
Agriculture Success Story : हिंगोली जिल्ह्यातील कुडाळा (ता. वसमत) येथील भागवत चव्हाण यांची कुटुंबाच्या विभक्तीनंतर वाट्याला आलेली पाच एकर शेती आहे. एम.ए. (समाजशास्त्र) बी.एड.पर्यंत शिक्षण झाल्यानंतर काही वर्षे त्यांनी नोकरीसाठी प्रयत्न केले राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिल्या. परंतु त्यात यश मिळाले नाही.
परंतु निराश न होता शेतीतूनच मोठे व्हायचे असे त्यांनी ठरवले. गावापासून दोन किलोमीटरवर शेती असून जवळून येलदरी-सिद्धेश्वर धरणाचा मुख्य कालवा जातो. त्यामुळे पाण्याची मुबलक उपलब्धता आहे. भागवत सोयाबीन, हळद, हरभरा आदी पिके घेऊ लागले. परंतु कमी बाजारभाव, वर्ष, दोन-वर्षाआड पडणारा दुष्काळ यामुळे उत्पन्नाची खात्री राहिली नव्हती.
कर्जाचा बोजा राहायचा. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी दुग्ध व्यवसायाची कास धरायचे ठरवले. मित्रमंडळींनी केलेल्या आर्थिक मदतीतून २०१९ मध्ये गावरान म्हैस घेतली. गावातील डेअरीला विक्री व्हायची. दररोजचे उत्पन्न सुरू झाले. त्यातून आत्मविश्वास दुणावला.
अंगठी मोडून उभारले भांडवल
सन २०२१ मध्ये स्वतःकडील शिल्लक तसेच अंगठी मोडून भांडवल उभे करून ८५ हजार रुपयांना नाशिक येथून एचएफ गाय खरेदी केली. गायीचे दूध गावातील गावातील डेअरीवर स्वीकारले जात नव्हते. त्यामुळे भागवत मोटार सायकलवरुन दहा किलोमीटरवरील जवळा बाजार येथील खासगी डेअरीला विक्री करू लागले.
प्रति लिटर २३ रुपये दर मिळायचा. दर दहा दिवसांनी पेमेंट मिळायचे. कष्ट- संघर्ष अविरत सुरू होते. अशावेळी पक्के नियोजन करून व्यवसायात यशस्वी होण्याकडे वाटचाल केली. सर्वप्रथम अनावश्यक खर्च कमी केला.
शेतातील लाकूड फाटा, ऊसपाचट यांचा वापर करून अल्प खर्चात गोठा तयार केला होता.आर्थिक सक्षमता प्राप्त केल्यानंतर २०२४ मध्ये ४५ बाय २५ फूट जागेत तीन पत्री शेडचा गोठा उभारला. सिमेंटची फरशी, विटा- सिमेंटच्या पक्क्या गव्हाणी, जागेवरच चारा- पाणी आदी व्यवस्था केल्या.
व्यवसायाचा विस्तार
२०२२ मध्ये खासगी बँकेचे दोन लाख रुपये कर्ज घेतले. एक गाय व कडबा कुट्टी यंत्र घेतले. दररोज ४० ते ४२ लिटर दूध उपलब्ध होऊ लागले. जातिवंत दुधाळ गायी खरेदीसाठी नाशिक येथील दुग्ध व्यावसायिक मित्र विष्णू टिळे यांचे मार्गदर्शन सोबत होते. टप्प्याटप्प्याने गायी खरेदी ककून आजमितीला १७ संकरित गायी आणि दोन म्हशी अशी लहान- मोठी मिळून ३० जनावरे आहेत. गावात एका दक्षिणेकडील कंपनीचे दूध संकलन केंद्र २०२३ मध्ये सुरू केले.
घरचे १३० लिटरपर्यंत तर अन्य शेतकऱ्यांचे मिळून दररोज ३०० ते ३५० लिटर दूधसंकलन होते. फॅट व एसएनएफनुसार गायीच्या दुधाला ३२ ते ३५ रुपये तर म्हशीच्या दुधाला ५० ते कमाल ८५ रुपये प्रति लिटर दर मिळतो. भागवत यांची परतफेडीची क्षमता विचारात संबंधित दाक्षिणात्य डेअरी कंपनीने नऊ लाख रुपये कर्ज दिले. त्यातून काही गायी, दूध काढणी व गोठा स्वच्छता यंत्र खरेदी करणे शक्य झाले.
व्यवसायातील ठळक बाबी
सुमारे दीड एकरांत विविध हिरव्या चाऱ्यांची लागवड. त्यातून ओल्या चाऱ्याची संपूर्ण गरज भागवली जाते. यात सुधारित नेपियर, प्रथिनांचे प्रमाण अधिक असलेला मका, ज्वारी, मेथी घास आदीचा समावेश. उसात मक्याचे आंतरपीक.
सुका चारा अन्य शेतकऱ्यांकडून खरेदी केला जातो.
दरवर्षी २५ ते ३० टन मुरघास निर्मिती होते. ट्रॅक्टरचलित मुरघास कुट्टी करणारे यंत्र असून ते भाडेतत्त्वावरही देण्यात येते. त्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळते.
व्यवसायातून प्रगती
दुग्धव्यवसायाच्या सुरवातीच्या काळात म्हशीचे दूध गावातील डेअरीला घालत असत. ३२७ रुपयांच्या पेमेंटच्या पहिल्या कमाईचा आनंद अवर्णनीय असल्याचे भागवत सांगतात. आज वर्षाला दूध विक्रीतून ६० टक्क्यापर्यंत नफा मिळवत असल्याचे ते अभिमानाने सांगतात. शेतातच पक्क्या घराचे बांधकाम केले आहे.
शिल्लक शेणखत विक्रीतून दरवर्षी एक ते दीड लाखांचे उत्पन्न मिळते. कर्ज हप्त्याचा भरणा नियमित केला जातो. विमा पॉलिसी, मुदत ठेव योजना आदींच्या माध्यमातून आर्थिक बचतीचे नियोजन करून भविष्यातील आर्थिक तरतूद केली आहे. कंपनीकडून घेतलेल्या नऊ लाख रुपये कर्जाची परतफेड १२ महिन्यांऐवजी ११ महिन्यातच केली आहे. येत्या काळात मुक्तसंचार गोठा व घरचे दूध संकलन २५० ते ३०० लिटरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.
रोजचा संघर्ष, तरीही थांबणे नाही
शेतात पक्का रस्ता नाही. पावसाळ्यात मोटारसायकल चालत नाही. अशावेळी तब्बल अडीच किलोमीटर चिखल तुडवत दररोज सकाळी- संध्याकाळी मिळून १३० लिटर दूध कॅनद्वारे खांद्यावरून वाहून न्यावे लागते. त्यामुळे भागवत यांच्या खांद्याला इजा झाली आहे. उपचार सुरु आहेत. मात्र व्यवसायात एकेक पाऊल पुढे टाकणे थांबविलेले नाही.
दुधाचे दर व व्यवसायातील खर्च पाहता मागील दिवाळीपासून भागवत प्रक्रिया उद्योगाकडे वळले आहेत. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत त्यांना १० लाखांचा प्रकल्प प्रस्ताव मंजूर झाला आहे. तूप, पनीर, खवा, पेढे यांची निर्मिती सुरू करून नांदेड, जिंतूर, शेगाव आदी ठिकाणी विक्री सुरु केली आहे.
कुटुंबाची एकी ठरली महत्त्वाची
घरचे सर्व सदस्य शेतीत राबत असल्याने एकमेकांवरील भार कमी केला आहे. वडील बापूराव यांच्याकडे शेतीची जबाबदारी आहे. आई धारुबाई दुग्धव्यवसायात तर पत्नी ऋतुजा दूध काढण्यापासून स्वच्छतेसह प्रक्रिया उद्योगात मदत करतात. कुटुंबाच्या एकीतूनच आर्थिक प्रगती साधली आहे.
भागवत चव्हाण ९६०४२८७६५९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.