
आरती देशमुख
Tribal Entrepreneurship Success Story : नंदूरबार हा आदिवासीप्रवण व सातपुडा पर्वतरांगांनी वेढलेला जिल्हा आहे. या भागातील शेतकऱ्यांची शेती दुर्गम व डोंगराळ भागात असून पाणीटंचाईचा सामनाही त्यांना करावा लागतो. कपाशीसह मिरची, केळी, कांदा व अन्य भाजीपाला पिकांमध्ये येथील शेतकरी कुशल झाले आहेत. अनेकांनी या पिकांमध्ये मास्टरी मिळवली आहे.
जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात खडक्या हे सातपुड्यात वसलेले दुर्गम गाव आहे. सायसिंग व सुनंदा हे पाडवी दांपत्य येथे राहते. त्यांची साडेतीन एकर शेती आहे. त्यात पावसाळ्यात केवळ ज्वारी, बाजरी आदी हंगामी पिके ते घेतात. मात्र केवळ या शेतीवर अवलंबून राहणे शक्य होत नाही. पडवी दांपत्य उच्चशिक्षित असून सायसिंग एमएबीएड तर सुनंदा या एमएएमएडपर्यंत शिकल्या आहेत. नोकरीची वाट न पाहता या दांपत्याने उद्योगाच्या माध्यमातून स्वयंरोजगार तयार करण्याचा निर्णय घेतला.
उद्योगाची मिळाली संधी
नंदूरबार येथे कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) कार्यरत आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योगाच्या नव्या वाटा दाखवून मार्गदर्शन करण्यात येते. नंदूरबार जिल्ह्यात मोहफुलांची भरपूर झाडे आहेत. या भूमीला या झाडांचे वरदानच लाभले आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. येथील समाजात मोहाला कल्पवृक्ष मानले जाते. परंतु झाडाच्या फुलांकडे अनेक लोक एक पेय या चुकीच्या दृष्टीनेच पाहतात. मात्र याच फुलांपासून लाडू तयार केले जाऊ शकतात व उद्योग उभारला जाऊ शकतो याबाबत केव्हीकेने पाडवी दांपत्याला प्रोत्साहन दिले.
त्यानुसार या दांपत्याने अधिक अभ्यास व विचार विनिमयातून हा उद्योग सुरू करण्याचे ठरवले. सन २०२० च्या सुरुवातीस कोव्हीडच्या संकटाने नोकऱ्या, उद्योग ठप्प झाले. मात्र याच काळात पाडवी यांनी आपल्या घरातच मोहफुलांपासून लाडू तयार करण्याचा प्रयोग सुरू केला. सुरुवातीला यंत्रसामग्री नव्हती. साधा मिक्सर, कुकर आणि घरगुती साचे यांचाच काय तो आधार होता. उद्योगाच्या सुरवातीला समाजाच्या टीकेचेही धनी व्हावे लागते. अशावेळी मनोबल टिकवणे अत्यंत महत्त्वाचे असते. पाडवी दांपत्याच्या वाट्यालाही अडथळ्यांची मालिका होती. परंतु हिम्मत न हारता त्यांनी इच्छाशक्ती, सचोटी व उद्योजकवृत्तीतून कृतीतून टीकेस उत्तर देण्याचे ठरवले.
उद्योगाची सुरुवात
लाडू निर्मिती उद्योगात सर्वप्रथम मोहफुलांचे वेळेवर संकलन, निवड करावी लागते. स्वच्छतेला महत्त्व असते. फुले सुकवावी लागतात. या लाडूत वेलची, शेंगदाणे, गाईचे तूप, अंबाडीच्या बिया आदींचा समावेश केला जातो. हा लाडू प्रथिने, लोह व तंतुमय पदार्थांनी भरपूर असतो. त्याचा स्वादही वेगळा असतो. ऊर्जा वाढवणारा आणि आरोग्यदायी म्हणून त्याला महत्त्व आहे. या उद्योगात पाडवी यांना काही लघु यंत्रसामग्रीचीही आवश्यकता होती. त्यानुसार मोहफुलांमधील देठ वेगळा करण्यासाठी ‘स्टेम रिमूव्हर’, मोठ्या प्रमाणात मिश्रण तयार करण्यासाठी इंडस्ट्रिअल मिक्सर’, तर मोहफुले वाळविण्यासाठी सोलर ड्रायर खरेदी केला.
विस्तार
सुरुवातीला गावाजवळील आठवडी बाजारात लाडू विकले जात. केवळ १५ ते २० किलो लाडूच बनायचे. परंतु दांपत्याने उत्पादनात आणि गुणवत्तेत सातत्याने सुधारणा करण्यासह विक्रीसाठी प्रमोशनही सुरू केले. नंदूरबार केव्हीके येथील विषय विशेषज्ञ (गृह उद्योग) आरती देशमुख यांनीही तांत्रिक व बाजारपेठेविषयी मार्गदर्शन व सहकार्य केले. त्यातूनच सुनंदा यांनी ऑनलाइन पद्धतीने उद्योगातील महत्त्वाच्या बाबी शिकून घेतल्या. ‘आझोळ’ या प्लॅटफॉर्मवर नोंदणी करून लाडूंची ऑनलाइन विक्री सुरू केली.
आज मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, बंगळूरपर्यंत त्यांच्या लाडवाचा प्रसार होण्यास मदत झाली आहे. यूथएड ग्लोबल यांच्या माध्यमातून नव आहार (पुणे), शबरी आदिवासी महामंडळ, नाशिक आदींच्या विक्री केंद्रांवरूनही मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली. कृषी मेळावे, जिल्हा उद्योग केंद्र, मुंबई येथील सरस प्रदर्शन तसेच बंगळूर, दिल्ली व कोलकतापर्यंत विद्यापीठे व संस्था यांच्या माध्यमातून स्टॉल उभारून उत्पादनाचे प्रमोशन केले. त्यातूनच उत्पादनाला वेगळी ओळख व मोगी भोग हा ब्रँड आणि विश्वास प्राप्त झाला. बॉक्स पॅकिंग, त्यात नऊ लाडू तर त्याची किंमत शंभर रुपये आहे.
झालेली प्रगती
लहानशा उद्योगाची सुरवात अवघ्या चारहजार ते पाचहजार रुपये भांडवलातून झाली होती. दुसऱ्या वर्षी २० ते २५ हजार रुपये भांडवल गुंतवावे लागले. आज पाहता पाहता उद्योगाची वार्षिक उलाढाल १० ते १५ लाख रुपयांच्या उंबरठ्यावर पोचवण्यात पाडवी दांपत्य यशस्वी झाले आहे. सायसिंग सांगतात की पूर्वी आम्ही साध्या घरात राहायचो. आता सर्वसोयींनी युक्त पक्के घर याच उद्योगातून उभारले आहे.
मुलगा सुमीत नंदूरबार येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत चौथी इयत्तेत शिकत आहे. दुर्गम, आदिवासी भागात शेतकामांव्यतिरिक्त अर्थार्जनाच्या फारशा संधी उपलब्ध नव्हत्या. आज पाडवी दांपत्याने उद्योगात स्थानिक महिलांनाही सामावून घेतले. लाडू तयार करणे, पॅकिंग अशी कामे या महिला करतात. त्यातून सुमारे दहा महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या घरातील महिला एरवी रोजगारासाठी अन्य ठिकाणी स्थलांतरित व्हायच्या. उद्योगातून मोठे आर्थिक पाठबळ मिळाले असून सामाजिक प्रतिष्ठाही उंचावल्याचे सायसिंग म्हणाले. पाडवी यांच्या यशात विविध संस्थांच्या मार्गदर्शनाचाही मोठा वाटा आहे.
सुनंदा पाडवी ९४०४२८७८९५, ९४०३५७२२९६
आरती देशमुख ९५०३६१२७०२
विषय विशेषज्ञ (गृह उद्योग) कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.