Agriculture Innovation: गहू काडापासून नैसर्गिक स्ट्रॉ निर्मितीचा अभिनव प्रयोग

Natural Straw Production: गव्हाच्या टाकाऊ घटकांपासून स्ट्रॉसारखे मूल्यवर्धित उत्पादन तयार करण्याची अभिनव संकल्पना भिवापूर (नागपूर) येथील भीमादेवी कृषीमित्र शेतकरी उत्पादक कंपनीने राबवली आहे.
Eco Friendly Straw
Eco Friendly StrawAgrowon
Published on
Updated on

Straw Making Process: विदर्भात खरिपामध्ये कपाशी, सोयाबीन, तूर आणि रब्बी हंगामात गहू, हरभरा ही प्रमुख पिके आहेत. हंगामाच्या अखेरीला या पिकांचे अवशेष जाळून पुढील पीक घेण्यासाठी शेत तयार केले जाते. या सेंद्रिय पदार्थाच्या जाळण्यामुळे हवेचे प्रदूषण होते. गव्हाच्या टाकाऊ घटकांपासून स्ट्रॉसारखे मूल्यवर्धित उत्पादन तयार करण्याची अभिनव संकल्पना भिवापूर (नागपूर) येथील भीमादेवी कृषीमित्र शेतकरी उत्पादक कंपनीने राबवली आहे.

गोसेखुर्द प्रकल्पा अंतर्गत पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आल्या असून, त्यांच्या सक्षमीकरणासाठी गोंडवाना विद्यापीठ (गडचिरोली) आणि विदर्भ पाटबंधारे विकास मंडळ प्रयत्न करत आहे. २०२९ पर्यंत चालणाऱ्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान शेतकरी आणि प्रशासनात दुवा (म्हणजेच कम्युनिटी मोबिलायझर) म्हणून प्रफुल्ल सरोदे काम पाहतात. भिवापूर आणि चिमूर या दोन तालुक्‍यात मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेचा लाभ या दोन तालुक्‍यांना मिळतो. या दोन्ही तालुक्‍यात सध्या तीस पाणी वापर संस्था कार्यरत असून, त्या शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहेत.

शेतकरी कंपनीची केली उभारणी

गोसेखुर्द प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना एकत्र आणत त्यांची शेतकरी उत्पादक कंपनी उभारण्यासाठी पुढाकार घेण्यातआला. त्यानुसार प्रफुल्ल सरोदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भीमादेवी कृषीमित्र शेतकरी उत्पादक कंपनी (भिवापूर, नागपूर) ची स्थापना केली. या कंपनीचे २५० भागधारक असून, शेतकरी उत्पादक कंपन्यांचा संघ असलेल्या महाएफपीसी सोबत संलग्नता घेतली आहे. त्यामुळे महाएफपीसी कडून घेण्यात आलेल्या एका कार्यशाळेमध्ये पिकांच्या टाकाऊ घटकांपासून उपउत्पादनांच्या निर्मितीची संकल्पना मांडण्यात आली. त्यातील परिसरात रब्बीतील मुख्य पीक असलेल्या गव्हाच्या काडापासून स्ट्रॉ निर्मितीच्या संकल्पनेवर लक्ष केंद्रित करण्यात आले. गव्हाच्या वेस्टवर काम करण्याचा निर्णय घेतला, असे प्रफुल्ल सांगतात.

Eco Friendly Straw
Agriculture Technology: रोबोटिक फवारणी यंत्रांचा विकास

शेतकऱ्यांना दिले जाते प्रोत्साहन

गव्हापासून स्ट्रॉ तयार करण्याच्या प्रकल्पाविषयी माहिती देताना प्रफुल्ल सरोदे म्हणाले, की यात सहभागी शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून एकरी चाळीस किलो एका विशिष्ट वाणाचे गहू बियाणे दिले जाते. त्याची किंमत २८०० ते ३२०० रुपये भरते. तसेच हंगाम अखेरीला गहू कापणीचे एकरी ४००० रुपये दिले जातात. त्या बदल्यामध्ये गहू पिकाचे सर्व अवशेष शेतकऱ्यांकडून घेतले जातात. त्या विशिष्ट वाणाची वैशिष्ट्ये आणि योग्य पद्धतीने केलेल्या कापणीमुळे अपेक्षित लांबीच्या स्ट्रॉ तयार करणे शक्य होते.

रासायनिक निविष्ठांच्या किमान वापरातही अधिक गहू उत्पादकता मिळविण्यासाठी कृषितज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. त्यासाठी ऑनलाइन संवाद साधनांचा वापर केला जातो. पहिल्या वर्षी २०२२-२३ या वर्षात २२ एकर, २०२३-२४ या वर्षात २२ एकर आणि त्यासोबतच २०२४-२५ या वर्षात ४० एकरावर हा प्रकल्प राबविण्यात आला. एका एकरातील गहू काडावरील प्रक्रियेनंतर सरासरी ६० ते ८० हजार स्ट्रॉ मिळतात. २०२५-२६ या वर्षात १०० एकरावर अंमलबजावणी करण्याचे नियोजन आहे.

अडचणीतून काढला मार्ग

भंडारा जिल्ह्यात भात पिकाच्या काढणीनंतर गव्हाची लागवड होते. मात्र, या शेतांमध्ये बियाणे फोकून लागवड करणे, पाणी साचून राहणे अशा विविध कारणामुळे अपेक्षित दर्जाचे स्ट्रॉ तयार होत नसल्याचे पहिल्या दोन प्रयोगामध्ये लक्षात आले. यात खाली ओल राहिल्याने वरील भागाची अपेक्षित लांबी मिळत नाही. तसेच त्याचा व्यासही तीन मि.मी. पेक्षा कमी मिळतो. त्यामुळे या भागात भात खाचरांऐवजी (धान बांधीऐवजी) सलग शेती असलेल्या शेतकऱ्यांकडेच हा प्रयोग करण्याचे प्रस्तावित आहे.

Eco Friendly Straw
Straw Management : पुरंदर येथे पाचट व्यवस्थापनावर मार्गदर्शन

पर्यावरणीय व सामाजिक फायदे

हे स्ट्रॉ नैसर्गिक असून, त्यामुळे प्लॅस्टिक स्ट्रॉचे पर्यावरणीय धोके टाळणे शक्य होते. शेतामध्येही गहू पीक अवशेष जाळण्यातून तयार होणारे प्रदूषण रोखले जाते. गहू कापणी मजुरांद्वारे केली जात असल्याने रोजगार मिळतो. जनावरांना चारा उपलब्ध होतो. सध्या हा प्रकल्प ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर राबविला जात आहे.

बाजारपेठ केली विकसित

गव्हाच्या उत्पादनावर साडेसात ते आठ हजार रुपये एकरी खर्च होतो. पहिल्या वर्षी उत्पादीत गहू स्ट्रॉचा वापर प्रामुख्याने ब्रॅण्डिंगसाठी नमुने म्हणून करण्यात आला. त्यांचे वाटप विविध व्यावसायिकांना करण्यात आला. त्यानंतर या नैसर्गिक स्ट्रॉची मागणी वाढत चालली आहे. दुसऱ्या वर्षीच नोएडा (उत्तरप्रदेश) मधील व्यावसायिकाला १ लाख ८० हजार स्ट्रॉ, तर पुणे येथील व्यावसायिकाला १ लाख ६० हजारावर स्ट्रॉ पाठविण्यात आल्या. या पर्यावरणपूरक स्ट्रॉची त्यांच्या मार्फत निर्यात केली जाते. सध्या कंपनीचा नफा मर्यादित असला तरी भविष्यात पर्यावरणपूरक स्ट्रॉची मागणी व निर्यात वाढण्याची अपेक्षा आहे.

उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न

सध्या स्ट्रॉसाठी खास गहू वाणाच्या लागवडीवर भर दिला जात आहे. त्यासाठी प्रोत्साहन म्हणून शेतकऱ्यांना बियाणे देणे, कापणीचा खर्च देणे यामुळे नैसर्गिक गहू स्ट्रॉ चा उत्पादन खर्च ७० पैसे इतका येतो. तो भविष्यात प्लॅस्टिक स्ट्रॉ इतका (सुमारे ४० पैसे प्रती स्ट्रॉ) कमी करणे शक्य होईल, असे सरोदे यांनी सांगितले.

...अशी आहे स्ट्रॉ निर्मितीची प्रक्रिया

हार्वेस्टरने काढणी केल्यास काड्या मोडण्याची भीती राहते. त्यामुळे मजुरांमार्फत गव्हाची कापणी केली जाते. या माध्यमातून परिसरातील मजुरांनाही रोजगार उपलब्ध होतो. काढणीनंतर गव्हाचे काड व टाकाऊ भाग हे सुरक्षित ठेवले जाते. त्यानंतरच्या प्रक्रियेत लोंब्या आणि काड्या वेगळ्या केल्या जातात. त्या तीन इंची व्यासाच्या व एक फूट लांबीच्या पाइपमध्ये भरल्या जातात. या माध्यमातून गहू स्ट्रॉची एक बॅच तयार होते. बाजारातील मागणीनुसार लांबी आठ इंच आणि व्यास तीन एमएम पेक्षा अधिक आवश्यक असतो.

त्यानुसार नियोजन केले जाते. या स्ट्रॉ सुरुवातीला थंड पाण्याने धुवून स्वच्छ केल्या जातात. त्यानंतर ६० अंश सेल्सिअस तापमानाच्या उष्ण पाण्यामध्ये टाकल्या जातात. त्यात ब्लोअरद्वारे हवा सोडून पुन्हा एकदा साफ केल्या जाता. या निर्जंतुकीकरणाची प्रक्रियेत काडीमध्ये शिल्लक असलेली खोडकिडीची अंडी, अन्य किडी बाहेर काढल्या जातात. अलीकडे या निर्जंतुकीकरणाच्या प्रक्रियेसाठी अल्ट्रासोनिक तंत्रज्ञानाचाही वापर ही केला जाऊ लागल्याचे प्रफुल्ल सरोदे सांगतात.

त्यानंतर मजुरांच्या माध्यमातून काड्यांची प्रतवारी केली जाते. एका वेळी चाकूने साधारणतः २५०० ते ३००० काड्या कापल्या जातात. मात्र आता त्यासाठी लाकडी पाटी व चाकू यांच्या साह्याने कापण्याचे तंत्र विकसित केले आहे. त्यामुळे कामाचा वेग वाढला असून, एका वेळी ४० ते ५० हजार स्ट्रॉ समान लांबीच्या कापल्या जातात. एका पाकिटात १०० स्ट्रॉ भरल्या जातात. त्याची घाऊक बाजारातील विक्री किंमत ७० रुपये आहे, तर किरकोळ बाजारात १३० रुपये मिळतात.

प्रफुल्ल सरोदे ७२०७२४७८२७

मिलिंद जोशी ९४०३९१२२३४

प्रकल्प समन्वयक तसेच सीनियर फेलो, गोंडवाना विद्यापीठ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com