
Induja Milk Company Yavatmal : आत्महत्याग्रस्त तालुक्यांमध्ये सामाजिक कामांमध्ये कार्यरत असलेल्या ‘टाटा ट्रस्ट’ने २०१८ मध्ये मुरली (ता. घाटंजी) येथील महिलांना सशक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ‘डेअरी हेल्थ ॲण्ड न्यूट्रिशन इन्सेटिव्ह इंडिया’ (डीएचएनआयआय) यांच्या माध्यमातून शाश्वत उत्पन्नासाठी घरातील महिलांना दूध उत्पादनाकडे वळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
पण त्याला एक मोठे रूप देण्यासाठी दुग्ध उत्पादक कंपनी उभा करणे गरजेचे वाटले. त्या उद्देशाने सुरुवातीच्या टप्प्यात १२ कोटी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला. या निधीतून ११ जुलै २०१८ मध्ये महिलांची दूध उत्पादक कंपनी स्थापन केली गेली.
त्यासाठी आवश्यक दस्तऐवजांची पूर्तता व विविध परवाने घेण्यात आले. त्यानंतर सुमारे आठ कोटी रुपये खर्चून आवश्यक त्या विविध दुग्ध संयंत्राची खरेदी करण्यात आली. यासाठी ‘नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड’ (एनडीडीबी)कडून आवश्यक ते तांत्रिक सहकार्य मिळाले.
...यांचा आहे संचालक मंडळात समावेश
इंदूजा महिला मिल्क प्रोड्यूसर कंपनीच्या संचालक मंडळात नीलिमा चिवाने, मंजूषा डोंबारे, लता अवचट, माधुरी राऊत, योगिता गावंडे, जयश्री साखरकर, वैशाली महानोर, रेश्मा गावंडे (अध्यक्ष) या आठ महिला संचालक आहेत. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिकंदर मुलानी तर तज्ज्ञ संचालक म्हणून रचना गोयल, विणू सोधी म्हणून काम पाहतात. सुरुवातीला ११ जुलै २०१८ रोजी दुग्ध उत्पादक संस्था म्हणून नोंदणी केलेल्या या कंपनीच्या प्रत्यक्ष दूध संकलनाला ९ जानेवारी २०१९ पासून सुरुवात झाली.
...असे आहे प्रक्रिया केंद्र
मुरली (ता. घाटंजी) येथे १० हजार लिटर क्षमतेचे दूध शीतकरण केंद्राची उभारणी केली आहे. या केंद्राच्या परिसरातील ४० गावांतील महिला दुग्धोत्पादकांकडून दूध संकलन करण्यात येते. या गावातून सुरुवातीला दैनंदिन फक्त ३०० लिटर इतके अत्यल्प दूध संकलन होत असे. ते वाढून पाच हजारांवर पोहोचले.
सातत्याने विस्तार कामे व सामान्य महिलांना प्रोत्साहन देत त्यांना दुधाळ जनावरे घेण्यास आवश्यक ती मदत केली. आजूबाजूच्या तीन जिल्ह्यांतील सुमारे ४४० गावातून होणारे दूध संकलन आजघडीला दैनंदिन पन्नास हजार लिटरवर पोहोचले आहे. आता दूध शीतकरण केंद्रे तीन (१५, १५, १० हजार लिटर क्षमतेची) आणि १० लिटर क्षमतेची बल्क कूलिंग युनिट पाच
...असे आहेत निकष
राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाकडून काही मानक कार्यपद्धती (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) निर्धारित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार महिला दुग्धोत्पादकांना कंपनीचे सभासद केले जाते. त्यानंतरच त्यांच्याकडून दूध संकलन होते. दीडशे रुपये भरून कंपनीचे सदस्य झाल्यानंतर त्या महिलेने वर्षातील किमान २०० दिवस आणि किमान ५०० लिटर दुधाचा पुरवठा कंपनीला करावा लागतो.
जमा होणाऱ्या प्रति लिटर दुधामागे एक रुपया या प्रमाणे कंपनीत भागभांडवल जमा होत जाते. या निकषांची पूर्तता करणाऱ्यांनाच सभासद मानले जाते. या सभासदांमधूनच नेतृत्व क्षमता असलेल्या आठ ते अकरा महिलांची कंपनीच्या संचालक मंडळावर वर्णी लागू शकते. म्हणजेच त्या कंपनीच्या सर्व निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊ शकतात. सर्व सभासदांसाठी तीन प्रकारच्या प्रशिक्षणाचे नियमित आयोजन होते. त्यामध्ये डेअरी व्यवस्थापन, व्हिलेज कॉन्टॅट ग्रुप, दूध उत्पादकता जागरूकता अभियान अशा विषयांवरील प्रशिक्षणांचा समावेश असतो.
या गावात रुजली धवलक्रांती
यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव, बोरीअरब (दारव्हा), पुसद, घाटंजी, दिग्रस, अरणी, पांढरकवडा, कळंब, राळेगाव, नीर या परिसरातील सुमारे २०० गावांमधून दूध संकलन होते. यासोबतच हिंगणघाट (वर्धा) ५०, मंगरूळपीर (वाशीम) १३०, कळमनुरी (हिंगोली) ७५ गावे अशा प्रकारे एकूण ४४० पेक्षा अधिक गावातून दूध संकलन केले जाते.
तांत्रिक मुद्यांवर दिला जातो भर
जनावरांच्या चांगल्या प्रजाती, पशुआहार आणि डेअरी व्यवस्थापन या तीन घटकांवर कंपनी काम करते. पशुखाद्य, मिनरल मिक्शर, मुरघास, राशन बॅलेन्सिंग प्रोग्रॅम या सुविधा पशुपालकांना घरपोच दिल्या जातात. जनावरांच्या चांगल्या प्रजातींसाठी कृत्रिम रेतन, वंध्यत्व निवारण कार्यक्रम, एनडीडीबीच्या साह्याने राष्ट्रीय गोकूळ मिशन अंतर्गत सात हजार सभासदांना प्रत्येकी एक या प्रमाणे दुधाळ जनावरांचे वाटप केले जात आहे. डेअरी व्यवस्थापनामध्ये मुक्त संचार गोठा नियोजन तसेच पशूंवरील खर्चात बचत यावर मार्गदर्शन करण्यावर भर आहे.
पशुआहाराकरिता स्वतंत्र कंपनी
पशुआहारावर विशेष भर देत इंदूजाच्या वतीने दर्जेदार चारा उत्पादनाकरिता ‘यशस्वी फॉडर ऍण्ड ऍग्री प्रोड्युसर कंपनी या स्वतंत्र शेतकरी कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या विशेष कार्यक्रमातून सुरू केलेल्या या कंपनीचा फोकस केवळ चारा उत्पादनावर ठेवण्यात आला आहे. २०२३ या पहिल्याच वर्षी १४०० टन, तर २०२४ मध्ये १७०० टन याप्रमाणे मुरघास निर्मिती केली.
त्याचा पुरवठा इंदूजाच्या पशुपालकांना घरपोच करण्यात आला. या कंपनीला पहिल्या तीन वर्षांसाठी सुमारे १८ लाख रुपयांचा निधी केंद्र सरकार स्तरावरून उपलब्ध होणार आहे. या निधीतून कंपनीअंतर्गंत असलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार व इतर बाबींवरील खर्च भागतो.
ही कंपनी हिरवा चारा दोन रुपये प्रति किलो या दराने त्या ४११ सभासदांकडून खरेदी करते. त्यापासून मुरघास निर्मिती करून त्याची विक्री इंदूजाच्या सभासदांना सहा रुपये प्रति किलो या दराने करते. यातून सर्व खर्च वजा २५ ते ५० प्रति किलो इतका फायदा कंपनीला मिळतो.
दुधाळ जनावरांची उपलब्धता
सामान्य पशुपालकाला जनावरांच्या खरेदीसाठी भांडवलाची गरज भासते. यासाठी सभासदांनी खासगी कर्ज काढून फेडीच्या चक्रात अडकण्याचा धोका होता. तो टाळण्यासाठी ‘इंदूजा’ आणि स्टेट बॅंक ऑफ इंडिया यांच्यामध्ये सामंजस्य करार केलेला आहे. या माध्यमातून १९२ जनावरांचे वितरणही करण्यात आले आहे.
महिलांना राष्ट्रीय गोकूळ मिशन अंतर्गत वितरित जनावरांचा तीन वर्षांचा विमा काढला जातो. त्यासोबतच पशुपालकासोबत तीन वर्ष जनावरांची विक्री करता येणार नाही. तसेच जनावरांपासून मिळणाऱ्या दुधाची विक्री केवळ कंपनीला करावी, असा करार केला जातो.
जनावरांचे जपले जाते आरोग्य
दोन पशुवैद्यकांसह पाच पशुवैद्यकीय पर्यवेक्षकांची सेवा कंपनीने उपलब्ध केलेली आहे. त्यांच्या माध्यमातून सभासदांकडील दुधाळ जनावरांचे आरोग्य, आहार यावर सातत्याने लक्ष ठेवले जाते. सभासदांच्या जनावरांच्या कृत्रिम रेतनासाठी ५० एआय टेक्निशियन कार्यरत आहेत.
दुधाचे होते संकलन
एका गावात सरासरी १५० लिटर दूध संकलन असावे, ही अपेक्षा आहे. अशा गावातून थेट कंपनीच्या वाहनाद्वारे सकाळ - संध्याकाळी दूध संकलन केले जाते. एका मार्गावरील वाहनाच्या माध्यमातून सरासरी दहा गावांतील दूध संकलन करण्याचा प्रयत्न असतो. त्यानुसार वाहनांचे मार्ग आणि वेळ निश्चित केली जाते.
आजवर झालेली प्रशिक्षणे
वंधत्व निवारण प्रोग्रॅम ः १०४ (१४ हजार १३२ पशूंची तपासणी)
राष्ट्रीय गोकूळ मिशन अंतर्गत ६५२८ जनावरांचे वाटप
एसबीआयतर्फे १९२ जनावरांसाठी कर्ज उपलब्धता व जनावरांची खरेदी.
दूध उत्पादक जागरूकता अभियान १०४१
व्हिलेज कॉन्टट ग्रूप बैठका १४८६
डेअरी व्यवस्थापन प्रशिक्षण १०
गावागावांत बायोगॅस...
इंदूजा व सिस्टिमा बायो या दोघांच्या संयुक्त उपक्रमातून एक हजार बायोगॅस यंत्रणा उभारण्यात येत आहे. त्याकरिता आकारलेल्या तीन हजार रुपयांची परतफेड दूध चुकाऱ्यातून टप्प्याटप्प्याने होते. चारा व इतर बाबींचा पुरवठा शेतकरी कंपनीद्वारे केला जातो. त्याचाही परतावा चुकाऱ्यातूनच करण्यावर भर आहे. www.indujaamilk.com या नावाने कंपनीचे संकेतस्थळ देखील आहे.
...अशी आहे उलाढाल
- कंपनीच्या सभासदांना त्यांच्या जमा भागभांडवलाच्या ८ टक्के या प्रमाणे लाभांश (डिव्हिडंट) दिला जातो.
- कंपनीशी जोडलेल्या व सक्रिय सभासदांना प्रोत्साहनपर राशी म्हणून प्रति लिटर दुधामागे ५० पैसे अतिरिक्त दिले जातात.
- एखाद्या सभासदाने १०० रुपयाचे दूध कंपनीला दिले, तर त्यातून होणाऱ्या एकूण व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या सुमारे ८५ रुपये विविध मार्गाने माघारी दिले जातात.
- २०१८-१९ या वर्षात कंपनीची उलाढाल ५१ लाख रुपये होती. २०२३-२४ या वर्षात ही उलाढाल ९२ कोटी ९७ लाख रुपयांवर पोहोचली आहे.
पुरस्कार
२०२० मध्ये डिजिटल व्यवस्थापनासाठी म्हणून ‘एनडीडीबी’कडून डिजिटल पेमेंट ॲवॉर्ड.
२०२१ मध्ये ‘इंडिया टूडे अॅग्रिकल्चरल ग्रुप’कडून ‘इंडिया डेअरी ॲवॉर्ड’ मिळाले.
- २०२४-२५ साठी ‘इंडियन डेअरी असोसिएशनकडून ‘इंटरडेअरी ॲवॉर्ड फॉर बेस्ट सस्टेनेबल प्रॅक्टिसेस’साठी गौरव.
योगिता गावंडे (संचालिका), ९१५८२५०००५
सिकंदर मुलाणी (तज्ज्ञ संचालक), ९८९०६६३६३९
सुनील पाटील (वित्त व लेखा व्यवस्थापक), ७०२००२५०७४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.