
Agriculture Success Story : सोलापूर-बार्शी महामार्गावर शेळगाव (आर) (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथे नितीन जाधव या युवा शेतकऱ्याची सहा एकर शेती आहे. एकेकाळी अत्यंत नाजूक आर्थिक परिस्थितीशी झगडण्याची वेळ आलेल्या जाधव कुटुंबाला प्रगतिपथावर नेण्यात नितीन यांनी केलेले प्रयत्न मोलाचे ठरले आहेत. त्यांचे वडील अण्णासाहेब देखील शेतकरीच. त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती.
त्यावेळी ज्वारी, तूर अशी पारंपरिक पिके ते घेत. नितीन यांना या परिस्थितीची झळ बसली. त्यामुळे सन २००४ मध्ये बारावीच्या शिक्षणानंतर त्यांनी शेतीची वाट धरली खरी. परंतु पाण्याचा अभाव होता. त्यामुळे नगदी, व्यावसायिक पिके घ्यायची तरी कशी व कोणती हा मोठा प्रश्न होता. शिवाय सिंचनाची सुविधा करण्यासाठी गाठी पुरेसे भांडवल देखील नव्हते.
अखेर शेतमजूर म्हणून गावातच उत्पन्नाचा स्रोत शोधला. संबंधित शेतकऱ्याकडे कांदा, भेंडी, टोमॅटो आदी भाजीपाला पिकांचा सुमारे सहा वर्षांचा अनुभव जमा झाला. त्यामुळे त्यातील व्यवस्थापनातील ज्ञान, अभ्यास व कौशल्य हस्तगत झाले होते. अखेर मिळवलेल्या उत्पन्नाचा स्वतःच्या शेतातच विनियोग करण्याच्या उद्देशाने नितीन यांनी मजुरीचे काम सोडले. त्यानंतर स्वतःच्या शेतीत पूर्ण लक्ष केंद्रित केले.
शेतीचा विकास व सुधारणा
शेतात विहीर होतीच. परंतु त्याला हंगामी पाणी होते. त्यामुळे पाण्याची कायमस्वरूपी सोय म्हणून बोअर घेतले. सुदैवाने त्यास पाणी चांगले लागले. त्यानंतर मिरची, दोडका, टोमॅटो अशी फळभाज्यांची पिके घेण्यास सुरवात केली. पहिल्याच प्रयोगात भेंडीतून (सन २०१२) दीड लाखाचे उत्पन्न मिळाले.
तर त्याच्या पुढील वर्षी दीड एकरांतील ढोबळी मिरचीनेही असेच चांगले उत्पन्न मिळून दिले. त्यावेळी मिरचीला दरही किलोला ४० रुपयांच्या दरम्यान मिळाला होता. दोन्ही पिकांनी आत्मविश्वास चांगलाच वाढला. नव्हे, खऱ्या अर्थाने शेतीची नवी दिशा दाखवली. त्यानंतर मात्र नितीन यांनी मागे फिरून पाहिले नाही.
भेंडीत मिळवला हातखंडा
मागील १०-१२ वर्षापासूनच्या अनुभवातून नितीन यांनी भेंडी पिकात हातखंडा तयार केला आहे. या पिकातील ते जणू मास्टर झाले आहेत. त्यातूनच त्यांनी शेतीचे व घरचे अर्थकारण सक्षम केले आहे. दरवर्षी २० एप्रिलच्या दरम्यान भेंडीची लागवड होते. ही भेंडी जूनला सुरू होते. ती पुढे दोन महिने म्हणजे ऑगस्टपर्यंत चालते.
या पिकातील व्यवस्थापनासंबंधी महत्त्वाच्या बाबी सांगायच्या तर मशागतीनंतर एकरी दोन ट्रेलर शेणखताचा वापर एकाडएक वर्ष होतो. घरी तीन म्हशी आहेत. त्याद्वारे शेणखत उपलब्ध होते. दोन ओळींत पाच फूट तर दोन झाडांमध्ये नऊ इंच यानुसार लागवड होते. नितीन सांगतात, की बाजारपेठेतील मागणीनुसार वाणात बदल करण्याचा प्रयत्न असतो.
लांब,सडपातळ असलेली म्हणजेच जाड नसलेली, चमक असलेली भेंडी देणाऱ्या वाणाला पसंती असते. एकदिवस आड तोडणी केल्याने आकार हवा तसा मिळतो. मालही ताजा असतो. ह्युमिक ॲसिड. विद्राव्य खतेव दर १० ते १२ दिवसांनी कीडनाशक असा वापर वाढीच्या अवस्थेनुसार होतो.
उत्पादन, बाजारपेठ
एकदिवसाआड ४०० किलोपर्यंत भेंडी मिळते. दोन ते अडीच महिन्यांत साधारण ३५ तोडे होतात.एकरी सुमारे १० ते १२ टन उत्पादन मिळते. नितीन बहुतांश भेंडी पुणे मार्केटला पाठवतात. काही वेळा व्यापारी जागेवर येतात. काही वेळा दरांची स्थिती लक्षात घेऊन सोलापूर, मुंबई येथेही माल पाठवला जातो.
मागील तीन- चार वर्षांत किलोला सरासरी २५ ते ३० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला आहे. यंदा मध्यंतरीच्या काळात हा दर ४० ते ४५ रुपयांपर्यंत पोचला होता. मात्र आता तो २० रुपयांवर घसरला आहे. प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये २५ ते ३० किलो प्रमाणात पॅकिंग करून वाहनांद्वारे भेंडी बाजारातच पाठवण्याचे नियोजन होते. एकरी सुमारे एक लाख रुपये उत्पादन खर्च येतो.
यातील सर्वांत जास्त खर्च मजुरीवर होतो. पुरुष मजुरांना प्रति दिन सातशे रुपये तर महिलांना पाचशे रुपये असे मजुरीचे वाढलेले दर असल्याचे नितीन सांगतात. तरीही खर्च जाऊन काही लाखांच्या आसपास उत्पन्न मिळते. भेंडीनंतर कांद्याची लागवड होते.
मग उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन भेंडी घेणे किंवा जमिनीला विश्रांती देणे यापैकी पर्यायाचा विचार होतो. कांद्याचे उत्पन्नही भेंडीला साह्यभूत ठरले आहे. सोलापूर बाजारपेठेपेक्षा बंगळूर बाजारपेठेत कांद्याला किलोला किमान पाच रुपये दर अधिक मिळतो. त्यामुळे काही शेतकरी मिळून तेथे प्रत्यक्ष जाऊन विक्री करतो असे नितीन यांनी सांगितले.
घरच्यांचे सहकार्य
सर्व प्रतिकूल परिस्थितीत नितीन यांनी हिमतीने अडचणींवर मार्ग शोधले. प्रयोग केले. न थांबता वाटचाल सुरू ठेवली. तेव्हा खऱ्या अर्थाने कष्टाला फळ मिळाले आहे. आज प्रगतिशील शेतकरी अशी ओळख त्यांनी तयार केली आहे.
वडील अण्णासाहेब, पत्नी पूनम देखील शेतीत राबतात. नितीन यांना आर्यन व भास्कर अशी छोटी मुले आहेत. गावातील संतोष जाधव, बालाजी गुंड या मित्रांचेही नेहमी सहकार्य मिळते. शेतीतील उत्पन्नातूनच जुन्या घराची डागडुजी करून घर बांधले. अडीच एकर शेतीही घेता आली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.