
अभिजित डाके
Indian Agriculture: कवलापूर (जि. सांगली) गाव पालेभाज्यांच्या उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. या भागात खाऱ्या पाण्याची समस्या आहे. त्यामुळे नगदी पिकांच्या काही मर्यादा आहेत. तरीही बाजारपेठांचा अभ्यास, विविध हंगामांतील मागणी लक्षात घेऊन वर्षभर टप्प्याटप्प्याने थोड्या- थोड्या गुंठ्यात विविध पालेभाज्या पिकविण्याचे कसब त्यांनी मिळवले आहे. त्यातून बारमाही ताज्या उत्पन्नाचा हुकमी स्रोतही निर्माण केला आहे.
‘कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाई माझी’ या संत सावंता माळी यांच्या अभंगातील ओळी शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त करून जातात. सांगली जिल्ह्यातील कवलापूर हे सांगली शहरापासून अवघ्या दहा ते अकरा किलोमीटरवर वसलेले गाव आहे. पूर्वी गावात गुलाबाची शेती केली जायची.
परंतु समस्यांमुळे गुलाबाचे उत्पादन घेणे शेतकऱ्यांनी थांबवले. मग गाजराची शेती सुरू झाली. आजही हे गाव गाजर उत्पादन आणि बियाणे उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. ऊस, द्राक्षे ही देखील कवलापूर गावची ओळख आहे. मात्र अशी नगदी, व्यावसायिक पिके घेण्यासाठी मर्यादा आहेत. शेतकऱ्यांच्या शब्दांत सांगायचे तर येथील जखीणमळ्यात पाणी सवळ म्हणजे क्षारयुक्त आहे. त्यामुळे पिकांचे प्रयोग करण्याला मर्यादा आहेत. या पाण्यात पालेभाज्या मात्र चांगल्या प्रकारे येऊ शकतात असा इथल्या शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
...अशी होते पालेभाज्यांची शेती
गावातील जखीणमळा येथील प्रत्येक कुटुंब पालेभाज्या उत्पादनात अग्रेसर आहे. मागील काही पिढ्यांपासून त्यांनी त्यात सातत्य, चिकाटी कायम ठेवली आहे. त्यामुळे या पिकांमध्ये चांगला अभ्यास होऊन त्यात ते माहीर झाले आहेत. नैसर्गिक संकटांमध्येही त्यांची लागवड थांबत नाही. प्रत्येक कुटुंबाचे १० गुंठ्यांपासून ते अर्धा एकरांपर्यंत पालेभाजीचे क्षेत्र असते. पालेभाज्यांचा कालावधी तुलनेने तसा कमी असतो.
परंतु कष्ट खूप करावे लागतात. काढणी व विक्री वेळेत करावी लागते. तरच चांगला दर मिळतो. कापणी, पेंढ्या बांधणीपर्यंत मजुरांची आवश्यकता असते. सध्याची मजूरटंचाईची समस्या लक्षात घेता घरातील सर्व सदस्य शेतीत राबतात. कामे वेळेत करण्याची जबाबदारी चोख पार पाडतात. त्यातून मजुरी खर्चात बचतही करतात. गावातील विष्णू माळी, अरुण माळी, सुधीर माळी सांगतात, की बाजारपेठेतील आवकेवर दर ठरतात.
प्रत्येक शेतकरी एकाच बाजारात न जाता विविध बाजारात गेल्याने तिथली आवक व दरांची परिस्थिती लक्षात येते. त्यानुसार आम्ही एकमेकांशी चर्चा करतो. त्यानुसार काढणी व बाजारात माल पाठवण्याचे नियोजन होते. त्यातून अपेक्षित दर मिळण्यास मदत होते. यंदा मेपासून पावसाला सुरवात झाली. त्यामुळे ऐन हंगामात भाज्यांचे नुकसान झाले. पुढील लागवडीसाठीही अडथळे निर्माण झाले. परंतु अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी धाडसाने लागवडीचे नियोजन केले.
विक्री व्यवस्था
गरजेनुसार पन्नास पेंढ्यांचा गठ्ठा तयार केला जातो.
सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर, रत्नागिरी, इस्लामपूर आदी बाजारपेठांमध्ये विक्री.
स्थानिक किरकोळ तसेच जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडूनही खरेदी.
उन्हाळ्यात दररोज तांबडा, हिरवा माठ यांची सहा- सात हजारांपर्यंत तर पालक, चाकवतीच्या दोन हजार पेंड्यांची विक्री.
मशागतीपासून ते काढणीपर्यंत सुमारे १० हजार रुपये खर्च.
तांबडा, हिरवा माठास सरासरी दर- ४०० ते ५०० रुपये प्रति शेकडा.
पालक, चाकवत- ७०० ते ८०० रुपये प्रति शेकडा.
शेतकरी अनुभव
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.