
Rural Entrepreneurship: सांगली शहरापासून सुमारे शंभर किलोमीटरवर आटपाडी हा अवर्षण प्रवण तालुका आहे. इथला दुष्काळ जगण्याची कसोटी पाहतो. आटपाडी शहरातील आकाश सुभाष व्हनमाने या युवा शेतकऱ्याची तीस एकर शेती आहे. त्याच्या आजोबांनी दुष्काळ सोसून शेतात कष्ट उपसले. आकाशचे वडील सुभाष यांनीही ‘सिव्हिल’ शाखेतील पदविका घेतली. आकाश यांनीही कृषी पदवीचे तर बंधू रोहित आणि मंगेश यांनी ‘इंजिनिअरिंग’चे शिक्षण पूर्ण केले.
...अन् दिशा मिळाली
आकाश यांनी पदवीनंतर खासगी कंपनीत ‘मार्केटिंग’ क्षेत्रात दोन वर्षे नोकरी केली. या काळात त्यांचा अनेक शेतकऱ्यांचा संपर्क आला. शेतकऱ्यांचे आदर्श दुग्ध व्यवसाय व गोठे पाहण्यास मिळाले. त्यातून आपणही असा व्यवसाय करावा असे वाटू लागले. परंतु दुष्काळी भाग असल्याने चाऱ्याचा मोठा प्रश्न होता. विकत चारा घेऊन जनावरे सांभाळणे आव्हानाचे होते. आकाश सांगतात, की गोठा उभारणीचा कसलाही अनुभव नव्हता. तरीही दुष्काळात मोठे धाडस करण्याचे ठरवले.
घरातील सदस्य म्हणत होते, की अनेक गोठे बंद झाले. तू या भानगडीत पडू नकोस. परंतु घेतलेल्या निर्णयाला वडिलांनी साथ दिली. पाच जनावरांच्या गोठ्यांपासून एक हजार जनावरांच्या गोठ्यांचा प्रत्यक्ष भेटी देऊन अभ्यास केला. व्यवस्थापन, जमा-खर्च आदी बाबींचा बारकाईने अभ्यास केला. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश चव्हाण यांची मदत झाली. कोरोना काळात आकाश यांनी मित्र संतोष दीक्षित यांच्या दिघंची येथील गोठ्याला भेट दिली. मित्राला गाई निवडीसाठी मदत मागितली. संतोष यांनी क्षणात मदतीचा हात पुढे केला. कधी गायी पसंत पडायच्या तर किमतीमुळे व्यवहार रखडायचा. अखेर मोठ्या प्रयत्नातून पाच एचएफ संकरित जातिवंत गायी गोठ्यात आल्या.
व्यवसायाचे केले सुनियोजन
साध्या पद्धतीने मुक्त गोठा उभारला. प्रत्येक गोष्ट शिकत व अनुभव घेत आकाश व्यवसायात जिद्दीने व आत्मविश्वासाने पुढे जाऊ लागले मागे हटायचे नाही व झोकून देऊन काम करायचे पक्के केले. प्रति दिन शंभर लिटर दूध संकलनाचे लक्ष्य ठेवले तरच व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो, याचे गणित मांडले. हळूहळू गाईंची संख्या वाढवण्यास सुरुवात केली. देखभालीसाठी मजूर तैनात केला. एका टप्प्यावर प्रति दिन शंभर लिटर दूध उपलब्ध होऊ लागले. आता पुढील शंभर लिटर दूध संकलनाचे लक्ष्य ठेवले. आज अभ्यास व उत्कृष्ट व्यवस्थापनातून पाच वर्षांच्या कालावधीत जनावरांची संख्या ५० पर्यंत नेण्यात यश मिळाले आहे. याच एचएफ व जर्सी गाईंचा समावेश आहे.
व्यवस्थापनातील ठळक बाबी
जनावरांना वेळेत आणि पोषक चारा दिला तरच दूध उत्पादनात वाढ होते. त्यामुळे प्रति गाईस एकावेळी ओला आणि सुका असा १५ किलो चारा, ४०० ग्रॅम पशुखाद्य, १०० ग्रॅम मिनरल मिक्शर असे व्यवस्थापन.
घरच्या १० एकरांमध्ये मका लागवड. त्याआधारे व गरजेनुसार शेतकऱ्यांकडून मका घेऊन वर्षाला दोनशे टनांपर्यंत मुरघास निर्मिती. त्यामुळेच दुष्काळात एवढी जनावरे जगवणे शक्य होत असल्याचे आकाश सांगतात. ते सांगतात, की गायींची संख्या जेवढी जास्त तेवढे गोठा व आर्थिक व्यवस्थापन करणे कठीण. त्यामुळेच एकच मजूर सांभाळू शकेल या पद्धतीने गाईंची संख्या मर्यादित ठेवली आहे. त्यामुळे प्रत्येक जनावराकडे पुरेसे लक्ष देता येते. मुक्त संचार गोठा आहे.
वयांनुसार व दुधाळ स्थितीनुसार गाईंसाठी स्वतंत्र आठ कप्पे. प्रत्येक कप्प्यात पाणी, चारा आणि खाद्याची सोय. प्रत्येक गाईच्या कानाला टॅगिंग. त्यामुळे जन्माला आल्यापासून वंशावळीच्या सर्व नोंदी ठेवल्या आहेत.
प्रत्येक तीन ते चार महिन्यांनी गोठ्याचे निर्जंतुकीकरण.
उन्हाळ्यात फॉगरची सोय. त्यामुळे जनावराच्या शरीराचे तापमान नियंत्रण होण्यास मदत.
दूध संकलन - प्रति दिन २०० लिटरपर्यंत
पुणे जिल्ह्यातील कंपनीला दूधपुरवठा. मिळणारा दर - (फॅट ३.५, एसएनएफ ८.५) ३३ रुपये प्रति लिटर.
मिळणाऱ्या उत्पन्नातून समान तीन विभागणी. दोन भाग खर्चासाठी तर एक भाग नफा म्हणून बाजूला ठेवला जातो.
दर चार महिन्यांनी ३० ट्रॉलीपर्यंत शेणखत उपलब्ध होते. शेताची गरज भागवून उर्वरित शेणखताची प्रति ट्रॉली साडेसहा ते सात हजार रुपये दराने. त्यातून अतिरिक्त उत्पन्न.
दरवर्षी काही कालवडींची विक्री. एकूण व्यवसायातून वर्षाला ३० टक्क्यांपर्यंत नफा.
पैदास तंत्रज्ञानाचा केला वापर
गाईंचे कृत्रीम रेतन करून घेण्यासाठी आकाश यांना ८० किलोमीटरपर्यंत जावे लागे. त्यात वेळ, पैसा व श्रम खर्ची पडत. त्यावर उपाय म्हणून आपल्या शेतावरच सीमेन कंटेनरची सुविधा तयार केली आहे. त्यासाठी नायट्रोजन पुरवण्यासाठीही यंत्रणा बसवली आहे. भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून पाच कालवडी गोठ्यात तयार झाल्या आहेत. प्रति दिन ३० लिटर दूध देण्याची क्षमता त्यांची क्षमता असेल असे आकाश सांगतात.
अन्य पूरक व्यवसाय
गोठ्यातील शेण व्यवस्थित विस्कटले जावे तसेच गोचिडांसारख्या किड्यांच्या त्रासापासून गाईंची मुक्तता व्हावी यासाठी ५० देशी कोंबड्यांचे पालन केले आहे. अंडी विक्रीतून देखील चांगले उत्पन्न मिळते. जोडीला निल्लोर ब्राऊन जातीच्या लहान मोठ्या १०० मेंढ्यांचे पालन केले जात आहे.
आकाश व्हनमाने ८९५६२५९२९२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.