ये देखील मोठी मागणी असते. ग्राहकांच्या मागणीनुसार सरासरी ५० ग्रॅम ते एक किलो पॅकिंगमध्ये मसाले उपलब्ध आहेत. सरासरी दर ४०० ते ८०० रुपये किलोच्या दरम्यान आहे. महिन्याला साधारण अडीच टन मसाल्यांचे उत्पादन आणि विक्री केली जात आहे.
महिलांना लघुउद्योगासाठी मदत
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू म्हणाल्या, की महिलांमध्ये निसर्गतः बचत, व्यवस्थापन आणि उद्योगाची कौशल्ये असतात. महिलांमध्ये तळमळ असते, पण ती तळमळ कृतीत उतरण्याची गरज असते. ज्या महिला प्रत्यक्ष कृती करत आहेत, त्यांना यश मिळत आहे.
या कौशल्याला उद्योजकतेचे धडे आणि आर्थिक बळ मिळाले तर अनेक ग्रामीण महिला उद्योजक होऊ शकतात, हे रसिका सारख्या अनेक महिलांनी सिद्ध करून दाखविले आहे. महिला आर्थिक सक्षम होत असल्याने त्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात आहे.
महिला सक्षमीकरण केवळ बोलून होत नसते, थोडे पैसे त्यांच्या हातात आल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढतो. वित्तीय संस्था विविध योजनेतून कर्ज मिळते, त्याचा लाभ महिलांनी घ्यावा. इतर महिलांनी प्रेरणा घेऊन काम करावे,यासाठी आमचा विभाग मदत करत आहे.
उद्योगाची वाटचाल
सध्या विविध ३५ प्रकारच्या मसाल्यांची निर्मिती.
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी), प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया उद्योग योजनांच्या (पीएमएफएमई) माध्यमातून ३७ लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध.
योजनेतील कर्जावर शासनाकडून ३५ टक्क्यांची सवलत.
हळद पावडर, मिरची पावडर, धने पावडर, काळीमिरी पावडर, कांदा, कोकणी, चिकन, फिश, बिर्याणी, मालवणी, सांबर मसाला, गरम मसाला, मिसळ मसाला, चाट, पाणीपुरी, घरगुती मसाला, चहा मसाला, गुळाचा चहा निर्मितीवर भर.
- रसिका पायगुडे, ९०९६३९१७१७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.